Friday, September 5, 2014

गणेशोत्सव

बरेच दिवस खरे तर गणेशोत्सवाबद्दल लिहावं असा विचार करत होतो. आज अखेरीस मुहूर्त लागला. गणपती येणार म्हटलं की आपल्या आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य आल्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. ह्या ब्लॉगच्या निमित्ताने जुन्नरच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणी जागविण्याचा प्रयत्न करतोय

आमच्याकडे घरी गणपती नसे. पण माझ्या आत्त्याच्या घरी गणपती बसवायला आम्ही तिन्ही भावंडे जात असू. अगदी मूर्ती ठरवायला जाण्यापासून ते घरी सजावट करणे इथपर्यंत मी रवी दादाला मदत करत असे. थोडा कळत्या वयाचा झाल्यावर गणपती घरी आणल्यानंतर प्रतिष्ठापना करताना त्या वेळच पौरोहित्य देखील मीच करत असे. या सगळ्यात का कोण जाणे एक वेगळीच मजा वाटे.आत्याच्या घरच्या गणपतीबरोबर पेठेतल्या आम्हा सगळ्या लहान मुलांच्या मंडळाचा देखील गणपती असे. त्यासाठी मग वर्गणी गोळा करायला रोज संध्याकाळी आम्ही सगळे जात असू. यावर्षी काय काय करायचं, कोणत्या स्पर्धा भरवायच्या, मूर्ती कशी आणायची, अध्यक्ष कोण, खजिनदार कोण या सगळ्या प्रश्नांवर त्यावेळेस भरपूर खलबते केली जात. गणपती आल्यानंतर ठरलेले सगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सगळेजण तितकेच कष्ट करत

शाळेतही गणपती असे. मग पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना झाल्यानंतर कुलकर्णी सरांनी पाठ करून घेतलेलं अथर्वशीर्ष सगळे विद्यार्थी म्हणत असत. त्यावेळेस पाठ झालेलं अथर्वशीर्ष आजही रोज आंघोळ करताना अगदी तसच्या तसं म्हणताना फार बरं वाटत. गणपती म्हटला की शाळेत लेझीम असे. मुलींकरता टिपऱ्या असतं. गणपती सुरु होण्याच्या साधारण महिनाभर आधी लेझीम पथकाचा सराव सुरु होत असे. रोज शाळा सुटल्यावर हा सराव ढमाले सर करून घेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस सबंध जुन्नर शहरातून आम्ही लेझीम खेळत जात असू. त्यावेळेस रस्त्याच्या आजुबाजूला उभे असलेल्या लोकांच्या, पालकांच्या कौतुकाने भरलेल्या नजरा आठवल्या की आजदेखील मोठा आनंद होतो. ढमाले सरांचा विसर्जन मिरवणुकीचा जोश काही न्याराच असे. खत्री पेढेवाल्याच्या दुकानासमोर शेवटची सलामी द्यायला आम्ही तिथे पोहोचलो की सर ढोल स्वतःच्या हातात घेत. एकदा त्यांनी ढोल हातात घेतला की तो ढोल फुटेपर्यंत ती सलामी चालत असे. सरांचा तो त्वेष पाहून आम्ही सगळे भान हरपून लेझीम खेळत असू.आणि मग वेध लागत ते विसर्जन केल्यानंतर मिळणाऱ्या डाळीच्या खिरापतीचे. सगळ्या विद्यार्थ्यांना पुरेल एवढी खिरापत तयार केली जात असे आणि अगदी डबे भरून ती दिली जात असे

इतकी सगळी मजा झाल्यानंतरदेखील दहाव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीचे वेध लागलेले असतं. त्या दिवशी भरपूर वेळ बाहेर राहायला मिळावं म्हणून मी आधीचे दिवस मी शक्य तेवढा जास्त वेळ अभ्यासाला देत असे. आणि मग अखेरीस दहावा दिवस आला की अगदी सकाळीच कल्याण पेठेच्या चौकात आम्ही जात असू. आत्ता अलीकडे लोकप्रिय झालेल्या स्पिकरच्या भिंती त्यावेळेस नसत. त्या वेळेस असत ते रांगडे ताफे. जुन्नरच्या आसपासच्या छोट्या गावागावानी असे ताफे असत. त्यांना विसर्जन मिरवणुकीच्या सुपाऱ्या दिल्या जात असत. तंबाखूचा किंवा गुटख्याचा एक तोबरा तोंडात भरून ह्या गावरान मंडळीनी एकदा ढोल ताशे बडवायला सुरुवात केली की ते तासनतास थांबत नसत. आज पुण्यातली १०-१२ ताशे आणि ३०-४० ढोल असणारी पथके जितका आवाज करतात तेवढाच किवा त्याहून तसुभर जास्तच आवाज हे लोक - ताशे आणि १५-२० ढोलांच्या मदतीने करत असतआणि त्या तालावर आम्ही सारे बेभान होऊन मोरया मोरया असा गजर करत नाचत असू. नकळत्या वयातले नाचातानाचे अंगविक्षेप मान्य करताना आजदेखील लाज अशी वाटत नाही. दिवस पुढे सरेल तशी मिरवणूक पुढे सरकत असे. रविवार पेठेतून शनिमंदिराच्या चौकात मिरवणूक पोहोचली की आमचा मित्र विनायकच्या आईने केलेल्या बटाटे वड्यांवर ताव मारायला आम्ही जात असू. विनायकचे १०-१२ आणि त्याचा भाऊ गणेशचे १०-१२ असे जवळजवळ २०-२२ जण या साऱ्यांना विन्याची आई आग्रह करकरून वडे खाऊ घालत असे. हे सगळं संपत असताना गणपती मशिदीजवळ कधी जातोय याची सगळे वाट पाहत असत. मानाचा पहिला रविवार पेठेचा गणपती मशिदीजवळ गेला की जवजवळ सगळ्याच पेठांची मुले तिथे जमा होत असत. ताफ्यावाल्याना त्या अगोदर विशेष खुराक पुरवला जात असे.कडक पोलीस बंदोबस्तात मशिदीजवळ ताशांचा गजर सुरु झाला की नकळतपणे साऱ्यांच्याच अंगात एक खुमखूमी जागत असे आणि देहभान हरपून सारेजण मोरयाचा उच्चार करत नाचत असत. तिथे मग सगळेच एकेमेकांचे मित्र असत. तिथे वयाचे बंधन नसे. तरुणांच्या उत्साहाला आवर घालताना जेष्ठांच्या नाकी नऊ येत असत. काही छोट्या मोठ्या मारामारीचे प्रसंग देखील उद्भवत असत. पण ते तेवढ्यापुरते असे. एकदा तिथून मिरवणूक पुढे सरकली की मग एकदम नगरपरिषदेसमोर शेवटचा डाव होऊन बाप्पाला निरोपासाठी नदीवर नेले जात असे

कालानुरूप मिरवणुकीचे स्वरूप पालटले. हल्ली सुरक्षिततेचे कारण देऊन मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न असतो. तो निश्चितच स्तुत्य आहे. पण हे सगळे करत असताना विसर्जन मिरवणुकीची मजाच लोकांना घेत येणार नाही अशी पावले उचलली जाणार नाहीत ही खबरदारी पोलिस आणि गणेश मंडळे घेतील एवढी एक माफक अपेक्षा



टिप - सदर छायाचित्र माझा मित्र अतुल काजळे (टिटू) याच्या ढोल ताशे अल्बम मधून साभार




Tuesday, August 26, 2014

रमा माधव

परवा रमा माधव हा मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेला चित्रपट पाहिला. हा ब्लॉग लिहायला थोडासा उशीर झालाय खरं तर. कारण एव्हाना बऱ्याच जणांनी हा चित्रपट पाहिला असेल. चित्रपट पाहायला जाताना काही अपेक्षा बरोबर घेऊन गेलो होतो. चित्रपट संपून बाहेर आल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असं बिलकूल वाटलं नाही. 

