Tuesday, November 7, 2017

मी सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. जुन्नरमध्ये 'कलोपासक' म्हणून एक संस्था होती. ते लोक विविध नामवंत कलाकारांना जुन्नरमध्ये आणून त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असत. अशाच एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीतकार राम कदम हे जुन्नरमध्ये आले होते.

राम कदम हे त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या गाण्यांना शिट्ट्या हमखास पडत. कार्यक्रम रंगात येऊ लागला तसं लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. मी नुकताच शिट्टी वाजवायला शिकलो होतो. मग इतरांकडे बघून मलाही हुक्की आली आणि मीही शिट्टी वाजवू लागलो. नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला आपण जोरात शिट्टी वाजवू शकतो याची मजा वाटली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. पहिला तास पार पडला. दुसरा तास सुरू झाला.

"गुंड उभा रहा." वर्गात येताच बाईंनी माझ्याकडे बघत आज्ञा केली. (माझ्या संपूर्ण शालेय जीवनात फक्त एक किंवा दोन शिक्षकांनी मला माझ्या नावाने हाक मारली असेल. बाकी सगळे गुंडच म्हणत. असो)

मी गोंधळतच उभा राहिलो. आल्या आल्या बाईंनी आपल्याला का उभं केलंय हे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं.

"तुझ्यासारख्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती."

"मी काय केलं बाई?" अजूनही काही न कळलेला मी विचारता झालो.

"अरे तूच मला विचारतोस? नीट विचार करून बघ." इति बाई..

मी पुन्हा आपला ढिम्म उभा.

"कालच्या कार्यक्रमात तू शिट्ट्या वाजवत होतास. सबंध कार्यकम संपेपर्यंत तुझा थिल्लरपणा सुरू होता."

मग माझी ट्यूब पेटली. कलोपासकच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग होत असे.कार्यक्रम संपल्यानंतर केबल ऑपरेटर ती कॅसेट केबलवर लावत असे. शूटिंग करणाऱ्या माणसाने नेमका मी शिट्टी वाजवत असताना कॅमेरा माझ्यावर फोकस केला होता. त्यामुळे माझी शिट्टी वाजवण्याची कला सबंध जुन्नर शहराला दिसली होती. आणि नेमकं तेच माझ्यावर शेकलं होतं. याच बाईंनी तास संपल्यानंतर मला शिक्षक खोलीमध्ये बोलवून सगळ्या शिक्षकांसमोर माझी खरडपट्टी काढली.

तसं पहायला गेलं तर मी मजा म्हणून शिट्टी वाजवीत होतो. त्याचा असा काही परीणाम होईल हे माझ्या गावीही नव्हते. आपल्याला शिट्टी वाजवता आली पाहिजे असा साधा विचार माझ्या डोक्यात होता. आणि नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शिकलेले कसब आजमावयाची संधी मिळाली होती. शिक्षक खोलीतून बाहेर पडताना एका शिक्षकांनी, "एवढंच ना!" असं म्हणून हसल्याचंही मला आठवतंय.

बाकी शिट्टी मात्र वाजवता आलीच पाहिजे अशा मताचा मी आहे. ती एक कला आहे असं मला वाटतं. माझा एक मित्र सोनू माळवे एका बोटाने सुद्धा शिट्टी वाजवीत असे. काही लोक तर बोटांचा वापर न करतादेखील जोरात शिट्टी वाजवतात. आजकालच्या पोरांना शिट्टी वाजव म्हटलं तर खुशाल 'मला नाही येत' म्हणून मोकळे होतात. या शिट्टी वाजविण्यामुळे अजून मी अजून एका कचाट्यात सापडलो होतो. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.

Sunday, October 15, 2017

नवीन वर्षासाठी कॅलेंडर घ्यावे आणि बरोबर काही पुस्तकेही घ्यावीत म्हणून मी डेक्कन भागात फिरत होतो.बरोबर आईसुद्धा होती.एका दुकानात शिरून कॅलेंडरबाबत विचारणा केली.

ती बाई म्हणाली,  "भरपूर आहेत सर".

