आज दुपारी बोपण्णा आणि कुरेशी जोडीचा सामना पाहिला. या जोडीने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मला अतिशय आनंद झाला. आणि हे सगळं पहात असतानाच माझं मन थोडं भूतकाळात गेलं. माझा मीच विचार करायला लागलो की आपण केव्हापासून हा खेळ पहायला लागलो. थोडासा विचार केल्यावर मला लक्षात आलं की अगदी लहान असताना शाळेची मधली सुट्टी असली की मी माझा आदित्य कुलकर्णी नावाचा एक मित्र आहे त्याच्या घरी जात असे. तेव्हा त्याचे आई-बाबा दोघही टेनिसचे सामने पहात बसलेले असायचे. सुरूवातीला मला काही कळायचं नाही. पण हळूहळू मला या खेळाबद्दल गोडी वाटू लागली. काही शंका असतील तर मी आदित्य किंवा त्याच्या आई-बाबांना विचारत असे. आणि एक घडी अशी आली की मला हा खेळ प्रचंड आवडू लागला.
एखादी मॅच पाहून मग त्यावर चर्चा करायला मी आणि आदित्य भेटायचो. बारावीनंतर पुण्यात आल्यावर सुरूवातीला फक्त वर्तमानपत्रातून वाचायचो. पण पुन्हा एकदा आदित्यचं कामाला आला. त्याच्या घरी टीव्ही होता. त्यामुळे एखादी मॅच असली की मी त्याच्या घरी जाऊन आम्ही दोघही ती मॅच बघत असू.
मला टेनिस कळायला लागल्यापासून आगासी, सॅम्प्रास, बेकर हे पुरूष खेळाडू तर सेलेस, ग्राफ, सॅंचेस या महिला खेळाडू हे माझे आवडीचे लोक होते. यात ईव्हानसेविकला विसरून जमणार नाही. त्याच्या त्या बिनतोड सर्व्हीसेस आणि ०-१५, ०-३०, ०-४० आणि गेम हा क्रम मी आयूष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्याची ती विंबल्डनला पॅट्रिक राफ्टर बरोबर झालेली ती मॅच जरी मला पहायला मिळाली नाही(जुन्नरमध्ये असलेल्या भारनियमनामूळे) तरी मी ती नंतर पुनःप्रक्षेपणामध्ये पाहिली होती. याबरोबर आगासी आणि सॅम्प्रास यांच्यामध्ये मैदानामध्ये असलेलं युद्ध कोण विसरू शकेल. अजूनही त्या दोघांच्यात झालेले कित्येक सामने मला आठवतात.
टेनिस म्हटलं की सुंदर मूली हे जणू समीकरण बनलं आहे. अगदी स्टेफी ग्राफपासून ते अगदी आजच्या कॅरोलीन वॉझ्नीयाकीपर्यंत अनेक सुंदर ललना या खेळात आल्या आणि गेल्या. काहींनी आपल्या खेळाने रसिकांना भूरळ घातली तर काहींनी आपल्या अदांनी आणि काहीजणींनी या दोन्ही गोष्टींनी रसिकांना भूरळ घातली.
भारताचं प्रतिनिधीत्व करणारेपण आहेत बरं या खेळात.विजय अमृतराज, लिऍंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा(तिने फारसं काही केलं नसेलसुद्धा, पण तरीही) आणि अगदी आजचे रोहन बोपण्णा, सोमदेव देवबर्मन, युकी भांबरी असे काही खेळाडू आहेत. पेस-भूपती एकत्र असताना त्यांनी दुहेरीच्या टेनिसविश्वात घातलेला धुमाकूळ कोणी कसं विसरू शकेल.
मात्र आजचं टेनिस हे फक्त ताकदीच्या जोरावर खेळलं जातयं की काय अशी शंका नदाल, मॉन्फिल्स यांना खेळताना बघून येते. पण कौशल्यावर आधारलेलं, ज्याला क्लासिक टेनिस असं म्हटलं जाते ते अजूनही आहे हे फेडररला खेळताना बघून जाणवतं.मला स्वतःला जरी फेडरर आवडत नसला तरी त्याने जे काही करून दाखवलं आहे त्याला तोड नाही.
तर असा हा टेनिसचा खेळ. कितीतरी दाखले देता येतील पण वेळेअभावी आत्ता शक्य नाहीये.
मला हा खेळ पहायला लावून या खेळाची गोडी लावणारा आदित्य आणि त्याचे आई-बाबा यांचे मी मनापासून आभार मानतो. राम राम.
1 number ahe, Gund..!!! Carry on... :)
ReplyDelete