Thursday, February 25, 2010

ब्लॉग लिहायला सुरुवात कर तू.. इति अद्वैत बोराटे..मी विचारात पडलो.च्यायला हा म्हणतोय खरं की तू लिही म्हणून, पण आपल्याला जमेल की नाही. शेवटी म्हटलं चला सुरूवात तर करु. पुढे काय व्हायचं ते होईल.पण काही दिवसांनी मी विचारात पडलो की बूवा लोक ब्लॉग का लिहीतात? बर तुमच्या ब्लॉगमध्ये काय काय लिहू शकता तुम्ही? की काहीही लिहीलं तरी चालतं?तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही अगदी वजनदार, अलंकारिक अशीच भाषा वापरणे बंधनकारक आहे का? साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहीलं तर चालत नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या मनाने शोधायचा प्रयत्न केला.बरं ही माझी वैयक्तिक मते आहेत. त्यामुळे काही जणांना ती पटणं मी गृहीत धरलेलं आहे.
माझ्या मते ब्लॉग हे तुमचे विचार मांडण्यासाठी असलेलं एक व्यासपीठ आहे.मग ते विचार काही का असेनात.तुमचे स्वतःचे राजकीय, क्रिडाविषयक, साहित्यिक,कलाक्षेत्रविषयक असलेले विचार तुम्ही इथे मांडू शकता. राजकीय नेते, त्यांच्या सध्याच्या हालचाली, एखादा नवीन चित्रपट किंवा एखादा तुम्हाला मनापासून आवडलेला जूना चित्रपट इथून ते थेट तुम्ही आजच्या दिवसात काय केलं इथपर्यंत सगळं काही तुम्ही लिहू शकता.(अगदी तुमचं पहिलं प्रेमसुद्धा :) आणि दुसरं असेल तर ते सुद्धा :) ). अर्थात हे तुम्ही लिहीलेलं सगळ्यांना आवडेलचं असंही नाही. काही लोकांना ते बरं वाटेल, काही लोक तुमची खिल्ली उडवतील, काही अगदी "हं ठिक आहे" असंही म्हणतील आणि काही लोकांना मात्र ते खरोखर आवडेल. मग तुम्ही स्वतः काय करणं अपेक्षित आहे? तर माझ्या मते तुम्हाला वाटतयं ना की आपण लिहूयात म्हणून, मग ते जरूर लिहा. इतर लोक काय म्हणतील? त्यांना ते आवडेल की नाही? ते लोक आपल्या लिखाणावर हसले तर काय?? या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नका.हे जरूर लक्षात असूद्यात की हे जे काही तुम्ही लिहीत आहात यातून तुम्हाला स्वतःला आनंद मिळतोय.मनातून कुठेतरी बरं वाटतयं.मग इतर लोकांची पर्वा का करावी? माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुमच्या ह्या लिहीण्याला एक ठराविक कालावधीनंतर ठराविक असा एक प्रेक्षकवर्ग लाभतो. आणि हेच लोक तुम्हाला मदत करत असतात.त्यांना तुमचं म्हणणं पटो अथवा पटो,हे लोक असे असतात की जे तुम्हाला सांगतात की अरे छान आहे बर का..किंवा अरे अजून छान होऊ शकतं हे,पुढच्यावेळेस प्रयत्न कर.आणि मला वाटतं लोकांनी हे एवढं बोललेलं पुरेसं असतं तुम्हाला.अगदी एका माणसाने जरी तुम्हाला म्हटलं ना की "अरे मी वाचतो बरं का तुझा ब्लॉग" तरी तुम्हाला फार बरं वाटतं. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.माझा हे लिहीणं आवडणारे लोक जसे आहेत तसेच माझ्या लिखाणाची अगदी जोरदार खिल्ली उडवणारे लोक पण आहेत.(योगायोग असा की दोघेही नाशिकमध्ये जन्मलेले आणि जोपासले गेलेले आहेत).पण म्हणून मी लिहीतो किंवा लिहीत नाही असं नाहीये.तर मला वाटतं म्हणून मी लिहीतो.आणि इथून पुढेसुद्धा लिहीत राहील.पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन परत येइल. तोपर्यंत राम राम.

Thursday, February 4, 2010

उत्तरायण

२००५ साली मराठीमध्ये एक चित्रपट आला होता. उत्तरायण नावाचा. त्या सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. साठीमध्ये असलेला रघु आणि दुर्गी हे बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर त्यांना एकमेकांबद्दल वाटू लागलेलं प्रेम आणि या वयात हे असं काही करायचं म्हणून दोघांच्याही मनात झालेला कलह याचं सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे. अलिकडेच मी हा चित्रपट पाहिला. त्यातलं एक गाणं मनाला भिडलं. गाण्याचे बोल खाली देत आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा.

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सये रमुनी या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे!

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा!

गीत- कौस्तुभ सावरकर
चित्रपट- उत्तरायण
(साभार-http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1924.htm)