एकेक कॅलेंडर बघत मी दुकानात हिंडत होतो.अचानक दुकानाच्या समोरच्या पायऱ्यांवर प्रो कब्बडी लीगचे काही खेळाडू बसलेले दिसले. हे इथं का कडमडत आहेत असा विचार करत मी पुढे सरसावलो. जवळ गेल्यावर लक्षात आलं तमिळ थालाईव्हाज संघाचे ४-५ खेळाडू बसले होते.त्यांच्या हातात प्रो कबड्डी लीगचे २०१८ चे कॅलेंडर होते.

इतक्या उन्हातान्हाचे हे पठ्ठे काय करतात अशी उत्सुकता  म्हणून मी विचारले,

"अरे आप लोग तो प्रो कबड्डी के प्लेयर्स हो ना?"

" हां सर."

"तो ऐसे यहाँ पे क्या कर रहे हो? और यह कॅलेंडर्स क्यूँ है आप सबके हाथोमें?"

"प्रो कबड्डी का प्रमोशन है.उसका हिस्सा है इसलीये हमें यह करना पडता है."

"अरे लेकिन इतने धूप पे आप सब लोग ऐसें रस्तेपे बैठकर कॅलेंडर थोडी ना बेचोगे!!" मी आश्चर्याने विचारले.

एवढं होईपर्यंत इतरही लोकांनी त्यांना ओळखले होते. त्यांच्या अवतीभोवती गर्दी होऊ लागली होती. त्यांच्यातला एक जण एक माणसाबरोबर तमिळमध्ये काहीतरी बोलत होता. अचानक काय झाले कळले नाही आणि त्या माणसाने त्या खेळाडूच्या श्रीमुखात भडकावली. काय झाले म्हणून सगळेच तिकडे धावले. ते दोघे तमिळमध्ये तावातावाने एकमेकांना काहीतरी बोलत होते. त्या माणसाचे इतर साथीदार एव्हाना जमा झाले होते. प्रकरण गंभीर आहे हे जाणून मी आईला एका कोपऱ्यात थांबायला सांगितले. पुढच्या काही क्षणातच त्यांच्यातला वाद पेटला. ४-५ जणांनी मिळून त्या खेळाडूला मारायला सुरुवात केली. इतर खेळाडू मध्ये पडायला गेले तर त्यांना तमिळ मध्येच बाजूला रहा अशी वॉर्निंग दिली गेली. त्याला मारणे सुरूच होते. अचानक एका माथेफिरूने खिशातून एक बाटली काढली. रॉकेल किंवा पेट्रोल असावे. दुसऱ्या खिशातून आपला रुमाल काढला. तो त्या बाटलीतल्या रॉकेलने ओला करून पेटवला. आणि दुकानावर फेकला. पुस्तकाचेच दुकान असल्याने आणि जुनी लाकडी इमारत असल्याने तिने पटकन पेट घेतला. मी आईला घेऊन तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो. अचानक दुकानाच्या दरवाजाची एक फळी आमच्या पुढ्यात पडली. त्यातून मार्ग काढत पुढे निघालो तर त्या तमिळ लोकांपैकी एकाने आम्हाला थांबवले. आई बरोबर आहे असे त्याला मी खुणावले. आमचे सुदैव असे की त्याच्या ते लक्षात आले आणि त्याने आमचा रस्ता सोडला. आम्ही तिथून कसेबसे बाहेर पडलो तो समोर पोलीस उभे. त्यातल्या एकाने माझी गचांडी धरून बाजूला ओढले आणि आपल्या सहकाऱ्याला म्हणाला,

"ह्याला घे रे."

त्यांना काही सांगेपर्यंत मी पोलिसांच्या गाडीच्या मागच्या भागात फेकलो गेलो होतो. आई कुठे गेली कळायला मार्ग नव्हता. त्या आगीतून मार्ग लढत पोलिसांची गाडी ठाण्यावर गेली. इतका वेळ तग धरून असलेला मी नेमका त्याचवेळेस पेंगायला लागलो. दमून म्हणा किंवा अजून काही. पोलिसांनी धरून ओढत मला ठाण्यात नेल्याचे आठवते.

