Sunday, August 14, 2016

चौदा आण्याची गोष्ट


दादांशी कॉलेजच्या गप्पा मारताना मग त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी सांगा असा आग्रह मी केला. दादासुद्धा तयार झाले. जमेल तसा एकेक किस्सा त्यांनी सांगितला. त्यातलाच एक आज इथे मांडतोय. नेहमीप्रमाणे दादा सांगू लागले. 

" आता १०० पैशाचा रुपया होतो. आमच्या वेळेस ६४ पैशाचा किंवा १६ आण्याचा रुपया होई . २ आण्यांची चवली , ४ आण्यांची पावली तर ८ आण्यांची अधेली होत असे. अर्थात मला सांगायची गोष्ट वेगळीच आहे. एकदा भोरमामा (दादांचे मामा) थोरांदळ्याला आले होते. मामा भेटले की आम्हाला फार बरे वाटत असे. त्यांचे ते उजळ कपडे, तलम धोतर, अंगात कबजा (एक प्रकारचे जॅकेट) असा त्यांचा थाट असे. आले की प्रत्येक वेळी आम्हाला ते पैसे देत असत. कबजाच्या खिशात हात घालून ते पसाभर नाणी काढत तेव्हा आमचे डोळे विस्फारत असत. त्या भेटीमध्ये मामांनी आम्हा भावंडांना एक आख्खा रुपया दिला. अर्थात देताना त्यांनी तो बाईच्या (दादांची मोठी बहीण - तिला सगळे बाईच म्हणतात) हातात दिला. त्या रुपयातून बाईने दोन आण्याचा खाऊ घेतला. काय ते आता मला आठवत नाही पण तेव्हा एक पैशाला पाच गोळ्या मिळत - रेषारेषांच्या. उरलेल्या चौदा आण्यांची (आताचे ८७ पैसे) बाईने पुरचुंडी बांधली आणि आम्ही दोघं कुमजाईत (गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या मळ्याचे नाव) रताळी खणायला गेलो. रताळी खणत असताना बाईने पैशाची पुरचुंडी माझ्याकडे दिली. बाई रताळी खणायची आणि मी गोळा करायचो. एक वाफा खणून झाला आणि बाई दमली. थोडी बसली आणि नंतर रताळ्यांचे ते घमेलं उचलून आम्ही परत घरी निघालो. घमेलं अर्थात तिच्या डोक्यावर. ती मोठी होती ना!! प्रत्येक वेळी बिचारीला ते मोठेपण असे वहावे लागे. 

बरेच अंतर गेल्यावर तिने मला पैशाबद्दल विचारले आणि मी हादरलो. माझ्याकडून पुरचुंडी कुठेतरी हरवली होती. पण बाई आता मारते की काय अशी भीती मला मुळीच वाटली नाही. आम्हा सगळ्या भावंडांना बाईची भीती कधीच वाटली नाही. उलट तिचा फार मोठा आधार वाटे. अजूनही वाटतो. पण आता ती किंचितही खटटू झाली तर मात्र भीती वाटते. 

आम्ही दोघंही शेताच्या दिशेने पळत निघालो. आधीच खणलेला वाफा बाईने परत एकदा सगळा खणला. अखेरीस चौदा आणे सापडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. चौदा आणे नव्हे तर आमच्यासाठी त्यावेळेस ते ब्रह्मांडच होते जणू. दोघंही खुश झालो आणि घरी परतलो. आजही चौदा आण्याची गोष्ट आठवली की बाई आणि माझे डोळे पाणावतात. चौदा आण्याला आज काहीच किंमत नाही पण त्यावेळेस त्याला किती किंमत होती हे आमचे आम्हीच जाणोत. अशा छोट्या छोट्या प्रसंगांनी आम्हा भावंडांना खूप काही शिकवले. खासकरून माझे आणि बाईचे भावाबहिणीचे नाते अजूनच घट्ट केले."

आदित्य 

Saturday, August 6, 2016

अमेरिकेतील काही आठवणी

२००९ च्या ऑगस्ट महिन्याच्या २ तारखेला मुबईहून अटलांटाला जाणाऱ्या विमानात मी बसलो. आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास होता. तोही एकदम अमेरिकेत. घरच्यांना थोडी काळजी होतीच. साधारणपणे १७ तासांच्या सलग प्रवासानंतर मी अटलांटा विमानतळावर पोहोचलो. तिथून मग पुढची अजून एक फ्लाईट पकडून फायनली कॅन्सस सिटीच्या विमानतळावर पोहोचलो. 

मॅनहॅटन नावाच्या छोट्या गावामध्ये माझी युनिव्हर्सिटी होती. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी. जुन्नरहून मी पुण्याला आलो होतो.पुण्यात ५ वर्षे काढली. आणि आता एकदम मॅनहॅटन सारख्या छोट्या गावात येऊन पडलो. पुढची २ वर्षे आपल्याला इथेच काढायची आहेत हि खूणगाठ मनाशी बांधली. माझ्या अनेक मित्रांना मी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन मध्ये राहतो असे वाटत असे. मीही त्यांना फारसं स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडत नसे. 

मॅनहॅटन तसं फारच छोटं गाव. कॅन्सस या राज्यामध्ये कॅन्सस आणि बिग ब्लु या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं. लोकसंख्या साधारण लाखभर पण त्यातले बहुसंख्य विद्यार्थी. अशा ठिकाणी दोन वर्षे काढायची म्हणजे तसं अवघड होतं. इथे विद्यार्थी म्हणून आलेले किंवा अमेरिकेत विद्यार्थी म्हणून जवळपास सगळ्यांना येणारे काही अनुभव इथे सांगावेसे वाटतात. 

१. सुरुवातीच्या १-२ महिन्यात आपण विकत घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या किमतीला आपण ६५ (सध्याचा डॉलर रेट) ने गुणतो. आणि मग अरे नको फार महाग आहे म्हणून परत ठेवून देतो. मला आठवतंय पॅराशूट तेलाची छोटी बाटली ३.५ डॉलरला होती. केवळ महाग आहे म्हणून मी टी घेतली नव्हती. अर्थात एखाद महिन्यानंतर सवय होते आणि डॉलरमध्ये विचार करायला लागतो आपण. 

२. विद्यार्थी म्हणून किंवा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडून ऑनसाईट आलेला असाल तरी प्रत्येकाला स्वयंपाक हा करावाच लागतो. नसेल येत तर मग भांडी घासायची तयारी असली पाहिजे. सुरुवातीला जरी अशी तयारी असली तरी काही दिवसांनी भांडी घासायचा खरोखर कंटाळा येतो. मी स्वतः स्वयंपाक करायला शिकण्याआधी ४-५ महिने फक्त भांडी घासत होतो. आता वाटतं स्वयंपाक करायला शिकून चूक काही केली नाही. 

३. कॅन्सस हे राज्य अमेरिकेमध्ये मिडवेस्ट पट्ट्यात येते. आपल्याकडे जसे कोकणपट्टा, विदर्भ, मराठवाडा असे विभाग आहेत तसेच अमेरिकेतसुद्धा आहेत. या देशात तर वेगवेगळे टाईम  झोन आहेत. मग त्यात ईस्टर्न टाईम, सेंट्रल टाईम, माऊंटन टाईम असे प्रकार आहेत. सांगायचा मुद्दा हा या मिडवेस्ट प्रातांतले लोक मला फार मनमिळाऊ वाटले. रस्त्यावरून जाताना कोणी दिसलं तर ओळख असो नसो ते तुमच्याकडे पाहून हसणार. "Hey, How are you doing?" असं विचारून तुमच्या उत्तराची वाट ना पाहता पुढे चालू लागणार. या सगळ्याचं सुरुवातीला आश्चर्य वाटलं मला. मग सिनियरला विचारलं तेव्हा त्याने काय नक्की फंडा आहे ते समजावून सांगितलं. 

४. लोकांना भारताबद्दल प्रचंड उत्सुकता असते. दिल्लीमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे नाही तर एक चांगला देश म्हणून भारताकडे बघणारे लोक जास्त आहेत. अशा वेळेस किंवा भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत साजरा करताना आपण भारतीय असल्याचा फार अभिमान वाटतो. 

५. आपले सण साजरे करायला मजा येते. बऱ्याच ठिकाणी दिवाळी, नवरात्री हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. पण नेमकं त्याच दरम्यान घरच्यांशी स्काईपवॉर कॉल होतो आणि घरची आठवण मन अस्वस्थ करते. 


६. तुमचा लॅपटॉप हा तुमची लाईफलाईन असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. लोक अक्षरशः त्यांच्या लॅपटॉप बरोबर झोपतात. सकाळी उठल्याबरोबर लॅपटॉप उघडून इमेल, फेसबुक, बातम्या चेक करतात आणि मग दिवस सुरु होतो. अलीकडे लॅपटॉपची जागा आयपॅडने घेतलेली दिसते. 

७. आपण स्वतः दुसऱ्या देशातून अमेरिकेत शिकायला आलेलो असल्याने, बाकी कोणकोणत्या देशातून इथे विद्यार्थी येतात याची आपोआपच माहिती होते. प्रत्येक देशाच्या विद्यार्थ्यांची एक ऑरगनायझेशन असते. बऱ्याचदा तुम्ही इतर देशांच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांना जाऊन बसता. 


८. जगात कुठेही गेला तरी भारतीय माणूस क्रिकेट खेळल्यावाचून राहू शकत नाही. मग अगदी घरातल्या छोट्याश्या जागेत का होईना क्रिकेट खेळायला मार्ग शोधला जातो. मोठ्या शहरांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान असे सामने देखील होतात. बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळायला बेसबॉलच्या मैदानाचा वापर केला जातो. २०११ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला तेव्हा केलेला जल्लोष अजूनही आठवतो मला. 

९. अमेरिकेत आलात म्हटल्यावर अमेरिकन लोकांच्या आवडीनिवडी कळणारच. अमेरिकन फुटबॉल हि त्यातलीच एक गोष्ट. अमेरिकन फुटबॉल न आवडणारा अमेरिकन माणूस शोधावा लागेल इतका हा खेळ इथे लोकप्रिय आहे. एखाद्या अमेरिकन माणसाबरोबर संवाद साधण्यासाठी अमेरिकन फुटबॉलचा ice breaker म्हणून छान वापर करता येतो. 

माझा मॅनेजर हा एक फुटबॉल खेळाडू होता. मग त्याचे लक्ष कामावरून जरा दुसरीकडे करण्यासाठी मी आणि माझा सहकारी फुटबॉलबद्दल बोलत असू. आपसूकच तो आमच्या चर्चेमध्ये सामील होत असे. 

१०. विद्यार्थी असताना उन्हाळे अतिशय आळसावलेले असतात. कॉलेजला सुट्टी असते. रिसर्चचं काम असलं तरी समर असल्याने तुमचा प्रोफेसरसुद्धा थोडी सूट देतो तुम्हाला. याच दिवसांमध्ये मग बरंच फिरणं होतं. बरेच चित्रपट, मालिकांचे एपिसोडच्या एपिसोड एकामागोमाग एक पहिले जातात. त्याबद्दल मग मित्रांमध्ये शेखी मिरवली जाते की मी अमुक एक सिरीजचे अमुक सीझन्स एका रात्रीत संपवले आणि अजून काय काय. 

११. ट्रॅफिकचे नियम पाळण्यावाचून पर्याय नसतो. इथल्यासारखी चिरीमिरी देऊन प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होऊन तुरुंगाची हवा खाण्याची वेळीसुद्धा येऊ शकते. बर नियम मोडल्यानंतर भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम प्रचंड असते त्यामुळे तसं न केलेलं जास्त शहाणपणाचं ठरतं. 

१२. अमेरिकेत गाडी चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची पद्धत आहे. पादचारी रस्ता क्रॉस करत असतील तर वाहने थांबून राहतात. भारतात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस असं केल्याबद्दल मी शिव्या खाल्ल्या आहेत. 

१३. तुम्ही थँक यु म्हणायला शिकता. अमेरिकेत शिकलेली  ही एक फार चांगली गोष्ट. येता जाता तुम्ही तुमच्यासाठी एखाद्याने केलेल्या छोट्या गोष्टीसाठीसुद्धा मनापासून थँक यु म्हणता. समोरच्याला सुद्धा बरं वाटतं. 

१४. अमेरिकेतील सेल हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. इथे लेबर डे, ब्लॅक फ्रायडे, ख्रिसमस अशा प्रसंगी मोठे सेल लागतात, या सगळ्यांत ब्लॅक फ्रायडेचा सेल सगळ्यात जास्त प्रसिद्ध. तो यासाठी की या सेलसाठी लोक १-२ दिवस आधीच रांगा लावायला सुरुवात करतात. यात फक्त आपलेच नाही तर अमेरिकन लोकसुद्धा असतात. बरं एकदा रांग लागली के ती शिस्त मात्र कोणी मोडत नाही. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी अगदी कचऱ्याच्या भावात मिळतात असं म्हटलं तरी चालेल. मग घरी येऊन भारतामध्ये असे सेल होणं कसं शक्य नाही वगैरे गप्पा मित्रांबरोबर मारल्या जातात. 

१५. वडा पाव, पाणीपुरी, भेळ असे रस्त्यावर मिळणारे पदार्थ अचानक दुर्मिळ होतात. आणि मग भारतीय जेवण कसं जगातलं भारी जेवण आहे यावर चर्चा झोडल्या जातात. 


१६. परीक्षांमध्ये कॉपी करण्याचा विचारसुद्धा तुमच्या मनाला शिवत नाही. कारण होणारे परीणाम खूप गंभीर असतात. चंबूगबाळ उचलून देशात परत येण्याची वेळ येऊ शकते. बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेस वर्गात पर्यवेक्षकदेखील नसतात. तरीही कोणी कॉपी करत नाही. आपल्याकडे हे कदापि शक्य नाही. 

१७. तुम्ही सहसा सगळे लेक्चर्स अटेंड करता. आपल्यासारखे प्रायव्हेट क्लासेस नाहीत तिकडे. त्यामुळे एकदा शिकवलेलं कळलं नाही तर होणारा त्रास जास्त असतो. 

१८. नकळतपणे तुमच्या इंग्लिश बोलण्याला अमेरिकन अक्सेंट येतो. आणि मग तुमचे भारतातले मित्र तुम्हाला तसे सांगतात आणि तुम्ही सतत ते नाकारत राहता. 

१९. तुम्ही भलेही मॅनुफॅक्चरिंग इंजिनियर असाल पण अमेरिकन लोकांसाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियरच असता. 


२०. भारतीय विद्यार्थी राहत असलेल्या प्रत्येक घराच्या टॉयलेटमध्ये एक मग असतो. आपल्याकडे टॉयलेट पेपर सहसा वापरला जात नाही म्हणून. 

मला खात्री आहे मी वर लिहिलेल्या मुद्द्यांशी अमेरिकेत शिकायला गेलेला प्रत्येक विद्यार्थी सहमत असेल . या यादीमध्ये अजूनही काही गोष्टी मी ऍड करत राहीन. सध्या थांबतो