Friday, September 14, 2018

आवाज कुणाचा?

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडा, 

"आवाज कुणाचा?" 

तुमच्या आरोळीला प्रतिसाद म्हणून, "मेकॅनिकलचा." असं म्हणणारे आवाज सगळ्यात जास्त असतील. अर्थात मेकॅनिकलच्या पोरांचा त्यादिवशी मासबंक नसेल तर हं!  

प्रत्येक इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये अशीच परिस्थिती असते. पहिलं वर्ष सगळ्यांना सारखंच असल्याने फारसा फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षांपासून मग त्या त्या शाखेचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरु होतो. डिपार्टमेंटच्या इमारती वेगवेगळ्या असतात. आमच्या कॉलेजला मॅकेनिकल डिपार्टमेंटचा पोर्च आहे. कॉलेज सुरु होण्याआधी तिथं सगळे जमायचे. वाटलंच तर लेक्चरला जायचे. दररोज लेक्चर्स सुरु होण्याआधी आमच्या कॉलेजात प्रार्थना होत असे. ही प्रार्थना सुरु असताना उभे राहणे अपेक्षित असे. एकदा प्रार्थना सुरु असताना मॅकेनिकल पोर्चला काही मुले शांतपणे बसून राहिली. पलीकडे असलेल्या ई अँड टीसीच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या एका मॅडमने हे पाहिले. प्रार्थना संपल्यावर त्या न राहवून मेकॅनिकल पोर्चकडे आल्या आणि आम्हाला ओरडू लागल्या. एक तर आपल्या डिपार्टमेंटचे सोडून इतर शिक्षक माहित नसलेल्या आम्हाला त्या आमच्याशी बोलत आहेत हे कळायला दोन मिनिटं गेली. कळल्यानंतर ह्या आपल्या डिपार्टमेंटच्या नाहीत म्हणून त्यांच्याकडे कुणी लक्षही दिलं नाही. आपल्या बोलण्यावर मुलांची काहीच प्रतिक्रिया नाही बघून त्यांनी चिडून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र पोर्चात हास्याचे फवारे उडाले हे सांगायला नकोच.  

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकलची पोरं अतिशय टारगट म्हणून गणली जातात. लेक्चर्स बंक करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे मेकॅनिकलची पोरं वागतात. आपले ज्युनियर्स जर सिन्सीयरली लेक्चर्स करत असतील तर सिनियर्स येऊन त्यांना वेड्यात काढतात. इतकं की आपण लेक्चर्स करून मोठी चूक करतोय की काय असं त्या ज्युनियर्सला वाटू लागतं. हळूहळू मग तेही सिनियर्सचा कित्ता गिरवू लागतात. 'मासबंक' हा शब्द फक्त उच्चारायची खोटी की मेकॅनिकलची पोरं वर्गातून बाहेर असतात. इतर ब्रॅंचेसची पोरं लेक्चर्स इमाने इतबारे करत असताना मेकॅनिकलची पोरं मात्र निवांत असतात. 

किती निवांत? तर एकदा लेक्चर बुडवून पोर्चात बसलेल्या आम्हाला सर येऊन म्हणाले, 

"अरे इथे काय बसलात? चला सगळे लेक्चरला." एवढं सरांनी रंगेहाथ पकडल्यावर तरी लेक्चरला जावे. पण जातील ते मेकॅनिकलचे कसले? आमच्यातलेच एक दोन जण सरांना म्हणाले, 

"सर आज नको. उद्या आम्ही सगळे नक्की येऊ." काय बोलायचं आता? 

"उद्या नक्की यायचं." एवढं म्हणून सर बिचारे निघून गेले. 

हे लेक्चर बंक करणं दुसऱ्या वर्षांपासून सुरु होतं ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत सुरूच असतं. कॉलेजमधून घरी पत्रं वगैरे जातात पण पोरं पालकांनासुद्धा सांगतात, 

"ते पत्र फाडून टाका."

