Tuesday, August 26, 2014

रमा माधव

परवा रमा माधव हा मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेला चित्रपट पाहिला. हा ब्लॉग लिहायला थोडासा उशीर झालाय खरं तर. कारण एव्हाना बऱ्याच जणांनी हा चित्रपट पाहिला असेल. चित्रपट पाहायला जाताना काही अपेक्षा बरोबर घेऊन गेलो होतो. चित्रपट संपून बाहेर आल्यानंतर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या असं बिलकूल वाटलं नाही. 

चित्रपटाची सुरुवात रमा आणि माधव यांच्या लग्नापासून होते. छोटी रमा शनिवारवाड्यावर येते. वाड्यात प्रवेश करताना तिच्या वयाला शोभेल असा उखाणा घेते. आणि मग तिथून ते अगदी चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत दिग्दर्शिकेने पात्रांची ओळख करून दिली आहे. स्वामी अनेकदा वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर हा सगळा प्रवास ३ तासांत मांडणे हे मोठं शिवधनुष्य आहे याची कल्पना आली होती. आणि दिग्दर्शिकेने ते पेलले याबद्दल कौतुकही वाटले होते. पण जसजसा चित्रपट पुढे सरकू लागला तसा माझा हिरमोड व्हायला सुरुवात झाली. मला खटकलेले आणि आवडलेले काही मुद्दे. 

१. चित्रपटाची मांडणी करताना पात्रांची ओळख करून देणे ही गरजेची बाब दिग्दर्शिकेने फारच मनावर घेतल्यासारखे वाटले. अर्धा चित्रपट या सगळ्या पात्रांची ओळख करून देण्यात आणि काहीशी पार्श्वभूमी सांगण्यात संपतो. दिग्दर्शिकेला नेमकं रमा माधव यांच्यातले प्रेम दाखवायचे आहे की पेशवाई दाखवायची आहे असा गोंधळ उडाला आहे असे वाटले. 

२. पेशव्यांचा इतिहास किती मोठा आहे हे मी सांगण्याची गरज नाही. पानिपतच्या लढाईचे पेशव्यांच्या इतिहासामध्ये असलेले महत्व साऱ्यांनाच ठाउक आहे. ही लढाई चित्रपटामध्ये दाखवायचा अट्टाहास दिग्दर्शिकेला आवरता आला असता. ही लढाई दाखवायची होती तर त्याची भव्यता देखील दाखवणे गरजेचे होते याचा दिग्दर्शिकेला कुठेतरी विसर पडला असावा अशी शंका आली. ५-५० लोकांमध्ये पानिपतची लढाई दाखविण्याची चूक दिग्दर्शिकेने केली असं वाटून गेलं. 

३. पेशव्यांचे वैभव मी काय सांगावे. नितीन देसाई यांच्यासारखा नावाजलेला कला दिग्दर्शक असल्याने पेशव्यांचे वैभव, त्याची भव्यता पहायला मिळेल अशी अपेक्षा होती. ती पूर्ण करण्यात देसाई माझ्या दृष्टीने अपयशी ठरले आहेत.

४. शिवाजीराजे, संभाजीराजे यांच्या भूमिका साकारल्यानंतर सदाशिवराव भाऊंची काहीशी दुय्यम भूमिका साकारण्याची तयारी दाखविल्याबद्दल डॉ. अमोल कोल्हे याचे कौतुक करावेसे वाटले. 

५. आनंदीबाईची ओळख सामान्य लोकांना कपटी अशीच आहे. पण या चित्रपटामध्ये तिची भूमिका काहीशी वेगळी दाखविण्यात दिग्दर्शिका यशस्वी ठरली आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या मराठीवर मेहनत घेतल्याचे जाणवते. 

६. राघोबादादांची भूमिका साकारताना प्रसाद ओकने कमाल केली आहे. पेशवाईची गादी आपल्याला न मिळता आपला पुतण्या माधारावला मिळाल्यानंतर त्याचा झालेला संताप, त्या रागातून उफाळलेल्या सूडबुद्धीने त्याने केलेली कटकारस्थाने ही त्याने सुंदर साकारली आहेत. 

७. आलोक राजवाडे या तुलनेने नव्या कलाकाराने माधवराव सुंदर साकारला आहे. या चित्रपटासाठी त्याने तलवारबाजी आणि घोडसवारीचे खास धडे घेतल्याचे कुठेतरी वाचनात आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे प्रत्यंतर आले. पर्ण पेठेने रमेची भूमिका बरी साकारली आहे. दिग्दर्शिका तिला कदाचित एक अभिनेत्री म्हणून आणखी वाव देऊ शकली असती. 

एकुणात हा चित्रपट पाहण्याचा अनुभव फारसा आनंददायी ठरला नाही हेच खरे. चित्रपट संपल्यानंतर  बाहेर येताना गेल्या काही दिवसांत आलेल्या आणि येत्या काही दिवसांत येणाऱ्या मराठी चित्रपटांची संख्या पाहिली आणि मराठी चित्रपट मोठा होतोय अशी एक सुखद जाणीव झाली आणि गेलेला मूड काहीसा परत आला.

No comments:

Post a Comment