Friday, September 5, 2014

गणेशोत्सव

बरेच दिवस खरे तर गणेशोत्सवाबद्दल लिहावं असा विचार करत होतो. आज अखेरीस मुहूर्त लागला. गणपती येणार म्हटलं की आपल्या आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळंच चैतन्य आल्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. ह्या ब्लॉगच्या निमित्ताने जुन्नरच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणी जागविण्याचा प्रयत्न करतोय

आमच्याकडे घरी गणपती नसे. पण माझ्या आत्त्याच्या घरी गणपती बसवायला आम्ही तिन्ही भावंडे जात असू. अगदी मूर्ती ठरवायला जाण्यापासून ते घरी सजावट करणे इथपर्यंत मी रवी दादाला मदत करत असे. थोडा कळत्या वयाचा झाल्यावर गणपती घरी आणल्यानंतर प्रतिष्ठापना करताना त्या वेळच पौरोहित्य देखील मीच करत असे. या सगळ्यात का कोण जाणे एक वेगळीच मजा वाटे.आत्याच्या घरच्या गणपतीबरोबर पेठेतल्या आम्हा सगळ्या लहान मुलांच्या मंडळाचा देखील गणपती असे. त्यासाठी मग वर्गणी गोळा करायला रोज संध्याकाळी आम्ही सगळे जात असू. यावर्षी काय काय करायचं, कोणत्या स्पर्धा भरवायच्या, मूर्ती कशी आणायची, अध्यक्ष कोण, खजिनदार कोण या सगळ्या प्रश्नांवर त्यावेळेस भरपूर खलबते केली जात. गणपती आल्यानंतर ठरलेले सगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सगळेजण तितकेच कष्ट करत

शाळेतही गणपती असे. मग पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना झाल्यानंतर कुलकर्णी सरांनी पाठ करून घेतलेलं अथर्वशीर्ष सगळे विद्यार्थी म्हणत असत. त्यावेळेस पाठ झालेलं अथर्वशीर्ष आजही रोज आंघोळ करताना अगदी तसच्या तसं म्हणताना फार बरं वाटत. गणपती म्हटला की शाळेत लेझीम असे. मुलींकरता टिपऱ्या असतं. गणपती सुरु होण्याच्या साधारण महिनाभर आधी लेझीम पथकाचा सराव सुरु होत असे. रोज शाळा सुटल्यावर हा सराव ढमाले सर करून घेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस सबंध जुन्नर शहरातून आम्ही लेझीम खेळत जात असू. त्यावेळेस रस्त्याच्या आजुबाजूला उभे असलेल्या लोकांच्या, पालकांच्या कौतुकाने भरलेल्या नजरा आठवल्या की आजदेखील मोठा आनंद होतो. ढमाले सरांचा विसर्जन मिरवणुकीचा जोश काही न्याराच असे. खत्री पेढेवाल्याच्या दुकानासमोर शेवटची सलामी द्यायला आम्ही तिथे पोहोचलो की सर ढोल स्वतःच्या हातात घेत. एकदा त्यांनी ढोल हातात घेतला की तो ढोल फुटेपर्यंत ती सलामी चालत असे. सरांचा तो त्वेष पाहून आम्ही सगळे भान हरपून लेझीम खेळत असू.आणि मग वेध लागत ते विसर्जन केल्यानंतर मिळणाऱ्या डाळीच्या खिरापतीचे. सगळ्या विद्यार्थ्यांना पुरेल एवढी खिरापत तयार केली जात असे आणि अगदी डबे भरून ती दिली जात असे

इतकी सगळी मजा झाल्यानंतरदेखील दहाव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीचे वेध लागलेले असतं. त्या दिवशी भरपूर वेळ बाहेर राहायला मिळावं म्हणून मी आधीचे दिवस मी शक्य तेवढा जास्त वेळ अभ्यासाला देत असे. आणि मग अखेरीस दहावा दिवस आला की अगदी सकाळीच कल्याण पेठेच्या चौकात आम्ही जात असू. आत्ता अलीकडे लोकप्रिय झालेल्या स्पिकरच्या भिंती त्यावेळेस नसत. त्या वेळेस असत ते रांगडे ताफे. जुन्नरच्या आसपासच्या छोट्या गावागावानी असे ताफे असत. त्यांना विसर्जन मिरवणुकीच्या सुपाऱ्या दिल्या जात असत. तंबाखूचा किंवा गुटख्याचा एक तोबरा तोंडात भरून ह्या गावरान मंडळीनी एकदा ढोल ताशे बडवायला सुरुवात केली की ते तासनतास थांबत नसत. आज पुण्यातली १०-१२ ताशे आणि ३०-४० ढोल असणारी पथके जितका आवाज करतात तेवढाच किवा त्याहून तसुभर जास्तच आवाज हे लोक - ताशे आणि १५-२० ढोलांच्या मदतीने करत असतआणि त्या तालावर आम्ही सारे बेभान होऊन मोरया मोरया असा गजर करत नाचत असू. नकळत्या वयातले नाचातानाचे अंगविक्षेप मान्य करताना आजदेखील लाज अशी वाटत नाही. दिवस पुढे सरेल तशी मिरवणूक पुढे सरकत असे. रविवार पेठेतून शनिमंदिराच्या चौकात मिरवणूक पोहोचली की आमचा मित्र विनायकच्या आईने केलेल्या बटाटे वड्यांवर ताव मारायला आम्ही जात असू. विनायकचे १०-१२ आणि त्याचा भाऊ गणेशचे १०-१२ असे जवळजवळ २०-२२ जण या साऱ्यांना विन्याची आई आग्रह करकरून वडे खाऊ घालत असे. हे सगळं संपत असताना गणपती मशिदीजवळ कधी जातोय याची सगळे वाट पाहत असत. मानाचा पहिला रविवार पेठेचा गणपती मशिदीजवळ गेला की जवजवळ सगळ्याच पेठांची मुले तिथे जमा होत असत. ताफ्यावाल्याना त्या अगोदर विशेष खुराक पुरवला जात असे.कडक पोलीस बंदोबस्तात मशिदीजवळ ताशांचा गजर सुरु झाला की नकळतपणे साऱ्यांच्याच अंगात एक खुमखूमी जागत असे आणि देहभान हरपून सारेजण मोरयाचा उच्चार करत नाचत असत. तिथे मग सगळेच एकेमेकांचे मित्र असत. तिथे वयाचे बंधन नसे. तरुणांच्या उत्साहाला आवर घालताना जेष्ठांच्या नाकी नऊ येत असत. काही छोट्या मोठ्या मारामारीचे प्रसंग देखील उद्भवत असत. पण ते तेवढ्यापुरते असे. एकदा तिथून मिरवणूक पुढे सरकली की मग एकदम नगरपरिषदेसमोर शेवटचा डाव होऊन बाप्पाला निरोपासाठी नदीवर नेले जात असे

कालानुरूप मिरवणुकीचे स्वरूप पालटले. हल्ली सुरक्षिततेचे कारण देऊन मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न असतो. तो निश्चितच स्तुत्य आहे. पण हे सगळे करत असताना विसर्जन मिरवणुकीची मजाच लोकांना घेत येणार नाही अशी पावले उचलली जाणार नाहीत ही खबरदारी पोलिस आणि गणेश मंडळे घेतील एवढी एक माफक अपेक्षा



टिप - सदर छायाचित्र माझा मित्र अतुल काजळे (टिटू) याच्या ढोल ताशे अल्बम मधून साभार