या आठवड्यामध्ये कामानिमित्त केरळमधील कोचीनला जाण्याचा योग आला. तिथल्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्हाला हवा असलेला माणुस मुन्नारच्या शाखेत असतो. मी आणि माझा सहकारी दोघेही मग कोचीनहून मुन्नारला गेलो.
मुन्नारबद्दल आधी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं. मुन्नारला जाणाऱ्या रस्त्यावर एकुणात पुढे आपल्याला काय दिसणार आहे याची साधारण कल्पना येऊ लागली होती. मुन्नारमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी ठरल्याप्रमाणे त्या माणसाला भेटलो. त्याने अजून एका माणसाला भेटायला सांगितल्याने खरं तर निराश आम्ही झालो पण कामाचा भाग म्हणून त्याला सुद्धा फोन केला. हे सगळं उरकेपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले होते. अर्थातच त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावले.
सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्याने आता हॉटेल मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. अखेरीस एका हॉटेलात रूम मिळाल्या आणि आमची गाडी त्या दिशेने चालू लागली.
त्या संध्याकाळी आभाळ काहीसं भरून आलेलं. मुळात मुन्नार उंचीवर असल्याने ढग खाली उतरू लागले होते. जागोजागी पर्यटक थांबून फोटो काढत होते. इतका वेळ गाडीत बसून निसर्गाच्या सौंदर्याची स्तुती करणारा मी एका विशिष्ट ठिकाणी गेल्या नंतर स्वतःला थांबवू शकलो नाही. माझ्या सहकाऱ्याला गाडी थांबवायला सांगून मी खाली उतरलो आणि ते सौंदर्य डोळ्यांमध्ये भरून घेऊ लागलो. सहसा कशाला पटकन चांगला न म्हणणारा मी निसर्गाची ती किमया पाहून हरखून गेलो होतो. नकळत हात फोनकडे गेला आणि मी फोटोज काढायला लागलो.
नजर जाईल तिथपर्यंत चहाचे मळे आणि ते संपले की पश्चिम घाटाच्या डोंगररांगा. यातले बहुसंख्य चहाचे मळे टाटांच्या मालकीचे आहेत. इथेच चहा बनविण्याचे कारखाने सुद्धा आहेत. इथे तयार होणारा चहा पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये विकला जातो. मुन्नारमध्ये गेलाच आहेस तर येताना आपल्याला चहा पावडर घेऊन ये असा हा आईचा आदेश आलेलाच होता. तो शिरसावंद्य मानून दुसऱ्या दिवशी सकाळची मिटिंग संपवून चहा खरेदी केली आणि पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी कूच केले.