जुलै २०१४ मध्ये मायामी हिट संघाचा स्टार खेळाडू लेब्रॉन जेम्स क्लिव्हलँड कॅव्हेलियर्सबरोबर करारबद्ध झाला. मायामी हिटकडून खेळताना त्याने या संघाला एनबीएची दोन विजेतेपदं मिळवून दिली. याचदरम्यान एक मुलगा या संघाचा कट्टर समर्थक बनला. ओमर राजा त्याचं नाव. लेब्रॉन हिट सोडून गेल्यानंतर तो निराश झाला. यातूनच त्याने मायामी हिटच्या सामान्यांचे हायलाईट्स पहायला सुरुवात केली. हे हायलाईट्स पाहताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ओमर आणि त्याचे मित्र मायामी हिटच्या सामन्यांतील काही क्षणांची वारंवार चर्चा करत. मात्र त्या क्षणांचे व्हिडीओ युट्युब, ईसपीएन यापैकी कुठल्याच वेबसाईटवर उपलब्ध नव्हते. आपल्या मित्रांबरोबर चर्चा करत असलेल्या या क्षणांचे व्हिडीओ कुठे ना कुठे तरी सापडतील या आशेतून ओमर कित्येक तास इंटरनेटवर घालवत असे. एक महिनाभर असे केल्यानंतर 'आपणच हे का करू नये?' असा विचार त्याच्या डोक्यातून आला. या विचारातूनच ऑगस्ट २०१४ मध्ये जन्म झाला हायलाईट फॅक्टरी या इंस्टाग्राम अकाउंटचा. आठवड्याभरातच ओमरला हे नाव नको असे वाटले म्हणून त्याने ते बदलून नाव ठेवले, 'हाऊस ऑफ हायलाईट्स'. तिथून सुरु झाला एक स्वप्नवत प्रवास.
हाऊस ऑफ हायलाईट्स सुरु केले तेव्हा ओमर फ्लोरिडामध्ये विद्यार्थीदशेत होता. सुरुवातीला स्वतः तयार केलेल्या क्लिप्स आपल्या अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर ओमरने लोकांकडून व्हिडीओ स्वीकारणे सुरु केले. ही कल्पना तात्काळ यशस्वी झाली. ओमरला इंस्टाग्रामवर रोज २००-३०० मेसेज येऊ लागले. प्रत्येक मेसेजमध्ये येणारा व्हिडीओ ओमर स्वतः पाहून मगच हाऊस ऑफ हायलाईट्स वर अपलोड करू लागला. हळूहळू हाऊस ऑफ हायलाईट्स लोकप्रिय होऊ लागले. सुरुवातीला शेकडोमध्ये फॉलोअर्स असणाऱ्या या अकाउंटला आता हजारोंनी फॉलोअर्स मिळू लागले. अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीने ओमर खुश होता. साधारण सात आठ लाख फॉलोअर्स असताना २०१६ मध्ये ब्लिचर रिपोर्ट या प्रसिद्ध वेबसाईटचे लक्ष हाऊस ऑफ हायलाईट्सकडे गेले. ओमर अजूनही शिकतच होता. तो ग्रॅज्युएट होण्याआधीच ब्लिचर रिपोर्टने त्याला हाऊस ऑफ हायलाईट्स विकत घेण्याची ऑफर दिली. शिवाय हे अकाउंट ब्लिचर रिपोर्टसाठी त्यानेच चालू ठेवावे असे सांगून त्याला नोकरीही दिली.