चित्रपटाची सुरुवात रमा आणि माधव यांच्या लग्नापासून होते. छोटी रमा शनिवारवाड्यावर येते. वाड्यात प्रवेश करताना तिच्या वयाला शोभेल असा उखाणा घेते. आणि मग तिथून ते अगदी चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत दिग्दर्शिकेने पात्रांची ओळख करून दिली आहे. स्वामी अनेकदा वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर हा सगळा प्रवास ३ तासांत मांडणे हे मोठं शिवधनुष्य आहे याची कल्पना आली होती. आणि दिग्दर्शिकेने ते पेलले याबद्दल कौतुकही वाटले होते. पण जसजसा चित्रपट पुढे सरकू लागला तसा माझा हिरमोड व्हायला सुरुवात झाली. मला खटकलेले आणि आवडलेले काही मुद्दे. 

१. चित्रपटाची मांडणी करताना पात्रांची ओळख करून देणे ही गरजेची बाब दिग्दर्शिकेने फारच मनावर घेतल्यासारखे वाटले. अर्धा चित्रपट या सगळ्या पात्रांची ओळख करून देण्यात आणि काहीशी पार्श्वभूमी सांगण्यात संपतो. दिग्दर्शिकेला नेमकं रमा माधव यांच्यातले प्रेम दाखवायचे आहे की पेशवाई दाखवायची आहे असा गोंधळ उडाला आहे असे वाटले. 

२. पेशव्यांचा इतिहास किती मोठा आहे हे मी सांगण्याची गरज नाही. पानिपतच्या लढाईचे पेशव्यांच्या इतिहासामध्ये असलेले महत्व साऱ्यांनाच ठाउक आहे. ही लढाई चित्रपटामध्ये दाखवायचा अट्टाहास दिग्दर्शिकेला आवरता आला असता. ही लढाई दाखवायची होती तर त्याची भव्यता देखील दाखवणे गरजेचे होते याचा दिग्दर्शिकेला कुठेतरी विसर पडला असावा अशी शंका आली. ५-५० लोकांमध्ये पानिपतची लढाई दाखविण्याची चूक दिग्दर्शिकेने केली असं वाटून गेलं. 

३. पेशव्यांचे वैभव मी काय सांगावे. नितीन देसाई यांच्यासारखा नावाजलेला कला दिग्दर्शक असल्याने पेशव्यांचे वैभव, त्याची भव्यता पहायला मिळेल अशी अपेक्षा होती. ती पूर्ण करण्यात देसाई माझ्या दृष्टीने अपयशी ठरले आहेत.

४. शिवाजीराजे, संभाजीराजे यांच्या भूमिका साकारल्यानंतर सदाशिवराव भाऊंची काहीशी दुय्यम भूमिका साकारण्याची तयारी दाखविल्याबद्दल डॉ. अमोल कोल्हे याचे कौतुक करावेसे वाटले. 

५. आनंदीबाईची ओळख सामान्य लोकांना कपटी अशीच आहे. पण या चित्रपटामध्ये तिची भूमिका काहीशी वेगळी दाखविण्यात दिग्दर्शिका यशस्वी ठरली आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या मराठीवर मेहनत घेतल्याचे जाणवते. 

६. राघोबादादांची भूमिका साकारताना प्रसाद ओकने कमाल केली आहे. पेशवाईची गादी आपल्याला न मिळता आपला पुतण्या माधारावला मिळाल्यानंतर त्याचा झालेला संताप, त्या रागातून उफाळलेल्या सूडबुद्धीने त्याने केलेली कटकारस्थाने ही त्याने सुंदर साकारली आहेत. 

७. आलोक राजवाडे या तुलनेने नव्या कलाकाराने माधवराव सुंदर साकारला आहे. या चित्रपटासाठी त्याने तलवारबाजी आणि घोडसवारीचे खास धडे घेतल्याचे कुठेतरी वाचनात आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे प्रत्यंतर आले. पर्ण पेठेने रमेची भूमिका बरी साकारली आहे. दिग्दर्शिका तिला कदाचित एक अभिनेत्री म्हणून आणखी वाव देऊ शकली असती. 

एकुणात हा चित्रपट पाहण्याचा अनुभव फारसा आनंददायी ठरला नाही हेच खरे. चित्रपट संपल्यानंतर  बाहेर येताना गेल्या काही दिवसांत आलेल्या आणि येत्या काही दिवसांत येणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या पाहिली आणि मराठी चित्रपट मोठा होतोय अशी एक सुखद जाणीव झाली आणि गेलेला मूड काहीसा परत आला.

Wednesday, August 6, 2014

पोष्टरबॉईज

अगदी अलीकडेच लयं भारी या मराठी चित्रपटाबद्दल लिहिल्यानंतर पुन्हा एकदा इतक्या लवकर एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल लिहावसं वाटेल असं वाटलं नव्हतं. पण श्रेयस तळपदे आणि समीर पाटील च्या पोष्टरबॉईज पाहिला आणि त्याबद्दल लिहायला सुरुवात केली.

चित्रपटाचे प्रोमोज पाहून लक्षात आलं होतं की हा चित्रपट विनोदी असणार आहे आणि तो अंदाज खरं ठरला. भारतामध्ये वाढती लोकसंख्या हा फार गंभीर विषय आहे. ही वाढती लोकसंख्या थांबवण्यासाठी सरकारतर्फे पुरुषांसाठी नसबंदीच्या शस्त्रक्रियेची जाहीरात केली जाते. माझ्या माहितीप्रमाणे ही शस्त्रक्रिया सरकारतर्फे माफक दरात करून मिळते. पण ज्या पुरुषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली त्यांच्याकडे आपल्याकडील लोक फार चांगल्या नजरेनं पाहत नाहीत. जणू काही त्या माणसाने एखादा गंभीर गुन्हा केला आहे या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं जातं. आता ही अशी परिस्थिती असताना नसबंदीच्या जाहिरातीच्या पोस्टरवर जर एखाद्याने तुमचा फोटो तुम्हाला न विचारता छापला तर?

नेमकं हेच या चित्रपटाचं कथानक आहे. दिलीप प्रभावळकर, हृषीकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या चित्रपटाच्या तीन नायकांबद्दल हेच घडलं आहे. नसबंदीच्या जाहिरातीवर या तिघांचे फोटो छापून आल्याने त्यांच्या आयुष्यात आलेले बिकट प्रसंग आणि त्यातून वाट काढताना निर्माण झालेले विनोदी प्रसंग दिग्दर्शकाने सुरेख हाताळलेले आहेत. चित्रपटा विनोदी करताना त्यात विनोदाची अतिशयोक्ती होणार नाही याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतलेली आहे. त्याबद्दल त्याला १०० गुण.

दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबद्दल मी न बोललेलंच बरं नाही का? मिळालेली कुठलीही भूमिका सहजरीत्या कशी करावी याचा धडाच ते देतात. हृषीकेश जोशी हा अभिनेता गेल्या काही दिवसात आठवणीत राहतील अशा भूमिका करतो आहे. या चित्रपटामधील त्याने साकारलेली मास्तरांची भूमिका चांगली लक्षात राहते. समोरच्याने बोलताना बरोबरच बोलावे यासाठी प्रसंगी तो मुख्यमंत्र्याचीसुद्धा चूक सुधारायला पुढेमागे पाहत नाही. या दोन तगड्या अभिनेत्यांसमोर अनिकेत तसा नवखा. पण त्याने आपल्या परीने त्याच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. गावरान तरुणाची चुकीचं इंग्रजी बोलण्याची त्याची सवय लक्षात राहते. रोहित शेट्टी, अन्नू मलिक, फराह खान, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या पाहुण्या भूमिका जमल्या आहेत. श्रेयस तळपदेने साकारलेली मुख्यमंत्र्याची भूमिका छोटी असली तरी त्याला ती जमली आहे. लेस्ली लुईसचं संगीत चित्रपटाच्या शेवटी असलेलं गाणं सोडलं तर फारसं लक्षात राहत नाही.

चित्रपट विनोदी असला तरी नसबंदी, स्त्री-पुरुष समानता, सामान्य माणसाने ठरवलं तरी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देण्याची त्याची असलेली ताकद असे काही विधायक विचारदेखील दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या नकळतपणे मांडलेले आहेत. एकुणात दमदार कलाकारांना साथीला घेउन हे विनोदी कथानक समीर पाटीलने चांगल फुलविलेल आहे. मसालेदार हिंदी चित्रपट पाहण्याबरोबर असा एखादा चांगला मराठी चित्रपट बघायला काहीच हरकत नाही. 

Sunday, July 13, 2014

लयं भारी

टाईमपासनंतर आज बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपट पाहण्याचा योग आला. आला म्हणजे मी घडवून आणला. गेले काही दिवस सगळीकडेच लयं भारी चित्रपटाची प्रसिद्धी चालू होती. मी अगदी ठरवून टाकलं होतं की हा चित्रपट पाहायचाच म्हनून. ठरवल्यानुसार गेलोदेखील.

चित्रपटाची सुरुवातच ढोल ताश्यांच्या गजरात होते. ही अशी सुरुवात पाहून फेसबुकवर स्टेटस अपडेट करायचा मोह मला आवरला नाही. तद्दन मसालेदार चित्रपट म्हणता येईल असा हा चित्रपट. सुरुवातीपासून चित्रपट प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेतो. भरपूर हाणामाऱ्या, लक्षात राहतील अशी गाणी आणि सोबतीला असणारं त्यातल्या त्यात बरं कथानक अशा सगळ्या गोष्टी असल्या की सामान्य प्रेक्षकाला चित्रपट नक्की आवडतो हे निशिकांत कामतला बरोबर कळलेलं आहे आणि त्याने नेमका त्याचाच वापर केला आहे.

आता थोडंसं रितेश देशमुखबद्दल. गेल्या काही दिवसात या माणसाने मराठी चित्रपटासाठी काहीतरी करायचं हे ठरवलेलं दिसतंय. बालक पालक, टाईमपास अशा चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर रितेशने स्वतःच मराठी चित्रपटात काम करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्याने निशिकांत कामतसारख्या गुणी दिग्दर्शकाची निवड केली. या चित्रपटाचे प्रोमो पाहूनच मला वाटलं होतं की यात काही वेगळ नसलं तरी रितेश देशमुखसाठी हा चित्रपट मैलाचा दगड नक्की ठरणार आहे. आणि त्यात काही चुकीचं आहे असं हा चित्रपट पाहून मला बिलकुल वाटत नाही. मिळालेल्या संधीचं रितेशने सोनं केलं आहे. तो ही भूमिका जगला आहे. मराठी चित्रपटाला गरजेचा असलेला एक हिरोगिरीवाला चित्रपट देण्यात तो निश्चित यशस्वी झालेला आहे. त्याने साकारलेला माउली पुढची काही वर्षे मराठी लोकांच्या मनात नक्की राहील. आपला हात भारी सारखे त्याचे संवाद आधीच लोकांच्या तोंडावर येऊ लागलेत.

अजय अतुलने दिलेलं संगीत दिलेलं असलं तरी एक माउली माउली गाणं सोडलं तर इतर गाणी चित्रपट संपताना लक्षातदेखील राहत नाहीत. अजयने गायलेलं माउली माउली हे गाणं केवळ कमाल आहे. गाणं चालू असताना वारीची दाखवलेली दृष्ये, अजयचा तगडा आवाज यामुळे अंगावर काटा उभा राहिला. माझ्यासारख्या तरूणाईला हे गाणं आधीच पसंद पडलेलं आहे. राधिका आपटेच्या वाट्याला फारसं काही आलेलं नाहीये. तिच्या अभिनयाची क्षमता माहीत असलेल्या लोकांना तिच्याबद्दल निश्चित वाईट वाटतं. “ए भाड्या” या एका संवादाशिवाय लक्षात ठेवण्यासारखं तिच्या वाटेला फारसं काही आलेलं नाहीये.  

अधूनमधून होणारी हिंदी चित्रपटाची आठवण, काही तर्कबुद्धीला न पटणारे प्रसंग सोडले तर एक करमणूक म्हणून हा चित्रपट एकदा निश्चित पहावा.


टीप – एखाद्या चित्रपटाबद्दल काही लिहिण्याची माझी पहिली वेळ आहे. काही कमीजास्त असेल तर माफी असावी.