सबमिशन वगैरे प्रकार आपल्यासाठी नाहीच असं मेकॅनिकलची पोरं मानतात. वेळ आली की मग ज्याने एखाद्याने फाईल पूर्ण केली असेल त्याची फाईल संपूर्ण वर्ग कॉपी करतो. मग त्याचं काही चुकलं असेल तर सगळ्या वर्गाची तीच चूक होते. एखाद्या एक्सपेरिमेंटचे रिडींग सबंध वर्गाचे सारखेच असतात. इतर ब्रँचची पोरं दर आठवड्याला प्रॅक्टिकल करतात. मेकॅनिकलवाले सेमिस्टरच्या शेवटी एकाच दिवसात सलग बसून सगळे प्रॅक्टिकल करतात. चुकून एखाद्या विषयाचं प्रॅक्टिकल दर आठवड्याला झालं तर त्याचं जर्नल मात्र सेमिस्टरच्या शेवटीच पूर्ण केलं जातं. एखादा शहाणपणा करत मध्ये जर्नल घेऊन गेला तर प्रोफेसर लोकसुद्धा त्याला सेमिस्टरच्या शेवटी यायला सांगतात. मग एकाच दिवशी रांगेने सगळ्यांचे जर्नल तपासले जातात. आठ एक्सपेरिमेंट असतील तर आठ सह्या न करता, महिरप टाकून एकच सही केली जाते. 

बरं इतकं सगळं केल्यावर मार्क कमी पडले पाहिजेत. तसंही होत नाही. बऱ्याच पोरांना अगदी चांगले नाही तरी बरे मार्क पडतात. म्हणजे इतर ब्रँचची पोरं लेक्चर्सला बसून, जीवतोड अभ्यास करून जेवढे मार्क पाडतात तेवढे तर मेकॅनिकलची पोरं शेवटी शेवटी अभ्यास करूनही पाडतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकलचा रुबाब असणाऱ्या पोरांना एखाद्या कॉम्प्यूटर किंवा इतर कुठल्या तत्सम ब्रँचच्या पोराने हटकले तर त्याची धडगत नसते. 

अभ्यास सोडून खेळाचा विषय घेतला तर तिथेही तेच. सगळ्या खेळांत मेकॅनिकलच विजेते. डायरेक्टर्स ट्रॉफी दर वर्षी मेकॅनिकलकडेच. नाही म्हणायला सिव्हिलवाले थोडीफार स्पर्धा करतात. पण त्यांच्यात अभ्यास करणारे फक्त अभ्यास करतात आणि खेळणारे फक्त खेळतात. 
कॉलेजच्या गॅदरिंगला दंगा करावा तर मेकॅनिकलच्याच पोरांनी. त्यांच्यासारखा दंगा कुणीच करत नाही. मग खुर्च्या हवेत फेकणे असो, खुर्च्यांवर उभे राहून नाचणे असेल, एखाद्याला विशिष्ट शब्दाने हाक मारणे असेल किंवा अजून काही. कॉलेजचं गॅदरिंग आपल्यासाठीच आहे अशा आविर्भावात मेकॅनिकलची पोरं वावरतात. 

या सगळ्या स्पर्धांमध्ये चियरिंगदेखील तेवढेच महत्वाचे असते. "आवाज कुणाचा?" असं म्हटलं की त्या त्या ब्रँचची पोरं आपल्या ब्रँचचं नाव घेऊन ओरडतात. या सगळ्यांत मेकॅनिकलचा आवाज सगळ्यात मोठा असतो हे सांगायला नकोच. माझ्या हॉस्टेलचा एक सिनियर केमिकल ब्रँचचा होता. त्याच्या ब्रँचच्या पोरांबरोबर चियरिंग करताना, "आवाज कुणाचा?" कुणी म्हटलं की त्याचे सगळे मित्र केमिकलचा म्हणायचे. हा एकटाच मेकॅनिकलचा म्हणायचा. त्यासाठी त्यांचा मारही खायचा. नंतर आम्हाला कायम सांगायचा, 

"मेकॅनिकल ब्रँच भारी असते राव. त्यावेळी ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी केमिकलला आलो. पण मेकॅनिकलबद्दल प्रेम अजूनही आहे." 

प्लेसमेंट सुरु होताना आम्हाला मार्गदर्शन करायला आमचे डीन आले. सगळ्याच ब्रँचची पोरं समोर बसली असताना डीनने आपल्या भाषणाची सुरुवात काही अशी केली, 

"खरं सांगायचं तर इंजिनीयरिंगच्या ब्रँच तीनच. एक सिव्हिल, दुसरी मेकॅनिकल आणि तिसरी इलेक्ट्रिकल. हे कॉम्प्युटर, ई अँड टीसी वगैरे सगळं खोटं आहे." 

