Sunday, July 9, 2017

सायकलचोरीची गंमत

पुण्यात असताना आई दादा डेक्कनला रहायला होते. दादांची बँक भवानी पेठेत होती. डेक्कनहून भवानी पेठेत जायला लांब पडे म्हणून दादांनी सायकल घ्यायची ठरवलं. त्यासाठी बँकेतून कर्ज काढून ४२४ रुपयाला सायकल घेतली. कर्जाचा २५ रुपये हफ्ता पगारातून कापला जाई. पुढे जुन्नरला बदली झाल्यावर दादांनी सायकलसुद्धा जुन्नरला नेली. आयुष्यातली पहिली मोठी खरेदी असल्याने दादांचा विशेष जिव होता सायकलवर. 

जुन्नरला असताना बँकेची शाखा सय्यदवाड्यात होती. तिथले लोक हिंदीमध्ये बोलताना मात्र वाडा न म्हणता "बाडा" असा उल्लेख करत. बँक घरापासून फार लांब नव्हती. त्यामुळे दादा पायीच जात असत. सायकल घरीच असे. एकदा त्यांच्या मनात आलं, "आज सायकलवर बँकेत जाऊयात." बँकेत पोहोचल्यावर त्यांनी दारासमोरच्या भिंतीला सायकल लावली. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आले. घरी येताना आपण आज सायकल घेऊन गेलो होतो हे त्यांच्या लक्षात राहिलेच नाही. जेवण करून बिनधास्त झोपलेसुद्धा ते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना लक्षात आलं की आपली सायकल बँकेतच विसरली आहे. पण अगदी पहाटे जाऊन काही होणार नव्हते. "नंतर बघू" असा विचार करून सगळं आटोपल्यावर मग दादा बँकेत गेले. पाहतात तर सायकल गायब. दादांना धक्का बसला पण स्वतःला सावरून त्यांनी आवाज चढवला,

"यहाँ मेरी सायकल थी. कौन लेके गया?" 

दादांचा मोठा आवाज ऐकून सय्यदवाड्यातले लोक चक्रावले. कारण वाड्यात असे होणे शक्य नव्हते. लोक गरीब होते पण चोर नव्हते. 

"शामतक मेरा सायकल नही मिला तो देखो. मै बराबर देखेगा!!" दादा संतापात जवजवळ ओरडलेच. 

दादांचा पारा चढलेला पाहून २-३ जणांनी जवळ येऊन चौकशी केली. त्यांना दादांनी घडलेला प्रकार सांगितला. 

"सायकल नही मिला तो बाडेकी बदनामी होगी!!" असं बोलून दादा बँकेत गेले. बरीच वर्षे जुन्नरला असल्याने सय्यदवाड्यातले लोक दादांना चांगले मानत. त्यामुळे आता काहीतरी होईल अशी आशा दादांना होती. 

दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास एक पोरगं नाक ओढत दादांकडे आलं आणि म्हणालं,

"साब, ये चाबी लो. सायकल बाहर लगाया है."

दादांना इतका आनंद झाला की त्यांनी पटकन खिशात हात घालून पाच रुपयाची नोट काढली आणि त्या पोराला दिली. 

सायकल चोरीला जाऊनही केवळ बाड्यातले लोक म्हणून ती परत मिळाली असं दादा अजूनही सांगतात. त्या दिवशी मात्र दादांनी न चुकता दुपारीच सायकल घरी नेली. हा किस्सा मात्र आमच्या सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहिला.