नाना नाना आणि फक्त नाना. असंच वर्णन करावं लागेल "नटसम्राट" या चित्रपटाचं. तुमची मातृभाषा कोणतीही असूद्यात. हा चित्रपट तुमच्यासाठी नक्की एक मेजवानी आहे. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकावर बेतलेला हा चित्रपट. महेश मांजरेकरांनी प्रचंड मेहनत घेऊन ही कलाकृती बनवली आणि नाना पाटेकरांनी आपल्याला मिळालेल्या भूमिकेचं खरोखर सोनं केलय.
गणपतराव बेलवलकर आपल्या अतिशय यशस्वी कारकीर्दीनंतर निवृत्ती घेतात. आपल्या कुटुंबीयांसोबत आता वेळ घालवायचा हे त्यांनी ठरवलेले असते. आपलं घर आणि इतर सगळी संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करून गणपतराव मोकळे होतात. आपल्या नवऱ्याचा हा निर्णय त्यांच्या बायकोला (गणपतराव चित्रपटामध्ये त्यांना प्रेमाने "सरकार" असं संबोधतात) फारसा पटत नाही पण त्या त्यांची साथ देतात. सगळं काही गणपतरावांना वाटतं असतं तसं घडतं नाही आणि अखेरीस ते दोघे घर सोडून बाहेर पडतात. आणि तिथून पुढे घडलेला सगळा भाग हा फक्त चित्रपटगृहामध्येच पहावा असं मी म्हणेन.
काही संवाद तुम्हाला हसायला लावतात पण पुढच्या क्षणाला तितकेच विचारातदेखील पाडतात कारण ते वास्तव असल्याची तुम्हाला लागलीच जाणीव होते. नानांची प्रमुख भुमिका असली तरी मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनिल बर्वे यांच्या भूमिकांचे महत्व कमी होत नाही. नेहा पेंडसेने आपल्या कारकीर्दीमध्ये आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याहून पूर्णपणे वेगळी अशी भूमिका तिने या चित्रपटामध्ये साकारलेली आहे. तिची भुमिका हा माझ्यासाठी एक धक्का होता हे मात्र निश्चित. माझा मित्र चैतन्य म्हणाला त्याप्रमाणे मेधा मांजरेकरांचे डोळेच इतके बोलके आहेत की त्यांनी फक्त कॅमेराकडे पाहिलं की प्रेक्षकांना त्यांना काय म्हणायचे आहे हे लक्षात येतं. हा त्यांच्या अभिनयाचा विजय आहे असे मी म्हणेन. काही जणांना चित्रपटामधले काही प्रसंग नाटकासारखे वाटतील पण माझ्या मते त्याची गरज होती म्हणून दिग्दर्शकाने ते प्रसंग तसे केले असतील. विक्रम गोखलेंची भूमिका थोडी अजून लांबीची असती तर कदाचित अजून मजा आली असती. डॉक्टर श्रीराम लागूंनी केलेली भूमिका प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण ही भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य नानांनी यशस्वीरीत्या पेलेलेलं आहे असं मी म्हणेन.
नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोन प्रचंड ताकदीच्या अभिनेत्यांची जुगलबंदी पहायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा. नाना पाटेकरांचे वजनदार मोनोलॉग ऐकायचे असतील तर हा चित्रपट नक्की बघा. भूमिकेचं बेअरिंग म्हणजे काय असतं हे पाहायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. संवादफेक म्हणजे काय असतं, प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणे म्हणजे काय असते हे पहायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. मराठी चित्रपटसृष्टी मधली अलीकडच्या काळातली एक उत्कृष्ट कलाकृती पहायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा. हा चित्रपट न पाहणे ही आपली चूक झाली असं नंतर वाटेल इतका जमून आलाय हा चित्रपट. लवकर जा.