त्यांचं हे वाक्य संपायची खोटी की मेकॅनिकलच्या पोरांनी अख्खा हॉल डोक्यावर घेतला. कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजच्या प्लेसमेंट हॉलमध्ये डीनसमोर पोरांनी शिट्ट्या मारल्याचा हा एकमेव प्रसंग असेल. इतर ब्रँचच्या पोरांची तोंड तेव्हा बघण्यासारखी झाली. 

इंजिनीयरिंगचा शेवटचा पेपर झाला तेव्हा आमच्यातला एकजण भर वर्गात उभा राहून ओरडला, 
"अरे आवाज कुणाचा?"

आपण परीक्षागृहात बसलो आहोत याचा विचार न करता आम्ही सगळे एका सुरात ओरडलो, 

"मेकॅनिकलचा."

ते होत नाही तोच काही जणांनी व्हरांड्यात सुतळी बॉम्ब फोडले. तेवढ्यावर न थांबता ढोल ताशे बोलावून त्याच्या तालावर नाचायला सुरुवात केली. कॉलेजच्या आवारात नको म्हणून सांगायला
आलेल्या सिक्युरिटी गार्डलासुद्धा नाचवले. पोरं इंजिनीयर झाली म्हणून तोही आनंदाने नाचला. त्यानंतर मात्र इतर सगळ्याच ब्रँचची पोरं एकत्र येऊन नाचली. कारण सगळेच इंजिनीयर झाले. आज दहा वर्ष झाली इंजिनीयरिंग पूर्ण करुन. माझ्या माहितीतला एक मुलगा नुकताच मेकॅनिकल इंजिनीयर झाला. एकदा सहज गप्पा मारता मारता त्याला विचारलं, 

"मग सध्या आवाज कुणाचा आहे?"

"प्रश्न आहे का हा सर? परीक्षांचे पॅटर्न बदलले, वेळही बदलली, मुलंही बदलली तरी आवाज कायम मेकॅनिकलचाच होता आणि मेकॅनिकलचाच राहील." हे त्याचं उत्तर ऐकून मीही गालात हसलो. 

Wednesday, September 12, 2018

पी.आर.

पी.आर. म्हटलं की जुन्नरकरांना डॉ. पी. आर. कुलकर्णीच डोळ्यासमोर येतात. लहानपणी एकदा काहीतरी निमित्त झालं आणि मी आजारी पडलो. दोन तीन दिवस उपचार करूनही काही फरक पडेना. मग दादा मला घेऊन पीआरकडे गेले. ती पीआर आणि माझी पहिली भेट. तशी माझा वर्गमित्र आणि आता जवळचा मित्र असलेल्या आदित्यचे वडील म्हणून ओळख होतीच. मात्र पेशंट म्हणून त्यांच्याकडे जाण्याची ही पहिलीच वेळ. नंबर आल्यावर मी दादांबरोबर आत गेलो. त्यांनी दादांना नमस्कार केला आणि विचारले, 

"बोला, काय होतंय?" 

पेशंटला हा प्रश्न विचारण्याची पीआरची शैली अशी काही आहे की पेशंटच्या चेहऱ्यावर आपले दुखणे सांगतानाही हसू येते. 

दादांनी त्यांना काहीतरी सांगितले असावे. त्यांनी समोरच्या टेबलावर मला झोपवून तपासले आणि काही गोळ्या लिहून दिल्या. 

"परत कधी येऊ?" म्हणून दादांनी विचारले तर ते म्हणाले, 

"परत कशाला येता आता? एवढ्यात बरा होणार आहे तो. बिनधास्त जा."

आपला पेशंट परत आपल्याकडे येऊ नये असे म्हणणारा हा अजब डॉक्टर आहे. तेव्हापासून अनेकदा पीआरकडून कधी डोकं फुटलं म्हणून, कधी डोळ्याच्या वर खोक पडली म्हणून, कधी गुडघा फुटला म्हणून पट्टी मारून घेणं हे नित्यनियमाचे झाले. त्यांचा दवाखानाही शाळेच्या जवळ असे.त्यामुळे काही झालं की मी आधी त्यांच्याकडे पळत असे. त्यांनाही कौतुक वाटे. मुलं म्हटलं की पडझड आलीच. त्यासाठी त्यांना रागावून काही होत नाही असंही हे पालकांना आवर्जून सांगत. 

