Thursday, October 13, 2016

मधुचा उपास

"कॉलेजला असताना जसे बिकट प्रसंग आले तशाच काही गमती देखील घडल्या. वाघ काकांची एक गम्मत तुला सांगतो", म्हणून दादा बोलू लागले. 

"मी नुकताच घरून जाऊन आलो होतो. मंचरला येताना बाबांनी मला डालड्याच्या रिकाम्या डब्यात एक किलो साखर भरून दिली होती. मुळात एवढी साखर कोण खाणार, एवढ्या साखरेचं करायचं काय हाही प्रश्नच होता. नेमकी त्याचवेळेस गोकुळाष्टमी आली. मधु महानुभाव पंथाचा असल्याने त्याने उपास धरला. आम्ही त्याला समजवायचा प्रयत्न केला, "अरे मधू आपल्याकडं उपासाचं खायला काही नाही. उपास धरू नको." 

पण मधू पडला कट्टर. त्याने आमचं न ऐकता उपास धरला. दिवस जसजसा वर येत राहिला तशी भूक मधुचं आतडं कुरतडत राहिली. त्याला काही सुचानां. खायला तर काही नाही, काय करावं? 

तितक्यात भिवसेन त्याला म्हणाला, "बाळू, गोपाकडं साखर आहे बुआ. साखर खातो का? उपासाला चालती साखर." (भिवसेन कधीकधी मधूला प्रेमाने बाळू म्हणत असे.)

ते ऐकून मधू मला म्हणाला, "ए गोपा, दे रे तो डबा."

मी त्याला डबा दिला आणि मधुनी साखर खायला सुरुवात केली. आता साखर खाऊन काही पोट भरणार नाही हेही आमच्या लक्षात आलं नाही. मधू जे सुटला तो एकदम डबा रिकामा करूनच थांबला. पण भूक काही शमली नाही. 

आज आम्हाला हसू येतं. पण त्या वेळेला आम्हीसुद्धा काळजीने त्याला विचारलं, "मधू आता मस्त झालं ना काम?"

मधू म्हणाला, "नाय रे. कसलं काय. भूक नाहीच गेली."

अशी ही मधुच्या उपासाची गोष्ट आम्हाला कायम सोबतीला राहिली. 

Tuesday, October 11, 2016

वाचाल तर वाचाल


"अजाब तसा चांगल्या घरचा होता. दर रविवारी त्याचा भाऊ त्याच्यासाठी एक तांब्या भरून तूप घेऊन यायचा. गावात नेऊन त्याला रवा घेऊन द्यायचा आणि अजाब रोज शिरा करून खायचा. शिवाय त्याला घरून रोज डबासुद्धा यायचा. तो आमच्याकडं पाठ करून जेवायचा. आम्हाला जेवायला रोज एकच मेनू. पिठलं आणि भाकरी. अर्थात आपल्याला शिरा खायला मिळत नाही याचं आम्हाला कधी वाईट वाटलं नाही. पण त्याची जी वृत्ती होती त्याचा आम्हाला संताप येत असे. बरं तोसुद्धा गप्प बसत नसे. येताजाता काहीतरी टोमणा मारत असे."

गेले काही दिवस कसल्या ना कसल्या कारणाने लिहायला जमले नाही. बऱ्याच जणांनी पुढचा लेख कधी येणार अशी चौकशी केली. उशीर झाल्याबद्दल माफी. 

आज पुन्हा एकदा दादांबरोबर गप्पा मारायला बसलो. नेहमीप्रमाणे दादा बोलू लागले. 

"मंचरला त्या काळी पाणी टंचाई असे. हॉटेलवाले, व्यापारी वगैरे पाणी विकत घ्यायचे. एखादी स्त्री किंवा पुरुष त्यांच्याकडे ठरल्याप्रमाणे हांडे आणून टाकायचे आणि त्याच्या मोबदल्यात व्यापारी त्यांना पैसे देत. आमच्याकडं प्रश्न मोठा होता. घरच्यांनी शिकायला तर पाठवलं पण पैशाची चैन कधीच नव्हती. पाणी ही बाब तर निकडीची. बर घरात नळ वगैरे असले प्रकार तोपर्यंत शोधले जायचे होते. आमच्या खोलीमध्ये पाणी हा विषय नाजूक होता. खाली टँकर आला की मडकं घेऊन खाली जायचं आणि ते भरून घेऊन परत वर यायचं असा आमचा कार्यक्रम असे. एक दिवस मी मडकं भरायला गेलो. वरच्या काठाला धरून टँकर खाली लावलं. पाण्याच्या जोराने वरचा काठ माझ्या हातातच राहिला आणि खालचा भाग खाली गाळून पडला. मडकं पण गेलं आणि ते भरण्यासाठी दिलेले १० पैसे सुद्धा गेले. आता करायचं काय हा प्रश्न आमच्यापुढे आला. मग कोणाकडून तरी पैसे उसने घेऊन नवीन मडकं आणलं आणि आमचा संसार पुन्हा सुरु झाला. 

