काल थोडा उशिराने का होईना पण नवीन आलेला 'डबलसीट' हा मराठी सिनेमा पाहिला. अगोदर अनेक लोकांनी चित्रपट चांगला असल्याचं सांगितलं होतं. मी मुद्दामच या चित्रपटाचं समीक्षण वाचलेलं नव्हतं. कारण माझ्या मते मग आपण चित्रपट त्या समीक्षणाला डोळ्यासमोर धरून बघतो.
अमित आणि मंजिरी नाईक या एका टिपिकल चाळीतल्या मध्यमवर्गीय जोडप्याची ही कथा आहे. चित्रपटाचे प्रोमोज पाहुनच बऱ्याच लोकांना हा चित्रपट जवळचा वाटला होता. अमित आणि मंजिरीचा नवा संसार अमितच्या आई बाबांच्या चाळीतल्या घरामध्ये सुरू होतो. मग नेहमीप्रमाणे जागा कमी पडणे, प्रायव्हसी नसणे हे प्रॉब्लेम सुरू होतात. पण मंजिरी या सगळ्याला हसतखेळत सामोरं जाते. पण कुठेतरी त्या दोघांना ही जाणीव होते की हे असं कधीपर्यंत जगायचं. आपलं स्वतःचे घर असले पाहिजे. आणि इथुन मग सुरु होतो घरच्यांचा विरोध जो नंतर मावळतो. घर येताना आलेल्या अडचणी, पोळलेले हात आणि मग पुन्हा राखेतून भरारी घ्यावी तशी पुन्हा एकदा नाईक कुटुंबीयांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्याला आलेले यश असा चित्रपटाचा शेवट गोड होतो.
चित्रपटाचं बरंच यश हे कलाकारांवर अवलंबून असतं. या चित्रपटाचं म्हणाल तर सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केलेलं आहे. अंकुश चौधरी इतक्या वर्षानंतरसुद्धा मराठी चित्रपटांवर आपली अजून तितकीच पकड आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करतो. मुक्ता बर्वेचा अवखळ, प्रेमळ अभिनय आणि घरावर संकट आल्यावर दाखवलेला खंबीरपणा वाखाणण्याजोगा. वंदना गुप्ते तर अशा भूमिका लीलया पेलतात. चित्रपटाच्या मध्यावर मुक्ताबरोबर असलेला त्यांचा एका संवाद चित्रपटगृहातल्या ९० टक्के लोकांच्या डोळ्यात पाणी आणतो. कुठेतरी प्रत्येकाला आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींचा, सोसलेल्या त्रासाची आठवण येते.
चित्रपटाचं संगीत ही आणखी एक जमेची बाजू म्हणता यॆइल. हृषीकेश, सौरभ आणि जसराज या संगीतकार त्रयीने गेल्या काही दिवसात आपल्या गाण्यांनी लोकांची मने जिंकली आहेत. मन सुद्द तुझं, किती सांगायचय मला ही गाणी अगोदरच लोकप्रिय झाली होती. मला विशेष आवडलेलं गाणं म्हणजे मन फिरुनी. अभय जोधपुरकर आणि प्रियांका बर्वेने सुरेख गायलेलं आहे.
माझ्या मते चित्रपट यशस्वी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे प्रेक्षक सबंध चित्रपटामध्ये कुठेतरी स्वतःला पाहतात. प्रत्येकाला ही स्वतःची गोष्ट वाटते. प्रत्येकाला आपलं स्वतःचं घर असावं असं वाटत असतं. मग त्यातून येणारे आनंद आणि दुःखाचे प्रसंग हे सगळ दिग्दर्शकाने चपखल मांडलेले आहे. याबद्दल त्याचेही कौतुक केलंच पाहिजे.
अजून एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. चित्रपट आला तेव्हा दुसऱ्या दिवशी ई-स्वेअर ला ब्रदर्स चित्रपटाचा खेळ रद्द करून डबलसीट चा खेळ लावल्याचे वाचनात आले. काल मी चित्रपट ई-स्वेअरच्या पाचव्या पडद्यावर पाहिला आणि सबंध चित्रपटगृह भरलेलं होतं. मी याआधी सुद्धा म्हटलं होतं आणि आत्तासुद्धा पुन्हा म्हणेल की मराठी चित्रपट मोठा होतोय.