Thursday, November 30, 2017

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी 

जेम्स बॉंडचा एकही चित्रपट पाहिला नाही असा माणूस सापडणे तसे अवघड आहे. आणि जेम्स बॉंडच्या चित्रपटाची ट्यून माहित नसलेला माणूस सापडणे त्याहूनही अवघड आहे. १९६२ साली डॉ. नो हा जेम्स बॉंड मालिकेतला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला वाजणारी ही ट्यून पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. पण ह्या ट्यूनचे मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात आहे याची फार कमी लोकांना माहिती आहे. 

काय आहे ह्या ट्यूनच्या जन्माची कहाणी?

जेम्स बॉंडची जगप्रसिद्ध ट्यून ब्रिटिश संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांनी संगीतबद्ध केली आहे. जेम्स बॉंड चित्रपट मालिकेचे निर्माते अल्बर्ट ब्रॉकोली यांनी एक दिवस संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांना फोन करून बोलावून घेतले. ब्रॉकोली यांनी तेव्हा नुकतेच इयन फ्लेमिंग यांच्या प्रसिद्ध जेम्स बॉंड या कादंबरी संग्रहाचे हक्क विकत घेतले होते. या कादंबरी संग्रहावर आधारीत चित्रपटांची मालिका काढण्याचा त्यांचा मानस होता. त्यातील पहिला चित्रपट डॉ.नो असणार होता. या चित्रपटासाठी संगीत द्यायला तुला आवडेल का असा प्रश्न ब्रॉकोली यांनी नॉर्मन यांना विचारला. तोपर्यंत नॉर्मन यांनी जेम्स बॉंडच्या रहस्य कथांबद्दल फक्त ऐकले होते. 

मग चित्रपटाचे दुसरे निर्माते हॅरी साल्ट्समन यांनी नॉर्मन यांना सहकुटूंब चित्रपटाचे शूटिंग सुरु असलेल्या जमैकाला येण्याचे निमंत्रण दिले. नॉर्मन यांना नकार देणे अवघड होते. नॉर्मन जमैकाला गेलेसुद्धा. चित्रपटाची कथा त्यांच्या हातात पडली आणि त्यांनी संगीतावर काम करायला सुरुवात केली. नॉर्मन त्यावेळेस ज्युलियन मूर यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक विजेते लेखक सर व्ही.एस. नायपॉल यांच्या हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास या गाजलेल्या कादंबरीवर आधारित एका संगीतपटावर काम करत होते. त्याच्या एका ट्यूनमध्ये त्यांनी विविध भारतीय वाद्यांचा उपयोग केला होता. हा संगीतपट पुढे कधी प्रदर्शित झालाच नाही. नॉर्मन यांनी मग आपल्या जुन्या ट्यून्समधून ही ट्यून शोधून काढली. त्याचे शब्द असे होते. 

“I was born with this unlucky sneeze.
“And what is worse I came into the world the wrong way round.
“Pundits all agree that I am the reason why my father fell into the village pond and drowned."
ह्याच ट्यूनमध्ये थोडासा बदल करून त्यांनी जेम्स बॉंडची प्रसिद्ध ट्यून बनवली. चित्रपट निर्मात्यांना देखील ती आवडली. त्यांनी लगेचच जॉन बॅरी या एका तरुण संगीतकाराला निमंत्रित करून हि ट्यून त्याच्याकडून पुन्हा अरेंज करून घेतली. आणि ह्या ट्यूनने नंतर इतिहास घडवला. जेम्स बॉंडचा चित्रपट आणि ही ट्यून हे जणू समीकरणच बनले. जॉन बॅरी यानेच ही धून संगीतबद्ध केली असे अनेकांना वाटत राहीले पण खरे संगीतकार मात्र नॉर्मन हेच होते. पुढे बॅरी यांनी हि धून आपणच लिहिली असा दावादेखील केला. पण अखेरीस कायद्याने नॉर्मन यांनाच न्याय दिला. 
मराठी चित्रपट अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काही दिवसापूर्वी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. दाक्षिणात्य अभिनेते अजित यांनी हा व्हिडीओ अतुल कुलकर्णींना पाठवल्याचं त्यांनी नमूद केले आहे. हा व्हिडीओ इंग्रजीमध्ये आहे म्हणून त्या कहाणीचा मराठी स्वैर अनुवाद करायचा हा खटाटोप. सदर व्हिडीओची युट्यूब लिंक सोबत देत आहे. 

Tuesday, November 7, 2017

मी सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. जुन्नरमध्ये 'कलोपासक' म्हणून एक संस्था होती. ते लोक विविध नामवंत कलाकारांना जुन्नरमध्ये आणून त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असत. अशाच एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीतकार राम कदम हे जुन्नरमध्ये आले होते.

राम कदम हे त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या गाण्यांना शिट्ट्या हमखास पडत. कार्यक्रम रंगात येऊ लागला तसं लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. मी नुकताच शिट्टी वाजवायला शिकलो होतो. मग इतरांकडे बघून मलाही हुक्की आली आणि मीही शिट्टी वाजवू लागलो. नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला आपण जोरात शिट्टी वाजवू शकतो याची मजा वाटली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. पहिला तास पार पडला. दुसरा तास सुरू झाला.

"गुंड उभा रहा." वर्गात येताच बाईंनी माझ्याकडे बघत आज्ञा केली. (माझ्या संपूर्ण शालेय जीवनात फक्त एक किंवा दोन शिक्षकांनी मला माझ्या नावाने हाक मारली असेल. बाकी सगळे गुंडच म्हणत. असो)

मी गोंधळतच उभा राहिलो. आल्या आल्या बाईंनी आपल्याला का उभं केलंय हे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं.

"तुझ्यासारख्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती."

"मी काय केलं बाई?" अजूनही काही न कळलेला मी विचारता झालो.

"अरे तूच मला विचारतोस? नीट विचार करून बघ." इति बाई..

मी पुन्हा आपला ढिम्म उभा.

"कालच्या कार्यक्रमात तू शिट्ट्या वाजवत होतास. सबंध कार्यकम संपेपर्यंत तुझा थिल्लरपणा सुरू होता."

मग माझी ट्यूब पेटली. कलोपासकच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग होत असे.कार्यक्रम संपल्यानंतर केबल ऑपरेटर ती कॅसेट केबलवर लावत असे. शूटिंग करणाऱ्या माणसाने नेमका मी शिट्टी वाजवत असताना कॅमेरा माझ्यावर फोकस केला होता. त्यामुळे माझी शिट्टी वाजवण्याची कला सबंध जुन्नर शहराला दिसली होती. आणि नेमकं तेच माझ्यावर शेकलं होतं. याच बाईंनी तास संपल्यानंतर मला शिक्षक खोलीमध्ये बोलवून सगळ्या शिक्षकांसमोर माझी खरडपट्टी काढली.

तसं पहायला गेलं तर मी मजा म्हणून शिट्टी वाजवीत होतो. त्याचा असा काही परीणाम होईल हे माझ्या गावीही नव्हते. आपल्याला शिट्टी वाजवता आली पाहिजे असा साधा विचार माझ्या डोक्यात होता. आणि नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शिकलेले कसब आजमावयाची संधी मिळाली होती. शिक्षक खोलीतून बाहेर पडताना एका शिक्षकांनी, "एवढंच ना!" असं म्हणून हसल्याचंही मला आठवतंय.

बाकी शिट्टी मात्र वाजवता आलीच पाहिजे अशा मताचा मी आहे. ती एक कला आहे असं मला वाटतं. माझा एक मित्र सोनू माळवे एका बोटाने सुद्धा शिट्टी वाजवीत असे. काही लोक तर बोटांचा वापर न करतादेखील जोरात शिट्टी वाजवतात. आजकालच्या पोरांना शिट्टी वाजव म्हटलं तर खुशाल 'मला नाही येत' म्हणून मोकळे होतात. या शिट्टी वाजविण्यामुळे अजून मी अजून एका कचाट्यात सापडलो होतो. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.