आज याचं फारसं कौतुक वाटत नाही. पण मुळात १० पैशाला एक हंडा पाणी हेच आम्हाला खूप महाग वाटे. मग हा १० पैशाचा खर्च काहीतरी करून कमी केला पाहिजे असं आम्ही ठरवलं. घरापासून एक दीड किलोमीटरवर एक विहीर होती. तिथे आम्ही सगळे आंघोळीला जात असू. मग आंघोळ झाली की घरी येताना बादली भरून घेऊन यायची. जड झालं की दुसऱ्याच्या हातात द्यायची. त्यामुळे पाणी जवळजवळ फुकट आल्यासारखं झालं. 

पण थोड्याच दिवसात एक नवी डोकेदुखी सुरु झाली. पाणी घेऊन आलं की आमचाच एक रूममेट रोज त्यासाठी टपून बसलेला असायचा. बबन अजाब त्याचं नाव. तो सुद्धा आंघोळीला विहिरीवर जायचा. पण येताना फक्त एक तांब्या भरून घेऊन यायचा. आणि तो संपला की आम्ही भरून आणलेल्या हंड्यातून पाणी घ्यायचा. त्याला हटकलं की, "मला काय आपला एक तांब्या. एका तांब्याने तुम्हाला काय फरक पडतो." असं म्हणून हसायचा. आमचा संताप व्हायचा पण त्याला बोलणार कोण हाही प्रश्न होताच. उगाच वाद नको असा दृष्टीकोन असणारे आम्ही लोक. आम्ही दुर्लक्ष केलं. 

एक दिवस दुपारी मी असाच पडलो होतो. भिवसेन (दादांचे अतिशय जवळचे मित्र. यांना आम्ही लोखंडे मामा म्हणतो.) आणि मधूची (वाघकाका - हे नंतर याच मंचर कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.) नेहमीप्रमाणे अजाब बरोबर काहीतरी वादावादी चालू होती. तो त्यांना डिवचत होता. तुमचं काय कॉमर्सच? डेबिट, क्रेडिट बावळटसारखं. या दोघांना काही नीट बोलता येईना. कॉमर्सची बाजू मांडता येईना. यांची अशी अवस्था पाहून त्याला अजून चेव येई. 

तो विचारी, " सांगा बरं शिवाजीचा जन्म कुठं झाला?"
हे म्हणत, "शिवनेरी."
मग तो म्हणे, "ह्या ते तर काय कोणीही सांगतंय. मला सांगा नेपोलियनला कोणत्या बेटावर कैदेत ठेवलं होतं?"
ह्या दोघांची डोकी फिरली. ते पाहून तो हसायचा, हातवारे करायचा. 
"वाघ, बोल की. हाये का तुमच्याकडं काही?"
मी पडलेला पाहून भिवसेनने मला उठवलं, "ए उठ. हा बब्या काय म्हणतो बघ." कारण त्याला बबन अशी हाक मारावी असं आम्हाला कधी वाटलंच नाही. 
मी उठून विचारलं, "हं काय?"
भिवसेन म्हणाला, "अरे त्या नेपोलियनला कुठल्या बेटावर कैदेत ठेवला होता?"

योगायोगाने मी नुकतंच नेपोलियनचं पुस्तक वाचलं होतं. मी लगेच म्हटलं, "सेंट हेलेना." अजाबकडे पाहिलं तर त्याच्या पापण्या पडलेल्या. माझं उत्तर ऐकून भिवसेनला चेव चढला. माझ्या पाठीवर थाप मारून भिवसेन म्हणाला, "अरे माझ्या वाघा. बब्या बोल तुझं काय म्हणणंय."

माझ्या पाठीवर आनंदाने अजून एक थाप मारून भिवसेन म्हणाला, " हे रे वाघ. च्यायला याला गप्प केला तू."

या प्रसंगानंतर मात्र आमचा आत्मविश्वास वाढला. अजाबच्या अरेला आम्ही कारे म्हणू लागलो. ती एक सवय होऊन गेली.

प्रसंग तसा छोटा पण केवळ वाचनाने मला हात दिला. आणि त्यामुळे एक प्रश्न कायमचा मिटला. वाचत रहा हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो ते याच कारणासाठी. "

Sunday, August 14, 2016

चौदा आण्याची गोष्ट


दादांशी कॉलेजच्या गप्पा मारताना मग त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी सांगा असा आग्रह मी केला. दादासुद्धा तयार झाले. जमेल तसा एकेक किस्सा त्यांनी सांगितला. त्यातलाच एक आज इथे मांडतोय. नेहमीप्रमाणे दादा सांगू लागले. 

" आता १०० पैशाचा रुपया होतो. आमच्या वेळेस ६४ पैशाचा किंवा १६ आण्याचा रुपया होई . २ आण्यांची चवली , ४ आण्यांची पावली तर ८ आण्यांची अधेली होत असे. अर्थात मला सांगायची गोष्ट वेगळीच आहे. एकदा भोरमामा (दादांचे मामा) थोरांदळ्याला आले होते. मामा भेटले की आम्हाला फार बरे वाटत असे. त्यांचे ते उजळ कपडे, तलम धोतर, अंगात कबजा (एक प्रकारचे जॅकेट) असा त्यांचा थाट असे. आले की प्रत्येक वेळी आम्हाला ते पैसे देत असत. कबजाच्या खिशात हात घालून ते पसाभर नाणी काढत तेव्हा आमचे डोळे विस्फारत असत. त्या भेटीमध्ये मामांनी आम्हा भावंडांना एक आख्खा रुपया दिला. अर्थात देताना त्यांनी तो बाईच्या (दादांची मोठी बहीण - तिला सगळे बाईच म्हणतात) हातात दिला. त्या रुपयातून बाईने दोन आण्याचा खाऊ घेतला. काय ते आता मला आठवत नाही पण तेव्हा एक पैशाला पाच गोळ्या मिळत - रेषारेषांच्या. उरलेल्या चौदा आण्यांची (आताचे ८७ पैसे) बाईने पुरचुंडी बांधली आणि आम्ही दोघं कुमजाईत (गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या मळ्याचे नाव) रताळी खणायला गेलो. रताळी खणत असताना बाईने पैशाची पुरचुंडी माझ्याकडे दिली. बाई रताळी खणायची आणि मी गोळा करायचो. एक वाफा खणून झाला आणि बाई दमली. थोडी बसली आणि नंतर रताळ्यांचे ते घमेलं उचलून आम्ही परत घरी निघालो. घमेलं अर्थात तिच्या डोक्यावर. ती मोठी होती ना!! प्रत्येक वेळी बिचारीला ते मोठेपण असे वहावे लागे. 

बरेच अंतर गेल्यावर तिने मला पैशाबद्दल विचारले आणि मी हादरलो. माझ्याकडून पुरचुंडी कुठेतरी हरवली होती. पण बाई आता मारते की काय अशी भीती मला मुळीच वाटली नाही. आम्हा सगळ्या भावंडांना बाईची भीती कधीच वाटली नाही. उलट तिचा फार मोठा आधार वाटे. अजूनही वाटतो. पण आता ती किंचितही खटटू झाली तर मात्र भीती वाटते. 

आम्ही दोघंही शेताच्या दिशेने पळत निघालो. आधीच खणलेला वाफा बाईने परत एकदा सगळा खणला. अखेरीस चौदा आणे सापडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. चौदा आणे नव्हे तर आमच्यासाठी त्यावेळेस ते ब्रह्मांडच होते जणू. दोघंही खुश झालो आणि घरी परतलो. आजही चौदा आण्याची गोष्ट आठवली की बाई आणि माझे डोळे पाणावतात. चौदा आण्याला आज काहीच किंमत नाही पण त्यावेळेस त्याला किती किंमत होती हे आमचे आम्हीच जाणोत. अशा छोट्या छोट्या प्रसंगांनी आम्हा भावंडांना खूप काही शिकवले. खासकरून माझे आणि बाईचे भावाबहिणीचे नाते अजूनच घट्ट केले."

आदित्य 

Saturday, August 6, 2016

अमेरिकेतील काही आठवणी

२००९ च्या ऑगस्ट महिन्याच्या २ तारखेला मुबईहून अटलांटाला जाणाऱ्या विमानात मी बसलो. आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास होता. तोही एकदम अमेरिकेत. घरच्यांना थोडी काळजी होतीच. साधारणपणे १७ तासांच्या सलग प्रवासानंतर मी अटलांटा विमानतळावर पोहोचलो. तिथून मग पुढची अजून एक फ्लाईट पकडून फायनली कॅन्सस सिटीच्या विमानतळावर पोहोचलो. 

मॅनहॅटन नावाच्या छोट्या गावामध्ये माझी युनिव्हर्सिटी होती. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी. जुन्नरहून मी पुण्याला आलो होतो.पुण्यात ५ वर्षे काढली. आणि आता एकदम मॅनहॅटन सारख्या छोट्या गावात येऊन पडलो. पुढची २ वर्षे आपल्याला इथेच काढायची आहेत हि खूणगाठ मनाशी बांधली. माझ्या अनेक मित्रांना मी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन मध्ये राहतो असे वाटत असे. मीही त्यांना फारसं स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडत नसे. 

मॅनहॅटन तसं फारच छोटं गाव. कॅन्सस या राज्यामध्ये कॅन्सस आणि बिग ब्लु या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं. लोकसंख्या साधारण लाखभर पण त्यातले बहुसंख्य विद्यार्थी. अशा ठिकाणी दोन वर्षे काढायची म्हणजे तसं अवघड होतं. इथे विद्यार्थी म्हणून आलेले किंवा अमेरिकेत विद्यार्थी म्हणून जवळपास सगळ्यांना येणारे काही अनुभव इथे सांगावेसे वाटतात. 

१. सुरुवातीच्या १-२ महिन्यात आपण विकत घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या किमतीला आपण ६५ (सध्याचा डॉलर रेट) ने गुणतो. आणि मग अरे नको फार महाग आहे म्हणून परत ठेवून देतो. मला आठवतंय पॅराशूट तेलाची छोटी बाटली ३.५ डॉलरला होती. केवळ महाग आहे म्हणून मी टी घेतली नव्हती. अर्थात एखाद महिन्यानंतर सवय होते आणि डॉलरमध्ये विचार करायला लागतो आपण. 

२. विद्यार्थी म्हणून किंवा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडून ऑनसाईट आलेला असाल तरी प्रत्येकाला स्वयंपाक हा करावाच लागतो. नसेल येत तर मग भांडी घासायची तयारी असली पाहिजे. सुरुवातीला जरी अशी तयारी असली तरी काही दिवसांनी भांडी घासायचा खरोखर कंटाळा येतो. मी स्वतः स्वयंपाक करायला शिकण्याआधी ४-५ महिने फक्त भांडी घासत होतो. आता वाटतं स्वयंपाक करायला शिकून चूक काही केली नाही. 

३. कॅन्सस हे राज्य अमेरिकेमध्ये मिडवेस्ट पट्ट्यात येते. आपल्याकडे जसे कोकणपट्टा, विदर्भ, मराठवाडा असे विभाग आहेत तसेच अमेरिकेतसुद्धा आहेत. या देशात तर वेगवेगळे टाईम  झोन आहेत. मग त्यात ईस्टर्न टाईम, सेंट्रल टाईम, माऊंटन टाईम असे प्रकार आहेत. सांगायचा मुद्दा हा या मिडवेस्ट प्रातांतले लोक मला फार मनमिळाऊ वाटले. रस्त्यावरून जाताना कोणी दिसलं तर ओळख असो नसो ते तुमच्याकडे पाहून हसणार. "Hey, How are you doing?" असं विचारून तुमच्या उत्तराची वाट ना पाहता पुढे चालू लागणार. या सगळ्याचं सुरुवातीला आश्चर्य वाटलं मला. मग सिनियरला विचारलं तेव्हा त्याने काय नक्की फंडा आहे ते समजावून सांगितलं. 

४. लोकांना भारताबद्दल प्रचंड उत्सुकता असते. दिल्लीमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे नाही तर एक चांगला देश म्हणून भारताकडे बघणारे लोक जास्त आहेत. अशा वेळेस किंवा भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत साजरा करताना आपण भारतीय असल्याचा फार अभिमान वाटतो. 

५. आपले सण साजरे करायला मजा येते. बऱ्याच ठिकाणी दिवाळी, नवरात्री हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. पण नेमकं त्याच दरम्यान घरच्यांशी स्काईपवॉर कॉल होतो आणि घरची आठवण मन अस्वस्थ करते. 


६. तुमचा लॅपटॉप हा तुमची लाईफलाईन असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. लोक अक्षरशः त्यांच्या लॅपटॉप बरोबर झोपतात. सकाळी उठल्याबरोबर लॅपटॉप उघडून इमेल, फेसबुक, बातम्या चेक करतात आणि मग दिवस सुरु होतो. अलीकडे लॅपटॉपची जागा आयपॅडने घेतलेली दिसते. 

७. आपण स्वतः दुसऱ्या देशातून अमेरिकेत शिकायला आलेलो असल्याने, बाकी कोणकोणत्या देशातून इथे विद्यार्थी येतात याची आपोआपच माहिती होते. प्रत्येक देशाच्या विद्यार्थ्यांची एक ऑरगनायझेशन असते. बऱ्याचदा तुम्ही इतर देशांच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांना जाऊन बसता. 


८. जगात कुठेही गेला तरी भारतीय माणूस क्रिकेट खेळल्यावाचून राहू शकत नाही. मग अगदी घरातल्या छोट्याश्या जागेत का होईना क्रिकेट खेळायला मार्ग शोधला जातो. मोठ्या शहरांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान असे सामने देखील होतात. बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळायला बेसबॉलच्या मैदानाचा वापर केला जातो. २०११ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला तेव्हा केलेला जल्लोष अजूनही आठवतो मला. 

९. अमेरिकेत आलात म्हटल्यावर अमेरिकन लोकांच्या आवडीनिवडी कळणारच. अमेरिकन फुटबॉल हि त्यातलीच एक गोष्ट. अमेरिकन फुटबॉल न आवडणारा अमेरिकन माणूस शोधावा लागेल इतका हा खेळ इथे लोकप्रिय आहे. एखाद्या अमेरिकन माणसाबरोबर संवाद साधण्यासाठी अमेरिकन फुटबॉलचा ice breaker म्हणून छान वापर करता येतो. 

माझा मॅनेजर हा एक फुटबॉल खेळाडू होता. मग त्याचे लक्ष कामावरून जरा दुसरीकडे करण्यासाठी मी आणि माझा सहकारी फुटबॉलबद्दल बोलत असू. आपसूकच तो आमच्या चर्चेमध्ये सामील होत असे. 

१०. विद्यार्थी असताना उन्हाळे अतिशय आळसावलेले असतात. कॉलेजला सुट्टी असते. रिसर्चचं काम असलं तरी समर असल्याने तुमचा प्रोफेसरसुद्धा थोडी सूट देतो तुम्हाला. याच दिवसांमध्ये मग बरंच फिरणं होतं. बरेच चित्रपट, मालिकांचे एपिसोडच्या एपिसोड एकामागोमाग एक पहिले जातात. त्याबद्दल मग मित्रांमध्ये शेखी मिरवली जाते की मी अमुक एक सिरीजचे अमुक सीझन्स एका रात्रीत संपवले आणि अजून काय काय. 

११. ट्रॅफिकचे नियम पाळण्यावाचून पर्याय नसतो. इथल्यासारखी चिरीमिरी देऊन प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होऊन तुरुंगाची हवा खाण्याची वेळीसुद्धा येऊ शकते. बर नियम मोडल्यानंतर भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम प्रचंड असते त्यामुळे तसं न केलेलं जास्त शहाणपणाचं ठरतं. 

१२. अमेरिकेत गाडी चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची पद्धत आहे. पादचारी रस्ता क्रॉस करत असतील तर वाहने थांबून राहतात. भारतात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस असं केल्याबद्दल मी शिव्या खाल्ल्या आहेत. 

१३. तुम्ही थँक यु म्हणायला शिकता. अमेरिकेत शिकलेली  ही एक फार चांगली गोष्ट. येता जाता तुम्ही तुमच्यासाठी एखाद्याने केलेल्या छोट्या गोष्टीसाठीसुद्धा मनापासून थँक यु म्हणता. समोरच्याला सुद्धा बरं वाटतं. 

१४. अमेरिकेतील सेल हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. इथे लेबर डे, ब्लॅक फ्रायडे, ख्रिसमस अशा प्रसंगी मोठे सेल लागतात, या सगळ्यांत ब्लॅक फ्रायडेचा सेल सगळ्यात जास्त प्रसिद्ध. तो यासाठी की या सेलसाठी लोक १-२ दिवस आधीच रांगा लावायला सुरुवात करतात. यात फक्त आपलेच नाही तर अमेरिकन लोकसुद्धा असतात. बरं एकदा रांग लागली के ती शिस्त मात्र कोणी मोडत नाही. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी अगदी कचऱ्याच्या भावात मिळतात असं म्हटलं तरी चालेल. मग घरी येऊन भारतामध्ये असे सेल होणं कसं शक्य नाही वगैरे गप्पा मित्रांबरोबर मारल्या जातात. 

१५. वडा पाव, पाणीपुरी, भेळ असे रस्त्यावर मिळणारे पदार्थ अचानक दुर्मिळ होतात. आणि मग भारतीय जेवण कसं जगातलं भारी जेवण आहे यावर चर्चा झोडल्या जातात. 


१६. परीक्षांमध्ये कॉपी करण्याचा विचारसुद्धा तुमच्या मनाला शिवत नाही. कारण होणारे परीणाम खूप गंभीर असतात. चंबूगबाळ उचलून देशात परत येण्याची वेळ येऊ शकते. बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेस वर्गात पर्यवेक्षकदेखील नसतात. तरीही कोणी कॉपी करत नाही. आपल्याकडे हे कदापि शक्य नाही. 

१७. तुम्ही सहसा सगळे लेक्चर्स अटेंड करता. आपल्यासारखे प्रायव्हेट क्लासेस नाहीत तिकडे. त्यामुळे एकदा शिकवलेलं कळलं नाही तर होणारा त्रास जास्त असतो. 

१८. नकळतपणे तुमच्या इंग्लिश बोलण्याला अमेरिकन अक्सेंट येतो. आणि मग तुमचे भारतातले मित्र तुम्हाला तसे सांगतात आणि तुम्ही सतत ते नाकारत राहता. 

१९. तुम्ही भलेही मॅनुफॅक्चरिंग इंजिनियर असाल पण अमेरिकन लोकांसाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियरच असता. 


२०. भारतीय विद्यार्थी राहत असलेल्या प्रत्येक घराच्या टॉयलेटमध्ये एक मग असतो. आपल्याकडे टॉयलेट पेपर सहसा वापरला जात नाही म्हणून. 

मला खात्री आहे मी वर लिहिलेल्या मुद्द्यांशी अमेरिकेत शिकायला गेलेला प्रत्येक विद्यार्थी सहमत असेल . या यादीमध्ये अजूनही काही गोष्टी मी ऍड करत राहीन. सध्या थांबतो

Friday, July 29, 2016

सडकेवर

दादांच्या कॉलेजचा प्रसंग वाचल्यानंतर बऱ्याच जणांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. पुढे लिही असं प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी. त्यातून मग पुढचा प्रसंग लिहावा असा विचार मनात आला. दादांकडून तो विचारून घेतला. एक दिवस संध्याकाळी बसलो दोघं जण आणि त्यांना म्हटलं बोला. दादा सांगू लागले. 

" पैशाची अडचण आल्याने सिडनहॅम कॉलेजला ऍडमिशन न घेता थोरांदळ्याला यायची वेळ आली. माझ्या नशिबाने त्याच वर्षी मंचरला कॉलेज सुरु झाले होते. मंचर कॉलेजला पुढच्या वर्षी जाऊ असा विचार होता डोक्यात. त्यासाठी पैसे जमवायला सडकंवर कामाला जाऊ लागलो. तिथं कामाची काय पद्धत आहे हे गेल्याशिवाय कळणार नव्हतं. एक दिवस भाकरी बांधुन गेलो. त्या कामावर त्या वेळेस वसंत पाटिल (ह्यांची आणि दादांची नंतर फार चांगली मैत्री झाली) मुकादम होते. ते म्हणाले, " आपल्याकडं काम कर तू." फार नंतर मग वसंत पाटिल मला आदरार्थी संबोधू लागले. 

मग काय मी कामाला सुरुवात केली. दुपारी सुट्टी झाली तेव्हा जेवलो आणि संध्याकाळी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत आलो कामावर. कामावरच्या आया बायांनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, " ए बाळा तू आजयं आला रं?"
मला प्रश्न पडला की त्यांना कसं सांगायचं. वेळ मारून न्यायला मी म्हटलं, " आलोय असाच. सुट्टीये मंग करावं काम म्हटलं."
"बरं कर कर कर!!" असं त्या म्हणाल्या. नाही म्हटलं तरी माझ्याविषयी सहानुभूती होती. माझी आई गेली होती आणि शाळेतही  थोडा चांगला होतो मी. त्यामुळे लोक थोड्या प्रेमाने वागवायचे मला. कामावर असताना मग घमेलं भरताना त्यात दोन खोरी कमी टाकणार, धावपळीच्या ठिकाणी मला ठेवणार नाहीत हे असं सहकार्य मला मिळत राहिलं. 


दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत पोटात भुकेची आग पेटलेली असायची. जवळ कुठे सावली नसायची.आम्ही सगळे एका पानं गळून पडलेल्या बाभळीच्या झाडाला आमची डब्याची गाठोडी बांधत असू. त्या वेळेस कसले स्टीलचे डबे आले. एका फडक्यात भाकरी आणि चटणी बांधून मी नेत असे. उन्हात कोळून भाकरी पार कडक होऊन जाई. मग ताकद लावायची आणि चुरायची पितळीमध्ये. कालवण घेतलं की वाळलेली भाकरी ते पटकन शोषून घ्यायची. मग दुसऱ्या कोणाचं तरी घ्यायचं आणि पुन्हा जेवायला सुरुवात. एक पितळी सहज जायची. 


जेवायच्या वेळेपर्यंत धुळीतच काम केलेलं असायचं. ती धूळ सगळी पायावर साचत असे. त्या वेळेस पाण्याचा सुद्धा प्रचंड तुटवडा असे. मग कसलं पाय धुणं आणि कसलं काय. तसंच आम्ही जेवायला बसत असू. मांडी घालून बसलं की पोटरी आणि मांडीच्या मध्ये घाम यायचा. आणि घाम आलाय हे कळायचं पण त्याचं काही वाटत नसे. उठून उभं राहिलं की पोटरी आणि मांडीला एक त्रिकोणी पट्टा येई. तो सुकला की आधीच पायावर असलेल्या धुळीने बुरशी आल्यासारखं दिसत असे. पण त्याचं काही वाटत नसे. संध्याकाळी घरी गेल्यावर हात पाय धुवेपर्यंत एखादा दागिना मिरवावा असा तो त्रिकोणी पट्टा लोक मिरवत असत. 


या कामावर असताना साहेब कधी येतो याची सगळे वाट पाहायचे. का?? तर तो आला की आपण त्याला काम  करताना दिसलं पाहिजे. नाहीतर काम जाईल याची भीती असायची. हजेरीवाला माणूस लक्ष ठेवायचा आणि काम नाही केलं की खाडा मांडीन अशी धमकी द्यायचा. तो आपल्याकडून जास्त काम करून घेतोय हे लवकरच लक्षात आलं माझ्या आणि त्याचा उलगडा पगाराच्या दिवशी झाला. पगाराच्या दिवशी भलतीच ४-५ माणसं येऊन रांगेला ऊभी राहिली. आमच्या अगोदर त्यांची नावं पुकारली गेली. इतर कोणी काही बोलत नसे. पण मी थोडा शिकलेला असल्याने मला उत्सुकता होती. त्यांनी आपापले पैसे घेतले आणि बाजूला जाऊन साहेबाला त्याचा वाटा काढून दिला. आणि गायब झाले. कामाला २० माणसं असायची पण हजेरीपटावर ३० लोकांची नावं यायची. नंतर कधीतरी त्या साहेबाला नोकरीवरून काढून टाकल्याचं मला कळलं.

या कामादरम्यान एक दिवस मी रांजणीला रेशनची साखर आणायला गेलो. आणि आधीच्या प्रसंगामध्ये सांगितलेले मारुती भिमाजी भोर मला तिथे भेटले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं मंचर कॉलेजला ऍडमिशन झालं आणि मी काम सोडून दिलं. हे काम कष्टाचं होतं. घरी गरीबी होतीच पण कष्टाशिवाय पर्याय नाही हा धडा मात्र मला या कामावर मिळाला."

पुढचे कॉलेजचे प्रसंग आठवतील तसे तुला सांगत जाईन असं म्हणून दादा थांबले. 

Saturday, July 16, 2016

दादांचं कॉलेज

आज संध्याकाळी दादांबरोबर गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता पोर्शे इंडियाचा डायरेक्टर पवन शेट्टीचा विषय निघाला. मी - दिवसापूर्वी त्याच्याबद्दल वाचले होते. दादांना मी त्याच्या वाटचालीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजला एमबीए केल्याचं मी दादांना सांगितलं. ते ऐकून दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, "मी मध्येच तुला थांबवतोय पण हे ऐक."

मी त्यांना म्हटलं बोला. दादा बोलू लागले

"माझी अकरावी संपल्यानंतर मी मुंबईला गेलो. त्यावेळी दहावी नसायची. माझ्या डोक्यात मुंबईला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायची हा विचार होता. मुंबईमध्ये मी आपल्या गावच्या एका माणसाकडे राहायला होतो. मारुती खेबडे नाव त्याचं. फार भला माणूस होता. वेळ मिळेल तेव्हा मी त्याच्याशी बोलत असे. त्याने मला सांगितलं की तू सिडनहॅम कॉलेजला जा. मी माझी सगळी कागदपत्र घेऊन गेलो. त्यावेळेस पॅन्ट माहीतच नव्हती आम्हाला. पायजमा आणि शर्ट हाच आमचा वेष असे. त्याबद्दल लाजही वाटत नसे.  मी आपला जाऊन रांगेत उभा राहिलो. मला पायजमा आणि शर्टमध्ये पाहून आजूबाजूचे लोक आपसांत बोलू लागले. बर ते इंग्लिशमध्ये बोलत. मला कळायचं की हे आपल्याबद्दल बोलत आहेत. पण मला स्वतःला इंग्लिश बोलता येत नव्हते. मग आपला गप्प राहिलो. नंबर आल्यावर आतमध्ये गेलो. माझी कागदपत्रे टेबलावर बसलेल्या बाईच्या हातात दिली. मला ६८ टक्के होते. त्यावेळेस ते मार्क खूप असत. माझे मार्क पाहून तिने आश्चर्याने मान वर केली आणि म्हणाली, "अरे!! ६८ है तुझे. मिलेगा तुझे." मी तिला फी विचारली. फी ३०० रुपये होती. माझ्याकडे तेव्हा कसले बोंबलायला आले ३०० रुपये. मी तिला म्हटलं मी उद्या येतो आणि बाहेर पडलो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि म्हणाले, "बहोत अच्छा मार्क मिला है." १५ मिनिटांपूर्वी जे लोक मला हसत होते तेच आता माझ्याभोवती गराडा घालून माझं कौतुक करत होते. तेव्हा मला स्वतःचाच फार अभिमान वाटला. घरी येऊन मी खेबड्याला सांगितलं की ३०० रुपये फी आहे. खेबडे तेव्हा एका ऑफिसात शिपाई होते. त्याने त्याच्यापरीने प्रयत्न करून मला ६० रुपये गोळा करून दिले. पण ते पुरेसे नव्हते. मग काय.. मी आपला थोरांदळ्याला परत आलो आणि सडकंवर कामाला जायला लागलो. त्या कामाचे जे पैसे मिळतील त्या पैशातून पुढच्या वर्षी मंचर कॉलेजला जायचं असा विचार होता डोक्यातसडकेवरच्या कामाचा अनुभव तुला परत कधीतरी सांगेल.  

एक दिवस रेशनची साखर आणायला रांजणीला गेलो. रांगेत माझा नंबर आला. मी पुढं होऊन रेशनवाल्याच्या हातात कार्ड दिलं. त्याचं नाव मारुती भिमाजी भोरत्याने कार्ड घेतलं आणि लांब फेकून दिलं. मला कळाना काय झालं. लोकं म्हणाली अहो त्या पोराचा नंबर आहे. द्या की त्याला साखर. तो काय ऐकेना. वर लोकांना सांगत होता की तुम्ही आपली साखर घ्या आणि चालू पडा. सगळे लोक गेल्यावर त्याने मला विचारलं. "तुझं नाव काय रे?" 

मी नाव सांगितलं.

"तू आत्ता कुठं असायला पाहिजे?"

मी म्हटलं, "सडकंवर". 

"गप्प. कॉलेजला का जात नाही?"

मी -"पैसे नाय फी भरायला." 

"घरी कारभारी कोण आहे?"

मी - "चुलता"

"मी उद्या येणार आहे तुमच्या गावात. तिथं भेट मला."

बरं म्हणून मी आपला घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गावातल्या पारावर खेळत होतो. थोड्या वेळात मारुती भोर येताना दिसला मला. तो शाळेत गेला. पुढच्या  मिनिटांत मला गुरुजींनी बोलावलं आणि सांगितलं तुझ्या चुलत्याला बोलावून घे. मी पळत घरी आलो. दादांना सांगितलं गावात मारुती भिमाजी आलाय. त्याने तुम्हाला बोलावलंय. दादा लगेच निघाले. शाळेत आल्यावर मारुती भिमाजी त्यांना म्हणाला, "तुम्ही घरचे कारभारी का?" 

दादांनी होकारार्थी मान हलवली

"हा पोरगा कॉलेजला गेला पाहिजे."

हं म्हणून मी आणि दादा घरी निघालो. येताना दादांनी एक पोस्टकार्ड घेतलं. घरी येऊन ते कार्ड माझ्यासमोर टाकून म्हणाले, "लिही". 

ते सांगत गेले ते मी लिहीत गेलो. - दिवसांनी एक माणूस घरी आला आणि मला हाक मारली. मी जवळ गेल्यावर त्याने खिशातून शंभर रुपयांची नोट काढून मला दिली आणि म्हणाला, " हे घे आणि काय कुठं झक मारायची ती मार." मुंबईहून नानांनी (मुंबईचे चुलते) त्याच्याकडे ते शंभर रुपये पाठवले होते

ते पैसे घेऊन मी मंचर कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि माझं कॉलेज सुरू झालं. मध्ये मारुती भिमाजी गेले. मला मात्र ते कळलं नाही. नंतर कुणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मला फार वाईट वाटलं. अजूनही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा माणूस म्हणून मी त्याचा उल्लेख करतो."