Sunday, September 24, 2017

उज्वल जनरल स्टोअर

लहानपणी पेन,पेन्सिल असं काही घ्यायचं असेल तर मी रविवार पेठेतल्या उज्वल जनरल स्टोअरमध्ये जात असे.कल्याण पेठेत सुद्धा दुकाने होती.पण उज्वल जनरलबरोबरचं नातं वेगळंच होतं.मग फक्त तेवढ्यासाठी मी सायकलवर रविवारात जात असे.

माझ्या जन्माच्या खूप अगोदर हे दुकान सुरू झालं असावं.कारण मला आठवतं तेव्हापासून उज्वल जनरल जुन्नरमध्ये आहे.विजूकाका म्हणजे दुकानातली प्रमुख व्यक्ती.डोक्यावरचे कमी होत चाललेले केस, हाफ शर्ट, पँट, उन्हाळा असेल तर क्वचित कॉटनची बंडी असे विजूकाका मला आठवतात.दुकानात कितीही गर्दी असली, गोंधळ असला तरी हा माणूस कधी गिऱ्हाईकावर रागावल्याचे, वैतागल्याचे मला आठवत नाही. कायम हसून बोलणार.दादांचे चांगले मित्र होते ते.त्यामुळे मलाही ओळखायचे.

"गुंड, तुझ्या आडनावाप्रमाणे वागू नको बरं का!!" असं गमतीने मला म्हणत असत.

"पप्पा कुठे गेले? मार्क किती पडले?" अशी चौकशीसुद्धा करत..

उज्वल जनरलच्या आसपास अजूनही एक दोन दुकाने होती.क्वचित यांच्याकडे एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या दुकानांत जाण्याचा प्रसंग येत असे.पण विजूकाका ज्या प्रेमाने गिऱ्हाईकाशी बोलत तेवढं त्यांना जमत नसे.साहजिकच त्यांच्याकडे जाण्याचं मी टाळत असे..

शाळा सुरू व्हायचे दिवस आले की यांच्याकडे लगबग सुरू होई..नविन वह्या, पुस्तके, गाईड्स, पेन, पेन्सिल, डबा, वॉटरबॅग शाळेसाठी लागणारी प्रत्येक वस्तू उज्वलमध्ये असे.वह्यांचे गठ्ठे तर दुकानाच्या बाहेरसुद्धा ठेवावे लागत इतका मालाला उठाव असे. विजूकाकांचा मुलगा तुषार, त्यांचे मोठे बंधू वसंतकाका, जमेल तेव्हा घरातली इतर माणसे गर्दीच्या वेळी दुकानात येत असत.या सगळ्यांत तुषार जास्त वेळ दुकानात असे. कालांतराने त्यानेच दुकानाची सूत्रे आपल्याकडे घेतली.पण विजूकाका मात्र दुकानात येत असत.त्याशिवाय त्यांना करमणार कसे ना!!

अगदी क्रिकेट खेळायला टेनिसचा बॉलसुद्धा आम्ही इथूनच घेत असू..बॉल घ्यायला दुकानात आम्ही दोघं तिघं गेलो की विजूकाकांना अंदाज येई.मग ते विचारत,

"आज मॅच का? चांगले खेळा बरं का!"

आम्हीदेखील हो म्हणून बाहेर पडत असू..

एखादा मुलगा/मुलगी दुकानात आपल्या आई वडिलांकडे आपल्याला अमुकच पेन पाहिजे असा हट्ट करत असेल तर विजूकाका त्यांच्या मदतीला येत.

"अरे पप्पा म्हणतात तोच पेन भारी आहे. त्याने उलट तुझं अक्षर जास्त चांगलं येईल.सगळेजण हाच घेतात." आता दुकानदार सांगतोय म्हटल्यावर ते पोरगंसुद्धा त्यांचं ऐकून तो पेन घेत असे.केवळ ऐपत नसल्यामुळे आपल्या मुलांना महाग पेन, पेन्सिल देऊ शकत नसलेल्या कित्येक आई वडिलांचे पैसे विजूकाकांनी असे वाचवले असतील.त्याबद्दल कित्येकांनी त्यांना धन्यवादही दिले असतील.

बारावीनंतर पुण्याला आल्यावर उज्वलमध्ये जाणं कमी झालं.नंतर कधीतरी, काही कारणाने उज्वलमध्ये जाण्याचा योग आला.बऱ्याच वर्षांनी भेटूनही तुषारने तेव्हा मला ओळखले होते..

"अरे तू गुंड ना? कुठे असतोस सध्या?काय करतोस?" अशी प्रेमळ चौकशी केली होती.

आज दादांबरोबर सहज बोलताना विषय निघाला म्हणून ह्या आठवणीनं उजाळा मिळाला. आज सुमारे १५ वर्षानंतरही या दुकानाबद्दल वाटणारी आत्मीयता कमी झालेली नाहीये.माझ्यासारख्या बऱ्याच जणांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये उज्वल जनरलचा नकळतपणे हातभार लागला.

विजूकाका आणि तुषार दोघांनाही भेटून बरेच दिवस झाले.अलीकडे तुषारची बायको म्हणजे श्रद्धा भाभी त्याला हातभार लावत असल्याचे कळले.बदलत्या काळाबरोबर उज्वल जनरल स्टोअरने देखील कात टाकली आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा कारभार अजून चालू आहे. पुढील "उज्वल" वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

Saturday, September 9, 2017

"सर तुमची परमिशन असेल तर मी थोडं बोलू का?"
एअरपोर्टच्या गर्दीतून गाडी बाहेर काढत उबरचा ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता.समोरचा आपल्याशी बोलायला उत्सुक आहे म्हटल्यावर आपण का माघार घ्यावी अशा विचाराने मीही त्याला होकार देत म्हटलं,
"बोला की."
"सर आज सकाळी मी डॅडी पिच्चर पाहिला."
"अरे वा! कसा काय वाटला मग तुम्हाला?"
"एक नंबर आहे सर."
"मग बघायला पाहिजे."
"नक्की बघा सर..फक्त दाऊदच्या रोलमधी फरहान अख्तरला नव्हतं घ्यायला पाहिजे.त्याचा आवाज बाद आहे.दाऊदसारख्या माणसाचा आवाज असा असतो का??ते काय नीट जमलं नाही त्याला."
"आणि अर्जुन रामपाल?" मी विचारता झालो.
"लई भारी काम केलंय सर त्यानी. म्हणजे त्यानी लई अभ्यास केला असणार या रोलसाठी."
"हं."
"आणि आपण अरुण गवळीला फक्त अलीकडं पाहतो. तरुणपणीचा डॅडी कसा होता, कसा राहायचा, कोणते कपडे घालायचा हे आपल्याला कुठं माहितीये.पण सर पिच्चरमध्ये ना सगळं एकदम डिटेल दाखवलंय."
"अच्छा."
"एखाद्याला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची थोडी माहिती असेल तर त्याला नक्की आवडंल सर. महाराष्ट्राचा क्राईम रेशो कसा वाढत गेला हे चांगलं दाखवलंय पिच्चरमध्ये."
क्राईम रेशो हा शब्द ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून मी एव्हाना गार पडलो होतो. त्या गनगनीत नंतरची त्याची एक दोन वाक्य मी ऐकलीच नाहीत. त्याला वाटलं आपण जास्त बोलतोय.
"सर सॉरी मी जरा जास्त बोलतोय."
"अहो नाही नाही.मीच जरा विचार करत होतो."
हे असले बायोपिक्स हमखास लोकांना आवडेल असे बनवतात दिग्दर्शक लोक.डॅडी सुद्धा कदाचित त्यातलाच एक असावा. म्हणून कदाचित यालासुद्धा मनापासून आवडला असेल असा विचार करता करता घर आले.
"उद्या जातो मी बघायला" असं त्याला म्हणत मी घराकडे चालू लागलो..