दादा सांगतात त्याप्रमाणे पीआर जुन्नरमध्ये साधारणपणे १९७५-७६ मध्ये आले. जुन्नरमधल्या आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी तेलीबुधवारातून केली. तेव्हा आठ आणे वगैरे फी घ्यायचे ते. पीआरचं पेशंटबाबतचे निदान अचूक असते अनेक जुने लोक आजही सांगतात. त्यामुळे योग्य उपचार होऊन पेशंटला गुणही येई. अल्पावधीतच पीआर जुन्नर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. अगदी लांब, मावळातूनसुद्धा पेशंट येऊ लागले. आजही त्यांच्याकडे तेव्हाचे काही पेशंट जे आता म्हातारे झाले आहेत ते येत असतात. कौतुकाने सांगतातही की "डाक्टर आठ आणे फी घ्यायचा तवापासून येतूय." याला कारण एकच. हा डॉक्टर आपल्याला नक्की बरं करणार ही श्रद्धा. 

आपल्याकडे येणारा पेशंट लवकरात लवकर बरा कसा होईल याच भावनेने पीआर त्याला तपासतात आणि औषधे देतात. बरं औषधं देताना भरमसाठ दिलीत असंही नाही. जेवढी गरजेची तेवढीच देणार. एमआरने सॅम्पल म्हणून दिलेली औषधे असतील तर एखादया गरीब पेशंटला तीच फुकट देऊन टाकणार. एखाद्या पेशंटकडे पैसे नसतील तर खुशाल पैसे न घेता "पुढच्या वेळी द्या" म्हणत त्याला जाऊ देणार. एखादा आजार दोन दिवसात बरा होणार असेल तर पेशंटला ते तसं स्पष्ट सांगतात. त्यासाठी त्याला उगाच दोन तीन दिवसांनी फॉलोअपला बोलावणे हा प्रकार अजिबात नसतो. बऱ्याचदा पेशंटला दोन दिवसात बरं वाटूनही जातं आणि 'डॉक्टर म्हणाले तेच बरोबर बरं का' अशा भावनेनं तो पुन्हापुन्हा येत राहतो. 

गेली पंचवीस एक वर्ष त्यांचा दवाखाना जुन्नरमधल्या ब्राह्मण बुधवार पेठ आणि सय्यदवाडा यांच्या सीमेवर आहे. सय्यदवाड्याच्या जवळ असल्याने साहजिकच मुसलमान पेशंट भरपूर असतात. मुसलमान स्त्रिया सहसा कुणासमोर आपला बुरखा उघडत नाहीत. पीआरसमोर मात्र त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. कारण आहे डॉक्टरांवर असलेला विश्वास! आपल्या मुलाला/मुलीला डॉक्टर नक्की बरं करणार हा तो विश्वास आहे. 

पीआरची मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचं शिट्टी वाजवणं आणि गुणगुणणं. पेशंट तपासता तपासता हा माणूस खुशाल शिट्टी वाजवत असतो. बरं ती शिट्टी काही हळू वगैरे नसते. चांगली जोरात असते. आता तर पेशंट लोकांनाही सवय झाली आहे. डॉक्टर गुणगुणत नसतील पेशंटलाही चुकल्यासारखे वाटत असावे. आदित्यमुळे माझे त्यांच्या घरीही येणेजाणे असते. घरी असतानाही पीआर मस्त शीळ घालत असतात. कधीकधी तर आदित्य, त्याची आई आणि मी काहीतरी गंभीर चर्चा करत असतो आणि पीआर मध्येच येऊन शिट्टी वाजवत आतल्या खोलीत जातात.    

डॉक्टर असले तरी पीआर श्रद्धाळू आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या पहिल्या गाडीपासून ते आत्ता असलेल्या होंडा सिटीपर्यंत प्रत्येक गाडीवर पुढच्या काचेवर 'श्री' लिहिलेले असते. बाकी काहीच नाही. फक्त 'श्री'.  

पीआर म्हटलं की त्यांचा कंपाउंडर फारूकचा उल्लेख टाळता येत नाही. गेली कित्येक वर्षे फारूक त्यांच्याकडे काम करतोय. अगदी 'वन मॅन आर्मी' सारखं म्हटलं तरी हरकत नाही. डॉक्टरांना भेटायचं म्हणजे आधी फारुकला नमस्कार घालावा लागतो. अगदी आम्ही मित्रही आदित्यच्या घरी जाताना, "क्या फारुक, कैसे हो?" विचारल्याशिवाय वर जात नाही. तसं पाहिलं तर फारुक साधा कंपाउंडर पण पीआरने त्यालासुद्धा इतकी वर्षे जपलंय. आता त्यालाही वयपरत्वे काम जमत नाही. तरीही तो रोज जमेल तेवढा वेळ येऊन जातो. अनेक पेशंटलाही फारूक माहित असतो. त्यामुळे दवाखान्यात आलं की तेही फारुकची चौकशी केल्याशिवाय आत जात नाहीत. फारुकची जागा आता मनिषाने घेतली आहे. तीदेखील आपली जबाबदारी समर्थपणे निभावते आहे. 

डॉक्टर म्हटलं की लोक फोन करूनही सल्ला घेतात. काहीजण फोनवर औषधे विचारून दवाखान्यात येतच नाहीत. अशा महाभागांना बरेचदा फोन स्वतःच घेऊन पीआर "डॉक्टर बाहेर गेलेत" असं सांगून फोन ठेवून देतात. एकदोन वेळेस असं केलं की पेशंटलाही कळून चुकतं. 

लँडलाईनच्या जमान्यात बरेचदा रॉंग नंबरही येत. जुन्नरच्या भूषण हॉटेलचा असाच रॉंग नंबर पीआरकडे येत असे. रॉंग नंबर सांगूनही समोरचा माणूस ऐकत नसेल तर पीआर अनेकदा ऑर्डर घेऊन मोकळे व्हायचे. त्यानंतर तो फोन करणारा आणि भूषण हॉटेल यांच्यात काय संवाद होत असेल देव जाणे. 

स्वतः डॉक्टर असल्याने ते तब्येत सांभाळून असतात. रोजचे फिरणे कधीच चुकत नाही. अलीकडे कधी कंटाळा आलाच तर फिरायला जात नाहीत. आम्ही लहान होतो तेव्हा तर पंचलिंगाकडे पीआर आणि डॉ. निरगुडकर यांचे वेगात चालणे पाहण्यासारखे असे. अर्थात त्याचा फायदा दोघांनाही झाला.   

लोकांना डॉक्टर म्हणून माहित असलेले पीआर एक चांगले वाचकही आहेत. त्यांचं वाचन सतत सुरु असतं. चित्रपट आणि खेळातही ते रस घेतात. कित्येकदा आम्ही एकत्र क्रिकेट आणि टेनिसचे सामने पाहिलेले आहेत.  पाहताना पीआर आमच्यातलेच होऊन बोलत असतात. त्यावेळी मी डॉक्टर आहे किंवा आदित्यचा बाप आहे असा अविर्भाव कुठेही नसतो. देव आनंदचा ज्वेलथीफ त्यांनी पन्नास वेळा सहज पाहिला असेल. 

आता आदित्य त्यांचा वारसा पुढे नेतो आहे. पीआर स्वतः इतके यशस्वी डॉक्टर असताना आदित्यला स्वतःचा जम बसवायला सुरुवातीला अवघड गेले. अखेरीस तोही पीआरचाच मुलगा आहे. त्याचंही निदान त्यांच्या इतकंच अचूक आहे. (माझ्या दादांच्या हार्ट अटॅकचं निदान त्यानेच केलं होतं.) आदित्य जबाबदारपणे गाडा हाकतो आहे त्यामुळे आणि वयपरत्वे पीआरनी आता प्रॅक्टिस थोडी कमी केली आहे. जमेल तेवढी प्रॅक्टिस ते करतात आणि बाकीचा वेळ आपली नात रीवाबरोबर आणि वाचन करत घालवतात. 

काही माणसं अशी असतात की ती नकळतपणे आपल्या आयुष्यवर प्रभाव पाडून जातात. माझ्या मते प्रत्येकाचे फॅमिली डॉक्टर अशाच काही व्यक्तींपैकी एक असतात. त्या त्या पेशंटच्या बऱ्याच बाबी त्यांना माहित असतात. पेशंटही डॉक्टरांकडून वेळच्यावेळी मार्गदर्शन घेत असतात. म्हणूनच कदाचित त्यांना 'फॅमिली डॉक्टर' म्हणत असावेत. माझ्या बाबतीतही तसेच झाले. आज इतक्या वर्षांनी विचार करताना पीआरचा माझ्या आयुष्यातला थोडा का होईना वाटा नाकारता येत नाही. 

तुमच्या फॅमिली डॉक्टरबद्दल तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा.

Sunday, September 2, 2018

दळण

काल दळण पाहिलं. हो पाहिलंच.द मा मिरासदारांच्या एका कथेवर आधारित हे नाटक/एकांकिका आहे.

आधीही एकदा मी दळण पाहिलं होतं. साधारण चारेक वर्षांपूर्वी.काल एका मित्राला घेऊन गेलो. त्याची एकूण विचारसरणी आता परिचयाची झाली आहे.त्यामुळे त्याला आवडेल की नाही ही शंका होती. नाटक सुरू असताना मी बऱ्याचदा त्याच्याकडे बघत होतो. वेगवेगळ्या संवादांना, विनोदी पंचेसला त्याची काय प्रतिक्रिया येतेय यांच्याकडेही माझं लक्ष होतं.तो दिलखुलास हसत होता.दाद देत होता.ह्याला नाटकाला आणण्याचा आपला निर्णय योग्य ठरला याचा मला आनंद झाला.

चार वर्षानंतर दळण पाहताना मला त्याच्या सादरीकरणात कुठेही बदल जाणवला नाही. अमेय वाघ, आलोक राजवाडे,सिद्धेश पुरकर आणि अजून एक दोन जण हे दळणच्या पहिल्या फळीतले कलाकार सोडले तर बहुसंख्य कलाकार बदलले आहेत असे वाटते (कदाचित तसे नसेलही). असे असूनही इतक्या वर्षांनंतरही हे नाटक तेवढ्याच ताकदीने तुमच्या समोर येतं.

छोट्या गावातल्या शाळेत एक स्त्रीलपंट मास्तर येतो.त्याच्या त्या स्त्रीलंपटपणामुळे काय धमाल उडते हे नाटकात दाखवले आहे.

अमेय वाघ अभिनेता म्हणून आता बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. चित्रपटही केलेत. अमर फोटो स्टुडिओसारखं उत्तम नाटकही करतोय. या सगळ्या व्यापातून वेळ काढून तो दळण करतो याबद्दल त्याचं कौतुक वाटतं. दळणच्या प्रसिद्धीसाठी इंस्टाग्राम, फेसबुकवर वेगवेगळ्या कल्पक पोस्ट्स टाकून तो तरुणाईला हे नाटक पहायला येण्याचं आव्हान करत असतो.यातून त्याचं या नाटकावरचं प्रेम जाणवतं. बाकी मास्तरांच्या भूमिकेत तो जो काही बाजार उठवतो त्याला तोड नाही. "आईला म्हणावं मास्तरांनी बोलीवलंय." हा डायलॉग तो गेली दहा वर्षे त्याच टोनमध्ये म्हणतोय आणि प्रत्येक प्रयोगाला त्या डायलॉगसाठी टाळ्या आणि शिट्ट्या घेतोय.

आलोक राजवाडे शिवाच्या भूमिकेत रंग भरतो.सवांदफेकीची त्याची शैली टाळ्या घेत राहते. मास्तरांना हाक मारताना 'मास्तर' मधला 'मा' तो असा काही लांबवतो की प्रेक्षकांमध्ये फक्त त्या एका शब्दामुळे खसखस पिकते.

इतर कलाकार अमेय, आलोक यांना यथायोग्य साथ देतात.गंधारचं साधं पेटी आणि तबल्याचं संगीतही परिणामकारक गाण्यांमध्ये ठरतं. एकुणात हे नाटक ८० मिनिटे तुम्हाला धरून ठेवतं.

पुण्यात अधूनमधून या नाटकाचे प्रयोग होत असतात. वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा.