Wednesday, March 30, 2011

जर भारत हरला असता तर..

काही वेळापूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना संपला. आणि कोट्यावधी भारतीयांच्या मनामध्ये असलेला विजय धोनीच्या वीरांनी खेचून आणला. सचिन नेहमीप्रमाणे त्याचा डाव खेळला. त्याचा १०० वं शतक हुकलं याची हुरहूरमात्र त्याच्या चाहत्यांना लागून राहिली. आशिष नेहराला खेळवण्याची धोनीची चाल कमालीची यशस्वी ठरली आणि नेहरासुद्धा अपेक्षांना जागला. पाकिस्तानच्या संघाने गचाळ क्षेत्ररक्षण कसं करावं याचं सुरेख प्रदर्शन केलं.

या सामन्यागोदर मिडीयावाल्यांनी किंवा दोन्ही संघांच्या चाहत्यांनी या सामन्याला अगदी युद्धाचं स्वरूप दिलं होतं. आज भारत जिंकला म्हणून ठीक आहे पण जर आपण हारलो असतो तर आत्ता जल्लोष करणाऱ्या याच चाहत्यांनी काय केलं असतं? हे युद्ध भारतीय संघ हरला म्हणून त्यांना काय शिक्षा दिली असती? आत्ता मैदानामध्ये झालेला हा जल्लोष कशामध्ये बदलला असता? पाकिस्तानी खेळाडू सुखरूपपणे हॉटेलपर्यंत गेले असते का?? त्यांना मुंबईमध्ये लोकांनी कशी वागणूक दिली असती. हा जो असंतोष असता तो अजून किती दिवस असाचं राहिला असता?? कदाचित पुढच्या विश्वचषकापर्यंत?? पुढच्या वेळेस भारत पाकिस्तानला हारवेल तोपर्यंत?? तुम्ही म्हणालं मला वेड लागलं आहे.पण स्वतःच्या मनाशी विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरे काय असली असती याचा शोध घ्या..

अर्थात भारतीय संघ अंतिम फेरीमध्ये गेला याचा मलादेखील आनंदच आहे. आणि त्यांना अंतिम फेरीसाठी माझ्या शुभेच्छा.

Sunday, February 27, 2011

थोडासा बदल

परवाकडे मी विचार केला की बरेच दिवस झाले आपण ‌ब्लॉग लिहिला नाहीये. म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझा जे सॉफ्टवेअर मी ब्लॉग लिहायला वापरतो ते ओपन केलं आणि लिहायला सुरुवात केली. काही वाक्ये लिहुन होत नाहीत तर मला एक मेसेज दिसला की तुम्हाला आता १० मिनिटे थांबावे लागेल कारण हे सॉफ्टवेअर आता मोफत नाहीये. माझा हिरमोड झाला आणि मी लगेच लिहिणे थांबवलं. माझा एक मित्र आहे चैतन्य शिवदे नावाचा. मी लगेच त्याला पिंग केलं आणि विचारलं की बाबा रे आता याला अजून काही पर्याय आहे का? त्याने मला लगेच गुगल IME बद्दल सांगितलं. आणि मला म्हणाला हे जे गुगल चा सॉफ्टवेअर आहे ते आता डाऊनलोड देखील करता येते. आणि हे तुला कदाचित तुझ्या आधीच्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त आवडेल.
मीदेखील मग लगेच त्याने दिलेल्या लिंकवर जाऊन ते सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं. गुगलवर त्याच्या वापराबद्दल थोडी माहिती वाचली. आणि सहज म्हणून लिहायला सुरुवात केली. तर खरोखर चैत्याच्या म्हणण्याप्रमाणे गूगलचे हे सॉफ्टवेअर अतिशय सोपं होतं. मी लगेच मग विचार केला का नाही मग ह्या विषयावर आपण ब्लॉग लिहुयात. आणि मी लिहायला सुरुवात केली. खरोखर हे सॉफ्टवेअर मला अतिशय सोपं आणि सुटसुटीत वाटलं.
आणि मनापासून मी आनंदी झालो. धन्यवाद गुगल. आणि अगदी चैत्या तुझे तर अगदी मनापासून आभार.

Saturday, January 22, 2011

नमस्कार..आज पुन्हा एकदा मोठ्या विश्रांतीनंतर काहीतरी लिहीत आहे.
परवाकडे एक बातमी वाचली. अमितभने त्याच्या ब्लॉगवर १००० वा ब्लॉग लिहीला.आणि पुढे मग अमिताभ ब्लॉग लिहीताना किती नियमीतपणे ब्लॉग लिहीतो. इतर लोक किंवा सेलिब्रिटीज कसे फक्त सुरुवात करतात आणि मग जसे दिवस जातील तसे कसे ते अनियमीत होत जातात याबद्दल काही चर्चा. ही बातमी वाचून माझ्या मनात आलं मीदेखील गेले काही दिवस ब्लॉग लिहीत आहे. आणि नकळतपणॆ मग मी विचार केला की आपण असे कितपत नियमीत आहोत? आणि उत्तर आलं फारसा नाही.
आणि मग मी विचार केला आपण ब्लॉग नियमीतणे न लिहीण्यामागे काय कारण असेल किंवा असू शकेल.तर कारणं बरीच सुचली.त्यापैकी काही अशी
१. मी फार बिझी असतो. अभ्यासातून वेळ मिळत नाही.
२. ब्लॉग लिहीण्यासाठी मनात काहीतरी आलं पाहिजे.
३. एखादा विषय सुचलाच तर त्यावर पुरेसं लिहू शकू का?
४. मला माझा ब्लॉग अपडेट करण्याशिवाय अजुनही पुष्कळ कामे आहेत.
५. मी करत असलेला कंटाळा.
ही कारणं पाहून माझं मलाच वाटलं आपण उगाच ही कारणं शोधून काढतो आणि कंटाळा करत राहतो. नकळत मग बच्चनजींबरोबर तुलना केली गेली. तो ६० वर्षाहून जास्त वय असलेला माणूस जर नियमीतपणॆ लिहीत असेल तर आपण का नाही.काम तर त्यालासुद्धा आहे. मग आपण हे का करू शकत नाही. मला माझ्या काही मित्रांनी शिव्यादेखील दिल्या, "गुंड्या मेलास की काय? काहीच लिहीलं नाहियेस इतक्यात." आणि मग विचार केला आपण खरचं आपण नियमीतणे लिहुयात.इथून पुढे जमेल तितकं नियमीत लिहीण्याचा प्रयत्न करेल.तोपर्यंत राम राम.

Wednesday, September 8, 2010

वेड टेनिसचं..


आज दुपारी बोपण्णा आणि कुरेशी जोडीचा सामना पाहिला. या जोडीने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मला अतिशय आनंद झाला. आणि हे सगळं पहात असतानाच माझं मन थोडं भूतकाळात गेलं. माझा मीच विचार करायला लागलो की आपण केव्हापासून हा खेळ पहायला लागलो. थोडासा विचार केल्यावर मला लक्षात आलं की अगदी लहान असताना शाळेची मधली सुट्टी असली की मी माझा आदित्य कुलकर्णी नावाचा एक मित्र आहे त्याच्या घरी जात असे. तेव्हा त्याचे आई-बाबा दोघही टेनिसचे सामने पहात बसलेले असायचे. सुरूवातीला मला काही कळायचं नाही. पण हळूहळू मला या खेळाबद्दल गोडी वाटू लागली. काही शंका असतील तर मी आदित्य किंवा त्याच्या आई-बाबांना विचारत असे. आणि एक घडी अशी आली की मला हा खेळ प्रचंड आवडू लागला.
एखादी मॅच पाहून मग त्यावर चर्चा करायला मी आणि आदित्य भेटायचो. बारावीनंतर पुण्यात आल्यावर सुरूवातीला फक्त वर्तमानपत्रातून वाचायचो. पण पुन्हा एकदा आदित्यचं कामाला आला. त्याच्या घरी टीव्ही होता. त्यामुळे एखादी मॅच असली की मी त्याच्या घरी जाऊन आम्ही दोघही ती मॅच बघत असू.
मला टेनिस कळायला लागल्यापासून आगासी, सॅम्प्रास, बेकर हे पुरूष खेळाडू तर सेलेस, ग्राफ, सॅंचेस या महिला खेळाडू हे माझे आवडीचे लोक होते. यात ईव्हानसेविकला विसरून जमणार नाही. त्याच्या त्या बिनतोड सर्व्हीसेस आणि ०-१५, ०-३०, ०-४० आणि गेम हा क्रम मी आयूष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्याची ती विंबल्डनला पॅट्रिक राफ्टर बरोबर झालेली ती मॅच जरी मला पहायला मिळाली नाही(जुन्नरमध्ये असलेल्या भारनियमनामूळे) तरी मी ती नंतर पुनःप्रक्षेपणामध्ये पाहिली होती. याबरोबर आगासी आणि सॅम्प्रास यांच्यामध्ये मैदानामध्ये असलेलं युद्ध कोण विसरू शकेल. अजूनही त्या दोघांच्यात झालेले कित्येक सामने मला आठवतात.
टेनिस म्हटलं की सुंदर मूली हे जणू समीकरण बनलं आहे. अगदी स्टेफी ग्राफपासून ते अगदी आजच्या कॅरोलीन वॉझ्नीयाकीपर्यंत अनेक सुंदर ललना या खेळात आल्या आणि गेल्या. काहींनी आपल्या खेळाने रसिकांना भूरळ घातली तर काहींनी आपल्या अदांनी आणि काहीजणींनी या दोन्ही गोष्टींनी रसिकांना भूरळ घातली.
भारताचं प्रतिनिधीत्व करणारेपण आहेत बरं या खेळात.विजय अमृतराज, लिऍंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा(तिने फारसं काही केलं नसेलसुद्धा, पण तरीही) आणि अगदी आजचे रोहन बोपण्णा, सोमदेव देवबर्मन, युकी भांबरी असे काही खेळाडू आहेत. पेस-भूपती एकत्र असताना त्यांनी दुहेरीच्या टेनिसविश्वात घातलेला धुमाकूळ कोणी कसं विसरू शकेल.
मात्र आजचं टेनिस हे फक्त ताकदीच्या जोरावर खेळलं जातयं की काय अशी शंका नदाल, मॉन्फिल्स यांना खेळताना बघून येते. पण कौशल्यावर आधारलेलं, ज्याला क्लासिक टेनिस असं म्हटलं जाते ते अजूनही आहे हे फेडररला खेळताना बघून जाणवतं.मला स्वतःला जरी फेडरर आवडत नसला तरी त्याने जे काही करून दाखवलं आहे त्याला तोड नाही.
तर असा हा टेनिसचा खेळ. कितीतरी दाखले देता येतील पण वेळेअभावी आत्ता शक्य नाहीये.
मला हा खेळ पहायला लावून या खेळाची गोडी लावणारा आदित्य आणि त्याचे आई-बाबा यांचे मी मनापासून आभार मानतो. राम राम.

Monday, September 6, 2010

नमस्कार.संपूर्ण ऊन्हाळ्याची सुट्टी माझ्या देशात भारतात घालवून मी पुन्हा एकदा या सॅम काकांच्या देशात परतलो आहे. पुन्हा एकदा अभ्यास, गृहपाठ, प्रोजेक्ट्स या जीवनाकडे मी परतलो आहे. आणि त्याचबरोबर माझ्या या ब्लॉगकडेदेखील. इथून पुढे जमेल तेव्हा वेळ काढून मी माझं मनोगत व्यक्त करत राहील. तोपर्यंत राम राम...

Wednesday, April 14, 2010

टक्कलपूराण....

आज मी थोड्याशा विचित्र विषयावर लिहिणार आहे. टक्कल...का करतात लोक टक्कल? याला तशी बरीच कारणे आहेत.कोणी काही धार्मिक कारणासाठी, कोणी दुखवटा असतो म्हणून, काही लोक अगदी डोक्यात कोंडा झाला म्हणूनसुद्धा करतात.तर काही लोक उगाच काहीही कारण नसताना स्टाइल म्हणूनसुद्धा करतात.मी माझा समावेश शेवटच्या प्रकारात करतो.
गेली - वर्षे मी चुकता वर्षातून किमान एकदा तरी टक्कल करतो.अगदी नाही जमलं तर किमान केस अतिशय बारिक करून टाकतो.का कोण जाणे पण मला हे असं आवडतं.सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ केली कि डोकं पुसायला वेळ कमी जातो.केस लहान असल्याने ते लवकर वाळून जातात.आणि याहून महत्वाचं म्हणजे केस विंचरावे लागत नाहीत.
अनेकदा मला लोक वेडा ठरवून मोकळे होतात.त्यांच्यामते हे असं टक्कल करणं फारसं सभ्यतेचं लक्षण नाही.पण मग ज्या लोकांना केसच नाहीयेत अशा लोकांचं काय? ते सगळे सभ्य नाहीत का?
बर टक्कल मी केलयं, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर माझ्याकडे बघू नका ना.केवळ तुम्ही लोक असं म्हणता म्हणून मी टक्कल करायचं नाही याला काही अर्थ नाही ना.
जसे काही लोक माझ्या या टक्कल करण्यावर आक्षेप घेतात त्याचप्रमाणे माझ्या या टक्कल करणे किंवा केस अगदी छोटे करणे याचं समर्थन करणारेसुद्धा बरेच लोक आहेत.आणि ते सगळेदेखील याच वर्गामध्ये मोडतात.यामध्ये माझे काही मित्र, काही मैत्रीणी, माझ्या बहीणी अगदी माझे वडील यांचादेखील समावेश होतो.
या टक्कल करण्याशी अनेक आठवणी जूळलेल्या आहेत.त्यातली एक इथे सांगतो.माझ्या एका मित्राने मला म्हटलं," जर तू टक्कल केलसं तर मीदेखील करेल." आता मला सवय आहे हो.मीसुद्धा त्याला हो म्हटलं.घरी गेलो आणि न्हाव्याकडे जाऊन टक्कल करून आलो. त्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की आता तूलादेखील टक्कल करावा लागेल.मला वाटलं हा कसलं करतोय टक्कल.पण नाही. ह्या मूलाचा मला एक तासाने पून्हा फोन आला आणि त्याने मला सांगितलं,"गुंड, मीसुद्धा टक्कल केलं बर का" मला खरतर पटलं नाही.पण त्याच दिवशी आम्ही एक नाटक पहायला गेलो होतो.माझा हा मित्र मला लांबून दिसला आणि त्याने खरोखर टक्कल केलं होतं.मी त्याला म्हटलं," शाब्बास रे पठ्ठ्या.जिंकलास तू." आणि पुढच्या १० मिनीटांत ह्याची आईदेखील तिथे आली. तिने त्याला आणि मला असं दोघाना इतकं झापलं की मला पण मी पून्हा टक्कल करेल की नाही यावर मला विचार करावा लागेल असं वाटून गेलं.
असे अनेक किस्से आहेत.पण हा मला जास्त आठवणीतला आहे म्हणून इथे सांगितला.तर असं हे टक्कलपूराण.आणि त्याबद्दलची माझी असलेली मते.

Monday, March 22, 2010

हर्षल देसाई....



अभियांत्रिकीसाठी मी पुण्यात आलो आणि पहिल्या वर्षी हर्षल देसाई नामक एका अजब रसायनाशी माझी ओळख झाली.मी होस्टेलला राहणारा मुलगा असल्याने आधी या माणसाबरोबर जेवढ्यात तेवढा माझा संबंध होता.याला कारण म्हणजे होस्टेलच्या सिनियर मित्रांनी लोकल मुलांपासून लांब रहायचा दिलेला सल्ला.पण दुसऱ्या वर्षी मी पुरूषोत्तम करंडकासाठी माझ्या कॉलेजच्या संघात होतो आणि हा मुलगा कधी कधी आमची प्रॅक्टीस पहायला येत असे.तेव्हा मग या मुलाबरोबर माझा संवाद व्हायला सुरुवात झाली.आणि मग नंतर नंतर असं लक्षात आलं की अरे हा तर खूप वेगळा आहे.लोकल मुलांबद्दल जे काही ऐकलं आहे त्यातलं काहीसूद्धा या माणसामध्ये दिसलं नाही मला.आणि मग हळूहळू मैत्री वाढ्त गेली.
पहिल्यांदा कोणाला भेटला तर हा इतका कमी बोलतो की समोरच्याला आपण फार जास्त बोलत आहोत असं वाटून जातं.पण ज्या लोकांशी त्याची खरोखर ओळख त्या लोकांना त्याचा हे वागणं बरोबर माहित आहे.
अभ्यासात,खेळात सगळीकडे हा असायचा. कॉलेजच्या रोबोकॉनच्या टीममध्येपण होता.पण लोकांसाठी त्याची एवढीच ओळख असावी असं मला वाटतं.पण देसाई हा एक नाटकवेडा असेल किंवा याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं कोणाला वाटलं असेल असं मला तरी नाही वाटत.नाटकामध्ये प्रचंड आवड असलेला आणि ती आवड जाणीवपूर्वक जपणारा असा हा मुलगा. सुदर्शन ला आम्ही लोकांनी कित्येक नाटकं एकत्र पाहिली आहेत.अजूनही ते दिवस आठवले की मी नॉस्टॅल्जीक होतो.कोणतही नाटक पाहीलं की त्यानंतर रात्री रूपालीमध्ये बसून कॉफी पित त्या नाटकावर सविस्तर चर्चा करायला देसाई हजर असायचा.(यासाठी कधी कधी आम्ही आक्या आणि बाजारला कलटीसुद्धा मारली आहे.) याची एक गोष्ट मला आवडली म्हणजे काहीही होऊ देत,लोक काहीही म्हणू देत देसाई स्वतःच्या मतावर ठाम असायचा.हेच चित्रपटांनाही लागू पडतं.हावरटासारखा हा चित्रपट पाहतो.याबाबतीत आम्हा लोकांना इतर लोक शिव्या देतात कारण लोकांना आवडणारे चित्रपट आम्हाला फार कमी वेळेस आवडतात.आणि मग काही विषय निघाला की आम्ही म्हणणार की नाही बुवा बेकार आहे आणि लोक म्हणणार तुम्ही वेडे झाला आहात.यावर देसाई मग अशा लोकांशी बोलायचाचं नाही.
अजून एक म्हणजे हा माणूस कधी काय करेल,कोणाला काय बोलेल याचा तुम्हाला कधीच अंदाज करता येत नाही.झेस्ट मधला beatles चा टी-शर्ट घातलेल्या माणसाचा प्रसंग, तिथेच आपल्या वर्गातल्या एका मुलीला तुमचा झालं असेल तर हा टेबल आम्हाला हवा आहे असं बेधडकपणे सांगणारा देसाई, हे काही प्रसंग नमुन्यासाठी.
असे अनेक प्रसंग आहेत, चर्चा आहेत, लिहायचा म्हटलं तर मी अजून बरचं काही लिहू शकतो.पण सगळ्याच गोष्टी इथे नमूद करणं शक्य नाहीये.कदाचित भविष्यामध्ये मला अजून काहीतरी लिहावसा वाटेल तुझ्याबद्दल तेव्हा नक्की लिहील.तोपर्यंत रजा घेतो.