Saturday, July 16, 2016

दादांचं कॉलेज

आज संध्याकाळी दादांबरोबर गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता पोर्शे इंडियाचा डायरेक्टर पवन शेट्टीचा विषय निघाला. मी २-३ दिवसापूर्वी त्याच्याबद्दल वाचले होते. दादांना मी त्याच्या वाटचालीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजला एमबीए केल्याचं मी दादांना सांगितलं. ते ऐकून दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, "मी मध्येच तुला थांबवतोय पण हे ऐक."

मी त्यांना म्हटलं बोला. दादा बोलू लागले. 

"माझी अकरावी संपल्यानंतर मी मुंबईला गेलो. त्यावेळी दहावी नसायची. माझ्या डोक्यात मुंबईला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायची हा विचार होता. मुंबईमध्ये मी आपल्या गावच्या एका माणसाकडे राहायला होतो. मारुती खेबडे नाव त्याचं. फार भला माणूस होता. वेळ मिळेल तेव्हा मी त्याच्याशी बोलत असे. त्याने मला सांगितलं की तू सिडनहॅम कॉलेजला जा. मी माझी सगळी कागदपत्र घेऊन गेलो. त्यावेळेस पॅन्ट माहीतच नव्हती आम्हाला. पायजमा आणि शर्ट हाच आमचा वेष असे. त्याबद्दल लाजही वाटत नसे.  मी आपला जाऊन रांगेत उभा राहिलो. मला पायजमा आणि शर्टमध्ये पाहून आजूबाजूचे लोक आपसांत बोलू लागले. बर ते इंग्लिशमध्ये बोलत. मला कळायचं की हे आपल्याबद्दल बोलत आहेत. पण मला स्वतःला इंग्लिश बोलता येत नव्हते. मग आपला गप्प राहिलो. नंबर आल्यावर आतमध्ये गेलो. माझी कागदपत्रे टेबलावर बसलेल्या बाईच्या हातात दिली. मला ६८ टक्के होते. त्यावेळेस ते मार्क खूप असत. माझे मार्क पाहून तिने आश्चर्याने मान वर केली आणि म्हणाली, "अरे!! ६८ है तुझे. मिलेगा तुझे." मी तिला फी विचारली. फी ३०० रुपये होती. माझ्याकडे तेव्हा कसले बोंबलायला आले ३०० रुपये. मी तिला म्हटलं मी उद्या येतो आणि बाहेर पडलो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि म्हणाले, "बहोत अच्छा मार्क मिला है." १५ मिनिटांपूर्वी जे लोक मला हसत होते तेच आता माझ्याभोवती गराडा घालून माझं कौतुक करत होते. तेव्हा मला स्वतःचाच फार अभिमान वाटला. घरी येऊन मी खेबड्याला सांगितलं की ३०० रुपये फी आहे. खेबडे तेव्हा एका ऑफिसात शिपाई होते. त्याने त्याच्यापरीने प्रयत्न करून मला ६० रुपये गोळा करून दिले. पण ते पुरेसे नव्हते. मग काय.. मी आपला थोरांदळ्याला परत आलो आणि सडकंवर कामाला जायला लागलो. त्या कामाचे जे पैसे मिळतील त्या पैशातून पुढच्या वर्षी मंचर कॉलेजला जायचं असा विचार होता डोक्यात. सडकेवरच्या कामाचा अनुभव तुला परत कधीतरी सांगेल.  

एक दिवस रेशनची साखर आणायला रांजणीला गेलो. रांगेत माझा नंबर आला. मी पुढं होऊन रेशनवाल्याच्या हातात कार्ड दिलं. त्याचं नाव मारुती भिमाजी भोर. त्याने कार्ड घेतलं आणि लांब फेकून दिलं. मला कळाना काय झालं. लोकं म्हणाली अहो त्या पोराचा नंबर आहे. द्या की त्याला साखर. तो काय ऐकेना. वर लोकांना सांगत होता की तुम्ही आपली साखर घ्या आणि चालू पडा. सगळे लोक गेल्यावर त्याने मला विचारलं. "तुझं नाव काय रे?" 

मी नाव सांगितलं.

"तू आत्ता कुठं असायला पाहिजे?"

मी म्हटलं, "सडकंवर". 

"गप्प. कॉलेजला का जात नाही?"

मी -"पैसे नाय फी भरायला." 

"घरी कारभारी कोण आहे?"

मी - "चुलता"

"मी उद्या येणार आहे तुमच्या गावात. तिथं भेट मला."

बरं म्हणून मी आपला घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गावातल्या पारावर खेळत होतो. थोड्या वेळात मारुती भोर येताना दिसला मला. तो शाळेत गेला. पुढच्या ५ मिनिटांत मला गुरुजींनी बोलावलं आणि सांगितलं तुझ्या चुलत्याला बोलावून घे. मी पळत घरी आलो. दादांना सांगितलं गावात मारुती भिमाजी आलाय. त्याने तुम्हाला बोलावलंय. दादा लगेच निघाले. शाळेत आल्यावर मारुती भिमाजी त्यांना म्हणाला, "तुम्ही घरचे कारभारी का?" 

दादांनी होकारार्थी मान हलवली. 

"हा पोरगा कॉलेजला गेला पाहिजे."

हं म्हणून मी आणि दादा घरी निघालो. येताना दादांनी एक पोस्टकार्ड घेतलं. घरी येऊन ते कार्ड माझ्यासमोर टाकून म्हणाले, "लिही". 

ते सांगत गेले ते मी लिहीत गेलो. २-३ दिवसांनी एक माणूस घरी आला आणि मला हाक मारली. मी जवळ गेल्यावर त्याने खिशातून शंभर रुपयांची नोट काढून मला दिली आणि म्हणाला, " हे घे आणि काय कुठं झक मारायची ती मार." मुंबईहून नानांनी (मुंबईचे चुलते) त्याच्याकडे ते शंभर रुपये पाठवले होते. 

ते पैसे घेऊन मी मंचर कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि माझं कॉलेज सुरू झालं. मध्ये मारुती भिमाजी गेले. मला मात्र ते कळलं नाही. नंतर कुणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मला फार वाईट वाटलं. अजूनही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा माणूस म्हणून मी त्याचा उल्लेख करतो." 


Saturday, June 18, 2016

कथा गणवेशाची

आज एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलो होतो. बायको खरेदीमध्ये मग्न असताना माझं लक्ष शेजारच्या काउंटरवर गेलं. एक दाम्पत्य आपल्या मुलाला घेऊन गणवेश खरेदीसाठी आले होते. वडिलांनी मुलाला उचलून काउंटरवर बसवले. आईने तोवर दुकानदाराला त्याच्या शाळेचे नाव सांगितले होते. दुकानदाराने बरोबर त्याच्या शाळेचा आणि त्याच्या मापाचा गणवेश काढून दिला. त्याच्या वडिलांनी पटकन त्याचा शर्ट काढून नवा शर्ट त्याला घातला. खाली उतरवून त्याची विजार उतरवून नविन विजार चढवली. स्वारीला आरशासमोर उभं केलं. त्याच्या चेहऱ्यावर कोण तो आनंद. गाडी खुश एकदम. पप्पांना म्हणतोय कसा, "एक फोटो काढा बरं माझा." वडिलांनी देखील पटकन आपला फोन काढून त्याचा एक फोटो काढून घेतला. 

त्यांची ही सगळी गडबड पाहून माझं मन भूतकाळात गेलं. उन्हाळ्याची सुट्टी संपत आली की शाळा सुरु होण्याचे वेध लागलेले असत. नविन वर्ष म्हणजे शाळेत मिळणारा नवा वर्ग, नवे शिक्षक, नव्या वह्या, पुस्तके. आमची बहिण पूजा एक वर्ष पुढे असल्यामुळे पुस्तकं सहसा मला नवी कधी मिळाली नाहीत. त्यावेळेस गणवेशसुद्धा एकच असे. आत्तासारखे सोमवारी घालायचा टीशर्ट वेगळा, स्पोर्ट्सचा टीशर्ट वेगळा अशी चंगळ नसे. एका वर्षात शरीरयष्टीमध्ये सुद्धा फार फरक झाला नसेल तर गणवेशसुद्धा नवा मिळत नसे. सुरुवातीला काही दिवस दादांकडे तक्रार करून नंतर मग मात्र सवय होऊन जात असे. 

गणवेश खरेदी मात्र अगदी वर उल्लेख केला तशीच होत असे. मी दादांबरोबर शिवाजीकाकांच्या (वाव्हळ) दुकानात जात असे. तिथे मग आधी वेगवेगळे शर्ट आणि हाफ चड्ड्या घालुन ट्रायल होत असे. आणि मग दादांच्या मताने त्यातला एक निश्चित होत असे. नवा गणवेश घेतल्याचा उत्साह मात्र पुढच्या काही वेळात दादा आणि शिवाजी काकांच्या गप्पा सुरु झाल्या की आपोआप ओसंडून जात असे. त्या दोघांच्या गप्पांमध्ये मला एकट्याला फार कंटाळा येत असे. मग "दादा चला घरी" असा तगादा मी लावत असे. नवा गणवेश घालून शाळेत जाणं याचंसुद्धा एक कौतुक असायचं. कारण सगळेच मित्र मैत्रिणी नव्या गणवेषात असत. मग तू कुठे घेतलास, त्याच्या चड्डीच्या खाकी रंगाची शेड कशी खाकी वाटत नाहीये, अमक्याच्या चड्डीला इलास्टिक आहे आणि पट्टा लावायला हुकच नाहीयेत अशा चर्चा केल्याची पुसट आठवण आहे. 

आठवीला गेल्यावर मग फुल पँट आली. त्यावेळी मग गणवेश रेडीमेड घेण्याऐवजी शिवून घेऊयात असं दादांनी सुचवलं. गावाकडे दादांचे एक मामा शिवणकाम करत. त्यांच्याकडून आपण तुझे कपडे शिवून घेऊ असं दादा म्हणाले. सुरुवातीला मी तयार नव्हतो. खेड्यात असणारे दादांचे मामा कसे शिवतील कपडे असं मला आपलं वाटून गेलं. आता माझ्या त्या वेडेपणाची कीव येते.त्यांनी खरोखरच कपडे मस्त शिवले आणि माझी स्वारी पुन्हा एकदा खुश. कॉलेजला गेल्यावर मग गणवेश नव्हताच. पुन्हा मग इंजिनियरिंगला गेल्यावर सोमवार आणि गुरुवारी गणवेश असे. अर्थात कॉलेजच फार कमी अटेंड केल्याने गणवेश घालायचा प्रसंग खूपवेळा आला नाही. 

एव्हाना बायकोची खरेदी संपली होती. इतका वेळ त्या छोट्या मुलाकडे कौतुकाने पाहणारा मीसुद्धा भानावर आलो आणि तिच्यासोबत दुकानातून बाहेर पडलो.