Thursday, November 8, 2018

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर


नव्वदच्या दशकात रमणारे आम्ही त्याच्यापलीकडे फारसे कधी जातही नाही.नाटकं वगैरे सुद्धा अलीकडचीच बघतो. नाटकं वाचणारे तर खूपच कमी जण असतात.कॉलेजात पुरुषोत्तम, फिरोदिया केलेलं असलं तरी ते वयही उथळ असते. त्यामुळे साठच्या दशकांत आपल्या अभिनयाने नाटकं,सिनेमे अजरामर केलेले कलाकार आम्हाला एक तर माहित नसतात. चुकून माहिती असलेच तर ते फक्त ऐकून किंवा वाचूनच.     

माझ्या पिढीला डॉ. काशिनाथ घाणेकर माहित असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. मला खात्री आहे आजही अनेकांना ते माहीत नसतील.मात्र रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अशी नावं ऐकली की आम्हाला थोडा आपलेपणा वाटतो. मग कधीतरी कुणीतरी सांगितलेलं आठवतं, "हा रोल काशिनाथ घाणेकर करायचे." 

'शूर आम्ही सरदार' गाणं माहित नसलेला मराठी माणूस सापडणे केवळ अशक्य आहे. लहानपणापासून आपल्यातल्या अनेकांनी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत हे गायलं असेलच. अगदी गेला बाजार बाथरूममध्ये तर नक्कीच. या गाण्यात घोड्यावर बसलेला माणूस कोण? हा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तो माणूस आहे डॉ. काशिनाथ घाणेकर. 

तर अशा या भारी माणसावर चित्रपट येतोय आणि घाणेकरांची भूमिका सुबोध भावे करतोय म्हटल्यावरच हा चित्रपट पहायचा हे मनाशी निश्चित केलं होतं.

चित्रपट म्हणून आणि डॉ.काशिनाथ घाणेकर फारसा भारी नसला तरी मला कौतुक सुबोध भावेचं (मुद्दाम एकेरीत उल्लेख करतोय.) करावंसं वाटतं. चित्रपट म्हणायचं झालं तर सुबोध मला ठळकपणे आठवतो तो 'सनई चौघडे'मधला. त्यानंतर बालगंधर्व,लोकमान्य, कट्यार या चित्रपटांतून त्याने आपला उत्तम अभिनय दाखवला. आमच्या पिढीने ऐकलेले, वाचलेले हे लोक त्याने पडद्यावर साकारले. ही माणसं कशी होती हे त्याने आजच्या पिढीसमोर आणलं. अगदी काशिनाथ घाणेकर सुरू होतानाही टीप येतेच. आजच्या पिढीला काशिनाथ घाणेकर माहीत व्हावेत म्हणून हा चित्रपटप्रपंच. या सगळयासाठी त्याचं कौतुक करावसं वाटतं. अशाच भूमिकांमध्ये अडकून न राहता त्याने तद्दन व्यावसायिक सिनेमेही केले.

बालगंधर्व पाहिल्यानंतर माझा एक मित्र म्हणाला होता,

"भावे कष्ट घेतो."

त्याचं हे वाक्य मला मनोमन पटलं. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याची मेहनत दिसते. अगदी सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या 'तुला पाहते रे' मालिकेतील विक्रांत सरंजामेही तरुणींना भुरळ पाडतो. काशिनाथ घाणेकरमध्येही सुबोधचे त्या भूमिकेसाठीचे कष्ट दिसून येतात. 'भूमिका जगणे' वगैरे शब्द थिटे वाटावेत इतक्या तन्मयतेने त्याने घाणेकर साकारले आहेत. हा चित्रपट फक्त सुबोधच्या अभिनयासाठी लक्षात राहील.त्याच्या संवादांसाठी लक्षात राहील. 'एकदम कडक!' हा त्याचा संवाद त्याच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्रातल्या चहाच्या टपऱ्यांवरसुद्धा पुढचे काही महिने नक्की ऐकू येत राहील. घाणेकर स्टार झाल्यावर आपल्या चाहत्यांमध्ये मिसळताना वाजणार पार्श्वसंगीत विशेष लक्षात राहण्याजोगे आहे. सुबोधबरोबरच प्रसाद ओक आणि वैदेही परशुरामी यांच्या भूमिका तितक्याच वजनदार. प्रसाद ओकचे प्रभाकर पणशीकर ठळकपणे लक्षात राहतात.

चित्रपटात जाणवलेली अजून एक गोष्ट नमूद करतो. दिग्दर्शकाने घाणेकरांना रंगभूमीचा सम्राट म्हणून डोक्यावर घेतलेलं जसं दाखवलं त्याचप्रमाणे दारूमध्ये त्यांचा झालेला सर्वनाशही दाखवला.त्यामुळे प्रेक्षकांनी त्यांना नाकारलेलंही दाखवलं. त्यांची ही बाजू जर प्रेक्षकांसमोर आणली नसती तर आज उद्या घाणेकरांसारखा नट होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पोरांना त्यांचं दारू पिणं, दारूच्या आहारी जाणं हे वाईट वाटलंच नसतं. घाणेकरांच्या दारूच्या व्यसनाचं उदात्तीकरण (ग्लोरीफिकेशन) केलं नाही त्याबद्दल दिग्दर्शकाचं विशेष अभिनंदन.

ठग्ज ऑफ हिंदुस्थानसारख्या बच्चन, आमीर खानसारखी स्टारकास्ट असलेल्या, यशराज फिल्मसारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटाशी टक्कर घेत व्हायकॉमने हा चित्रपट प्रदर्शित केला त्याचंही कौतुक. 'आपलं नाणं एकदम खणखणीत वाजणार' हा आत्मविश्वास असल्यानेच त्यांनी हे केलं असावं आणि ते खरंही ठरतंय. 

घाणेकर कसे होते हे जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट बघा. चित्रपट म्हणून नाही तर सुबोधच्या अभिनयासाठी मात्र नक्की बघा.