अचानक एक दांडका माझ्या पायावर पडला आणि मी तंद्रीतून जागा झालो.आजूबाजूला पाहतोय तर माझ्याच बेडवर मी झोपलो होतो. ऐन रविवारी दुपारी हे भयाण स्वप्न मला पडले होते. चेहरा घामाने थबथबला होता. काल रात्री बालेवाडीला तमिळ थालाईव्हाजची मॅच पाहिली होती त्याचा असा काही परिणाम होईल असे वाटले नव्हते. असो.स्वप्नात काहीही घडू शकते..

Sunday, September 24, 2017

उज्वल जनरल स्टोअर

लहानपणी पेन,पेन्सिल असं काही घ्यायचं असेल तर मी रविवार पेठेतल्या उज्वल जनरल स्टोअरमध्ये जात असे.कल्याण पेठेत सुद्धा दुकाने होती.पण उज्वल जनरलबरोबरचं नातं वेगळंच होतं.मग फक्त तेवढ्यासाठी मी सायकलवर रविवारात जात असे.

माझ्या जन्माच्या खूप अगोदर हे दुकान सुरू झालं असावं.कारण मला आठवतं तेव्हापासून उज्वल जनरल जुन्नरमध्ये आहे.विजूकाका म्हणजे दुकानातली प्रमुख व्यक्ती.डोक्यावरचे कमी होत चाललेले केस, हाफ शर्ट, पँट, उन्हाळा असेल तर क्वचित कॉटनची बंडी असे विजूकाका मला आठवतात.दुकानात कितीही गर्दी असली, गोंधळ असला तरी हा माणूस कधी गिऱ्हाईकावर रागावल्याचे, वैतागल्याचे मला आठवत नाही. कायम हसून बोलणार.दादांचे चांगले मित्र होते ते.त्यामुळे मलाही ओळखायचे.

"गुंड, तुझ्या आडनावाप्रमाणे वागू नको बरं का!!" असं गमतीने मला म्हणत असत.

"पप्पा कुठे गेले? मार्क किती पडले?" अशी चौकशीसुद्धा करत..

उज्वल जनरलच्या आसपास अजूनही एक दोन दुकाने होती.क्वचित यांच्याकडे एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्या दुकानांत जाण्याचा प्रसंग येत असे.पण विजूकाका ज्या प्रेमाने गिऱ्हाईकाशी बोलत तेवढं त्यांना जमत नसे.साहजिकच त्यांच्याकडे जाण्याचं मी टाळत असे..

शाळा सुरू व्हायचे दिवस आले की यांच्याकडे लगबग सुरू होई..नविन वह्या, पुस्तके, गाईड्स, पेन, पेन्सिल, डबा, वॉटरबॅग शाळेसाठी लागणारी प्रत्येक वस्तू उज्वलमध्ये असे.वह्यांचे गठ्ठे तर दुकानाच्या बाहेरसुद्धा ठेवावे लागत इतका मालाला उठाव असे. विजूकाकांचा मुलगा तुषार, त्यांचे मोठे बंधू वसंतकाका, जमेल तेव्हा घरातली इतर माणसे गर्दीच्या वेळी दुकानात येत असत.या सगळ्यांत तुषार जास्त वेळ दुकानात असे. कालांतराने त्यानेच दुकानाची सूत्रे आपल्याकडे घेतली.पण विजूकाका मात्र दुकानात येत असत.त्याशिवाय त्यांना करमणार कसे ना!!

अगदी क्रिकेट खेळायला टेनिसचा बॉलसुद्धा आम्ही इथूनच घेत असू..बॉल घ्यायला दुकानात आम्ही दोघं तिघं गेलो की विजूकाकांना अंदाज येई.मग ते विचारत,

"आज मॅच का? चांगले खेळा बरं का!"

आम्हीदेखील हो म्हणून बाहेर पडत असू..

एखादा मुलगा/मुलगी दुकानात आपल्या आई वडिलांकडे आपल्याला अमुकच पेन पाहिजे असा हट्ट करत असेल तर विजूकाका त्यांच्या मदतीला येत.

"अरे पप्पा म्हणतात तोच पेन भारी आहे. त्याने उलट तुझं अक्षर जास्त चांगलं येईल.सगळेजण हाच घेतात." आता दुकानदार सांगतोय म्हटल्यावर ते पोरगंसुद्धा त्यांचं ऐकून तो पेन घेत असे.केवळ ऐपत नसल्यामुळे आपल्या मुलांना महाग पेन, पेन्सिल देऊ शकत नसलेल्या कित्येक आई वडिलांचे पैसे विजूकाकांनी असे वाचवले असतील.त्याबद्दल कित्येकांनी त्यांना धन्यवादही दिले असतील.

