Tuesday, June 12, 2012


नमस्कार. आज जरा फोटोग्राफीबद्दल लिहितोय. लेख केवळ मनोरंजन म्हणून लिहिलेला आहे. कोणालाही दुखविण्याचा हेतू इथे नाहीये.
फोटोची हौस कोणाला नसते. अगदी २-३ महिन्याच्या बाळापासून ते अगदी ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबा-आज्जीना देखील फोटो काढून घेण्याची हौस असते. पण काही लोकांना फोटो काढायची हौस असते किवा आवड असते. आणि या आवडीतून काही लोक पुढे जाऊन त्यातंच शिक्षण घेतात. काहीजण जुजबी शिकून स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. यात अजून एक इंटरेस्टिंग असं निरीक्षण मी केलं. अगदी हल्ली हे पाहण्यात आलं आहे. फारसं काही ज्ञान नसलेले लोक केवळ पैसा आहे म्हणून महागडा कॅमेरा आणि महागड्या लेन्सेस विकत घेतात. आणि मग सुरु होतो तो एक फोटोग्राफिक प्रवास. स्वतः काढलेले फोटो फेसबुकवर टाकणे आणि मग चार लोक त्यावर कॉमेंट्स करणार. कोणीतरी विचारणार अरे कोणता कॅमेरा आहे आणि कोणती लेन्स आहे. जरा एक्स्पोजर जास्त का नाही ठेवलंस? आणि तत्सम सगळ्या कॉमेंट्स तिथे वाचायला मिळतात. काही लोक यातून जरा वेगळा मार्ग निवडतात आणि स्वतःचा फोटोग्राफी ब्लॉग सुरु करतात. तिथे मग एकेक फोटो अपलोड करून तो फोटो काढताना त्यांना किती कष्ट करावे लागले किंवा ती पोज मिळवण्यासाठी किती वेळ वाट पहावी लागली याचं विस्तृत वर्णन करतात. काही जण आपले फेसबुक पेजादेखील सुरु करतात. माझ्या माहितीतला एक मुलगा होता. त्याची फोटोग्राफी बरी होती. मध्ये कधीतरी या हिरोचा वाढदिवस होता. बऱ्याचशा लोकांनी त्याला फेसबुकवर शुभेच्छा दिल्या. त्या प्रत्येक पोस्टवर याने धन्यवाद असा रिप्लाय दिला आणि स्वतःच्या फोटोग्राफी ब्लॉग ची लिंक पेस्ट केली. हा असला प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेला लाजीरवाणा प्रयत्न होता असं मला वाटलं. या फेसबुकवर फोटो टाकणाऱ्या लोकांच्या अल्बम्सची नावेदेखील मजेशीर असतात. त्यातल्या त्यात रँडम हे सगळ्यात जास्त वापरलं जाणारं नाव. काही अजून वापरली जाणारी नावे म्हणजे Through My Lens, Caught My Eye, Photography???, My Photography इत्यादि. जे दिसेल त्या सगळ्यांत या लोकांना फोटोग्राफिक मटेरिअल दिसायला लागतं. मोकाट जनावरं, रस्त्यावरचे भिकारी, गटारात उगवलेलं झाड, पाण्यात पडलेलं कशाचही प्रतिबिंब, जाता येता दिसणारे जीने, विजेजे खांब, रस्त्यावर खेळणारी लहान मुलं या सगळ्यांत या लोकांना अचानक फोटोग्राफिक मटेरिअल असल्याचा साक्षात्कार होतो. आणि हे सगळे यांचे फोटोग्राफीचे प्रयत्न फेसबुकवर आल्याने आमच्यासारख्या लोकांना ते सहन करावं लागतं.
यातूनही सुंदर फोटो काढणारे अनेक असतात. तेदेखील आपण काढलेले फोटोज अपलोड करतात. पण त्यांच्या फोटोकडे पाहताच त्या लोकांची लेव्हल वेगळी आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. आणि या लोकांचे फोटो आवर्जून पहावेसे वाटतात.
तर असा हा फोटोग्राफीचा प्रवास. काही लोक खरोखर चांगले फोटोज काढतात तर काही वर सांगितल्याप्रमाणे फोटो काढायचा प्रयत्न करतात. पण अशा दोन्ही प्रकारच्या माणसांकडून आमच्यासारख्या अडाणी माणसाचं मनोरंजन होतं.

3 comments: