Friday, July 29, 2016

सडकेवर

दादांच्या कॉलेजचा प्रसंग वाचल्यानंतर बऱ्याच जणांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. पुढे लिही असं प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी. त्यातून मग पुढचा प्रसंग लिहावा असा विचार मनात आला. दादांकडून तो विचारून घेतला. एक दिवस संध्याकाळी बसलो दोघं जण आणि त्यांना म्हटलं बोला. दादा सांगू लागले. 

" पैशाची अडचण आल्याने सिडनहॅम कॉलेजला ऍडमिशन न घेता थोरांदळ्याला यायची वेळ आली. माझ्या नशिबाने त्याच वर्षी मंचरला कॉलेज सुरु झाले होते. मंचर कॉलेजला पुढच्या वर्षी जाऊ असा विचार होता डोक्यात. त्यासाठी पैसे जमवायला सडकंवर कामाला जाऊ लागलो. तिथं कामाची काय पद्धत आहे हे गेल्याशिवाय कळणार नव्हतं. एक दिवस भाकरी बांधुन गेलो. त्या कामावर त्या वेळेस वसंत पाटिल (ह्यांची आणि दादांची नंतर फार चांगली मैत्री झाली) मुकादम होते. ते म्हणाले, " आपल्याकडं काम कर तू." फार नंतर मग वसंत पाटिल मला आदरार्थी संबोधू लागले. 

मग काय मी कामाला सुरुवात केली. दुपारी सुट्टी झाली तेव्हा जेवलो आणि संध्याकाळी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत आलो कामावर. कामावरच्या आया बायांनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, " ए बाळा तू आजयं आला रं?"
मला प्रश्न पडला की त्यांना कसं सांगायचं. वेळ मारून न्यायला मी म्हटलं, " आलोय असाच. सुट्टीये मंग करावं काम म्हटलं."
"बरं कर कर कर!!" असं त्या म्हणाल्या. नाही म्हटलं तरी माझ्याविषयी सहानुभूती होती. माझी आई गेली होती आणि शाळेतही  थोडा चांगला होतो मी. त्यामुळे लोक थोड्या प्रेमाने वागवायचे मला. कामावर असताना मग घमेलं भरताना त्यात दोन खोरी कमी टाकणार, धावपळीच्या ठिकाणी मला ठेवणार नाहीत हे असं सहकार्य मला मिळत राहिलं. 


दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत पोटात भुकेची आग पेटलेली असायची. जवळ कुठे सावली नसायची.आम्ही सगळे एका पानं गळून पडलेल्या बाभळीच्या झाडाला आमची डब्याची गाठोडी बांधत असू. त्या वेळेस कसले स्टीलचे डबे आले. एका फडक्यात भाकरी आणि चटणी बांधून मी नेत असे. उन्हात कोळून भाकरी पार कडक होऊन जाई. मग ताकद लावायची आणि चुरायची पितळीमध्ये. कालवण घेतलं की वाळलेली भाकरी ते पटकन शोषून घ्यायची. मग दुसऱ्या कोणाचं तरी घ्यायचं आणि पुन्हा जेवायला सुरुवात. एक पितळी सहज जायची. 


जेवायच्या वेळेपर्यंत धुळीतच काम केलेलं असायचं. ती धूळ सगळी पायावर साचत असे. त्या वेळेस पाण्याचा सुद्धा प्रचंड तुटवडा असे. मग कसलं पाय धुणं आणि कसलं काय. तसंच आम्ही जेवायला बसत असू. मांडी घालून बसलं की पोटरी आणि मांडीच्या मध्ये घाम यायचा. आणि घाम आलाय हे कळायचं पण त्याचं काही वाटत नसे. उठून उभं राहिलं की पोटरी आणि मांडीला एक त्रिकोणी पट्टा येई. तो सुकला की आधीच पायावर असलेल्या धुळीने बुरशी आल्यासारखं दिसत असे. पण त्याचं काही वाटत नसे. संध्याकाळी घरी गेल्यावर हात पाय धुवेपर्यंत एखादा दागिना मिरवावा असा तो त्रिकोणी पट्टा लोक मिरवत असत. 


या कामावर असताना साहेब कधी येतो याची सगळे वाट पाहायचे. का?? तर तो आला की आपण त्याला काम  करताना दिसलं पाहिजे. नाहीतर काम जाईल याची भीती असायची. हजेरीवाला माणूस लक्ष ठेवायचा आणि काम नाही केलं की खाडा मांडीन अशी धमकी द्यायचा. तो आपल्याकडून जास्त काम करून घेतोय हे लवकरच लक्षात आलं माझ्या आणि त्याचा उलगडा पगाराच्या दिवशी झाला. पगाराच्या दिवशी भलतीच ४-५ माणसं येऊन रांगेला ऊभी राहिली. आमच्या अगोदर त्यांची नावं पुकारली गेली. इतर कोणी काही बोलत नसे. पण मी थोडा शिकलेला असल्याने मला उत्सुकता होती. त्यांनी आपापले पैसे घेतले आणि बाजूला जाऊन साहेबाला त्याचा वाटा काढून दिला. आणि गायब झाले. कामाला २० माणसं असायची पण हजेरीपटावर ३० लोकांची नावं यायची. नंतर कधीतरी त्या साहेबाला नोकरीवरून काढून टाकल्याचं मला कळलं.

या कामादरम्यान एक दिवस मी रांजणीला रेशनची साखर आणायला गेलो. आणि आधीच्या प्रसंगामध्ये सांगितलेले मारुती भिमाजी भोर मला तिथे भेटले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं मंचर कॉलेजला ऍडमिशन झालं आणि मी काम सोडून दिलं. हे काम कष्टाचं होतं. घरी गरीबी होतीच पण कष्टाशिवाय पर्याय नाही हा धडा मात्र मला या कामावर मिळाला."

पुढचे कॉलेजचे प्रसंग आठवतील तसे तुला सांगत जाईन असं म्हणून दादा थांबले. 

Saturday, July 16, 2016

दादांचं कॉलेज

आज संध्याकाळी दादांबरोबर गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता पोर्शे इंडियाचा डायरेक्टर पवन शेट्टीचा विषय निघाला. मी - दिवसापूर्वी त्याच्याबद्दल वाचले होते. दादांना मी त्याच्या वाटचालीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजला एमबीए केल्याचं मी दादांना सांगितलं. ते ऐकून दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, "मी मध्येच तुला थांबवतोय पण हे ऐक."

मी त्यांना म्हटलं बोला. दादा बोलू लागले

"माझी अकरावी संपल्यानंतर मी मुंबईला गेलो. त्यावेळी दहावी नसायची. माझ्या डोक्यात मुंबईला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायची हा विचार होता. मुंबईमध्ये मी आपल्या गावच्या एका माणसाकडे राहायला होतो. मारुती खेबडे नाव त्याचं. फार भला माणूस होता. वेळ मिळेल तेव्हा मी त्याच्याशी बोलत असे. त्याने मला सांगितलं की तू सिडनहॅम कॉलेजला जा. मी माझी सगळी कागदपत्र घेऊन गेलो. त्यावेळेस पॅन्ट माहीतच नव्हती आम्हाला. पायजमा आणि शर्ट हाच आमचा वेष असे. त्याबद्दल लाजही वाटत नसे.  मी आपला जाऊन रांगेत उभा राहिलो. मला पायजमा आणि शर्टमध्ये पाहून आजूबाजूचे लोक आपसांत बोलू लागले. बर ते इंग्लिशमध्ये बोलत. मला कळायचं की हे आपल्याबद्दल बोलत आहेत. पण मला स्वतःला इंग्लिश बोलता येत नव्हते. मग आपला गप्प राहिलो. नंबर आल्यावर आतमध्ये गेलो. माझी कागदपत्रे टेबलावर बसलेल्या बाईच्या हातात दिली. मला ६८ टक्के होते. त्यावेळेस ते मार्क खूप असत. माझे मार्क पाहून तिने आश्चर्याने मान वर केली आणि म्हणाली, "अरे!! ६८ है तुझे. मिलेगा तुझे." मी तिला फी विचारली. फी ३०० रुपये होती. माझ्याकडे तेव्हा कसले बोंबलायला आले ३०० रुपये. मी तिला म्हटलं मी उद्या येतो आणि बाहेर पडलो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि म्हणाले, "बहोत अच्छा मार्क मिला है." १५ मिनिटांपूर्वी जे लोक मला हसत होते तेच आता माझ्याभोवती गराडा घालून माझं कौतुक करत होते. तेव्हा मला स्वतःचाच फार अभिमान वाटला. घरी येऊन मी खेबड्याला सांगितलं की ३०० रुपये फी आहे. खेबडे तेव्हा एका ऑफिसात शिपाई होते. त्याने त्याच्यापरीने प्रयत्न करून मला ६० रुपये गोळा करून दिले. पण ते पुरेसे नव्हते. मग काय.. मी आपला थोरांदळ्याला परत आलो आणि सडकंवर कामाला जायला लागलो. त्या कामाचे जे पैसे मिळतील त्या पैशातून पुढच्या वर्षी मंचर कॉलेजला जायचं असा विचार होता डोक्यातसडकेवरच्या कामाचा अनुभव तुला परत कधीतरी सांगेल.  