बारावीनंतर पुण्याला आल्यावर उज्वलमध्ये जाणं कमी झालं.नंतर कधीतरी, काही कारणाने उज्वलमध्ये जाण्याचा योग आला.बऱ्याच वर्षांनी भेटूनही तुषारने तेव्हा मला ओळखले होते..

"अरे तू गुंड ना? कुठे असतोस सध्या?काय करतोस?" अशी प्रेमळ चौकशी केली होती.

आज दादांबरोबर सहज बोलताना विषय निघाला म्हणून ह्या आठवणीनं उजाळा मिळाला. आज सुमारे १५ वर्षानंतरही या दुकानाबद्दल वाटणारी आत्मीयता कमी झालेली नाहीये.माझ्यासारख्या बऱ्याच जणांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये उज्वल जनरलचा नकळतपणे हातभार लागला.

विजूकाका आणि तुषार दोघांनाही भेटून बरेच दिवस झाले.अलीकडे तुषारची बायको म्हणजे श्रद्धा भाभी त्याला हातभार लावत असल्याचे कळले.बदलत्या काळाबरोबर उज्वल जनरल स्टोअरने देखील कात टाकली आहे. इतक्या वर्षांनंतरही त्यांचा कारभार अजून चालू आहे. पुढील "उज्वल" वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा.

Saturday, September 9, 2017

"सर तुमची परमिशन असेल तर मी थोडं बोलू का?"
एअरपोर्टच्या गर्दीतून गाडी बाहेर काढत उबरचा ड्रायव्हर माझ्याशी बोलत होता.समोरचा आपल्याशी बोलायला उत्सुक आहे म्हटल्यावर आपण का माघार घ्यावी अशा विचाराने मीही त्याला होकार देत म्हटलं,
"बोला की."
"सर आज सकाळी मी डॅडी पिच्चर पाहिला."
"अरे वा! कसा काय वाटला मग तुम्हाला?"
"एक नंबर आहे सर."
"मग बघायला पाहिजे."
"नक्की बघा सर..फक्त दाऊदच्या रोलमधी फरहान अख्तरला नव्हतं घ्यायला पाहिजे.त्याचा आवाज बाद आहे.दाऊदसारख्या माणसाचा आवाज असा असतो का??ते काय नीट जमलं नाही त्याला."
"आणि अर्जुन रामपाल?" मी विचारता झालो.
"लई भारी काम केलंय सर त्यानी. म्हणजे त्यानी लई अभ्यास केला असणार या रोलसाठी."
"हं."
"आणि आपण अरुण गवळीला फक्त अलीकडं पाहतो. तरुणपणीचा डॅडी कसा होता, कसा राहायचा, कोणते कपडे घालायचा हे आपल्याला कुठं माहितीये.पण सर पिच्चरमध्ये ना सगळं एकदम डिटेल दाखवलंय."
"अच्छा."
"एखाद्याला महाराष्ट्राच्या गुन्हेगारीची थोडी माहिती असेल तर त्याला नक्की आवडंल सर. महाराष्ट्राचा क्राईम रेशो कसा वाढत गेला हे चांगलं दाखवलंय पिच्चरमध्ये."
क्राईम रेशो हा शब्द ड्रायव्हरच्या तोंडून ऐकून मी एव्हाना गार पडलो होतो. त्या गनगनीत नंतरची त्याची एक दोन वाक्य मी ऐकलीच नाहीत. त्याला वाटलं आपण जास्त बोलतोय.
"सर सॉरी मी जरा जास्त बोलतोय."
"अहो नाही नाही.मीच जरा विचार करत होतो."
हे असले बायोपिक्स हमखास लोकांना आवडेल असे बनवतात दिग्दर्शक लोक.डॅडी सुद्धा कदाचित त्यातलाच एक असावा. म्हणून कदाचित यालासुद्धा मनापासून आवडला असेल असा विचार करता करता घर आले.
"उद्या जातो मी बघायला" असं त्याला म्हणत मी घराकडे चालू लागलो..

Wednesday, August 30, 2017

१९९५ साली आम्ही भाड्याच्या घरातून आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. त्या अगोदर साधारण चार वर्षांपूर्वी १९९१ ला दादांनी नगरहून टीव्ही आणला होता. टीव्ही होताच त्यामुळे शनिवार रविवार चांगले जायचे. त्यावेळेस दर शनिवारी झी टीव्ही वर फिलिप्स टॉप टेन नावाचा कार्यक्रम लागत असे. त्या त्या आठवड्याची टॉपची १० गाणी त्या कार्यक्रमामध्ये दाखवली जात. अर्थात हिंदी. नुकतंच कळू लागल्यामुळे ही गाणी मला ऐकावीशी वाटत. शनिवारी सकाळची शाळा असे. शाळा सुटली की गाण्याचा हा कार्यक्रम चुकू नये म्हणून मी घाईने घरी येत असे. 

गाण्याचा हा कार्यक्रम एक तासात संपत असे. नंतर कधी गाणी ऐकावीशी वाटली तर बाकी काही पर्याय नसे. मग आपल्याकडे टेप असावा असे वाटत राही. दादांकडे तशी मागणीदेखील केली जाई. ते सुद्धा "घेऊ" एवढंच म्हणत. नाही कधीच म्हणत नसत. असं करता करता एक दीड वर्ष गेलं. टेप काही आला नव्हताच. एक दिवस दुपारची सुट्टी संपवून दादा पुन्हा बँकेत चालले होते. घरातून निघताना मला म्हणाले, 

"चल माझ्याबरोबर."

"कुठे?" बँकेत जाताना मला का बरोबर चल म्हणतायेत असा प्रश्न मला पडलेला. 

"तू चल रे." 

दादांच्या बँकेजवळ सह्याद्री इलेक्ट्रॉनिक्स नावाचं एक दुकान होतं. अजूनही आहे. दादा मला तिथे घेऊन गेले. दुकानात गेल्यावर दुकानदाराचा मुलगा, बाबाला ते म्हणाले, 

"चलो दे दो वह टेप."

त्याने निमूटपणे मागे एका रॅकवर ठेवलेला बॉक्स आमच्या समोर ठेवला आणि उघडायला सुरुवात केली. त्यातून टेप बाहेर काढला. त्याची वायर वगैरे लावून त्यात एक कॅसेट टाकली आणि प्लेचं बटन दाबलं. गाणं सुरु झालं. कुठलं बटन दाबलं की काय होतं वगैरे त्याने समजावून सांगितलं.  रेडिओ कसा लावायचा वगैरे सांगितलं. त्याचं प्रात्यक्षिक झाल्यावर दादा म्हणाले, 

"कर दो पॅक." 

त्याने पॅक केलेला टेपचा बॉक्स माझ्या हातात ठेवत मला म्हणाले,

"हं, जा आता घरी घेऊन."

एव्हाना हे काय चाललंय याचा विचार करत असलेला मी त्यांना म्हणालो,

"हा आपला आहे?"

"आपला नाही तर मग कोणाचा?" दादांनी उत्तर दिले. 

मी खुशीने घरी आलो आणि माझ्या बहिणींना आमचा नवा टेप दाखवला. काय आनंद झाला होता आम्हा तिघांना.पण एक प्रॉब्लेम होता. टेपवर लावायला कॅसेट कुठे होत्या आमच्याकडे. संध्याकाळी येताना दादांनी एक कुठलीशी कॅसेट आणली. त्यावर गाणी ऐकत आम्ही जेवलो असू. पण नंतर बरेच दिवस हवी ती गाणी ऐकायला मिळत नव्हतीच. नाही म्हणायला रोज सकाळी रेडिओ चालत असे. सकाळी बरोबर ७ वाजून ५ मिनिटांनी बातम्या लागत असत. 

"नमस्कार. हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहेत." 

हे वाक्य इतक्या वर्षानंतरसुद्धा ठळक आठवते. तुमच्यापैकी बऱ्याचजणांनादेखील आठवत असेल. कधीमधी आई विविधभारती वर गाणी लावत असे. पण त्यावेळेस आम्ही नेमके शाळेत असू. म्हणजे आपल्याला हवी ती गाणी फक्त कॅसेट्स नसल्यामुळे ऐकायला मिळत नाहीत म्हणून सगळं अडून बसायचं. 

अधूनमधून आम्ही दादांकडे तगादा लावायचो. 

"दादा कॅसेट्स कधी घेणार?"

"घेऊ, घेऊ" ते एवढंच म्हणायचे. 

नंतर एक दोन महिन्यांनी मग मला घेऊन दादा मुंबईला गेले. इकडे तिकडे कामं उरकली. संध्याकाळी आम्ही दोघं आणि अण्णा (माझा चुलता) एका कॅसेट्च्या दुकानात गेलो. कोणत्या कॅसेट्स घ्यायच्या हे दादांनी एका कागदावर लिहून आणलं होतं. त्या लिस्टमध्ये लता मंगेशकर अर्थात सगळ्यांत वरच्या नंबरवर होत्या. मी आपला माझ्या वयाला अनुसरून चित्रपटाच्या गाण्यांच्या कॅसेट्स घ्या असा हट्ट करत होतो. दादा फक्त "जरा थांब, जरा थांब" म्हणत मला थोपवून धरत होते.  

लता मंगेशकर मराठी व हिंदी, किशोरदा, आशा भोसले यांच्या गाण्यांच्या कॅसेट्स दादांनी घेतल्या. नंतर एक कॅसेट सुमन कल्याणपूरच्या गाण्यांची घेतली. एव्हाना माझा हट्ट वाढत चालला होता. तेव्हा बॉर्डर आणि येस बॉस हे चित्रपट आले होते. येस बॉस मधलं "मै कोई ऐसा गीत गाऊ" आणि बॉर्डरमधलं "संदेसे आते है" ही गाणी तेव्हा फिलिप्स टॉप टेनला वरच्या नंबरला होती.मी दादांना आपल्याला ह्या दोन्ही कॅसेट्स हव्यातच असा हट्ट धरला. दादा माझ्या बालसुलभ हट्टाकडे दुर्लक्ष करत बिलींग काउंटरवर गेले. अर्थात माझा हिरमोड झाला होता. त्या दुकानदाराने बहुधा ते ओळखले आणि दादांना म्हणाला,

"इतना सब कॅसेट्स लिया. एक कॅसेट बच्चे के लिये ले लो."

ही मात्रा लागू पडली. आणि दादांनी मला चित्रपटांची नावे विचारली. मी नावे सांगताच त्याने त्या दोन कॅसेट्स पुढ्यात टाकल्या. प्रत्येकीची किंमत तेव्हा ४५ रुपये वगैरे होती. अर्थात महाग!! मग दादा म्हणाले, 

"कोणती तरी एकच घे." 

मी विचारात पडलो. माझं वैचारिक द्वंद्व  दुकानदाराने बरोबर ओळखलं आणि पुढ्यात एक कॅसेट टाकली आणि म्हणाला, 

"ये लेकर जाओ. ए साईडको येस बॉस और बी साईडको बॉर्डर." एका झटक्यात त्याने माझा प्रश्न सोडवला होता. मी खुशीत होतो. सगळी खरेदी घेऊन आम्ही घरी आलो. कधी एकदा जुन्नरला जातो आणि गाणी ऐकतो असं मला झालं होतं. 

जुन्नरला आल्यावर मग रोज गाणी ऐकायची सवयच झाली. कोणती कॅसेट लावायची यावरून आम्हा तिघांत भांडण देखील होत असे. दादांची निवड किती "बाप"होती हे अर्थात आता लक्षात येत होतं. तोपर्यंत फारश्या माहित नसलेल्या गाण्यांच्या मी प्रेमात पडलो. दादांनी प्रत्येक कॅसेट अतिशय काळजीपूर्वक निवडली होती. कुठलीही कॅसेट लावली की अमुक एक गाणं आवडत नाही म्हणून फॉरवर्ड करा असा प्रकार कधी होतंच नसे.

जुन्नरला एका दुकानात रिकाम्या कॅसेटमध्ये गाणी भरून मिळत असत. मग दादांच्या नकळत एक दोन कॅसेट्स मी तशा भरून घेतल्या. दिल चाहता है वगैरे चित्रपटांची गाणी त्या कॅसेटमध्ये टाकल्याचं मला आठवतं. नंतर पुण्याला आल्यावर हॉस्टेलवर टेप वगैरे नव्हताच. इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना मी कॉम्पुटर घेतला. मग त्यावर गाणी ऐकायला सुरुवात झाली. तरी सुट्टीला जुन्नरला गेल्यावर टेप लागत असे. आईदादा तेव्हासुद्धा सकाळच्या बातम्या लावत असत. २००९ मध्ये मी अमेरिकेला जाईपर्यंत टेप व्यवस्थित चालू होता. नंतर कधी तरी त्याने जीव टाकायला सुरुवात केली. हळूहळू आईदादांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलं.मागे एकदा जुन्नरला गेलो होतो तेव्हा येताना टेप घेऊन आलो. तो चालत नाहीच पण एक आठवण म्हणून असावा म्हणून आपला आणला. नंतर कधीतरी अँटिक म्हणून डिस्प्लेला ठेवता येईल!!

Saturday, August 26, 2017

गणपती आणि मी


गणपतीच्या निमित्ताने एक गोष्ट शेअर करावीशी वाटते..एरवी कधी मंदिरात न जाणारा मी गणपतीच्या दिवसात मात्र का कोण जाणे सगळं मनोभावे करतो..

जुन्नरला आमच्या घरी गणपती नसायचा..पण टेमगिरे आत्याच्या (माझी आत्या) घरी असायचा..तो जणू काही माझ्याच घरचा गणपती आहे असं मला वाटत असे,अजूनही वाटते..अगदी गणपती मूर्ती बूक करण्यापासून ते विसर्जनापर्यंत मी त्यात सहभागी असे.. रविदादा आणि मी दोघंही उत्साहाने सगळं करत असू..मला आठवतं त्याप्रमाणे बऱ्याचदा गणपती प्रतिष्ठापनेच्या वेळी आत्याच्या घरी पौरोहित्य मीच करत असे.. रोज सकाळ संध्याकाळची आरती न चुकता करत असे..ते दहा दिवस उत्साहाचे असत...

नंतर नोकरी निमित्ताने रविदादा पुणे, मुंबईला असायचा..कधी त्याला रजा नाही मिळाली तर आत्या माझ्याकडूनच गणपती बसवून घ्यायची..सगळं काही मी आणि नाना करायचो..माझ्या घरी गणपती नसताना अशा रीतीने का होईना गणपती बाप्पा माझ्याकडून सेवा करून घ्यायचा..हा योगायोग म्हणायचा का?? 

एका वर्षी माझा मित्र आदित्यच्या घरी गणपती विसर्जनाला तो नव्हता..त्याच्या बाबांचे कसलेसे ऑपरेशन झाले होते..त्याने मला पुण्याहून फोन करून सांगितले,

"बाबांबरोबर जाऊन आमच्या घरच्या गणपतीचे विसर्जन कर."  त्या निमित्ताने त्याच्याही घरच्या गणपतीची सेवा झाली..हाही योगायोगच का??

आता पुण्यात आल्यावर गेली ३-४ वर्षे माझ्या बायकोच्या घरच्या गणपतीची प्रतिष्ठापना मीच करतोय.. आयुष्यात कुठेही असलो तरी या ना त्या प्रकारे कधीतरी कुठेतरी बाप्पा मला संधी देतोय..

या वर्षीपासून आमच्या सोसायटीमध्ये गणपती आहे.त्याच्या नियोजनात माझा पुरेपूर सहभाग आहेच. 

देव नसला तरी काहीतरी शक्ती हे जग सांभाळतेय असं मी मानतो. "हाच देव आहे" हा भाबडेपणा झाला. या प्रचंड विश्वात जे नियमित व अनियमितही घडते त्यामागे मोठी शक्ति आहे. ह्या आकाराचा, ऊकाराचा, हा देव हे कोणी ठरवले? तर माणसाने. मग माणूसच आधी व मग देव असे समीकरण बसते. नियती सनातन आहे, माणसापूर्वीही ती होती आणि माणूस संपला तरी असणार आहे.नम्र कुठे व्हावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण अंती नियती जे ठरवते तेच घडते. देव माणसाला काही देत नाही व त्याकडून काही घेत नाही. आपल्यासाठी नदी वाहत नाही तर ती वाहते म्हणून आपल्याला पाणी मिळते.आमच्या गावात, थोरांदळ्यात नदी नाही. ती नियती आहे. कोणत्याही देवाला ती आणता आलेली नाही. आता अमूक देव मानला तर सर्व धर्मात ते वेगवेगळे कसे? तुम्हाला जिथे नम्र व्हायला होते तिथे व्हा.मग तो गणपती असेल, अल्ला असेल, येशू असेल किंवा अजूनही काही असेल. फरक काहीच पडत नाही. मी तरी ह्या मताचा आहे.

श्रद्धेत बळ असते असे म्हणतात. मला योग येतोय त्याचा अर्थ  नियती कल्याण करते आहे असा मी घेतो..त्यात मी वाहत जाणार नाहिये हे निश्चित..

Sunday, July 9, 2017

सायकलचोरीची गंमत

पुण्यात असताना आई दादा डेक्कनला रहायला होते. दादांची बँक भवानी पेठेत होती. डेक्कनहून भवानी पेठेत जायला लांब पडे म्हणून दादांनी सायकल घ्यायची ठरवलं. त्यासाठी बँकेतून कर्ज काढून ४२४ रुपयाला सायकल घेतली. कर्जाचा २५ रुपये हफ्ता पगारातून कापला जाई. पुढे जुन्नरला बदली झाल्यावर दादांनी सायकलसुद्धा जुन्नरला नेली. आयुष्यातली पहिली मोठी खरेदी असल्याने दादांचा विशेष जिव होता सायकलवर. 

जुन्नरला असताना बँकेची शाखा सय्यदवाड्यात होती. तिथले लोक हिंदीमध्ये बोलताना मात्र वाडा न म्हणता "बाडा" असा उल्लेख करत. बँक घरापासून फार लांब नव्हती. त्यामुळे दादा पायीच जात असत. सायकल घरीच असे. एकदा त्यांच्या मनात आलं, "आज सायकलवर बँकेत जाऊयात." बँकेत पोहोचल्यावर त्यांनी दारासमोरच्या भिंतीला सायकल लावली. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आले. घरी येताना आपण आज सायकल घेऊन गेलो होतो हे त्यांच्या लक्षात राहिलेच नाही. जेवण करून बिनधास्त झोपलेसुद्धा ते. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना लक्षात आलं की आपली सायकल बँकेतच विसरली आहे. पण अगदी पहाटे जाऊन काही होणार नव्हते. "नंतर बघू" असा विचार करून सगळं आटोपल्यावर मग दादा बँकेत गेले. पाहतात तर सायकल गायब. दादांना धक्का बसला पण स्वतःला सावरून त्यांनी आवाज चढवला,

"यहाँ मेरी सायकल थी. कौन लेके गया?" 

दादांचा मोठा आवाज ऐकून सय्यदवाड्यातले लोक चक्रावले. कारण वाड्यात असे होणे शक्य नव्हते. लोक गरीब होते पण चोर नव्हते. 

"शामतक मेरा सायकल नही मिला तो देखो. मै बराबर देखेगा!!" दादा संतापात जवजवळ ओरडलेच. 

दादांचा पारा चढलेला पाहून २-३ जणांनी जवळ येऊन चौकशी केली. त्यांना दादांनी घडलेला प्रकार सांगितला. 

"सायकल नही मिला तो बाडेकी बदनामी होगी!!" असं बोलून दादा बँकेत गेले. बरीच वर्षे जुन्नरला असल्याने सय्यदवाड्यातले लोक दादांना चांगले मानत. त्यामुळे आता काहीतरी होईल अशी आशा दादांना होती. 

दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास एक पोरगं नाक ओढत दादांकडे आलं आणि म्हणालं,

"साब, ये चाबी लो. सायकल बाहर लगाया है."

दादांना इतका आनंद झाला की त्यांनी पटकन खिशात हात घालून पाच रुपयाची नोट काढली आणि त्या पोराला दिली. 

सायकल चोरीला जाऊनही केवळ बाड्यातले लोक म्हणून ती परत मिळाली असं दादा अजूनही सांगतात. त्या दिवशी मात्र दादांनी न चुकता दुपारीच सायकल घरी नेली. हा किस्सा मात्र आमच्या सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहिला.