Friday, September 14, 2018

आवाज कुणाचा?

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडा, 

"आवाज कुणाचा?" 

तुमच्या आरोळीला प्रतिसाद म्हणून, "मेकॅनिकलचा." असं म्हणणारे आवाज सगळ्यात जास्त असतील. अर्थात मेकॅनिकलच्या पोरांचा त्यादिवशी मासबंक नसेल तर हं!  

प्रत्येक इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये अशीच परिस्थिती असते. पहिलं वर्ष सगळ्यांना सारखंच असल्याने फारसा फरक पडत नाही. दुसऱ्या वर्षांपासून मग त्या त्या शाखेचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरु होतो. डिपार्टमेंटच्या इमारती वेगवेगळ्या असतात. आमच्या कॉलेजला मॅकेनिकल डिपार्टमेंटचा पोर्च आहे. कॉलेज सुरु होण्याआधी तिथं सगळे जमायचे. वाटलंच तर लेक्चरला जायचे. दररोज लेक्चर्स सुरु होण्याआधी आमच्या कॉलेजात प्रार्थना होत असे. ही प्रार्थना सुरु असताना उभे राहणे अपेक्षित असे. एकदा प्रार्थना सुरु असताना मॅकेनिकल पोर्चला काही मुले शांतपणे बसून राहिली. पलीकडे असलेल्या ई अँड टीसीच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या एका मॅडमने हे पाहिले. प्रार्थना संपल्यावर त्या न राहवून मेकॅनिकल पोर्चकडे आल्या आणि आम्हाला ओरडू लागल्या. एक तर आपल्या डिपार्टमेंटचे सोडून इतर शिक्षक माहित नसलेल्या आम्हाला त्या आमच्याशी बोलत आहेत हे कळायला दोन मिनिटं गेली. कळल्यानंतर ह्या आपल्या डिपार्टमेंटच्या नाहीत म्हणून त्यांच्याकडे कुणी लक्षही दिलं नाही. आपल्या बोलण्यावर मुलांची काहीच प्रतिक्रिया नाही बघून त्यांनी चिडून निघून जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र पोर्चात हास्याचे फवारे उडाले हे सांगायला नकोच.  

कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकलची पोरं अतिशय टारगट म्हणून गणली जातात. लेक्चर्स बंक करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे मेकॅनिकलची पोरं वागतात. आपले ज्युनियर्स जर सिन्सीयरली लेक्चर्स करत असतील तर सिनियर्स येऊन त्यांना वेड्यात काढतात. इतकं की आपण लेक्चर्स करून मोठी चूक करतोय की काय असं त्या ज्युनियर्सला वाटू लागतं. हळूहळू मग तेही सिनियर्सचा कित्ता गिरवू लागतात. 'मासबंक' हा शब्द फक्त उच्चारायची खोटी की मेकॅनिकलची पोरं वर्गातून बाहेर असतात. इतर ब्रॅंचेसची पोरं लेक्चर्स इमाने इतबारे करत असताना मेकॅनिकलची पोरं मात्र निवांत असतात. 

किती निवांत? तर एकदा लेक्चर बुडवून पोर्चात बसलेल्या आम्हाला सर येऊन म्हणाले, 

"अरे इथे काय बसलात? चला सगळे लेक्चरला." एवढं सरांनी रंगेहाथ पकडल्यावर तरी लेक्चरला जावे. पण जातील ते मेकॅनिकलचे कसले? आमच्यातलेच एक दोन जण सरांना म्हणाले, 

"सर आज नको. उद्या आम्ही सगळे नक्की येऊ." काय बोलायचं आता? 

"उद्या नक्की यायचं." एवढं म्हणून सर बिचारे निघून गेले. 

हे लेक्चर बंक करणं दुसऱ्या वर्षांपासून सुरु होतं ते अगदी शेवटच्या वर्षापर्यंत सुरूच असतं. कॉलेजमधून घरी पत्रं वगैरे जातात पण पोरं पालकांनासुद्धा सांगतात, 

"ते पत्र फाडून टाका."

सबमिशन वगैरे प्रकार आपल्यासाठी नाहीच असं मेकॅनिकलची पोरं मानतात. वेळ आली की मग ज्याने एखाद्याने फाईल पूर्ण केली असेल त्याची फाईल संपूर्ण वर्ग कॉपी करतो. मग त्याचं काही चुकलं असेल तर सगळ्या वर्गाची तीच चूक होते. एखाद्या एक्सपेरिमेंटचे रिडींग सबंध वर्गाचे सारखेच असतात. इतर ब्रँचची पोरं दर आठवड्याला प्रॅक्टिकल करतात. मेकॅनिकलवाले सेमिस्टरच्या शेवटी एकाच दिवसात सलग बसून सगळे प्रॅक्टिकल करतात. चुकून एखाद्या विषयाचं प्रॅक्टिकल दर आठवड्याला झालं तर त्याचं जर्नल मात्र सेमिस्टरच्या शेवटीच पूर्ण केलं जातं. एखादा शहाणपणा करत मध्ये जर्नल घेऊन गेला तर प्रोफेसर लोकसुद्धा त्याला सेमिस्टरच्या शेवटी यायला सांगतात. मग एकाच दिवशी रांगेने सगळ्यांचे जर्नल तपासले जातात. आठ एक्सपेरिमेंट असतील तर आठ सह्या न करता, महिरप टाकून एकच सही केली जाते. 

बरं इतकं सगळं केल्यावर मार्क कमी पडले पाहिजेत. तसंही होत नाही. बऱ्याच पोरांना अगदी चांगले नाही तरी बरे मार्क पडतात. म्हणजे इतर ब्रँचची पोरं लेक्चर्सला बसून, जीवतोड अभ्यास करून जेवढे मार्क पाडतात तेवढे तर मेकॅनिकलची पोरं शेवटी शेवटी अभ्यास करूनही पाडतात. त्यामुळे आधीच मेकॅनिकलचा रुबाब असणाऱ्या पोरांना एखाद्या कॉम्प्यूटर किंवा इतर कुठल्या तत्सम ब्रँचच्या पोराने हटकले तर त्याची धडगत नसते. 

अभ्यास सोडून खेळाचा विषय घेतला तर तिथेही तेच. सगळ्या खेळांत मेकॅनिकलच विजेते. डायरेक्टर्स ट्रॉफी दर वर्षी मेकॅनिकलकडेच. नाही म्हणायला सिव्हिलवाले थोडीफार स्पर्धा करतात. पण त्यांच्यात अभ्यास करणारे फक्त अभ्यास करतात आणि खेळणारे फक्त खेळतात. 
कॉलेजच्या गॅदरिंगला दंगा करावा तर मेकॅनिकलच्याच पोरांनी. त्यांच्यासारखा दंगा कुणीच करत नाही. मग खुर्च्या हवेत फेकणे असो, खुर्च्यांवर उभे राहून नाचणे असेल, एखाद्याला विशिष्ट शब्दाने हाक मारणे असेल किंवा अजून काही. कॉलेजचं गॅदरिंग आपल्यासाठीच आहे अशा आविर्भावात मेकॅनिकलची पोरं वावरतात. 

या सगळ्या स्पर्धांमध्ये चियरिंगदेखील तेवढेच महत्वाचे असते. "आवाज कुणाचा?" असं म्हटलं की त्या त्या ब्रँचची पोरं आपल्या ब्रँचचं नाव घेऊन ओरडतात. या सगळ्यांत मेकॅनिकलचा आवाज सगळ्यात मोठा असतो हे सांगायला नकोच. माझ्या हॉस्टेलचा एक सिनियर केमिकल ब्रँचचा होता. त्याच्या ब्रँचच्या पोरांबरोबर चियरिंग करताना, "आवाज कुणाचा?" कुणी म्हटलं की त्याचे सगळे मित्र केमिकलचा म्हणायचे. हा एकटाच मेकॅनिकलचा म्हणायचा. त्यासाठी त्यांचा मारही खायचा. नंतर आम्हाला कायम सांगायचा, 

"मेकॅनिकल ब्रँच भारी असते राव. त्यावेळी ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी केमिकलला आलो. पण मेकॅनिकलबद्दल प्रेम अजूनही आहे." 

प्लेसमेंट सुरु होताना आम्हाला मार्गदर्शन करायला आमचे डीन आले. सगळ्याच ब्रँचची पोरं समोर बसली असताना डीनने आपल्या भाषणाची सुरुवात काही अशी केली, 

"खरं सांगायचं तर इंजिनीयरिंगच्या ब्रँच तीनच. एक सिव्हिल, दुसरी मेकॅनिकल आणि तिसरी इलेक्ट्रिकल. हे कॉम्प्युटर, ई अँड टीसी वगैरे सगळं खोटं आहे." 

त्यांचं हे वाक्य संपायची खोटी की मेकॅनिकलच्या पोरांनी अख्खा हॉल डोक्यावर घेतला. कुठल्याही इंजिनीयरिंग कॉलेजच्या प्लेसमेंट हॉलमध्ये डीनसमोर पोरांनी शिट्ट्या मारल्याचा हा एकमेव प्रसंग असेल. इतर ब्रँचच्या पोरांची तोंड तेव्हा बघण्यासारखी झाली. 

इंजिनीयरिंगचा शेवटचा पेपर झाला तेव्हा आमच्यातला एकजण भर वर्गात उभा राहून ओरडला, 
"अरे आवाज कुणाचा?"

आपण परीक्षागृहात बसलो आहोत याचा विचार न करता आम्ही सगळे एका सुरात ओरडलो, 

"मेकॅनिकलचा."

ते होत नाही तोच काही जणांनी व्हरांड्यात सुतळी बॉम्ब फोडले. तेवढ्यावर न थांबता ढोल ताशे बोलावून त्याच्या तालावर नाचायला सुरुवात केली. कॉलेजच्या आवारात नको म्हणून सांगायला
आलेल्या सिक्युरिटी गार्डलासुद्धा नाचवले. पोरं इंजिनीयर झाली म्हणून तोही आनंदाने नाचला. त्यानंतर मात्र इतर सगळ्याच ब्रँचची पोरं एकत्र येऊन नाचली. कारण सगळेच इंजिनीयर झाले. आज दहा वर्ष झाली इंजिनीयरिंग पूर्ण करुन. माझ्या माहितीतला एक मुलगा नुकताच मेकॅनिकल इंजिनीयर झाला. एकदा सहज गप्पा मारता मारता त्याला विचारलं, 

"मग सध्या आवाज कुणाचा आहे?"

"प्रश्न आहे का हा सर? परीक्षांचे पॅटर्न बदलले, वेळही बदलली, मुलंही बदलली तरी आवाज कायम मेकॅनिकलचाच होता आणि मेकॅनिकलचाच राहील." हे त्याचं उत्तर ऐकून मीही गालात हसलो. 

4 comments: