Monday, July 2, 2018

मराठी भाषका जागा हो! इंटरनेटचा धागा हो!!

मराठी भाषका जागा हो!  इंटरनेटचा धागा हो!!

आज गुगल सर्च संमेलनाला हजर राहण्याची संधी मिळाली. पुण्यात नोंदणी करायला एक दिवस उशीर झाल्याने इंदोरमधल्या संमेलनासाठी नोंदणी केली.


सध्या भारताकडे सगळेच उद्योग एक आगामी बाजारपेठ म्हणून बघत आहेत. गुगलही त्यापैकीच एक. इंटरनेटचा वापर वेगाने वाढणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर बराच वर लागतो. यातही पहिल्यांदा इंटरनेटचा वापर करणारे लोक भारतामध्येच जास्त आहेत. या सगळ्या लोकांना आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी गुगलचा हा खटाटोप सुरू आहे.

इंग्रजी वाचणाऱ्या, इंग्रजीमध्ये गुगल सर्च करणाऱ्या लोकांची संख्या आता फारशी वाढणार नाही हे गुगलने वेळीच ओळखून आता आपला मोर्चा प्रादेशिक भाषांकडे वळवला आहे. यातही हिंदी, तामिळ, बंगाली आणि तेलगू या भाषांना त्यांनी प्रथम पसंती दिली आहे. हळूहळू इतरही भाषांकडे ते वळणार आहेत. आपली वेगवेगळी उत्पादने या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल आता प्रयत्नशील आहे. यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये लिहिणाऱ्या, किंवा प्रादेशिक भाषांमध्ये लिहिलेला मजकूर प्रकाशित करणाऱ्या लोकांची मदत घ्यायची असे त्यांनी ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील ११ शहरांमध्ये गुगल सर्च संमेलन भरविण्यात आले आहे. लक्षात घ्या, जे गुगल एकेकाळी भारताला खिजगणतीतही धरत नसे, तेच गुगल आता भारतीय प्रादेशिक भाषांसाठी पायघड्या घालत आहे ही फार मोठी गोष्ट आहे. 

गुगलची सर्च आऊटरिच टीम या शहरांमध्ये जाऊन तिथल्या प्रादेशिक भाषांमधील 'कंटेंट क्रिएटर्स'ना भेटते आहे.एक दिवसाच्या या वर्कशॉपमध्ये गुगल सर्च नक्की कसे काम करते? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे नक्की काय? ते करत असताना काय करावे आणि काय करू नये या विषयांवर पहिल्या सत्रात माहिती देण्यात आली..

त्यानंतर गुगलचे येऊ घातलेले उत्पादन 'क्वेश्चन हब' याविषयी माहिती देण्यात आली. इंटरनेटवर लोक काय शोधत आहेत? कोणत्या प्रश्नांची उत्तरे गुगलवर उपलब्ध नाहीत? हे या 'क्वेश्चन हब'मार्फत गुगल आपल्या पार्टनर्सला कळविते. मग हे पार्टनर्स त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये ती माहिती लिहून प्रकाशित करतात. सध्या हे उत्पादन हिंदी ह्या भारतीय आणि बहासा या इंडोनेशियामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेत उपलब्ध आहे.

मोबाईल इंटरनेटकर्त्यांची वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन बऱ्याच वेबसाईट्स आता मोबाईल फ्रेंडली व्हर्जनसुद्धा आणत आहेत. या मोबाईल फ्रेंडली वेबसाईट्स तयार करताना काय दक्षता घेतली पाहिजे यावरही एक सत्र पार पडले. (भारतात एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ९९% लोक आपल्या मोबाईलवर इंटरनेट वापरतात.) 

या संमेलनामध्ये सहभागी लोकांसाठी सर्वाधिक आवडता विषय होता गुगल अॅडसेन्स. या उत्पादनाद्वारे गुगल तुमच्या वेबसाईटवर काही जाहिराती दाखवते. तुमच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या लोकांनी या जाहिरातींवर लोकांनी क्लिक केले की तुम्हाला पैसे मिळतात असा साधा फंडा. कोणत्याही वेबसाईटवर अॅडसेन्सद्वारे जाहिराती दाखवणे वाटते तितके सोपे मात्र नाही. अॅडसेन्ससाठी नोंदणी करणाऱ्या केवळ १०-१२% वेबसाईटला गुगलची परवानगी मिळते.ही परवानगी मिळाल्यानंतरही गुगलने घालून दिलेले नियम पाळावे लागतात. कृत्रिम क्लिक्स, रोबोटचा वापर असे प्रकार आढळल्यास गुगल तुमच्या वेबसाईटला कायमचे बाद करू शकते. एखाद्या भाषेतील अधिकाधिक वेबसाईट्सने असेच गैरप्रकार केले तर गुगल त्या भाषेतील अॅडसेन्ससाठीचा सपोर्ट बंदही करू शकते. त्यामुळे अॅडसेन्स वापरताना काय दक्षता घेतली पाहिजे हेही गुगलच्या लोकांनी सांगितले.

सध्या अॅडसेन्स फक्त इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. मराठीमध्ये कधी येणार असे विचारले असता आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच आम्ही मराठीसाठी देखील अॅडसेन्स लाँच करू असे सांगण्यात आले. मराठीआधी इतर भाषांना प्राधान्य का? असा प्रश्न विचारल्यावर, इतर भाषांमध्ये मराठीपेक्षा जास्त प्रमाणात कंटेंट क्रिएशन  होते. तामिळ, तेलगू वापरकर्ते त्यांच्या भाषेत लिहितात, गुगल सर्च करतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले असे सांगण्यात आले.

मित्रांनो म्हणूनच मराठीमध्ये कंटेंट क्रिएशनची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मराठी भाषकांची संख्या देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब दिलासा देणारी असली तरी नुसतं मराठी बोलून भागणार नाही तर मराठीत लिहावे सुद्धा लागणार आहे.तरच इतर प्रादेशिक भाषांसमोर आपण टिकू शकणार आहोत. मराठी आणि हिंदी भाषांची लिपी देवनागरी असल्याचा फटका नकळतपणे मराठीला बसतोय असे मला वाटते.जवळपास सगळ्याच मराठी भाषकांना, वाचकांना हिंदी बोलता आणि वाचता येते.त्यामुळे शोधत असलेली माहिती हिंदीमध्ये उपलब्ध असली तरी आपण त्यावर समाधान मानतो आणि शांत बसतो. भारतातील सर्वाधिक इंग्रजी भाषक महाराष्ट्रामध्ये नोंदवले गेले आहेत. इंग्रजी आपली मातृभाषा आहे असे सांगितलेल्या २.६ लाख लोकांपैकी जवळपास १ लाख लोक महाराष्ट्रातील आहेत. इथे मात्र आपण तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांना मागे टाकले आहे. विकिपीडियानेदेखील आपले लेख प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. तिथेही सध्या हिंदी आणि तामिळ भाषेत सर्वाधिक लेख उपलब्ध आहेत.तेलगू आणि बंगाली भाषांनी तिथेही आपल्याला मागे टाकले आहे. 

इतर राज्यांतले लोक आपल्या भाषेचा अभिमान बाळगत त्यांच्या इंटरनेटवरील रोजच्या बोलण्यात, लिहिण्यात आपली मातृभाषा वापरत असताना आपण त्यात मागे राहतोय की काय अशी शंका येतेय. आत्ताच यावर कृती केली नाही तर असेच सतत वाट पाहत बसावे लागेल. म्हणून मित्रांनो इथून पुढे इंटरनेटवर लिहिताना, बोलताना, वाचताना मराठीचा जास्तीत जास्त वापर करा आणि इतरांनाही सांगा. भविष्य इंटरनेटवर बेतलेलं असताना तिथे मराठी मागे रहायला नको ही काळजी आपण नाही तर अजून कुणी घ्यायची?  

Saturday, March 17, 2018

शिक्षक आणि त्यांचे पेटंट डायलॉग

शाळेत किंवा कॉलेजात असताना बरेच शिक्षक आपल्याला शिकवून जातात.यातून काही शिक्षक त्यांच्या शिकविण्याच्या उत्तम पद्धतीसाठी, काही जण त्यांच्या विद्यार्थीप्रियतेसाठी शाळा,कॉलेज सोडल्यानंतरही बरीच वर्षे आपल्या लक्षात राहतात. काही शिक्षक त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे लक्षात राहतात. माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील अशाच काही शिक्षकांबद्दल थोडेसे.

संस्कृतचे डुंबरे सर त्यांच्या अचूक व्याकरणासाठी जसे प्रसिद्ध होते तसेच एक दोन वाक्ये बोलली की "इकडे लक्ष द्या!" असे एका ठराविक टोनमध्ये म्हणण्यासाठी देखील प्रसिद्ध होते. आम्ही आठवीत जाण्यागोदरच ते निवृत्त झाले होते. त्यांच्या संस्कृतच्या शिकवणीला मात्र मी जात असे. आज इतक्या वर्षांनंतरही सरांचे "इकडे लक्ष द्या" कानात जसेच्या तसे ऐकू येते.

मराठी आणि इतिहास शिकविणाऱ्या थोरात बाईंना शिकवताना  'विशेषतः' आणि 'या ठिकाणी'  हे शब्द वापरण्याची सवय होती. शिकविण्याच्या ओघामध्ये त्या बरेचदा हे दोन शब्द वापरत असत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर त्यांचा तास असेल आणि कंटाळा आला की आम्ही, आज बाई किती वेळा विशेषतः आणि किती वेळा या ठिकाणी हे शब्द म्हणाल्या याची मोजदाद करत असू.

गणिताचे कापसे सर त्यांच्या खुसखुशीत बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते..एखाद्या विद्यार्थ्याला ओरडताना,"तुला काही कळते का? योग्य धोरणाने, विचार करत काम करावे."असा सल्ला त्यांना द्यायचा असे. तो देताना ते त्यांच्या ठराविक शैलीमध्ये, "ए कळतं कै..धोरण धर धोरण." असं म्हणत. त्यांचा हा डायलॉग विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होता. इतका की बरेच जण बोलताना एकमेकांना "ए धोरण धर." असे म्हणत. मलाही सवय होती असे म्हणायची. एकदा घरी काहीतरी करत असताना मी चुकलो आणि दादा मला म्हणाले, "धोरण धर धोरण." दादांचं ते बोलणं ऐकून माझी हसून पुरेवाट झाली.

भूगोलात बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रदेशांची माहिती असते.अमुक प्रदेशात अमुक प्रकारची जमीन, तमुक प्रदेशात तमुक प्रकारचे वृक्ष असे बरेच काय काय असते. हे शिकवताना भूगोलाच्या पिसे सरांना वाक्याचा शेवट 'पहावयास मिळते' या शब्दांनी करायची सवय होती. कधी कधी लागोपाठ पाच सहा वाक्यांचा शेवट 'पहावयास मिळते'ने होत असे. सरही त्याअगोदरचे वाक्य बोलून एक छोटा पॉज घेत आणि विद्यार्थी नेमके त्याचवेळेस सरांसोबत एकसुरात पहावयास मिळते असे म्हणून वाक्य संपवत. एकदा या एकसुरात पहावयास मिळते म्हणायचा अतिरेक झाला. सर चिडले आणि पहिल्या बाकापासून सगळ्यांना बडवायला सुरुवात केली. माझं नशिब चांगलं म्हणा किंवा अजून काही, माझ्यासमोरच्या बाकापर्यंत येऊन सर थांबले आणि पाठीमागे बसणारे आम्ही ५-६ जण मारापासून वाचलो. 

गणिताचे ढोले सर गणित सोडवायला देत आणि मग एकेक विद्यार्थ्याने सोडवलेले गणित तपासत बाकांच्या रांगांमधून फिरत असत. सरांनी आपली वही तपासावी अशी सगळ्यांचीच इच्छा असे. सरही कोणाला नाराज करत नसत. वही तपासली की त्यावर बरोबरची टिक करून "करेक्ट" असे ते म्हणत. कधी कधी बऱ्याच वह्या त्यांच्या पुढ्यात असल्या की सगळ्या वह्यांवर टिक करत करत "करेक्ट, करेक्ट" असे एक विशिष्ट टोनमध्ये म्हणत सर त्याचा फडशा पाडत. बऱ्याचदा ते "करेक्ट" हे "करेक्" असेच ऐकू येई. सरांनी आपली वही तपासली म्हणून मुलांना मात्र आनंद होई. 

भूगोलाच्या ताठे सरांच्या तासाला तर हास्याचे फवारे उडत. सर भूगोल उत्तम शिकवतच पण एखाद्या खोडकर मुलाला हाक मारण्यासाठी ते विशिष्ट शब्द वापरत. मस्ती करणाऱ्या पोरांना ते "ए काठमांडू" "ए नरुट्या" अशा शब्दांनी पुकारत. तासाला लक्ष देणारी इतर मुले म्हणजे 'भारत' देश आणि त्यांच्यापेक्षा वेगळा असा तो खोडकर मुलगा नेपाळमधला 'काठमांडू' म्हणजे भारतापेक्षा वेगळा असा विचार या शब्दांच्या वापरामागे असावा की काय अशी आता शंका येते. 

गणित आणि शास्त्र विषय शिकवणारे एस. डी. पानसरे सर त्यांच्या टापटीपपणाबद्दल प्रसिद्ध होते. ते ओतूरवरून स्प्लेंडरवर शाळेत येत. व्यवस्थित इन केलेला शर्ट,पायात शूज, क्वचित चामड्याची चप्पल आणि रे बॅनचा काळा गॉगल असा त्यांचा वेष असे. सर शाळेत येताना कमीतकमी ७-८ पोरं तरी रोज त्यांची ऐटीतली सफारी वळून वळून बघत असत. पानसरे सरांचा टापटीपपणा त्यांच्या शिकविण्यातही डोकावे. मुलांना वहीमध्ये काहीतरी लिहून देत असताना त्याचा प्रत्यय येत असे. एखाद्या विषयाचे हेडिंग लिहिले की, 

"डॅश करा. ती ओळ सोडून द्या. खालच्या ओळीला घ्या." हे त्यांचे वाक्य हमखास ठरलेले असे. 

त्यामुळे सगळ्याच मुलांच्या वह्या दिसायला चांगल्या दिसत. नंतर अभ्यास करतानासुद्धा वाचायला सोयीस्कर पडे. 

व्ही. डी. पानसरे सरांना वर्गातल्या सगळ्या मुलांचा सातबारा माहित असायचा. ते स्वतः जुन्नर तालुक्यातले असल्यामुळे कोण कुठल्या गावचा, कुणाचे वडील काय करतात, कोणाची कसली शेती आहे याची यथासांग माहिती त्यांना असे. मग मुलांना वर्गात हाक मारतानाही ते त्यांच्या गावाच्या नावाने हाक मारत. मग 'थोरांदळ्याचे गुंड', 'डेहण्याचे तिटकारे','भागडीचे उंडे', 'नळवण्याचे देशमुख' अशी नावे घेऊन मुलांना हाक मारली जाई. 

चायल सर पर्यवेक्षक असताना आम्हाला भूगोल शिकवायचे. बऱ्याचदा कामामुळे त्यांना तास घेणे जमत नसे आणि मग अभ्यासक्रम मागे राही. त्यासाठी शनिवार,रविवारी ते ज्यादा तास घेत. ह्या ज्यादा तासांना नोट्स देताना ते फळ्यावर लिहून देत. फळा पूर्ण भरला की दुसऱ्या वर्गात जाऊन त्या वर्गाच्या फळ्यावर लिहून ठेवत. मग मुलांची या वर्गातून त्या वर्गात पळापळ होत असे. चायल सरांना दोन्ही हातांनी लिहिता येत असे. त्यामुळे त्यांचा फळ्यावर लिहिण्याचा वेगही प्रचंड असे. 

संस्कृतचे जोशी सर शिकवताना जरा मुलांची गडबड जाणवली की "यत्किंचतही आवाज नकोय." या त्यांच्या वाक्यामुळे अजूनही लक्षात राहतात. संस्कृतचे काळ शिकवताना  'मि वः मः,  सि थः थ, ति तः अन्ति' हे ते एका विशिष्ट लयीत म्हणत आणि आमच्याकडूनही म्हणून घेत. आज इतक्या वर्षांनंतरही झोपेतून उठूनसुद्धा मी आणि माझे अनेक वर्गमित्र  'मि वः मः,  सि थः थ, ति तः अन्ति' ना चुकता म्हणू शकतो. 

त्रिकोणामिती शिकवताना साइन, कॉस, टॅन साठी वेगवेगळ्या कोनांच्या किंमती लक्षात रहाव्यात म्हणून दाते सर त्याचे कोष्टक बनवून कंपासपेटीमध्ये लावायला सांगत. ते कोष्टक आमच्याकडून म्हणूनही घेत. हे अगदी इंजिनियरिंग होईपर्यंत माझ्या लक्षात होते. 

गणित आणि शास्त्र विषय शिकवणारे साबळे सर फळ्यावर लिहिताना वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे अक्षर फळ्यावर आणि कागदावर तितकेच सुंदर असे. आकृत्या अतिशय रेखीव असत. एखाद्या विद्यार्थ्याने फळ्यावरचे वाचताना चूक केली तर त्या विद्यार्थ्याला, "तुझ्या डोळ्यात काय शेंबूड भरलाय काय रे?" असे म्हणून मोकळे होत. सबंध वर्ग मग हसत बसे. आजकालचे शिक्षक असे बोलले तरी विद्यार्थ्यांच्या आधी पालक तक्रार करतील. 

साबळे सरांसारखेच बेल्हेकर सरदेखील वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरत. तेही फळ्यावर सुंदर आकृत्या काढून विषय सोपा करून समजावत. बेल्हेकर सरांना परफ्युमची फार आवड असे. ते आमच्या वर्गाच्या शेजारून जरी गेले तरी आमच्या वर्गात घमघमाट येत असे. त्यांच्या परफ्युमच्या आवडीची विद्यार्थ्यांमध्ये चर्चा असे. 

इंग्रजीचे माकूणे सर हा विषय इंग्रजीमध्येच शिकवत. आम्हाला कायम इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन देत. आज आम्ही जे काही बरेवाईट इंग्रजी बोलतो त्यासाठीची पायाभरणी काहीप्रमाणात त्यांनीच केली होती. माकूणे सर आमच्या वर्गाचे प्रिय असण्यासाठी अजूनही एक कारण होते. आमच्या वर्गात सगळ्यांनाच लिहायचा कंटाळा होता. माकूणे सरांचा नियम असा असे की तुम्हाला एखादा शब्द नविन वाटला तरच त्याचा अर्थ वहीत लिहून घ्या. त्यामुळे सहसा आमच्या इंग्रजीच्या वह्या फार भरत नसत. सरांना फळा स्वच्छ लागे. त्यांच्या अगोदर तास असलेल्या शिक्षकाने फळा साफ केलेला नसेल तर त्यांची चिडचिड होई. मग चार पाच मिनिटे फळा व्यवस्थित पुसून मगच ते शिकवायला सुरुवात करत. शिकवताना थोडी गडबड ऐकू आली तर, "You chit-chatters. Don't murmur." असे म्हणून मुलांना गप्प करत. 

कॉलेजला असताना फिजिक्स शिकवायला डुंबरे सर होते. त्यावेळेस डुंबरे सर आणि इंगळे सर हे दोघे ज्युनिअर कॉलेजला फिजिक्सचे दादा लोक होते. दोघांनी कधीच शिकवताना हातात पुस्तक घेतल्याचं मला आठवत नाही. डुंबरे सर एखादा मुद्दा शिकवून झाला की तो मुलांना समजलाय की नाही याची खात्री करण्यासाठी सतत "ओके?" असा प्रश्न विचारायचे. त्यातला ओ बऱ्याचदा सायलेंट असायचा. ऐकायला फक्त "के?" एवढंच यायचं. त्यांच्या आवाजात ते ऐकायला मजा यायची.

अकरावीला फिजिक्सला चव्हाण सर होते. तेही पुस्तक न घेता शिकवायचे. शिकवताना "सोपं सोपं असतं रे सगळं." असं म्हणून ते मुलांना धीर देत. एकदा काहीतरी झाले आणि शिकवताना ते चुकले. आपण चुकलोय हे लगेच त्यांच्या लक्षातही आले आणि चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वर्गात कोणाकडे पुस्तक आहे का याची चाचपणी केली. एका मुलाने दिलेले पुस्तक घेऊन त्यांनी आपली चूक सुधारली आणि आपली चूक मान्यदेखील केली. तेवढयात आमचा वर्गमित्र रोहन कबाडी त्यांना म्हणाला, 

"जाऊ द्या हो सर. सोपं सोपं असतं सगळं." 

हे ऐकून त्यांचा पारा चढला आणि रोहनला वर्गाबाहेर जावे लागले. 

आज इतक्या वर्षांनंतरही हे शिक्षक अजूनही लक्षात राहिले याला कारण त्यांची शिकवण्याची पद्धत. ज्यांचे नाव लिहिले नाही ते लक्षात नाहीत असे नाही पण हा ब्लॉग लिहिण्याच्या ओघात वर नमूद केलेल्या शिक्षकांची आवर्जून आठवण झाली. तुमचेही शाळेतले असे कोणी शिक्षक असतील तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Wednesday, February 14, 2018

"आपली तारीख किती आहे? २३ एप्रिल ना??

कॅबमध्ये बसल्या बसल्या ड्रायव्हरचा फोनवर बोलतानाचा आवाज कानावर पडला. 

"सर ट्रिप स्टार्ट करतो." एवढं मला सांगून तो पुन्हा फोनमध्ये गुंतला. 

"चालतंय ना मग. मी माझ्या बाजूनी सगळं घेतो उरकून. २३ ला सकाळी ९ ते ११ ची वेळ ठरवू. मी महाराजांना पण तसं सांगून ठेवतो. ओके,ओके. तुम्ही नका काळजी करू." असे म्हणत त्याने फोन ठेवला. 

उबरवर त्याचं रेटिंग ४.८ बघून मी त्याच्याशी बोलायला उत्सुक होतो. सुरुवात करायची म्हणून मी विचारलं,

"उबर फुल टाइम बिझनेस का?"

"नाय ओ सर. उबरमध्ये मजा नाय राहिली आता. मी साईड बिझनेस म्हणून करतो."

"अरे!!! मग मेन बिझनेस कोणता तुमचा?" मी आश्चर्यचकित होत विचारलं. 

"हे काय हेच आत्ता फोनवर बोलत होतो ते."

"मला समजलं नाही नक्की कशाबद्दल बोलत होतात तुम्ही ते. काहीतरी नियोजन चाललं होतं इतकंच लक्षात आलं." मी त्याला सांगितले. 

"आता बघा, हा फोन तळेगावरून होता. तिथं एका पार्टीच्या मुलाचा बड्डे आहे. त्यानिमित्त त्यांना किर्तनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे." 

"मग तुम्ही किर्तन करता की काय?" मी हसत विचारले. 

"नाय ओ. मी किर्तन त्यांना अरेंज करून देतो."

"म्हणजे नक्की काय?" माझा पुढचा प्रश्न तयार होता. 

"म्हणजे मी ह्या सगळ्याचं इव्हेंट मॅनेजमेंट करतो असं म्हणा ना." त्याने माझी मदत केली. 

"वाह!! छानच की. मग तुम्ही अरेंज करून देणार म्हणजे काय काय करणार?" असं विचारत मी पुन्हा चर्चेचा चेंडू त्याच्याकडे तटवला. तोही तयारच होता. 

"म्हणजे बघा आत्ता फोन केलेल्या पार्टीने मला सांगितलं की त्यांचं बजेट ३० हजार आहे. मग आता मी तेवढयात सगळं बसेल अशी व्यवस्था करून देणार. २३ एप्रिलला सकाळी ९ वाजता महाराज आणि त्यांचा लवाजमा तिथं पोहोचणार. त्यांचं काय हाये ते किर्तन बिर्तन उरकणार आणि पुढच्या कार्यक्रमाला जाणार."

"मग तुम्ही हे महाराज कुठून शोधणार?" मी पुढचा प्रश्न विचारला. 

"अहो आता झालेत कॉन्टॅक्ट बरेच. मी गेली चार पाच वर्षं हे करतोय. म्हणजे तुमची जशी गरज असंल तसं. तुम्ही म्हणाले आम्हाला सप्ताह करायचा तर आपण ते करतो. तुम्ही म्हणाले सात दिवस सकाळ संध्याकाळ कीर्तन पाहिजे तर आपण ते पण करून देतो."

"पण ह्याचा खर्च जास्त असेल ना?"

"तुमचं बजेट असंल तसं सगळं करतो आपण. आता कधी कधी एखाद्या गावाचा कार्यक्रम असतो. मग गावकरी म्हणतात, आमचं ५ लाखाचं बजेट आहे. आम्हाला अमुकच महाराज पाहिजे. मग त्यानुसार आम्ही कामाला लागतो."

"पण हे महाराज लोक कधी कुठं जाणार हे कोण ठरवतं?"

"अहो बुकिंग असतंय सर. आता बघा की एप्रिलच्या कार्यक्रमासाठी गड्यानी मला फेब्रुवारीतच फोन करून बुकिंग केलंय.आता मी महाराजांना सांगितलं की ते त्यांच्या डायरीत नोंद करून ठेवणार. सर एकेक दीडदीड वर्षं आधी लोकं बुकिंग करून ठेवतात."

"पण मग यातून तुम्हाला कितपत शिल्लक पडते?" मी जरा नाजूक प्रश्न विचारला. 

"आता बघा हे सगळे कार्यक्रम, काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था, काही ठिकाणी सप्ताह असं सगळं धरून महिन्याकाठी ५०-६० हजार रुपये शिल्लक पडतात मला."

"अरे वाह!! चांगले पैसे मिळतात."

"हां बरं चाललंय आपलं. त्यानिमित्ताने आपल्या हातून देवाची सेवा पण होती.. नाय का?"

मी नुसतेच हं म्हटले. 

"हे बुवा लोकं किती पैसे घेतात मग?"

"रेट असतात सर यांचे. म्हणजे जो बुवा फेमस त्याचा रेट जास्त. एका प्रवचनाचे लाख लाख रुपये घेणारे पण बुवा आहेत."

"हे बुवा लोक कुठंही जायला तयार होतात का?" मी अजून एक प्रश्न विचारला. 

"अहो सर पैसा मिळतोय म्हटल्यावर कोण नाही जाणार. जायला यायला गाडी, खायप्यायाची चंगळ असल्यावर कुणीपण जाईल की. जुन्नर,आंबेगाव आणि खेड तालुक्यांनी ह्याचं जास्त प्रस्थ आहे. पार येडी झालीत लोकं. दशक्रिया आली की बोलव महाराज, वाढदिवस आला की बोलव महाराज हे असंच चालू आहे. तुम्हाला सांगतो सर ह्याच्यातून काहीकाही महाराज लोकं मोक्कार गबर होऊन बसलेत. आपण त्येपण काम करतो."

"म्हणजे काय करता?" मी थांबणार नव्हतो. 

"अहो ह्यांना सगळं पेमेंट कॅशमधी होतं. त्याला काय टॅक्स नाय, काय नाय. मग पुण्यात फ्लॅट,बिट घ्यायचा झाला तर इन्कमचा प्रूफ नको का? मग आपण ५-६ महाराजांचं ते पण काम बघतो. म्हणजे त्यांच्या नावानी एक एन्टरप्राइज फर्म करायची आणि टॅक्सेशन करायचं. त्यांचपण काम होतं आणि चार पैसे आपल्याला पण मिळतात."

"पण ह्या लोकांचं उत्पन्न असतं तरी किती असं?" 

"सर एक माणूस मृदंग वाजवतो. म्हणजे तो तसं बघायला गेलं तर साईड हिरो म्हणा ना. पण मृदंग लई भारी वाजवतो. त्याच वार्षिक उत्पन्न किती असंल?"

"किती?" मी विचारले. 

"अंदाज करा."

"असेल आठ दहा लाख रुपये." मी अंदाज लावत म्हटलं."

"सर तो माणूस एक वर्षाला एकवीस लाख रुपये कमावतो. फक्त मृदंग वाजवून."

"काय सांगता?" मी आ वासत म्हटलं. 

"एकूणएक शब्द खरा आहे सर. देव समोर आहे." गाडीत लावलेल्या गणपतीच्या फोटोकडे बोट दाखवत तो म्हणाला. 

"चांगला धंदा आहे हा." मी गमतीने त्याला म्हणालो. 

"चांगलाच म्हणायला पाहिजे सर. माझं घर चालतंय त्यावर."

"मग तुम्ही का नाही करत हे सगळं? किंवा मुलांना का नाही शिकवत हेच?"

"सर आळंदीत, पंढरपुरात ह्या सगळ्याचं शिक्षण देणाऱ्या मोठमोठ्या संस्था आहेत. तिथं दिवसरात्र हेच चालू असतं. एखाद्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला आळंदीला नदीच्या तीरावर चक्कर मारा. ही सगळी भविष्यात महाराज होऊ घातलेली पोरं तिथं असतात. ह्यांचे आईबाप खुशाल ह्यांना शाळा न शिकवता ह्या शिकवणीला पाठवतात. अहो ह्याच्यात कसलं आलंय भविष्य सर? चाललं तर ठीक. पण नाय चाललं तर ह्या पोरांच्या आयुष्यातली उमेदीची वर्षं वायाला जातात हो. बरोबर का नाय?" त्याने माझं मत घेण्याचा प्रयत्न केला. 

"हो बरोबरच आहे. शिक्षणाला पर्याय नाही. शाळा न शिकवता आपल्या मुलांना बुवागिरीचे शिक्षण देणारे पालक मूर्खच म्हणावे लागतील." मीही सहमती दर्शवली. 

"मी ठरवलंय सर. माझ्या दोन्ही मुलींना चांगल्या शाळेत टाकलंय. त्यांना आत्ताच सांगून ठेवलंय, काय पाहिजे तेवढं शिका. खर्च मी करतो. त्यांना चांगलं शिकवायचं आणि मगच त्यांची लग्नं लावून द्यायची."

"हा निर्णय मात्र उत्तम घेतलाय तुम्ही. मला बरं वाटलं ऐकून.चला तुम्हाला शुभेच्छा."  गाडी एअरपोर्टवर आली होती. मी उतरून माझ्या वाटेला लागलो. 

Friday, February 2, 2018

परवा गावाकडे एका परिचितांच्या घरी मयत झाले. अंतिम विधीला जाणे भाग पडले. पुण्यातून सकाळी निघून आम्ही पोहोचलो. त्या लोकांना भेटून सांत्वन केले. ज्या घरात मयत झाले होते ते गावाच्या सीमेवर होते. म्हणजे जवळजवळ दुसऱ्या गावात म्हटले तरी चालेल. दोन गावांच्या मध्ये फक्त एक रस्ता शीव म्हणून पाळला जातो. रस्त्याच्या अलीकडे एक गाव आणि पलीकडे दुसरे. 


ज्या घरात मयत झाले ते तसे पाहिले तर दुसऱ्या गावाला जवळ होते. पण त्या गावात अंतिम विधी कसा करणार? तो तर आपल्याच गावात केला पाहिजे. पण घर आणि गावातली अंत्यसंस्काराची जागा यातले अंतर जवळपास पाच किलोमीटर इतके होते. एवढे अंतर प्रेताला खांद्यावर घेऊन जाणे म्हणजे जिकिरीचे काम आहे. खांदेकऱ्यांचे हाल होतात. घरातल्या लोकांचे हाल होतात, उन्हाची वेळ असेल तर तापलेल्या रस्त्यावर चालताना पाय पोळतात. जुन्या काळात सोयीसुविधा नव्हत्या तेव्हा प्रेताला खांद्यावर घेऊन जाण्यावाचून काहीही पर्याय नव्हता. या गावातले लोक गेली कित्येक वर्षे तसेच करतही आले. पण हे सगळे कधी स्टॅंडर्ड बनून गेले कोणालाच कळले नाही. आता इतक्या सुविधा झालेल्या असतानाही प्रेताला खांद्यावरूनच घेऊन जायचे असा आग्रह काही जुन्या मंडळींनी धरला. आमच्यातल्या काही तरुण मंडळींनी त्याला विरोध दर्शवला. रूढी, परंपरांचे गारुड या लोकांच्या मनात एवढे रुजले आहे की त्यांनी ऐकायला नकार दिला. 

त्यांच्यातल्याच एका ज्येष्ठाने नंतर समजावून सांगितले. 

"अरे जग कुठे चाललंय? तुम्ही कुठं अडकून बसलात? जरा विचार करा?"

आसपासच्या एक दोन गावांतही असेच होते. ते गावकरी शहाणे झाले. त्यांनी एक रथच बनवून घेतला. त्याचं नावही "स्वर्गरथ" असे ठेवले. गावातल्या कुठल्याही घरात मयत झाले की अंतिम यात्रा या रथातून काढली जाते. सगळ्यांचाच त्रास वाचतो, सोय होते. 

आपलाच हेका लावून धरणाऱ्या ह्या जुन्या मंडळींनी अखेरीस ऐकले नाहीच.  सकाळी दहाच्या आसपास अंत्ययात्रा सुरु झाली. म्हातारी मंडळी, गुडघे दुखणाऱ्या बायका, लहान मुले यांची रवानगी एका टेम्पोतून करण्यात आली. काही लोक स्वतःच्या गाड्यांनी गेले. गंमत अशी की प्रेताला खांद्यावर घेऊन जायचे असा आग्रह धरणाऱ्या आणि तरुण वर्गाचा विरोध मोडून काढणाऱ्या जुन्या मंडळींनी हळूच काढता पाय घेतला. आपापल्या दुचाकीवर बसून ते छू झाले. म्हणजे भर उन्हात अनवाणी चालणाऱ्या कुटुंबियांचे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खांदेकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. अगोदर जाऊन पोहोचलेल्या लोकांना पाऊण तास बसून रहावे लागले ते वेगळेच. 

प्रेताला स्मशानभूमीमध्ये आणले गेले. पुढची कार्यवाही करण्याअगोदर मरण पावलेल्या माणसाच्या मुलांनी आंघोळ करावी असा संकेत आहे. स्मशानभूमी देखील नदीच्या काठावरच होती. पण मुलांनी नदीमध्ये आंघोळ न करता पाईप लावून त्यातून पाणी अंगावर घेतले. इथे रूढी पाळल्या गेल्या नाहीत तेव्हा हीच मंडळी मूग गिळून गप्प होती. 

अंत्यविधी सुरु असताना आणि झाल्यानंतरही ही माणसे कशी गाडीवर पुढे निघून आली याच्या खुमासदार गप्पा उपस्थितांमध्ये रंगल्या होत्या. 

Thursday, January 11, 2018

कुल्फीए!!! खवेवालीए!!!!!

एक रुपया, दोन रुपये!!! कुल्फीए!!!!

एका विशिष्ट ठसक्यात आणि लयीत हा कुल्फीवाला जुन्नरच्या पेठांमधूनत फिरायचा..

बाहेरचं खाणं चांगलं नाही असं लहानपणापासूनच अंगी बाणवलेलं असल्याने कुल्फी खाण्याची वेळ फारदा आली नाही..पण एखाद्या दिवशी कुल्फीवाला घरासमोरून चालला की इच्छा होत असे..मग मी आईकडे हट्ट करे.. आई सहसा माझ्याकडे दुर्लक्ष करीत असे..पण माझी आत्या जर घरी असेल तर मात्र मला थोडीफार संधी मिळत असे..आत्याला थोडा मस्का मारला की ती,

"घे गं सुरेखा.. कुठं आपण रोज रोज घेतो कुल्फी." असे म्हणून आईला भरीस पाडत असे..

संधी साधून आत्या मला सांगे,

"जा बाब्या आपल्याला तिघांना कुल्फी घेऊन ये."

मी कुल्फी आणेपर्यंत मग आत्याने पैसे काढून ठेवलेले असत..

माझ्या लहानपणापासून ते अगदी कॉलेजच्या दिवसांपर्यंत जुन्नरला एक दोनच आईस्क्रीमवाले/कुल्फीवाले होते..वर उल्लेख केलेल्या कुल्फीवाल्याकडे  खवाकुल्फी मिळत असे..लोखंडी किंवा  ऍल्युमिनिअमच्या साच्यांमध्ये कुल्फीचे द्रव स्वरूपात असलेले मिश्रण टाकून तो साचा बर्फात ठेवायचा..आणि थोड्या वेळाने त्याची कुल्फी तयार होत असे..एक रुपया आणि दोन रुपये असे दोन दर असत.
नेहरुबाजारातून शंकरपुरा पेठेमार्गे लवाटे हॉस्पिटलच्या बाजूने हा कुल्फीवाला कल्याण पेठेत येई..त्याची ती सवयीची आरोळी डहाळ्यांच्या घरापासूनच ऐकू येई..

वर पत्र्याचे छप्पर असलेली हातगाडी, तिच्या मधोमध कुल्फीच्या साच्यांचे मोठे लाकडी खोके, त्याच्या बाजूला एका स्टीलच्या डब्यात कुल्फीचे द्रवरूपी मिश्रण,एका छोट्या डब्यामध्ये रिकामे साचे विसळण्यासाठी स्वछ पाणी, कुल्फीसाठी लागणाऱ्या बांबूच्या तासलेल्या काड्या आणि एका छोटया पेटीत गल्ला असा सगळा त्याचा सरंजाम असे..तो हातगाडीसुद्धा स्वछ ठेवत असे..साधा सदरा,पँट आणि डोक्यावर क्वचित मुसलमान लोक घालतात तशी टोपी असा त्याचा वेष असे..पायात सहसा स्लिपरच असे...

आमच्या घरासमोरून गेल्यावर हळूहळू तो आवटे शाळेपर्यंत जाई.. शाळा सुटायची वेळ त्याला अर्थातच माहीत असे..शाळा सुटली की त्या दिवसाचा बऱ्यापैकी गल्ला करून बहूधा घरी जात असावा..कुल्फीचासुद्धा सिझन असे..सिझन नसेल तेव्हा तो सहसा जुन्नरमध्ये न मिळणारी फणस,पेर असली फळे विके..बऱ्याचदा तो ही फळे घेऊन रविवारच्या बाजारात देखील बसे..

पण त्याची कुल्फी विकताना ओरडण्याची पद्धत फळे विकताना येत नसे..ती विशिष्ट आरोळी, विशिष्ट हेल आजही आठवतो..

आज कामानिमित्त वारजे परिसरात जाण्याचा योग आला तेव्हा असाच एक कुल्फीवाला दिसला आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..तुमच्याही लहानपणी असाच एखादा कुल्फीवाला होता का???

Thursday, November 30, 2017

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी

जेम्स बॉंड ट्यूनची कहाणी 

जेम्स बॉंडचा एकही चित्रपट पाहिला नाही असा माणूस सापडणे तसे अवघड आहे. आणि जेम्स बॉंडच्या चित्रपटाची ट्यून माहित नसलेला माणूस सापडणे त्याहूनही अवघड आहे. १९६२ साली डॉ. नो हा जेम्स बॉंड मालिकेतला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला वाजणारी ही ट्यून पन्नास वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. पण ह्या ट्यूनचे मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात आहे याची फार कमी लोकांना माहिती आहे. 

काय आहे ह्या ट्यूनच्या जन्माची कहाणी?

जेम्स बॉंडची जगप्रसिद्ध ट्यून ब्रिटिश संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांनी संगीतबद्ध केली आहे. जेम्स बॉंड चित्रपट मालिकेचे निर्माते अल्बर्ट ब्रॉकोली यांनी एक दिवस संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांना फोन करून बोलावून घेतले. ब्रॉकोली यांनी तेव्हा नुकतेच इयन फ्लेमिंग यांच्या प्रसिद्ध जेम्स बॉंड या कादंबरी संग्रहाचे हक्क विकत घेतले होते. या कादंबरी संग्रहावर आधारीत चित्रपटांची मालिका काढण्याचा त्यांचा मानस होता. त्यातील पहिला चित्रपट डॉ.नो असणार होता. या चित्रपटासाठी संगीत द्यायला तुला आवडेल का असा प्रश्न ब्रॉकोली यांनी नॉर्मन यांना विचारला. तोपर्यंत नॉर्मन यांनी जेम्स बॉंडच्या रहस्य कथांबद्दल फक्त ऐकले होते. 

मग चित्रपटाचे दुसरे निर्माते हॅरी साल्ट्समन यांनी नॉर्मन यांना सहकुटूंब चित्रपटाचे शूटिंग सुरु असलेल्या जमैकाला येण्याचे निमंत्रण दिले. नॉर्मन यांना नकार देणे अवघड होते. नॉर्मन जमैकाला गेलेसुद्धा. चित्रपटाची कथा त्यांच्या हातात पडली आणि त्यांनी संगीतावर काम करायला सुरुवात केली. नॉर्मन त्यावेळेस ज्युलियन मूर यांच्याबरोबर नोबेल पारितोषिक विजेते लेखक सर व्ही.एस. नायपॉल यांच्या हाऊस ऑफ मिस्टर बिस्वास या गाजलेल्या कादंबरीवर आधारित एका संगीतपटावर काम करत होते. त्याच्या एका ट्यूनमध्ये त्यांनी विविध भारतीय वाद्यांचा उपयोग केला होता. हा संगीतपट पुढे कधी प्रदर्शित झालाच नाही. नॉर्मन यांनी मग आपल्या जुन्या ट्यून्समधून ही ट्यून शोधून काढली. त्याचे शब्द असे होते. 

“I was born with this unlucky sneeze.
“And what is worse I came into the world the wrong way round.
“Pundits all agree that I am the reason why my father fell into the village pond and drowned."
ह्याच ट्यूनमध्ये थोडासा बदल करून त्यांनी जेम्स बॉंडची प्रसिद्ध ट्यून बनवली. चित्रपट निर्मात्यांना देखील ती आवडली. त्यांनी लगेचच जॉन बॅरी या एका तरुण संगीतकाराला निमंत्रित करून हि ट्यून त्याच्याकडून पुन्हा अरेंज करून घेतली. आणि ह्या ट्यूनने नंतर इतिहास घडवला. जेम्स बॉंडचा चित्रपट आणि ही ट्यून हे जणू समीकरणच बनले. जॉन बॅरी यानेच ही धून संगीतबद्ध केली असे अनेकांना वाटत राहीले पण खरे संगीतकार मात्र नॉर्मन हेच होते. पुढे बॅरी यांनी हि धून आपणच लिहिली असा दावादेखील केला. पण अखेरीस कायद्याने नॉर्मन यांनाच न्याय दिला. 
मराठी चित्रपट अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी काही दिवसापूर्वी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला होता. दाक्षिणात्य अभिनेते अजित यांनी हा व्हिडीओ अतुल कुलकर्णींना पाठवल्याचं त्यांनी नमूद केले आहे. हा व्हिडीओ इंग्रजीमध्ये आहे म्हणून त्या कहाणीचा मराठी स्वैर अनुवाद करायचा हा खटाटोप. सदर व्हिडीओची युट्यूब लिंक सोबत देत आहे. 

Tuesday, November 7, 2017

मी सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. जुन्नरमध्ये 'कलोपासक' म्हणून एक संस्था होती. ते लोक विविध नामवंत कलाकारांना जुन्नरमध्ये आणून त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असत. अशाच एका कार्यक्रमासाठी प्रसिद्ध संगीतकार राम कदम हे जुन्नरमध्ये आले होते.

राम कदम हे त्यांच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या गाण्यांना शिट्ट्या हमखास पडत. कार्यक्रम रंगात येऊ लागला तसं लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. मी नुकताच शिट्टी वाजवायला शिकलो होतो. मग इतरांकडे बघून मलाही हुक्की आली आणि मीही शिट्टी वाजवू लागलो. नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला आपण जोरात शिट्टी वाजवू शकतो याची मजा वाटली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. पहिला तास पार पडला. दुसरा तास सुरू झाला.

"गुंड उभा रहा." वर्गात येताच बाईंनी माझ्याकडे बघत आज्ञा केली. (माझ्या संपूर्ण शालेय जीवनात फक्त एक किंवा दोन शिक्षकांनी मला माझ्या नावाने हाक मारली असेल. बाकी सगळे गुंडच म्हणत. असो)

मी गोंधळतच उभा राहिलो. आल्या आल्या बाईंनी आपल्याला का उभं केलंय हे प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं.

"तुझ्यासारख्या मुलाकडून अशी अपेक्षा नव्हती."

"मी काय केलं बाई?" अजूनही काही न कळलेला मी विचारता झालो.

"अरे तूच मला विचारतोस? नीट विचार करून बघ." इति बाई..

मी पुन्हा आपला ढिम्म उभा.

"कालच्या कार्यक्रमात तू शिट्ट्या वाजवत होतास. सबंध कार्यकम संपेपर्यंत तुझा थिल्लरपणा सुरू होता."

मग माझी ट्यूब पेटली. कलोपासकच्या कार्यक्रमांचे व्हिडीओ शुटींग होत असे.कार्यक्रम संपल्यानंतर केबल ऑपरेटर ती कॅसेट केबलवर लावत असे. शूटिंग करणाऱ्या माणसाने नेमका मी शिट्टी वाजवत असताना कॅमेरा माझ्यावर फोकस केला होता. त्यामुळे माझी शिट्टी वाजवण्याची कला सबंध जुन्नर शहराला दिसली होती. आणि नेमकं तेच माझ्यावर शेकलं होतं. याच बाईंनी तास संपल्यानंतर मला शिक्षक खोलीमध्ये बोलवून सगळ्या शिक्षकांसमोर माझी खरडपट्टी काढली.

तसं पहायला गेलं तर मी मजा म्हणून शिट्टी वाजवीत होतो. त्याचा असा काही परीणाम होईल हे माझ्या गावीही नव्हते. आपल्याला शिट्टी वाजवता आली पाहिजे असा साधा विचार माझ्या डोक्यात होता. आणि नुकत्याच शिट्टी वाजवायला शिकलेल्या मला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शिकलेले कसब आजमावयाची संधी मिळाली होती. शिक्षक खोलीतून बाहेर पडताना एका शिक्षकांनी, "एवढंच ना!" असं म्हणून हसल्याचंही मला आठवतंय.

बाकी शिट्टी मात्र वाजवता आलीच पाहिजे अशा मताचा मी आहे. ती एक कला आहे असं मला वाटतं. माझा एक मित्र सोनू माळवे एका बोटाने सुद्धा शिट्टी वाजवीत असे. काही लोक तर बोटांचा वापर न करतादेखील जोरात शिट्टी वाजवतात. आजकालच्या पोरांना शिट्टी वाजव म्हटलं तर खुशाल 'मला नाही येत' म्हणून मोकळे होतात. या शिट्टी वाजविण्यामुळे अजून मी अजून एका कचाट्यात सापडलो होतो. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.