इंस्टाग्रामवर हे अकाउंट सुरु केल्यापासून ओमरने एकही दिवस सुट्टी घेतली नाहीये. ओमर रोज सकाळी साधारण ८ वाजता उठतो. उठल्या उठल्या सगळ्यात आधी तो आपले दोन फोन चेक करतो. ओमरच्या सहा सात तासांच्या झोपेच्या अवधीमध्ये त्याला हजारो नोटिफिकेशन्स आलेले असतात. उठल्यापासून ते मॅनहॅटनमधील आपल्या ऑफिसला जाईपर्यंत त्याला आलेले प्रत्येक नोटिफिकेशन वाचतो, त्यातले नको ते डिलीट करतो. रात्रीतून ओमरला इंस्टाग्रामवर साधारण ७००-७५० मेसेज आलेले असतात. ऑफिसला पोहोचून तो त्याला आलेला प्रत्येक मेसेज पाहतो आणि गरज पडेल तिथे रिप्लाय देखील करतो. जिथे जाईल तिथे ओमर हाऊस ऑफ हायलाईट्सचे काम करत असतो. अगदी चित्रपटगृहात देखील व्हिडीओ क्लिप एडिट करून त्याने अपलोड केल्या आहेत. ओमरच्या ऑफिसमध्ये २ टीव्ही आहेत. प्रत्येक टीव्हीवर किमान ३ सामने सुरु असतात. म्हणजे एका वेळी ६ सामने पाहत ओमर आपले काम करत असतो. ओमरच्या मदतीला चार जणांची टीम आहे. मात्र आजही हाऊस ऑफ हायलाईट्सवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडीओ ओमरने ओके केल्याशिवाय अपलोड होत नाही.
ब्लिचर रिपोर्टने टेक ओव्हर केल्यापासुन हाऊस ऑफ हायलाईट्सचे फॉलोवर्स साधारण दिवसाला १२,००० या वेगाने सतत वाढतच आहेत. नुकतेच या पेजचे १ कोटी फॉलोअर्स झाले. यामध्ये अगदी लेब्रॉन जेम्स, द रॉक, स्टेफ करी, रोनाल्डो यांसारखे दिग्गज देखील आहेत.
३० जुलै २०१८ रोजी फॉलोअर्सची संख्या
हाऊस ऑफ हायलाईट्स - १ कोटी
ईसपीएन - १ कोटी ४ लाख
स्पोर्ट्ससेंटर - १ कोटी २० लाख
हाऊस ऑफ हायलाईट्सच्या व्हिडीओजला ईएसपीएन आणि स्पोर्ट्ससेंटर सारख्या नावाजलेल्या अकाउंट्सपेक्षा जास्त हिट्स मिळत आहेत.
जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांना काही कारणास्तव एखादा सामना बघता आला नाही तर त्यातील नेमक्या क्षणांचे व्हिडीओज हाऊस ऑफ हायलाईट्सवर नक्की उपलब्ध असतात. सुरुवातीला अमेरिकन फुटबॉल आणि एनबीए या खेळांवर लक्ष असलेल्या या पेजने आता इतरही खेळांचे व्हिडीओ पुरवायला सुरुवात केली आहे. या पेजची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे सामने प्रत्यक्ष पाहणारे प्रेक्षकच ओमरला त्यांनी रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाठवतात. त्यातील योग्य ते व्हिडीओ थोडेफार एडिटिंग करून हाऊस ऑफ हायलाईट्सवर अपलोड केले जातात.
ब्लिचर रिपोर्टबरोबर काम करायला सुरुवात केल्यापासून ओमरला त्यांचे कंटेंटदेखील वापरता येऊ लागले आहे. नुकतेच हाऊस ऑफ हायलाईट्सचे ट्विटर हँडल आणि युट्युब चॅनेलही सुरु झाले आहे. कुठलीही जाहिरात न करता त्यांचे ट्विटरवर ३८,००० आणि युट्युबवर २,६०,००० सबस्क्रायबर्स आहेत. अजूनही ओमर व्हिडिओजवर काम करत असला तरी इथून पुढे ब्लिचर रिपोर्टसाठी वेगवेगळे कंटेंट बनवण्याची त्याची मनिषा आहे. मी स्वतः हे पेज सुरु झाल्यापासून फॉलो करत आलोय. हाऊस ऑफ हायलाईट्सची एकही पोस्ट मिस करण्याजोगी नसते. तुम्हीही दर्दी क्रिडारसिक असाल तर इंस्टाग्रामवर हे पेज नक्की फॉलो करा.