आत्ताच चेन्नई एक्स्प्रेस पाहून घरी परतलो आहे.
चित्रपट का पहिला वगैरे चर्चा करण्यात मला फारसं स्वारस्य नाहीये. चित्रपट तसा
सुमारच होता. पण चित्रपटाच्या शेवटी लुंगी डान्स नावाचं एक गाणं दिग्दर्शकाने
टाकलं आहे. मला चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्टं म्हणजे हे गाणं.
त्याचं कारण म्हणजे ते गाणं हे “रजनीकांत” यांना केलेलं अभिवादन आहे (बॉलीवूडचा
बादशाह असला तरी दक्षिणेकडे खरा सुपरस्टार रजनीकांतच आहे हे कदाचित शाहरुखला कळलं असावं.).
तुम्ही म्हणाल अचानक रजनीकांतबद्दल तुला का बाबा
प्रेम वाटायला लागलं. खरं तरं बरेच दिवस या प्रसंगाबद्दल लिहावं असं मनात होतं. पण
काही ना काही कारणांमुळे ते राहून जायचं. या चित्रपटाच्या निमित्ताने ते आठवलं आणि
तुम्हाला ते सांगावं या हेतूने लिहितो आहे. ऑगस्ट २००९ मध्ये मी अमेरिकेत उच्च
शिक्षणासाठी आलो. ज्या विद्यापीठात मला प्रवेश मिळाला तिथे बहुसंख्य तेलगु आणि
तमिळ विद्यार्थी होते. याचसुमारास रजनीकांतवर इंटरनेटवर अनेक विनोद यायला लागले.
आणि हे विनोद मला आवडले म्हणून मी माझ्या फेसबुकवर शेअर करू लागलो. काही विनोद मी
स्वतः तयार केलेले असायचे. हे विनोद वाचून काही लोकांना प्रचंड हसू येई. आणि तसं
ते मला सांगतदेखील असत. एकदा मात्र बाका प्रसंग उभा राहिला. एक लेक्चर संपवून मी
घरी येत असताना एक तेलगु सिनियर मला रस्त्यात भेटला. त्याचं पाहिलं वाक्य, “तू
स्वतःला कोण समजतोस?” मी बुचकळ्यात पडलो की हा असं का विचारतो आहे. तोच त्याचं
दुसरं वाक्य, “तू फेसबुकवर रजनीकांतची टिंगल का करतोस? त्याच्यावरचे फालतू विनोद
का शेअर करतोस?” मला लक्षात आलं की याला नक्की कसला त्रास होतोय. वेळ मारून
न्यायची म्हणून मी त्याला असं काही नाहीये सांगून पळ काढला. मुळात माझा असा काही
हेतू नव्हता. इतक्या मोठ्या माणसाची टिंगल करावी असा विचारदेखील माझ्या मनात
नव्हता. पण शांत बसेल तो मी कसला म्हणून मी घरी जाउन रजनीकांतबद्दल शक्य असेल तेव्हढी
माहिती शोधून काढली. सुदैवाने माझा एक रूममेट तमिळ होता. त्याने मला अजून काही
माहिती पुरवली. हे सगळं करून झाल्यावर मी अजून जोमाने माझा जुना उद्योग सुरु केला.
रजनीकांतबद्दल जोक लिहिणे. हे मात्र काही त्या सिनियरला पटलं नाही. त्याने पुन्हा
एकदा मला गाठलं आणि तोच प्रश्न पुन्हा विचारला. यावेळेस मी तयार होतो. मी त्याला रजनीकांतबद्दल
उलट काही प्रश्न विचारले. त्याची तत पप झाली. मी त्याला सांगितलं, “राजा नुसतं मी रजनीकांतचा
फॅन आहे असं म्हणून चालत नाही. त्याने काय केलंय, कशामुळे त्याला इतका सन्मान
मिळतोय हेदेखील माहीत असू देत. तुला रजनीकांतबद्दल जितका आदर आणि प्रेम आहे तितकाच
आदर आणि प्रेम मलादेखील आहे. केवळ जोक फेसबुकवर टाकले म्हणून मी त्याची टिंगल करतो
असं नाहीये.” हे समजून सांगितल्यावर मात्र स्वारी नरम आली आणि तिथून पुढे कधी
त्याने मला पुन्हा असा प्रश्न विचारला नाही.
रजनीकांतबद्दल अजून काही लिहावं असं बरेच दिवस
मनात आहे. पण ते पुन्हा कधीतरी.
mast .. Tuzi lihnyachi bhasha oghavti ahe.. gives me a comfortable feeling while reading..
ReplyDeleteDhanyawad Aniruddha....
ReplyDelete