एक दिवस रेशनची साखर आणायला रांजणीला गेलो. रांगेत माझा नंबर आला. मी पुढं होऊन रेशनवाल्याच्या हातात कार्ड दिलं. त्याचं नाव मारुती भिमाजी भोरत्याने कार्ड घेतलं आणि लांब फेकून दिलं. मला कळाना काय झालं. लोकं म्हणाली अहो त्या पोराचा नंबर आहे. द्या की त्याला साखर. तो काय ऐकेना. वर लोकांना सांगत होता की तुम्ही आपली साखर घ्या आणि चालू पडा. सगळे लोक गेल्यावर त्याने मला विचारलं. "तुझं नाव काय रे?" 

मी नाव सांगितलं.

"तू आत्ता कुठं असायला पाहिजे?"

मी म्हटलं, "सडकंवर". 

"गप्प. कॉलेजला का जात नाही?"

मी -"पैसे नाय फी भरायला." 

"घरी कारभारी कोण आहे?"

मी - "चुलता"

"मी उद्या येणार आहे तुमच्या गावात. तिथं भेट मला."

बरं म्हणून मी आपला घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गावातल्या पारावर खेळत होतो. थोड्या वेळात मारुती भोर येताना दिसला मला. तो शाळेत गेला. पुढच्या  मिनिटांत मला गुरुजींनी बोलावलं आणि सांगितलं तुझ्या चुलत्याला बोलावून घे. मी पळत घरी आलो. दादांना सांगितलं गावात मारुती भिमाजी आलाय. त्याने तुम्हाला बोलावलंय. दादा लगेच निघाले. शाळेत आल्यावर मारुती भिमाजी त्यांना म्हणाला, "तुम्ही घरचे कारभारी का?" 

दादांनी होकारार्थी मान हलवली

"हा पोरगा कॉलेजला गेला पाहिजे."

हं म्हणून मी आणि दादा घरी निघालो. येताना दादांनी एक पोस्टकार्ड घेतलं. घरी येऊन ते कार्ड माझ्यासमोर टाकून म्हणाले, "लिही". 

ते सांगत गेले ते मी लिहीत गेलो. - दिवसांनी एक माणूस घरी आला आणि मला हाक मारली. मी जवळ गेल्यावर त्याने खिशातून शंभर रुपयांची नोट काढून मला दिली आणि म्हणाला, " हे घे आणि काय कुठं झक मारायची ती मार." मुंबईहून नानांनी (मुंबईचे चुलते) त्याच्याकडे ते शंभर रुपये पाठवले होते

ते पैसे घेऊन मी मंचर कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि माझं कॉलेज सुरू झालं. मध्ये मारुती भिमाजी गेले. मला मात्र ते कळलं नाही. नंतर कुणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मला फार वाईट वाटलं. अजूनही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा माणूस म्हणून मी त्याचा उल्लेख करतो."