Sunday, April 29, 2012


नमस्कार. आज खूप दिवसांनी लिहायला बसलोय.मधल्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेल्यात. त्याचा आढावा आता घेत बसत नाही. या ब्लॉग न लिहिण्याच्या काळात बऱ्याच लोकांनी मला विचारलं काय रे बाबा, ब्लॉग का लिहीत नाहीयेस? दर वेळेस काहीतरी पळवाट शोधली मी. पण आज अचानक एका क्षणी वाटलं चला आज लिहुयात. निमित्त अतिशय छोटं होतं. माझा चष्मा.
तसा मी रोज चष्मा घालणारा माणूस नाही. पण गरज पडते तेव्हा मात्र वापरतो. आज सहज चष्म्याकडे पाहताना मनात विचार आला की आपण बारावीपासून चष्मा वापरायला सुरुवात केली. त्या अगोदर माझ्या बाबांचा चष्मा मी रोजचं पहायचो. आणि तेव्हा वाटायचं की आपल्याला चष्मा नाहीये ते बरं आहे. पण बारावीमध्ये असताना अभ्यासचं टेंशन म्हणा किंवा इतर काही म्हणा मला चष्मा लागला. आधी काही दिवस नवीन चष्म्याच अप्रूप होतं. पण कालांतराने तेही गेलं. मग तो चष्मा घालणं ही एक जबरदस्ती वाटू लागली. मी कंटाळा करू लागलो. मग पुण्यात आलो. आता पुण्यात आलो म्हणजे नवीन चष्मा पाहिजे ना. मग नवीन चष्मा बनवला. त्यासाठी चार पाच दुकाने फिरलो आणि शेवटी मग त्यातल्या त्यात बरी दिसेल अशी एक फ्रेम घेतली. कारण मी कॉलेजला जाणार होतो ना. आणि मग सुरु झाला तो एक छंद. येता जाता मी मला दिसतील त्या लोकांच्या चष्म्याच्या फ्रेम्सचं निरीक्षण करू लागलो. एखाद्या माणसाने घातलेल्या चष्म्याची फ्रेम आपल्याला कशी दिसेल याचा विचार करू लागलो. आणि यातून मला खूप मजा वाटायची. अजूनही मी असं करतो.
यातून एक गोष्ट लक्षात आली. चष्म्याची फ्रेम. तशी फार छोटी गोष्ट. पण ती जर ठीक नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या दिसण्यावर होतो. आणि म्हणूनच आपल्याला सुट होईल अशी फ्रेम असावी असं सगळ्यांना वाटत असतं. अजून एक म्हणजे काही लोकांना चष्मा घातलेलं पाहायची आपल्याला इतकी सवय असते की एखाद्या दिवशी त्यांनी चष्मा नाही घातला तर आपण त्या माणसाला ओळखत देखील नाही. काही मुली चष्मा घालून अतिशय हॉट दिसतात. तर काहीना नाही सुट होत चष्मा. हेच पुरुषांच्या बाबतीतदेखील लागू होतं. काही लोक तर आपल्याला चष्मा चांगला दिसतो म्हणून झिरो नंबरचा चष्मा वापरतात. तर काही लोक चष्मा नको म्हणून सर्जरी करून घेतात. काही लोकांना चष्मा आहे म्हणून सैन्यामध्ये जाता येत नाही. काहीजणांना चष्मा नसेल तर दिसतदेखील नाही.एखाद्याला चष्मा आहे म्हणून मित्र काय काय चिडवतात देखील. शाळेपासून पडलेली नावे अगदी आयुष्यभर चिकटून जातात. मग ती नावेदेखील भन्नाट असतात. अगदी ढापण, गांधी, बॅटरी, डबल बॅटरी अशी काय काय ती नावे असतात. या नावांवरून आठवलं की माझा एक मित्र आहे. त्याला आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून बॅटरी म्हणतो. नंतर त्याने लेसीक करून घेतली आणि आज तो आयएएस ऑफिसर आहे. तरी देखील आजही आमच्यातले काहीजण त्याला त्याच नावाने हाक मारतात.
तर लोकहो. चष्मा. पाहायला गेलं तर किती छोटी वस्तू. पण याच चष्म्यामुळे कित्येक जणांना आपली नावं बदलायला लागतात (कागदोपत्री नव्हे), कित्येक जणांना आपण चांगले दिसतो हे समजत, अगदी काही जणांच लग्नदेखील ठरतं.
तर असा हा चष्मा आणि अशा या चष्म्याच्या गमती. राम राम.