अभियांत्रिकीसाठी मी पुण्यात आलो आणि पहिल्या वर्षी हर्षल देसाई नामक एका अजब रसायनाशी माझी ओळख झाली.मी होस्टेलला राहणारा मुलगा असल्याने आधी या माणसाबरोबर जेवढ्यात तेवढा माझा संबंध होता.याला कारण म्हणजे होस्टेलच्या सिनियर मित्रांनी लोकल मुलांपासून लांब रहायचा दिलेला सल्ला.पण दुसऱ्या वर्षी मी पुरूषोत्तम करंडकासाठी माझ्या कॉलेजच्या संघात होतो आणि हा मुलगा कधी कधी आमची प्रॅक्टीस पहायला येत असे.तेव्हा मग या मुलाबरोबर माझा संवाद व्हायला सुरुवात झाली.आणि मग नंतर नंतर असं लक्षात आलं की अरे हा तर खूप वेगळा आहे.लोकल मुलांबद्दल जे काही ऐकलं आहे त्यातलं काहीसूद्धा या माणसामध्ये दिसलं नाही मला.आणि मग हळूहळू मैत्री वाढ्त गेली.
पहिल्यांदा कोणाला भेटला तर हा इतका कमी बोलतो की समोरच्याला आपण फार जास्त बोलत आहोत असं वाटून जातं.पण ज्या लोकांशी त्याची खरोखर ओळख त्या लोकांना त्याचा हे वागणं बरोबर माहित आहे.
अभ्यासात,खेळात सगळीकडे हा असायचा. कॉलेजच्या रोबोकॉनच्या टीममध्येपण होता.पण लोकांसाठी त्याची एवढीच ओळख असावी असं मला वाटतं.पण देसाई हा एक नाटकवेडा असेल किंवा याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं कोणाला वाटलं असेल असं मला तरी नाही वाटत.नाटकामध्ये प्रचंड आवड असलेला आणि ती आवड जाणीवपूर्वक जपणारा असा हा मुलगा. सुदर्शन ला आम्ही लोकांनी कित्येक नाटकं एकत्र पाहिली आहेत.अजूनही ते दिवस आठवले की मी नॉस्टॅल्जीक होतो.कोणतही नाटक पाहीलं की त्यानंतर रात्री रूपालीमध्ये बसून कॉफी पित त्या नाटकावर सविस्तर चर्चा करायला देसाई हजर असायचा.(यासाठी कधी कधी आम्ही आक्या आणि बाजारला कलटीसुद्धा मारली आहे.) याची एक गोष्ट मला आवडली म्हणजे काहीही होऊ देत,लोक काहीही म्हणू देत देसाई स्वतःच्या मतावर ठाम असायचा.हेच चित्रपटांनाही लागू पडतं.हावरटासारखा हा चित्रपट पाहतो.याबाबतीत आम्हा लोकांना इतर लोक शिव्या देतात कारण लोकांना आवडणारे चित्रपट आम्हाला फार कमी वेळेस आवडतात.आणि मग काही विषय निघाला की आम्ही म्हणणार की नाही बुवा बेकार आहे आणि लोक म्हणणार तुम्ही वेडे झाला आहात.यावर देसाई मग अशा लोकांशी बोलायचाचं नाही.
अजून एक म्हणजे हा माणूस कधी काय करेल,कोणाला काय बोलेल याचा तुम्हाला कधीच अंदाज करता येत नाही.झेस्ट मधला beatles चा टी-शर्ट घातलेल्या माणसाचा प्रसंग, तिथेच आपल्या वर्गातल्या एका मुलीला तुमचा झालं असेल तर हा टेबल आम्हाला हवा आहे असं बेधडकपणे सांगणारा देसाई, हे काही प्रसंग नमुन्यासाठी.
असे अनेक प्रसंग आहेत, चर्चा आहेत, लिहायचा म्हटलं तर मी अजून बरचं काही लिहू शकतो.पण सगळ्याच गोष्टी इथे नमूद करणं शक्य नाहीये.कदाचित भविष्यामध्ये मला अजून काहीतरी लिहावसा वाटेल तुझ्याबद्दल तेव्हा नक्की लिहील.तोपर्यंत रजा घेतो.