Wednesday, September 12, 2018

पी.आर.

पी.आर. म्हटलं की जुन्नरकरांना डॉ. पी. आर. कुलकर्णीच डोळ्यासमोर येतात. लहानपणी एकदा काहीतरी निमित्त झालं आणि मी आजारी पडलो. दोन तीन दिवस उपचार करूनही काही फरक पडेना. मग दादा मला घेऊन पीआरकडे गेले. ती पीआर आणि माझी पहिली भेट. तशी माझा वर्गमित्र आणि आता जवळचा मित्र असलेल्या आदित्यचे वडील म्हणून ओळख होतीच. मात्र पेशंट म्हणून त्यांच्याकडे जाण्याची ही पहिलीच वेळ. नंबर आल्यावर मी दादांबरोबर आत गेलो. त्यांनी दादांना नमस्कार केला आणि विचारले, 

"बोला, काय होतंय?" 

पेशंटला हा प्रश्न विचारण्याची पीआरची शैली अशी काही आहे की पेशंटच्या चेहऱ्यावर आपले दुखणे सांगतानाही हसू येते. 

दादांनी त्यांना काहीतरी सांगितले असावे. त्यांनी समोरच्या टेबलावर मला झोपवून तपासले आणि काही गोळ्या लिहून दिल्या. 

"परत कधी येऊ?" म्हणून दादांनी विचारले तर ते म्हणाले, 

"परत कशाला येता आता? एवढ्यात बरा होणार आहे तो. बिनधास्त जा."

आपला पेशंट परत आपल्याकडे येऊ नये असे म्हणणारा हा अजब डॉक्टर आहे. तेव्हापासून अनेकदा पीआरकडून कधी डोकं फुटलं म्हणून, कधी डोळ्याच्या वर खोक पडली म्हणून, कधी गुडघा फुटला म्हणून पट्टी मारून घेणं हे नित्यनियमाचे झाले. त्यांचा दवाखानाही शाळेच्या जवळ असे.त्यामुळे काही झालं की मी आधी त्यांच्याकडे पळत असे. त्यांनाही कौतुक वाटे. मुलं म्हटलं की पडझड आलीच. त्यासाठी त्यांना रागावून काही होत नाही असंही हे पालकांना आवर्जून सांगत. 

दादा सांगतात त्याप्रमाणे पीआर जुन्नरमध्ये साधारणपणे १९७५-७६ मध्ये आले. जुन्नरमधल्या आपल्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी तेलीबुधवारातून केली. तेव्हा आठ आणे वगैरे फी घ्यायचे ते. पीआरचं पेशंटबाबतचे निदान अचूक असते अनेक जुने लोक आजही सांगतात. त्यामुळे योग्य उपचार होऊन पेशंटला गुणही येई. अल्पावधीतच पीआर जुन्नर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. अगदी लांब, मावळातूनसुद्धा पेशंट येऊ लागले. आजही त्यांच्याकडे तेव्हाचे काही पेशंट जे आता म्हातारे झाले आहेत ते येत असतात. कौतुकाने सांगतातही की "डाक्टर आठ आणे फी घ्यायचा तवापासून येतूय." याला कारण एकच. हा डॉक्टर आपल्याला नक्की बरं करणार ही श्रद्धा. 

आपल्याकडे येणारा पेशंट लवकरात लवकर बरा कसा होईल याच भावनेने पीआर त्याला तपासतात आणि औषधे देतात. बरं औषधं देताना भरमसाठ दिलीत असंही नाही. जेवढी गरजेची तेवढीच देणार. एमआरने सॅम्पल म्हणून दिलेली औषधे असतील तर एखादया गरीब पेशंटला तीच फुकट देऊन टाकणार. एखाद्या पेशंटकडे पैसे नसतील तर खुशाल पैसे न घेता "पुढच्या वेळी द्या" म्हणत त्याला जाऊ देणार. एखादा आजार दोन दिवसात बरा होणार असेल तर पेशंटला ते तसं स्पष्ट सांगतात. त्यासाठी त्याला उगाच दोन तीन दिवसांनी फॉलोअपला बोलावणे हा प्रकार अजिबात नसतो. बऱ्याचदा पेशंटला दोन दिवसात बरं वाटूनही जातं आणि 'डॉक्टर म्हणाले तेच बरोबर बरं का' अशा भावनेनं तो पुन्हापुन्हा येत राहतो. 

गेली पंचवीस एक वर्ष त्यांचा दवाखाना जुन्नरमधल्या ब्राह्मण बुधवार पेठ आणि सय्यदवाडा यांच्या सीमेवर आहे. सय्यदवाड्याच्या जवळ असल्याने साहजिकच मुसलमान पेशंट भरपूर असतात. मुसलमान स्त्रिया सहसा कुणासमोर आपला बुरखा उघडत नाहीत. पीआरसमोर मात्र त्यांना काहीही प्रॉब्लेम नसतो. कारण आहे डॉक्टरांवर असलेला विश्वास! आपल्या मुलाला/मुलीला डॉक्टर नक्की बरं करणार हा तो विश्वास आहे. 

पीआरची मला आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे त्यांचं शिट्टी वाजवणं आणि गुणगुणणं. पेशंट तपासता तपासता हा माणूस खुशाल शिट्टी वाजवत असतो. बरं ती शिट्टी काही हळू वगैरे नसते. चांगली जोरात असते. आता तर पेशंट लोकांनाही सवय झाली आहे. डॉक्टर गुणगुणत नसतील पेशंटलाही चुकल्यासारखे वाटत असावे. आदित्यमुळे माझे त्यांच्या घरीही येणेजाणे असते. घरी असतानाही पीआर मस्त शीळ घालत असतात. कधीकधी तर आदित्य, त्याची आई आणि मी काहीतरी गंभीर चर्चा करत असतो आणि पीआर मध्येच येऊन शिट्टी वाजवत आतल्या खोलीत जातात.    

डॉक्टर असले तरी पीआर श्रद्धाळू आहेत. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या पहिल्या गाडीपासून ते आत्ता असलेल्या होंडा सिटीपर्यंत प्रत्येक गाडीवर पुढच्या काचेवर 'श्री' लिहिलेले असते. बाकी काहीच नाही. फक्त 'श्री'.  

पीआर म्हटलं की त्यांचा कंपाउंडर फारूकचा उल्लेख टाळता येत नाही. गेली कित्येक वर्षे फारूक त्यांच्याकडे काम करतोय. अगदी 'वन मॅन आर्मी' सारखं म्हटलं तरी हरकत नाही. डॉक्टरांना भेटायचं म्हणजे आधी फारुकला नमस्कार घालावा लागतो. अगदी आम्ही मित्रही आदित्यच्या घरी जाताना, "क्या फारुक, कैसे हो?" विचारल्याशिवाय वर जात नाही. तसं पाहिलं तर फारुक साधा कंपाउंडर पण पीआरने त्यालासुद्धा इतकी वर्षे जपलंय. आता त्यालाही वयपरत्वे काम जमत नाही. तरीही तो रोज जमेल तेवढा वेळ येऊन जातो. अनेक पेशंटलाही फारूक माहित असतो. त्यामुळे दवाखान्यात आलं की तेही फारुकची चौकशी केल्याशिवाय आत जात नाहीत. फारुकची जागा आता मनिषाने घेतली आहे. तीदेखील आपली जबाबदारी समर्थपणे निभावते आहे. 

डॉक्टर म्हटलं की लोक फोन करूनही सल्ला घेतात. काहीजण फोनवर औषधे विचारून दवाखान्यात येतच नाहीत. अशा महाभागांना बरेचदा फोन स्वतःच घेऊन पीआर "डॉक्टर बाहेर गेलेत" असं सांगून फोन ठेवून देतात. एकदोन वेळेस असं केलं की पेशंटलाही कळून चुकतं. 

लँडलाईनच्या जमान्यात बरेचदा रॉंग नंबरही येत. जुन्नरच्या भूषण हॉटेलचा असाच रॉंग नंबर पीआरकडे येत असे. रॉंग नंबर सांगूनही समोरचा माणूस ऐकत नसेल तर पीआर अनेकदा ऑर्डर घेऊन मोकळे व्हायचे. त्यानंतर तो फोन करणारा आणि भूषण हॉटेल यांच्यात काय संवाद होत असेल देव जाणे. 

स्वतः डॉक्टर असल्याने ते तब्येत सांभाळून असतात. रोजचे फिरणे कधीच चुकत नाही. अलीकडे कधी कंटाळा आलाच तर फिरायला जात नाहीत. आम्ही लहान होतो तेव्हा तर पंचलिंगाकडे पीआर आणि डॉ. निरगुडकर यांचे वेगात चालणे पाहण्यासारखे असे. अर्थात त्याचा फायदा दोघांनाही झाला.   

लोकांना डॉक्टर म्हणून माहित असलेले पीआर एक चांगले वाचकही आहेत. त्यांचं वाचन सतत सुरु असतं. चित्रपट आणि खेळातही ते रस घेतात. कित्येकदा आम्ही एकत्र क्रिकेट आणि टेनिसचे सामने पाहिलेले आहेत.  पाहताना पीआर आमच्यातलेच होऊन बोलत असतात. त्यावेळी मी डॉक्टर आहे किंवा आदित्यचा बाप आहे असा अविर्भाव कुठेही नसतो. देव आनंदचा ज्वेलथीफ त्यांनी पन्नास वेळा सहज पाहिला असेल. 

आता आदित्य त्यांचा वारसा पुढे नेतो आहे. पीआर स्वतः इतके यशस्वी डॉक्टर असताना आदित्यला स्वतःचा जम बसवायला सुरुवातीला अवघड गेले. अखेरीस तोही पीआरचाच मुलगा आहे. त्याचंही निदान त्यांच्या इतकंच अचूक आहे. (माझ्या दादांच्या हार्ट अटॅकचं निदान त्यानेच केलं होतं.) आदित्य जबाबदारपणे गाडा हाकतो आहे त्यामुळे आणि वयपरत्वे पीआरनी आता प्रॅक्टिस थोडी कमी केली आहे. जमेल तेवढी प्रॅक्टिस ते करतात आणि बाकीचा वेळ आपली नात रीवाबरोबर आणि वाचन करत घालवतात. 

काही माणसं अशी असतात की ती नकळतपणे आपल्या आयुष्यवर प्रभाव पाडून जातात. माझ्या मते प्रत्येकाचे फॅमिली डॉक्टर अशाच काही व्यक्तींपैकी एक असतात. त्या त्या पेशंटच्या बऱ्याच बाबी त्यांना माहित असतात. पेशंटही डॉक्टरांकडून वेळच्यावेळी मार्गदर्शन घेत असतात. म्हणूनच कदाचित त्यांना 'फॅमिली डॉक्टर' म्हणत असावेत. माझ्या बाबतीतही तसेच झाले. आज इतक्या वर्षांनी विचार करताना पीआरचा माझ्या आयुष्यातला थोडा का होईना वाटा नाकारता येत नाही. 

तुमच्या फॅमिली डॉक्टरबद्दल तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा.

6 comments: