स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.
तसं पाहायला गेलं तर जुन्नर हे छोटं शहर. या
छोट्या शहरात चार मोठ्या शाळा. त्यातल्याच एका शाळेत मी अगदी बालवाडीपासून ते
दहावीपर्यंत शिकलो. या सबंध दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षाच्या काही आठवणी
आहेत. या सगळ्या आठवणींमध्ये एक आठवण मात्र सारखी आहे. ती म्हणजे दरवर्षीचा स्वातंत्र्यदिन
दर १५ ऑगस्टला आम्ही तिन्ही भावंडे सकाळी लवकर उठत असू. आंघोळ करून
दादांनी कडक इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून, पायात पांढरे शुभ्र, नवे कोरे बूट
आणि नवे सॉक्स घालून मी तयार होत असे आणि मित्रांबरोबर शाळेत जात असे. खालच्या शाळेत
तेव्हा कुलकर्णी बाई शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका होत्या. त्या सगळ्यांना रांगेत उभे
करत असत. अजूनही त्यांची ती खास स्वातंत्र्यदिनासाठी घातलेली पांढरी साडी आणि
गळ्यात शिट्टी अशी मूर्ती डोळ्यांसमोर येते. झेंडावंदन होताच आकाशात सोडायला
म्हणून काही मुले कबूतरे घेऊन येत असत. त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळ्या रांगेत
सगळ्यांच्या पुढे उभं केलं जात असे. दर वर्षी माझा आपल्याकडे कबूतर नाही आणि
त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या पुढे उभं राहता येत नाही म्हणून संताप होत असे. दरवर्षी
मी दादांकडे मला कबूतर पाळू द्या असा हट्ट करत असे.
शाळेतल झेंडावंदन संपवून मग तहसीलदार कचेरीकडे आम्ही
सगळे धाव घेत असू. कारण तिथे पोलीस दल, गृहरक्षक दल, एन.सी.सी. असे सगळेच लोक असत.
का कोण जाणे पण कचेरीतील तो कार्यक्रम चुकू नये म्हणून मी खूप काळजी घेत असे.
अजूनही त्या कार्यक्रमाबद्दल लहानपणापासून असलेली उत्सुकता तशीच कायम आहे. तिथेच
दादा मला भेटत असत आणि आम्ही तो कार्यक्रम आटोपून घरी परतत असू. घराच्या वाटेवर असताना
दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
दूरदर्शनवर पाहण्याचे वेध लागलेले असत. घरी येताच टीव्हीसमोर बसून तो कार्यक्रम मी
बघत असे. महाराष्ट्राचा रथ दिसला की का कोण जाणे पण अभिमान वाटत असे. तो संपूर्ण
कार्यक्रम पाहून मग उरलेला दिवस सुट्टीचा आनंद घेण्यात घालवत असे.
वरच्या शाळेत गेल्यावर मात्र थोडी वेगळी
परिस्थिती होती. मला का कोण जाणे पण एम.सी.सी. मध्ये सहभागी होण्यात फारसा रस
नव्हता. कदाचित त्यासाठी घालावी लागणारी अर्धी चड्डी हेही एक कारण होतं. मग मी
शाळेच्या बँड पथकात सहभागी व्हायचं ठरवलं. बँडपथकात असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण
मानलं जाई. त्यामुळे तेही एक समाधान मनाला होतचं. आख्खा ट्रूप आमच्या समोरून बँडच्या
तालावर परेड करत आमच्या समोरून जात असे. बँड पथकातल्या माझ्या एका सहकार्याला एक
मुलगी तेव्हा आवडायची. परेड आमच्या समोरून जाताना त्याला ती दिसावी म्हणून त्याला
मी पुढे माझ्या जागी उभं राहू दिल्याचं मला आठवतंय. शाळेनंतर मग परेड करत आम्ही सगळे
कचेरीत जावून ध्वजारोहण करीत असू. कचेरीतून परत येताना शाळेच्या वाटेवर एक
निर्मनुष्य रस्ता होता. त्या रस्त्यावर आम्ही सगळे जणू काही बाप्पाच्या विसर्जन
मिरवणूकीत वाजवतो आहोत अशा थाटात जोरजोरात ढोल बडवत असू.
जुन्नर सोडून पुण्याला शिकायला आलो. पण दरवर्षी
१५ ऑगस्टला ध्वजारोहण कधी मी चुकवलं नाही. एक वर्षी मी पुण्याहून जुन्नरला जात
होतो. जुन्नरला जाईपर्यन्त समारंभ संपून गेलेला असेल असं माझ्या लक्षात आलं.
मध्येच कुरुळी फाट्यावर एक शाळा दिसली. पटकन गाडी वळवून मी त्या शाळेत गेलो. तिथे
ध्वजारोहण केलं आणि मग जुन्नरला गेलो.
पुढे शिक्षणासाठी अमेरिकेत आलो. इथे आल्यावर
देखील इंडियन स्टुडंट असोसिएशनच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मी जात असे. भारतात
असतानासुद्धा आपलं राष्ट्रगीत कानावर पडलं की उर भरून येत असे, अंगावर काटा येत
असे. आता परदेशात असताना आपलं राष्ट्रगीत ऐकलं तर आपण भारतीय असल्याचा अजूनच
अभिमान वाटतो. कधी कधी फार भावूक झालो तर डोळ्यांच्या कडा ओल्यादेखील होतात. अमेरिकेला
येताना आपला राष्ट्रध्वज मी बरोबर आणला होता. माझ्या घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये
भिंतीवर तो लावला आहे. आता नोकरीसाठी मी छोट्या गावात राहतो. इथे ध्वजवंदनाचा
औपचारीक कार्यक्रम होत नाही. दरवर्षी ध्वजारोहण चुकता कामा नये असं लहान असताना कधीतरी
दादांनी सांगितल्याच आठवतंय. त्यांच्या त्या शिकवणीप्रमाणे मी घरातल्या
तिरंग्यासमोर उभा राहून आपलं राष्ट्रगीत म्हणेन आणि माझ्यासाठी भारतीय
स्वातंत्रदिन साजरा झालेला असेल.
No comments:
Post a Comment