Wednesday, August 14, 2013

स्वातंत्र्यदिन

                                


स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.

तसं पाहायला गेलं तर जुन्नर हे छोटं शहर. या छोट्या शहरात चार मोठ्या शाळा. त्यातल्याच एका शाळेत मी अगदी बालवाडीपासून ते दहावीपर्यंत शिकलो. या सबंध दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षाच्या काही आठवणी आहेत. या सगळ्या आठवणींमध्ये एक आठवण मात्र सारखी आहे. ती म्हणजे दरवर्षीचा  स्वातंत्र्यदिन

दर १५ ऑगस्टला आम्ही  तिन्ही भावंडे सकाळी लवकर उठत असू. आंघोळ करून दादांनी कडक इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून, पायात पांढरे शुभ्र, नवे कोरे बूट आणि नवे सॉक्स घालून मी तयार होत असे आणि मित्रांबरोबर शाळेत जात असे. खालच्या शाळेत तेव्हा कुलकर्णी बाई शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका होत्या. त्या सगळ्यांना रांगेत उभे करत असत. अजूनही त्यांची ती खास स्वातंत्र्यदिनासाठी घातलेली पांढरी साडी आणि गळ्यात शिट्टी अशी मूर्ती डोळ्यांसमोर येते. झेंडावंदन होताच आकाशात सोडायला म्हणून काही मुले कबूतरे घेऊन येत असत. त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळ्या रांगेत सगळ्यांच्या पुढे उभं केलं जात असे. दर वर्षी माझा आपल्याकडे कबूतर नाही आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या पुढे उभं राहता येत नाही म्हणून संताप होत असे. दरवर्षी मी दादांकडे मला कबूतर पाळू द्या असा हट्ट करत असे.

शाळेतल झेंडावंदन संपवून मग तहसीलदार कचेरीकडे आम्ही सगळे धाव घेत असू. कारण तिथे पोलीस दल, गृहरक्षक दल, एन.सी.सी. असे सगळेच लोक असत. का कोण जाणे पण कचेरीतील तो कार्यक्रम चुकू नये म्हणून मी खूप काळजी घेत असे. अजूनही त्या कार्यक्रमाबद्दल लहानपणापासून असलेली उत्सुकता तशीच कायम आहे. तिथेच दादा मला भेटत असत आणि आम्ही तो कार्यक्रम आटोपून घरी परतत असू. घराच्या वाटेवर असताना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहण्याचे वेध लागलेले असत. घरी येताच टीव्हीसमोर बसून तो कार्यक्रम मी बघत असे. महाराष्ट्राचा रथ दिसला की का कोण जाणे पण अभिमान वाटत असे. तो संपूर्ण कार्यक्रम पाहून मग उरलेला दिवस सुट्टीचा आनंद घेण्यात घालवत असे.

वरच्या शाळेत गेल्यावर मात्र थोडी वेगळी परिस्थिती होती. मला का कोण जाणे पण एम.सी.सी. मध्ये सहभागी होण्यात फारसा रस नव्हता. कदाचित त्यासाठी घालावी लागणारी अर्धी चड्डी हेही एक कारण होतं. मग मी शाळेच्या बँड पथकात सहभागी व्हायचं ठरवलं. बँडपथकात असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाई. त्यामुळे तेही एक समाधान मनाला होतचं. आख्खा ट्रूप आमच्या समोरून बँडच्या तालावर परेड करत आमच्या समोरून जात असे. बँड पथकातल्या माझ्या एका सहकार्याला एक मुलगी तेव्हा आवडायची. परेड आमच्या समोरून जाताना त्याला ती दिसावी म्हणून त्याला मी पुढे माझ्या जागी उभं राहू दिल्याचं मला आठवतंय. शाळेनंतर मग परेड करत आम्ही सगळे कचेरीत जावून ध्वजारोहण करीत असू. कचेरीतून परत येताना शाळेच्या वाटेवर एक निर्मनुष्य रस्ता होता. त्या रस्त्यावर आम्ही सगळे जणू काही बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत वाजवतो आहोत अशा थाटात जोरजोरात ढोल बडवत असू.

जुन्नर सोडून पुण्याला शिकायला आलो. पण दरवर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहण कधी मी चुकवलं नाही. एक वर्षी मी पुण्याहून जुन्नरला जात होतो. जुन्नरला जाईपर्यन्त समारंभ संपून गेलेला असेल असं माझ्या लक्षात आलं. मध्येच कुरुळी फाट्यावर एक शाळा दिसली. पटकन गाडी वळवून मी त्या शाळेत गेलो. तिथे ध्वजारोहण केलं आणि मग जुन्नरला गेलो.


पुढे शिक्षणासाठी अमेरिकेत आलो. इथे आल्यावर देखील इंडियन स्टुडंट असोसिएशनच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मी जात असे. भारतात असतानासुद्धा आपलं राष्ट्रगीत कानावर पडलं की उर भरून येत असे, अंगावर काटा येत असे. आता परदेशात असताना आपलं राष्ट्रगीत ऐकलं तर आपण भारतीय असल्याचा अजूनच अभिमान वाटतो. कधी कधी फार भावूक झालो तर डोळ्यांच्या कडा ओल्यादेखील होतात. अमेरिकेला येताना आपला राष्ट्रध्वज मी बरोबर आणला होता. माझ्या घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये भिंतीवर तो लावला आहे. आता नोकरीसाठी मी छोट्या गावात राहतो. इथे ध्वजवंदनाचा औपचारीक कार्यक्रम होत नाही. दरवर्षी ध्वजारोहण चुकता कामा नये असं लहान असताना कधीतरी दादांनी सांगितल्याच आठवतंय. त्यांच्या त्या शिकवणीप्रमाणे मी घरातल्या तिरंग्यासमोर उभा राहून आपलं राष्ट्रगीत म्हणेन आणि माझ्यासाठी भारतीय स्वातंत्रदिन साजरा झालेला असेल. 

Saturday, August 10, 2013

एक आठवण..

आत्ताच चेन्नई एक्स्प्रेस पाहून घरी परतलो आहे. चित्रपट का पहिला वगैरे चर्चा करण्यात मला फारसं स्वारस्य नाहीये. चित्रपट तसा सुमारच होता. पण चित्रपटाच्या शेवटी लुंगी डान्स नावाचं एक गाणं दिग्दर्शकाने टाकलं आहे. मला चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्टं म्हणजे हे गाणं. त्याचं कारण म्हणजे ते गाणं हे “रजनीकांत” यांना केलेलं अभिवादन आहे (बॉलीवूडचा बादशाह असला तरी दक्षिणेकडे खरा सुपरस्टार रजनीकांतच आहे हे कदाचित शाहरुखला कळलं असावं.).

तुम्ही म्हणाल अचानक रजनीकांतबद्दल तुला का बाबा प्रेम वाटायला लागलं. खरं तरं बरेच दिवस या प्रसंगाबद्दल लिहावं असं मनात होतं. पण काही ना काही कारणांमुळे ते राहून जायचं. या चित्रपटाच्या निमित्ताने ते आठवलं आणि तुम्हाला ते सांगावं या हेतूने लिहितो आहे. ऑगस्ट २००९ मध्ये मी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आलो. ज्या विद्यापीठात मला प्रवेश मिळाला तिथे बहुसंख्य तेलगु आणि तमिळ विद्यार्थी होते. याचसुमारास रजनीकांतवर इंटरनेटवर अनेक विनोद यायला लागले. आणि हे विनोद मला आवडले म्हणून मी माझ्या फेसबुकवर शेअर करू लागलो. काही विनोद मी स्वतः तयार केलेले असायचे. हे विनोद वाचून काही लोकांना प्रचंड हसू येई. आणि तसं ते मला सांगतदेखील असत. एकदा मात्र बाका प्रसंग उभा राहिला. एक लेक्चर संपवून मी घरी येत असताना एक तेलगु सिनियर मला रस्त्यात भेटला. त्याचं पाहिलं वाक्य, “तू स्वतःला कोण समजतोस?” मी बुचकळ्यात पडलो की हा असं का विचारतो आहे. तोच त्याचं दुसरं वाक्य, “तू फेसबुकवर रजनीकांतची टिंगल का करतोस? त्याच्यावरचे फालतू विनोद का शेअर करतोस?” मला लक्षात आलं की याला नक्की कसला त्रास होतोय. वेळ मारून न्यायची म्हणून मी त्याला असं काही नाहीये सांगून पळ काढला. मुळात माझा असा काही हेतू नव्हता. इतक्या मोठ्या माणसाची टिंगल करावी असा विचारदेखील माझ्या मनात नव्हता. पण शांत बसेल तो मी कसला म्हणून मी घरी जाउन रजनीकांतबद्दल शक्य असेल तेव्हढी माहिती शोधून काढली. सुदैवाने माझा एक रूममेट तमिळ होता. त्याने मला अजून काही माहिती पुरवली. हे सगळं करून झाल्यावर मी अजून जोमाने माझा जुना उद्योग सुरु केला. रजनीकांतबद्दल जोक लिहिणे. हे मात्र काही त्या सिनियरला पटलं नाही. त्याने पुन्हा एकदा मला गाठलं आणि तोच प्रश्न पुन्हा विचारला. यावेळेस मी तयार होतो. मी त्याला रजनीकांतबद्दल उलट काही प्रश्न विचारले. त्याची तत पप झाली. मी त्याला सांगितलं, “राजा नुसतं मी रजनीकांतचा फॅन आहे असं म्हणून चालत नाही. त्याने काय केलंय, कशामुळे त्याला इतका सन्मान मिळतोय हेदेखील माहीत असू देत. तुला रजनीकांतबद्दल जितका आदर आणि प्रेम आहे तितकाच आदर आणि प्रेम मलादेखील आहे. केवळ जोक फेसबुकवर टाकले म्हणून मी त्याची टिंगल करतो असं नाहीये.” हे समजून सांगितल्यावर मात्र स्वारी नरम आली आणि तिथून पुढे कधी त्याने मला पुन्हा असा प्रश्न विचारला नाही.

रजनीकांतबद्दल अजून काही लिहावं असं बरेच दिवस मनात आहे. पण ते पुन्हा कधीतरी.

Tuesday, April 23, 2013

सचिन रमेश तेंडूलकर!!


तो दिवस होता २४ एप्रिल १९७३ चा. मुंबईमध्ये साहित्य सहवासमध्ये राहणाऱ्या रमेश तेंडूलकरांच्या घरी एक मुलाने जन्म घेतला होता. आपल्या आवडत्या संगीत दिग्दर्शकाचं नाव आपल्या मुलाला द्यायचं असं त्यांनी ठरवलं आणि सुरु झाला एका विक्रमी पर्वाचा प्रवास. त्याचं नाव सचिन रमेश तेंडूलकर. कोणाला माहित होतं हे पोर उद्या क्रिकेटमधले सगळे विक्रम आपल्या नावावर करणार आहे आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणार आहे.

सचिन लहानपणी तसा खोडकर होता. त्याचा हाच स्वभाव बदलावा आणि त्याचं लक्ष इतरत्र कुठेतरी गुंताव म्हणून मोठा भाऊ अजितने साधारणपणे १९८४ ला सचिनला क्रिकेटकडे वळवलं. त्यावेळचे अतिशय नावाजलेले क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या तालमीत मग सचिनचा पुढचा प्रवास सुरु झाला. आचरेकर सचिनचा खेळ पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी सचिनला शारदाश्रमला जाण्याचा सल्ला दिला. आणि तिथे मग त्याने पोत्याने धावा काढल्या. सरावाच्या वेळेस आचरेकर गुरुजी एक रुपयाचं नाणं स्टम्पवर ठेवत. आणि जो कोणी सचिनला बाद करेल त्याला ते नाणं मिळत असे. सबंध सरावसत्रामध्ये जर सचिन बाद झाला नाही तर ते नाणं त्याला मिळत असे. तेव्हा कमावलेली १३ एक रुपयाची नाणी सचिनला अजूनही प्रेरणा देतात हे त्याने कित्येकदा सांगितलं आहे.

एव्हाना शालेय वर्तुळामध्ये सचिनचं नाव होऊ लागलं होतं. त्याने कांबळीबरोबर झेव्हीयर्स  विरुद्ध खेळताना केलेल्या ६६४ धावांच्या भागीदारीचा विक्रम अगदी २००६ पर्यन्त टिकून होता. सचिनला मात्र आपण एक जलदगती गोलंदाज व्हावं असं वाटत असे. त्यासाठी तो अगदी चेन्नईमध्ये असलेल्या एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये देखील गेला. पण तिथले तेव्हाचे प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे डेनिस लिली यांनी सचिनला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचा सल्ला दिला. शाळेमध्ये असे विक्रम करत असलेल्या सचिनसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे उघडायला मग जास्त वेळ लागला नाही. नोव्हेंबर १९८७ मध्ये सचिनची मुंबईच्या रणजी संघामध्ये निवड झाली. (माझा जन्म होऊन तेव्हा जेमतेम ११ महिनेचं उलटले होते.) आपला पहिला रणजी सामना खेळायला मात्र सचिनला पुढच्या हंगामाची वाट पहावी लागली. ११ डिसेंबर १९८८ ला सचिनने मुंबईकडून रणजी पदार्पण केलं आणि गुजरातविरुद्धच्या त्या सामन्यात नाबाद १०० धावा काढून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक काढणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला.

बरोबर एक वर्षाने राजसिंग डूंगरपुर यांनी सचिनची पाकिस्तान दौऱ्यासाठी निवड केली. वयाच्या सोळाव्या वर्षी सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या सामन्यात पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या वकार युनिसने त्याला बाद करण्याअगोदर सचिनने १५ धावा काढल्या होत्या. धावा जास्त काढल्या नसल्या तरी त्याने त्यावेळच्या पाकिस्तानी गोलंदाजीच्या तोफखान्यासमोर तग धरली होती. आणि नेमकी त्याचीच दखल क्रिकेटमधील जाणकारांनी घेतली होती. त्याच दौऱ्यातील शेवटच्या सियालकोटच्या कसोटीमध्ये इम्रान खानच्या एक उसळत्या चेंडूने सचिनच्या नाकाचा वेध घेतला. नाकातून रक्त वाहत असूनदेखील सचिनने खंबीरपणे खेळत राहायचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्याचं आजही कौतुक केलं जातं. त्या सामन्यात त्याच्याबरोबर खेळपट्टीवर असणाऱ्या सिद्धूने त्याची केलेली प्रशंसा या व्हिडीओमध्ये दिसते. http://www.youtube.com/watch?v=n1cXX4ERy2Y  
रमीझ राजाने या दौऱ्यातील एका प्रदर्शनीय सामन्याची एक आठवण सांगितली होती. या सामन्यात सचिन फलंदाजीला आल्यावर अब्दुल कादीरने त्याला उंची दिलेले चेंडू टाकायला सुरुवात केली. सचिनने पहिले २ चेंडू सावकाश खेळून काढले. तिसऱ्या चेंडूवर त्याने पुढे सरसावत षटकार ठोकला. कादीरने त्याला चिडवायला म्हणून टाळ्या वाजवल्या. पुढच्या चेंडूवर सचिनने पुन्हा षटकार ठोकला. चेंडू आधीच्या षटकारापेक्षा अजून लांब जावून पडला. आता मात्र कादीरने मान डोलावून सचिनला दाद दिली होती. पण थांबेल तो सचिन कसला. त्याने सलग तिसरा चेंडू प्रेक्षकांत भिरकावला आणि कादीरने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. पुढचाही चेंडू त्याने तसाच टोलावला. कादीर प्रचंड भडकला होता. षटक संपले तरी त्याला गोलंदाजी करायची होती, सचिनला बाद करायचे होते. रमीझ राजा म्हणाला, “तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळून चुकलं की सचिन नुसताच गुणवान खेळाडू नाहीये तर खराखुरा उगवता तारा आहे.”

आणि मग सुरु झाला तो पुढची २० वर्षे न थांबणारा प्रवास. १९९४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्याने आपलं पाहिलंवाहिलं शतक केलं. आणि नंतर मात्र त्याने कधी मागे वळून पाहिलंच नाही.  १९९६च्या विश्वकरंडकात त्याने सगळ्यात जास्त धावा काढल्या. त्यानंतर १९९८ मध्ये शारजामध्ये त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची काढलेली पिसे कोणी कसं विसरू शकेल. शेन वॉर्नने तेव्हा म्हटलं होतं मला स्वप्नातदेखील सचिन माझी गोलंदाजी चोपतोय असं दिसतं. शारजामध्ये तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजी झोडत असताना टोनी ग्रेगचं समालोचन ऐकून आजही अंगावर काटा येतो.यानंतर असे अनेक विक्रम तो स्वतःच्या नावावर करत गेला.

मला आठवतं त्याप्रमाणे साधारणपणे १९९२ च्या विश्वकरंडकापासून मला क्रिकेटमध्ये जरा रस येऊ लागला. भारताचा सामना असेल तर दादांबरोबर तो पाहायला आम्ही तिघं भावंडं बसत असू. सचिनची फलंदाजी मात्र मला अगदी ठळकपणे १९९६ पासूनची आठवते. तेव्हापासून ते अगदी आत्तापर्यंत त्याला खेळताना कितीही पाहिलं तरी मन भरत नाही. फलंदाजीला मैदानात येताना आकाशाकडे त्याचं ते पाहण, आणि मग गार्ड घेतानाची त्याची ती विशिष्ट पोझिशन सगळं कसं अगदी सुरेख. आखून रेखून केल्यासारखं. तो मैदानात येणार असं नुसतं कळलं तरी मैदानात असलेल्या लोकांचा तो प्रचंड आवाज, सचिन.. सचिन!! चा तो गजर आणि मैदानात असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने उभं राहून त्याला दिलेली ती मानवंदना. इतकी वर्षे झाली तो खेळतोय पण यात कुठेही बदल झालेला नाही. इतकं सगळ यश मिळत असताना ते यश पचवणंसुद्धा तितकंच अवघड असतं. सचिनला मात्र ते जमलं. अगदी काहीही झालं तरी त्याने ते यश डोक्यात जाऊ दिलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना, अपेक्षांचं प्रचंड ओझं सांभाळताना लागणारा खंबीरपणा त्याच्याकडे आहे. १९९९ मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं. अंत्यविधीसाठी सचिन विमानाने आला. आणि तो संपवून पुन्हा संघामध्ये परतला. त्यानंतरच्या केनियाविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद शतक ठोकलं. शतक पूर्ण झाल्यानंतर एरवी तो आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानतो. पण त्यादिवशीचे शतक पूर्ण झाल्यावर त्याचं ते आकाशाकडे पाहण नेहमीचं नव्हतं. त्या दिवशीचं शतक त्याने आपल्या दिवंगत वडिलांना अर्पण केलं. कित्येक क्रिकेटरसिकांच्या डोळ्यात तो प्रसंग पाहून पाणी तरळल होतं.

एक फलंदाज म्हणून महानायक असलेला सचिन एक यशस्वी कर्णधार मात्र बनू शकला नाही. पण त्याने समजूतदारपणा दाखवत कर्णधारपद सोडलं आणि त्यानंतर गांगुलीने सूत्रे हातात घेतली. २००७ मध्ये द्रविड भारताच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये द्रविड कर्णधारपद सोडणारं अशा बातम्या आल्या. त्यावेळेस भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः त्याला कर्णधारपद देऊ केलं होतं. पण सचिनने मनाचा मोठेपणा दाखवत महेंद्रसिंग धोनीच नाव त्यांना सुचवलं. आणि त्यानंतर धोनीच्या कारकिर्दीला मिळालेली कलाटणी सारं जग जाणून आहे. त्याच्या मनाच्या मोठेपणाचे अजून एक उदाहरण. राहुल द्रविड कर्णधार असताना पाकिस्तानविरुद्ध सचिन १९४ वर खेळत असताना द्रविड डाव घोषित करायचं ठरवलं. त्याच्या या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ क्रिकेटर्सनी त्याच्यावर टीका केली. मिडीयावाल्यांनी तेच लावून धरलं. पण हा निर्णय संघाच्या हितासाठी होता आणि त्याबद्दल सचिनला कल्पना होती हे द्रविडने सांगितल्यावर प्रकरण निवळल. सचिनच्या मोठेपणाचा अगदी अलीकडे घडलेला किस्सा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुरली विजयने शतक केलं. तो बाद होऊन परत येत असताना प्रेक्षक त्याला मानवंदना देण्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत होते. यावेळी सचिन मात्र मैदानावर न येता मागेच उभा राहिला. कारण मुरली विजयला ती मानवंदना मिळाली पाहिजे. आपण आत्ता मैदानात गेलो तर आपल्या जाण्यामुळे ती झाकोळली जाईल असा विचार फक्त आणि फक्त तोच करू शकतो. परवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळत असताना पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी खेळ थांबला तेव्हा सचिन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने ठरवलं असतं तर तो लगेच तंबूत जाऊ शकला असता. पण त्याने तसं न करता आपल्या साथीदारांना येऊ दिलं. आपल्या कर्णधाराने सीमारेषा ओलांडल्यानंतरच त्याने सीमारेषा ओलांडली. अगदी लहानश्या कृतीतून त्याने आपला कर्णधाराप्रती असलेला आदर दाखवून दिला.

इतकी वर्षे अथकपणे क्रिकेट खेळत राहिल्यावर दुखापती होणे साहजिक आहे. २००३-०४ च्या सुमारास त्याच्या टेनिस एल्बोच्या दुखापतीमुळे त्याला वर्षभर क्रिकेटपासून लांब राहावं लागलं. सचिनने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी त्याच्या मनात निवृत्तीचे विचार येऊ लागले होते. पण पुन्हा एकदा त्याचा खंबीरपणा, त्याची प्रचंड इच्छाशक्ती या सगळ्याच्या जोरावर त्याने पुनरागमन केलं. २००६ च्या आसपास त्याच्या खांद्याच्या दुखापतीने डोकं वर काढलं. पण हा पठ्ठ्या हरला नाही. त्याने त्यातूनही स्वतःला मार्ग दाखवला आणि पुन्हा परतला. पण त्याच्या खेळात पूर्वीसारखी जान राहिली नव्हती. २००७ च्या विश्वकरंडकात भारताचं पानिपत झालं. आणि सचिनला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. या लोकांच्या यादीमध्ये इयन चॅपेल आघाडीवर होते.  

मात्र हरेल तो सचिन कसला. तो खेळत राहिला. त्याला पुन्हा एकदा सूर गवसला होता आणि तो पुन्हा एकदा धावा काढू लागला. एव्हाना फलंदाजीचे सगळेच विक्रम त्याच्या नावावर झाले होते. पण एक विक्रम अजूनही बाकी होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकाचा. पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम होता. १९४ धावांचा. आणि तो भारताच्या विरुद्ध होता याची सल करोडो भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनात होती. माझी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांची ती इच्छा होती. हा विक्रम मोडावा तर तो सचिननेच. २४ फेब्रुवारीचा तो दिवस. मी अमेरिकेत होतो. सामना सुरु झाला तेव्हा माझ्याकडे रात्र होती. सकाळी अचानक जुन्नरहून माझा मित्र आदित्य कुलकर्णीचा फोन आला. “अरे लेका, ऊठ. तेंडल्या २०० मारतोय.” मी ताडकन उठून लॅपटॉप चालू केला आणि मॅच लावली. १९९ वर खेळत असताना त्याने ऑफ साईडला चेंडू तटवून एक धाव घेतली. आणि काय तो जल्लोष झाला मैदानात. मी वेड्यासारखा ओरडत घरात फिरत होतो. माझ्या रूममधल्या इतर मित्रांना उठवत होतो. लोकांना फोन करत होतो. फेसबुकवर स्टेटस अपडेट करत होतो. लोकांचे स्टेटस लाईक करत होतो. काय ते समाधान होतं. त्याला लोक देव का म्हणतात हे त्याने दाखवून दिलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलं द्विशतक त्याने ठोकलं होतं. ही खेळी झाल्यानंतर सेहवागने सुनंदन लेलेंना सांगितलं होतं, “सचिनने ही खेळी करून संघात मोठी अडचण निर्माण करून ठेवली होती. त्याने केलेल्या या विक्रमाबद्दल आदर व्यक्त करायला त्याचे पाय धरावेत तर ते सचिनला आवडणार नाही. मग म्हटलं नुसतं हस्तांदोलन करून भावना व्यक्त कराव्यात तर ते फार कोरडेपणाचे होईल. त्याला अगदी मनापासून मिठी मारावी तर तेवढी माझी लायकीदेखील नाही.” सेहवागची ही प्रतिक्रिया वाचून सचिनच्या मोठेपणाची कल्पना येते. त्याचं द्विशतक झाल्यानंतर विक्रम साठेने सुनंदन लेलेंना मेसेज पाठवला होता.”सचिन खेळत असलेल्या जमान्यात मला जन्माला घातलं म्हणून मी माझ्या आई वडीलांचा जाहीर सत्कार करणार आहे.” माझ्या पिढीच्या सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या मनात तेव्हा याच भावना होत्या. त्याने २०० केल्यानंतर सुनील गावसकर त्याला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने जवळजवळ सचिनसमोर दंडवत घातला होता. अर्थात सचिनने त्यांना तसं करू दिलं नाही ही गोष्ट वेगळी.

पण अजूनही एक स्वप्न बाकी होतं. भारताला विश्वकरंडक मिळवून देण्याचं. २०११ मध्ये भारताने विश्वकरंडक जिंकला आणि त्याचं ते स्वप्नदेखील पूर्ण झालं. अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू, त्याने युवराजला मारलेली ती मिठी, आणि विश्वकरंडकाच्या चषकाला अगदी लहान मुलाप्रमाणे हातात घेऊन त्याने केलेला तो जल्लोष. अजूनही ते सगळं पाहताना अंगावर काटा येतो, डोळ्यांत पाणी येतं. मैदानाला विजयी फेरी मारताना त्याच्या संघ सहकाऱ्यांनी त्याला खांद्यावर उचलून त्याचा यथायोग्य सन्मान केला. “सगळं कसं स्वप्नवत आहे. विश्वकरंडक जिंकणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे. मला माझे अश्रू थांबवायचे नाहीयेत”. हे त्याचं वाक्य होतं. हा विश्वकरंडक सचिनसाठी जिंकायचा आहे हे युवराज आणि भज्जीने जाहीरपणे सांगितलं होतं. केवळ त्याच्यासाठी. किती ते मोठेपण माणसाचं.

एव्हाना त्याला शंभर आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम खुणावू लागला होता. पण तिथे जाण्यापर्यंतचा प्रवास त्याच्यासाठी खुप क्लेशदायी होता. त्या एका शतकासाठी त्याला सबंध कारकीर्दीमध्ये झेलली नसेल एवढी टीका झेलावी लागली. सचिन केवळ त्या विक्रमासाठी खेळतोय असं लोक म्हणू लागले. यात अगदी कपिल देवसुद्धा मागे नव्हता. पण सचिन शांत राहिला. आणि अखेरीस १६ मार्च २०१२ ला त्याने आपलं शंभरावं शतक पूर्ण केलं. शतकांच शतक त्याने पूर्ण केलं. शतकानंतर त्याने सांगितलं, “मी कधीच या शतकाचा विचार केला नाही. पण माझ्या आजूबाजूला सगळेच त्या शतकाबद्दल बोलत होते. माझ्या इतर ९९ शतकांबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं. ते मला मानसिकदृष्ट्या लागलं.”

सचिन २३ वर्षे सतत खेळत होता. पण आता त्याला जाणीव होऊ लागली होती. २०१५ चा विश्वकरंडक आपण खेळू शकणार नाही हे त्याला समजून चुकलं होतं. आणि म्हणून त्याने थांबायचा निर्णय घेतला. अगदी अलीकडे त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. इथून पुढे त्याला खेळताना पाहायला मिळणार नाही. अर्थात तो कसोटीमध्ये खेळत आहेच. पण एकदिवसीय क्रिकेटचा थरार त्यात नाही, सचिनने केलेली प्रतिस्पर्धी गोलंदाजीची तोडफोड त्यात नाही. त्याच्या या विशाल कारकीर्दीकडे पाहिलं तर मनात विचार येतो मी खूप नशीबवान आहे. कारण मी सचिनला खेळताना पाहिलं आहे. मी त्याला २०० धावा करताना पाहिलं आहे, मी त्याला शंभराव शतक करताना पाहिलं आहे, मी स्ट्रेट ड्राईव्हच्या बादशाहाला खेळताना पाहिला आहे, मी त्याला शेन वॉर्नला, शोएब अख्तरला, हेच काय जगभरातल्या भल्याभल्या गोलंदाजाना चोपताना पाहिलेलं आहे, मी त्याला अप्पर कटचा सिक्स मारताना पाहिलेलं आहे. किती ती नजाकतीने भरलेली त्याची ती फलंदाजी. मी ती पाहिली आहे. यानंतरच्या पिढ्या हे सगळे विक्रम डीव्हीडीवर पाहतील, पण मी मात्र हे विक्रम याची देही याची डोळा पाहिलेले आहेत. सचिनने मारलेला सिक्स एखाद्या माणसाला किती आवडू शकतो याचं एक उदाहरण म्हणूण एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. झी मराठीवरच्या खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमामध्ये द्वारकानाथ संझगिरी आणि विनोद कांबळी आले होते. रॅपिड फायरमध्ये अवधूतने संझगिरीना प्रश्न विचारला “कोणी मारलेला सिक्सर जास्त आवडतो? सचिन की विनोद?” (माझ्या मते मुळात हा प्रश्नच चुकीचा होता. असो.) संझगिरी एक सेकंदसुद्धा वाया न घालवता म्हणाले होते “देवाने जरी सिक्सर मारला तरी मला सचिनने मारलेला सिक्सर जास्त आवडतो” या एका वाक्यात तो किती महान आहे याची कल्पना येते.

या माणसाबद्दल किती लिहू आणि किती नको असं मला होतंय. पण कुठेतरी थांबावं लागेलच. गेली २३ वर्षे तो खेळत होता. सबंध भारतातल्या चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर पेलत होता. आता असा अचानक तो नसणार म्हटल्यावर थोडसं विचित्र वाटतं. परवा ऑस्ट्रेलियाविरूद्ध दिल्लीच्या मैदानावर खेळत असताना विराट कोहली बाद झाल्यावर लोकांनी प्रचंड गलका करायला सुरुवात केली. कारण पुढे सचिन फलंदाजीला येणार होता. सचिनला पाहायला मिळणार या आनंदात दिल्लीचे लोक आपल्या घरचा विराट बाद झाला याचं दुःख झटक्यात विसरून गेले होते. किती ते मोठेपण असावं ना.क्रिकेटच्या या देवाला मानवंदना देण्याचा माझा हा एक छोटा प्रयत्न. तुम्हा सर्वाना आवडेल अशी आशा धरतो. काही चुकले असेल तर सचिनवरील प्रेमापोटी मला माफ करा.

टीप – संबंधीत लेख लिहीत असताना विकिपेडिया आणि सुनंदन लेले यांची वेबसाईट यांचा आधार घेतलेला आहे.

Monday, February 18, 2013

शिवजयंती



नमस्कार. बऱ्याच लोकांना माहित आहेच की मी मुळचा जुन्नरचा. जुन्नरची खरी ओळख म्हणजे शिवनेरी किल्ला. राजांचं जन्मस्थान. ज्या योद्ध्याने अवघं मराठी साम्राज्य उभारलं त्याचा जन्म जुन्नरमध्ये झाला होता. आणि याच गोष्टीमुळे मला मी जुन्नरचा आहे याचा अभिमान वाटतो.


अगदी लहान असल्यापासून दरवर्षी शिवजयंती साजरी होताना पाहत आलोय. १२ वी झाली आणि जुन्नर सोडावं लागलं. पण दरवर्षी १९ फेब्रुवारीला नक्की वाटतं की आज जुन्नरमध्ये असायला हवं होतं. आता तर नुसत्या बातम्या वाचतो वर्तमानपत्रामध्ये. अजूनही बऱ्याच गोष्टी अगदी तशाच्या तश्या आठवतात. आदल्या दिवशीपासून सुरु होणारी ती तयारी. वेगवेगळ्या गावांहून येणाऱ्या मशाली, पंचायत समितीमध्ये अगदी पहाटेपासून वाजणारे ते पोवाडे, आणि ते ऐकून अंगावर येणारा काटा, अंगात तात्पुरती का होईना संचारणारी विरश्री. सगळं कसं काल घडल्यासारखं वाटतं. अगदी दरवर्षी नाही जमलं तरी बऱ्याचदा सकाळी लवकर तयार होऊन दादांबरोबर गडावर जात असे. साधारणपणे साडेनऊ वाजता आकाशात हेलिकॉप्टरची घरघर ऐकू यायची. आणि मग मुख्यमंत्री आले म्हणून गडावर सगळ्यांची लगबग सुरु व्ह्यायची. मुख्यमंत्री आले की त्यांच्या स्वागताला अगदी हवशे, नवशे सगळेच असायचे. राजांच्या आणि जिजाऊंच्या पुतळ्याची पूजा केल्यानंतर फोटोमध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या शेजारी दिसावं म्हणून सगळ्यांची ती धडपड पाहून हसू यायचं.
ते आटोपलं की पायथ्याला वरच्या शाळेच्या मैदानावर किंवा अगदी अलीकडे मार्केटयार्डाच्या आवारात सगळ्या मंत्र्यांची सभा आणि मग सभेमध्ये आश्वासनांची खैरात होत असे. अव्वाच्या सव्वा रक्कम शिवनेरीच्या विकासासाठी कबूल केली जात असे. त्यातली काही अगदी अलीकडे मिळाली म्हणे (आणि गडाच्या विकासासाठी वापरालीदेखील गेली हे विशेष).
एकदा हे मंत्री गेले की मग वेध लागत ते रात्री शाळेच्या मैदानावर होणाऱ्या शोभेच्या दारूकामाचे. लहान असताना दादांबरोबर आणि जरा कळायला लागल्यानंतर मित्रांबरोबर तिकडे हमखास जात असू. मित्रांबरोबर असताना अंधारात कोणाची तरी टिंगल करून हसायला केवढी ती मजा यायची. पण हीच मजा एका मित्रावर उलटली होती एकदा. अर्थात छोट्या गावात सगळेच एकमेकांना ओळखत असल्याने प्रकरण थोडक्यात निभावलं होतं. आणि यानंतर नेहरू बाजारात मनोरंजनाचे कार्यक्रम असत. त्यांना मात्र मला कधीही जाता आलं नाही. घरी लवकर येण्याची तंबी म्हणा किंवा अजून काही म्हणा.
तर हा शिवजयंतीचा एक दिवस. राजांचा जन्मदिवस म्हणून अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. अजूनही होतो. तितक्याच दिमाखात, डौलात. आज सकाळी दादांना फोन केला तेव्हा ते म्हणाले अरे आज शिवजयंती. पटकन सगळ्या आठवणी मनात दाटून आल्या. काही वेळासाठी मन परत मागे गेलं आणि वाटलं नुसत्या बातम्या वाचण्यापेक्षा जाऊयात एकदा जुन्नरला.