Wednesday, August 6, 2014

पोष्टरबॉईज

अगदी अलीकडेच लयं भारी या मराठी चित्रपटाबद्दल लिहिल्यानंतर पुन्हा एकदा इतक्या लवकर एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल लिहावसं वाटेल असं वाटलं नव्हतं. पण श्रेयस तळपदे आणि समीर पाटील च्या पोष्टरबॉईज पाहिला आणि त्याबद्दल लिहायला सुरुवात केली.

चित्रपटाचे प्रोमोज पाहून लक्षात आलं होतं की हा चित्रपट विनोदी असणार आहे आणि तो अंदाज खरं ठरला. भारतामध्ये वाढती लोकसंख्या हा फार गंभीर विषय आहे. ही वाढती लोकसंख्या थांबवण्यासाठी सरकारतर्फे पुरुषांसाठी नसबंदीच्या शस्त्रक्रियेची जाहीरात केली जाते. माझ्या माहितीप्रमाणे ही शस्त्रक्रिया सरकारतर्फे माफक दरात करून मिळते. पण ज्या पुरुषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली त्यांच्याकडे आपल्याकडील लोक फार चांगल्या नजरेनं पाहत नाहीत. जणू काही त्या माणसाने एखादा गंभीर गुन्हा केला आहे या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं जातं. आता ही अशी परिस्थिती असताना नसबंदीच्या जाहिरातीच्या पोस्टरवर जर एखाद्याने तुमचा फोटो तुम्हाला न विचारता छापला तर?

नेमकं हेच या चित्रपटाचं कथानक आहे. दिलीप प्रभावळकर, हृषीकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या चित्रपटाच्या तीन नायकांबद्दल हेच घडलं आहे. नसबंदीच्या जाहिरातीवर या तिघांचे फोटो छापून आल्याने त्यांच्या आयुष्यात आलेले बिकट प्रसंग आणि त्यातून वाट काढताना निर्माण झालेले विनोदी प्रसंग दिग्दर्शकाने सुरेख हाताळलेले आहेत. चित्रपटा विनोदी करताना त्यात विनोदाची अतिशयोक्ती होणार नाही याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतलेली आहे. त्याबद्दल त्याला १०० गुण.

दिलीप प्रभावळकर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याबद्दल मी न बोललेलंच बरं नाही का? मिळालेली कुठलीही भूमिका सहजरीत्या कशी करावी याचा धडाच ते देतात. हृषीकेश जोशी हा अभिनेता गेल्या काही दिवसात आठवणीत राहतील अशा भूमिका करतो आहे. या चित्रपटामधील त्याने साकारलेली मास्तरांची भूमिका चांगली लक्षात राहते. समोरच्याने बोलताना बरोबरच बोलावे यासाठी प्रसंगी तो मुख्यमंत्र्याचीसुद्धा चूक सुधारायला पुढेमागे पाहत नाही. या दोन तगड्या अभिनेत्यांसमोर अनिकेत तसा नवखा. पण त्याने आपल्या परीने त्याच्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. गावरान तरुणाची चुकीचं इंग्रजी बोलण्याची त्याची सवय लक्षात राहते. रोहित शेट्टी, अन्नू मलिक, फराह खान, सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या पाहुण्या भूमिका जमल्या आहेत. श्रेयस तळपदेने साकारलेली मुख्यमंत्र्याची भूमिका छोटी असली तरी त्याला ती जमली आहे. लेस्ली लुईसचं संगीत चित्रपटाच्या शेवटी असलेलं गाणं सोडलं तर फारसं लक्षात राहत नाही.

चित्रपट विनोदी असला तरी नसबंदी, स्त्री-पुरुष समानता, सामान्य माणसाने ठरवलं तरी प्रस्थापितांच्या विरोधात लढा देण्याची त्याची असलेली ताकद असे काही विधायक विचारदेखील दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या नकळतपणे मांडलेले आहेत. एकुणात दमदार कलाकारांना साथीला घेउन हे विनोदी कथानक समीर पाटीलने चांगल फुलविलेल आहे. मसालेदार हिंदी चित्रपट पाहण्याबरोबर असा एखादा चांगला मराठी चित्रपट बघायला काहीच हरकत नाही. 

No comments:

Post a Comment