"आज दंगल पहायला जातोय." मी चैत्याला फोनवर सांगत होतो.
"आई बाबांना घेऊन जा. त्यांना आवडेल नक्की." तो पलीकडून म्हणाला.
"हो त्यांनाच घेऊन चाललोय."
चित्रपट सुरु झाला आणि पहिल्या दहा मिनिटांनंतर मला प्रत्येक फ्रेमला आमच्या पूजाची आठवण होऊ लागली. चित्रपट जसजसा पुढे सरकत होता तसा मी नकळतपणे भूतकाळात जात होतो.
मी पाचवीत आणि पूजा सहावीत होती. शाळेचे सामने सुरु होते. रनिंगमध्ये माझा टिकाव लागायचा नाही फारसा. मी बाद होऊन बाजूला बसलो होतो. अचानक माई (मी पूजाला माई म्हणतो.) स्टार्टींग लाईनवर दिसली. मी साधारणपणे ५० मीटरवर जाऊन थांबलो. क्लॅप वाजला आणि माई सुसाट सुटली. मी खुशीत येऊन पुढे पळायला सुरुवात केली. पुढच्या काही सेकंदात तिने ती शर्यत जिंकलेली होती. मी पळत जाऊन तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो. पाण्याची बाटली पुढे केली आणि तिच्याबरोबर परत स्टार्टींग लाइनकडे चालू लागलो. ही शर्यंत तिच्या आणि आम्हा सगळ्यांच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरली.
मागच्या ब्लॉगमध्ये लिहिल्याप्रमाणे याच शर्यतीनंतर ढमाले सरांनी पूजामधली गुणवत्ता हेरली होती. हिला आपण तयार करायचंच असा निश्चय करून सर दादांना भेटले. दादांनीसुद्धा लगेच परवानगी दिली आणि पूजाची तयारी सुरु झाली.
शाळेचे संघदेखील भरपूर होते. १४ वर्षाखालील खो-खो, कबड्डी, १७ वर्षाखालील खो-खो, कबड्डी, मैदानी स्पर्धांचा वेगळा संघ. यात पुन्हा मुले आणि मुलींचे संघ आलेच. तयारी करून घ्यायला सर एकटे. सोबतीला चिमटे सर, खराडे सर असत. थोडा वेळ खो-खो, थोडा वेळ कबड्डी असं सर मॅनेज करत असत. मैदानावर गेलं की आधी मैदानाला पळत ३-४ फेऱ्या माराव्या लागत. एक फेरी चारशे मीटरची होत असे. यातून कोणालाही सुटका नसे. ते झाल्यावर इतर व्यायामप्रकार होत आणि मगच सराव सुरु होत असे.
पूजाच्या वेगाला सरांनी तंत्राची जोड द्यायला सुरुवात केली. नुसतंच पळत सुटायचं याला काही अर्थ नव्हता. हिऱ्याला जवाहिरी जसा पैलू पाडतो तसंच काहीसं सरांनी करायला सुरुवात केली. म्हणायला खरं तर फक्त शंभर मीटर पण प्रत्यक्षात पळताना प्रचंड एनर्जी खर्ची पडते. रोज सराव करताना कमीत कमी दहा तरी स्प्रिंट व्हायच्या. त्याअगोदर वॉर्मअप सुद्धा भरपूर असे. एवढं सगळं केल्याने तिचा पिट्टा पडत असे. घरी येऊन कधी जेवते आणि कधी झोपते असं तिला होई. सुरुवातीला पाय सुजत तिचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी परत प्रॅक्टिस असेच. पायांना पुरेसा आराम मिळावा म्हणून मसाज करावा लागे. मग तो मसाज नक्की कसा करायचा हे दाखवण्यासाठी सर एक दोन दिवस घरी आले. त्यांनी स्वतःच्या हातांनी पूजाच्या पायाला मसाज केला. त्यातून मग घरचे आम्ही सगळेच शिकलो. रोज रात्री झोपण्याअगोदर अर्धा तास हा सेशन चाले.
एवढ्या थकव्यानंतरसुद्धा पूजा पहाटे ४ ला उठत असे. गृहपाठ आणि थोडाफार सेल्फ स्टडी उरकून ६ ला मैदानावर जात असे. ६ ते ८:३० सराव करून घरी येई. घरी आल्यावर मग अंडी, भिजवलेले दाणे असा आहार घेऊन शाळेत जाई. संध्याकाळी परत सरावासाठी मैदानावर. यात ४ वर्षे कधीही खंड पडला नाही. ही सगळी मेहनत करत असताना ती अभ्यासदेखील जोरात करत होती. पहिल्या वर्षी सरांनी पूजाला कोणत्याच स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही. ते तिला तयार करत होते.
पुढच्या वर्षी पहिली स्पर्धा तालुका पातळीवर झाली. पूजाने १०० आणि २०० मीटर अशा दोन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तालुका मारला!! आत्तापर्यंत तालुका मारणे म्हणजे काय असतं हे आम्हाला नुसतंच ऐकून माहित होतं. आता मात्र घरातलं कोणीतरी हे करून दाखवतंय याचा आनंद वाटत होता. पुढची स्पर्धा गट पातळीवर होती. तीन तालुक्यातून विजयी झालेले खेळाडू गट पातळीवर एकमेकांशी स्पर्धा करत. गट पातळीला पहिलाच प्रयत्न असल्याने थोडं दडपण होतं. इथे विजयी होणारे पहिले २ खेळाडू जिल्हा पातळीला खेळत. पूजा इथेही यशस्वी झाली. जिल्हा पातळीच्या स्पर्धा पुण्यात बालेवाडीला होत. तिथे पहिल्यांदाच जायचं म्हणून सरांनी पूजासाठी स्पाईक शूज घ्यायला लावले. स्पाइकचे शूज म्हणजे नक्की काय असतं याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. सरच एक दिवस पुण्याला गेले आणि शूज घेऊन आले. त्यावेळेस तिचे ते शूज बघून मी हरखून गेल्याचं मला पुसटसं आठवतंय.
स्पाईक्स घालून पळण्यासाठी वेगळी तयारी करावी लागते. या बुटांच्या चवड्याखाली छोटे खिळे लावलेले असतात. पळताना पायाचा फक्त पुढचा भाग जमिनीला टेकावा असा हेतू. पळताना पाय पुढे पडला की ऍक्शन रिऍक्शनच्या नियमानुसार शूज पायाला अजून वर ढकलतात त्यामुळे नकळतपणे पळण्याचा वेग थोडातरी वाढतो. स्पाईक्स घालून पळताना थोडं पुढे झुकून पळावं लागतं. हे तिला जमावं म्हणून सरांनी एका टायरला दोर बांधून त्याची दोन्ही टोके तिच्या खांद्याला अडकवली. हळूहळू त्याचा फायदा दिसू लागला. पूजाचे वजन थोडं जास्त होतं. त्याचाच परिणाम म्हणून तिला पाठदुखी सुरु झाली. पण ती हटली नाही. आम्हाला आता पायांबरोबर पाठीलाही मसाज करावा लागत असे. मूव्ह क्रिमच्या ट्यूबच्या ट्यूब हातोहात संपत होत्या. पण ध्येय ठरलेलं असल्याने घरातलं कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं.
पूजा जिल्ह्याला गेली. पहिलीच वेळ असल्याने निकाल हवा तसा आला नाही. इकडे जुन्नरला आमची घालमेल सुरु होती. संध्याकाळी उशिरा सरांचा फोन आला. त्यांनी दादांना निकाल सांगितला आणि फोन पूजाकडे दिला. पूजा तिकडून ओक्साबोक्शी रडू लागली. इकडून दादा समजूत काढत होते.
"आपलं पाहिलंच वर्ष आहे हे बाळ. आणि पहिल्या प्रयत्नात आपण जिल्ह्याला गेलो. पुढच्या वर्षी अजून जोमानं तयारी करू. मी आहे तुझ्याबरोबर."
दादांच्या त्या शब्दांनी तिला थोडा धीर आला असावा. दुसऱ्या दिवशी पूजा जुन्नरला आली. शाळेच्या शनिवारच्या असेम्ब्लीमध्ये सरांनी पूजाचं नाव पुकारून तिला पुढे बोलावलं. सगळ्यांच्या समोर तिचं तोंड भरून कौतुक केलं. आपल्या बहिणीचं कौतुक होतंय म्हटल्यावर माझीही छाती फुगून आली होती. ४-५ दिवस कौतुकात गेल्यावर पुनःश्च हरी ओम म्हणतात तसं पुन्हा तयारी सुरु झाली. सरांच्या मदतीला आता खोत सर येऊ लागले. वेळ मिळेल तसा पोकळे सर येऊ लागले.
पुढच्या वर्षीचं लक्ष्य जिल्हा मारून विभाग खेळायचं होतं. शाळा तिला पूर्णपणे पाठिंबा देत होती.
गावात लोक दादांना थांबवून सांगत होते.
"साहेब, काल फिरायला गेलो तेव्हा पूजाची प्रॅक्टिस बघितली. काय पळते पोरगी. कमाल आहे राव."
शाळेच्या ग्राउंडचीच सवय नको म्हणून सरांनी पूजाला ओतूर कॉलेजच्या ग्राऊंडवर नेलं. का तर तिथे सरळसोट शंभर मीटरचा ट्रॅक होता. मीही बरोबर होतोच. सरांनी स्टॉपवॉच सेट केलं. खोत सरांनी क्लॅप दिला. पूजाचा स्टार्ट उत्तम झाला आणि पहिल्या वीस मीटरनंतर तिने वेग वाढवायला सुरुवात केली. वाऱ्याच्या वेगाने ती पळत होती. अंतिम रेषा तिने पार केली आणि सरांचे डोळे चमकल्याचे मी पाहिलं. पूजाने तिची आतापर्यंतची सर्वोत्तम वेळ दिली होती. सरांनी अजूनही सांगितलेलं नाही पण माझ्या अंदाजे तिने १४ सेकंद वेळ नोंदवली होती. सर प्रचंड खुष होते. एव्हाना पूजा चालत स्टार्टींग लाईनला आली. आल्या आल्या तिचा पहिला प्रश्न,
"किती आलं टायमिंग?"
तिने हुरळून जायला नको म्हणून सरांनी दोन सेकंद वेळ वाढवून सांगितल्याचं मला आठवतंय.
त्या वर्षी पूजाने तालुका आणि गट खिशात घातले. पुढच्या तयारीसाठी तिच्या वेगावर परिणाम नको म्हणून सरांनी पूजाला केसांचा बॉयकट करायला लावला आणि टीशर्ट ऐवजी तिच्यासाठी स्लिव्हलेस टॉप आणला. तो नेमका तिला थोडा ढगळ झाला. मला आठवतंय रात्री नऊ वाजता चिमटे सर स्वतःच्या हातांनी आमच्या घरातलं शिलाई मशीन चालवत होते. पूजाच्या टॉपला तिच्या मापाच्या टिपा मारत होते. काय नशीबवान होती पूजा!!!
पूजा जिल्हा खेळायला पुण्याला गेली. स्पर्धेच्या दिवशी आम्ही सकाळपासून बैचेन होतो. स्पर्धा दुपारी पार पडली तरी निकाल आमच्या पर्यंत यायला संध्याकाळ होत असे. संध्याकाळी सरांचा फोन आला.
" पेढे तयार ठेवा. पोरीने जिल्हा मारलाय."
काय आनंद झाला म्हणून सांगू. येस्स, येस्स म्हणत घरभर नाचलो मी. दुसऱ्या दिवशीच्या पेपरला पूजाचं नाव आलं. मला पेपर जपून ठेवायला सांगून दादा बँकेत गेले. त्यानंतरचे काही दिवस अदभूत होते. सबंध शाळेत पूजाचं कौतूक होत होतं. बरेच लोक घरी येऊन अभिनंदन करत होते. योगायोगाने त्या वर्षी आम्हाला तिघांना शाळेतल्या स्पर्धांमध्ये एकूण १६ बक्षिसे मिळाली होती. दादांनी फोटोग्राफर घरी बोलावून आम्हा सगळ्यांचा मिळालेल्या ढाली आणि कपांबरोबर फोटो काढून घेतला. त्या वर्षी पूजा विभाग पातळीला हारली. पण त्याचं दुःख फारसं नव्हतं.
पुढचं वर्ष पूजाचं शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर ती दहावीला जाणार होती. सरांचं लक्ष आता राज्य पातळीकडे होते. जीवतोड मेहनत करून पूजा राज्यपातळीला गेली. एवढ्या वरच्या लेव्हलला खेळायचं दडपण म्हणा किंवा अजून काही, पूजाने सलग तीन चुकीचे स्टार्ट घेतले आणि स्पर्धेतून तिला बाद करण्यात आलं. तिचा तिसरा स्टार्ट योग्य होता असं सरांचं म्हणणं होतं पण पंचांचा निर्णय अंतिम यावर सरांचाही विश्वास होता. पूजाचा हा 'शंभर मीटर' चा विलक्षण प्रवास हा असा संपला. अर्थात याबद्दल घरच्यांना,सरांना किंवा तिला स्वतःला कधी खंत वाटली नाही. आपण प्रयत्न केले, जीवतोड मेहनत केली याचं समाधान सगळ्यांनाच होतं.
पूजाच्या या प्रवासाच्या निमित्ताने ढमाले सर, खोत सरांसारखे गुरु भेटले. आजही ती ४-५ वर्षे आमच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गेली असं आई दादा सांगतात.
दंगल पाहताना माझेच डोळे माईच्या आठवणीने ४-५ वेळा भरून आले. तिचा तो सकाळचा सराव डोळ्यापुढं येत राहीला. आई दादांची अवस्था माझ्याहून बिकट होती. गीतामध्ये त्यांना आपली पूजा नक्की दिसली असेल. दादांचं शरीर कापताना जाणवलं मला दोन तीनदा. भरपूर रडले असतील ते दोघेपण. चित्रपट संपल्यावर बाहेर येताना मला म्हणाले,
"कमाल चित्रपट आहे."
मी हसून पुढे चालू लागलो. त्यांना कळू न देता मीसुद्धा डोळ्याच्या कडा पुसल्या होत्या.