उद्या माननीय शरद पवार यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या मनातले काही विचार मांडायचा हा प्रयत्न.
मी दहावी मध्ये होतो तेव्हाची गोष्ट. माझ्या सराव परीक्षेदरम्यान साहेबांचा साठावा वाढदिवस आला. आता साठावा वाढदिवस म्हटल्यावर त्याचा भरपूर गाजावाजा झाला. संपूर्ण पेपर भरून साहेबांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती होत्या. सकाळने त्या वेळेस एक १५-२० पानी पुरवणी काढली होती. त्यामध्ये साहेबांवर बरेच लेख होते. दादांनी मला ती पुरवणी पूर्ण वाचायला सांगितली. माझी सराव परीक्षा असल्याने मी रोज रात्री झोपताना एक दोन लेख वाचून झोपत असे. साधारण ४-५ दिवसात ती पुरवणी वाचून मी पूर्ण केली. त्यानंतर माझ्या मनामध्ये का कोण जाणे साहेबांबद्दल एक विशेष असा आदर निर्माण झाला. आणि तो आजतागायत कायम आहे.
महाराष्ट्राला साहेब नवे नाहीत. साहेबांची राजकीय दूरदृष्टी मी वेगळी काय सांगणार. लहानपणी दादांनी सांगितलेला एक किस्सा इथे नमूद करावासा वाटतो. आत्ताच्या शिरूर मतदारसंघामध्ये तेव्हा माननीय कै. किसनराव बाणखेले आणि माननीय कै. रामकृष्ण मोरे या दोघांमध्ये लोकसभेसाठी लढत होती. मोरेसरांच्या प्रचारासाठीची शेवटची सभा मंचरला ठेवली होती. साहेब स्वतः सभेला हजर होते. सभेच्या दरम्यान साहेबांनी अंदाज घेतला. सभा संपल्यानंतर गाडीमध्ये बसताना साहेबांनी सरांना सांगितले की आज रात्रीमध्ये काही करता आले तर ठीक नाहीतर आपले सीट गेले म्हणून समजा. आणि खरोखर त्या निवडणूकीमध्ये मोरे सर पराभूत झाले. फक्त सभेमध्ये बसलेल्या लोकांच्या कलावरुन साहेबांनी अंदाज बांधला होता आणि तो खरा ठरला. आजकाल लोकांच्या मनाचा इतका अभ्यास असलेले नेते दुर्मिळ आहेत.
साहेबांची मला भावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं गाडीमध्ये ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसणे. दिल्ली किंवा इतर कुठेही असले आणि गाडीमध्ये प्रवास करायचा झाला तर साहेब कायम ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसतात. महाराष्ट्रामध्ये निवडणूकांच्या वेळी गावोगावी फिरताना बऱ्याचदा ते ड्रायव्हरला रस्तादेखील सांगत असतात. आजमितीला साहेबांच्या इतका महाराष्ट्र माहीत असलेला दुसरा राजकीय नेता सापडणार नाही.
साहेबांची भाषणाची शैली देखील इतरांपेक्षा वेगळी. प्रत्यक्ष त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मला ४-५ वेळाच मिळाली आहे. क्वचित टीका केलीच तर तीसुद्धा मोजक्या पण शेलक्या शब्दात. कधीकधी अचानक भाषण चालू असताना गर्दीमध्ये बसलेल्या एखाद्या कार्यकर्त्याचे नाव घेऊन जणू काही त्याच्याशीच बोलतो आहोत अशी जनमानसाला आपलीशी करून घेणारी भाषणशैली. आमचे जुन्नरचे स्नेही सुनील ढोबळे यांनी सांगितलेली एक आठवण इथे सांगाविशी वाटते. आळेफाट्याला साहेबांची सभा होती. त्या सभेमध्ये भाषण करताना साहेबांची नजर गर्दीमध्ये बसलेल्या एका जुन्या कार्यकर्त्यावर गेली. आणि पुढच्या क्षणी साहेबांनी काय चिमा बरोबर ना? असा प्रश्न त्याला केला. इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपले नाव साहेबांच्या लक्षात आहे असे वाटून तळेरानच्या चिमा पाटील या कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आले. हे केवळ उदाहरण आहे. काहींना हा पब्लिसिटी स्टंट वाटेल पण हे असं अनेकदा आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे सांगणारी माणसं देखील भेटतात.
राजकारणाबरोबरच साहित्य आणि कला ह्या क्षेत्रांमध्येदेखील तितकीच रुची असणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये साहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. १९८० साली घाशीराम कोतवाल नाटकाचा परदेशदौरा आखला गेला होता. ह्या दौऱ्याला काही लोकांचा विरोध होता. त्यात शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर ह्यांनी घाशीराम विरोधात कोर्टात याचिका दाखल करून हा प्रदेश दौरा धोक्यात आणून ठेवला. साहेबांनी नाटकवाल्या मंडळीना घेऊन मातोश्री गाठलं. तिथेसुद्धा चर्चेतून काही मार्ग निघाला नाही. कारण त्या साहेबांनी घाशीरामच्या बाजूने निकाल लागला तरी शिवसैनिक विरोध करतील अशी तंबी दिलेली. अखेरीस पवार साहेबांनी हा दौरा होणारच असं सांगून जब्बार पटेल आणि इतरांना पुण्याला पाठविले. ठरल्याप्रमाणे कुठेही कुणालाही न कळता हे सगळे कलाकार एके दिवशी पुण्याहून विमानाने मुंबईला दाखल झाले आणि दुसऱ्या विमानाने परदेशी गेले. अलीकडेच सतीश आळेकरांचा याबाबत सविस्तर माहिती देणारा लेख लोकसत्तेत प्रसिद्ध झाला होता. त्याची लिंक सोबत देत आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला बरेच लोक साहेबांवर टीका करताना दिसले. साहेब केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना इतक्या हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे वगैरे. त्यानंतर भाजप सरकार आले आणि मी सहजच एका मित्र टीकाकाराला विचारले की भारताचे सध्याचे कृषीमंत्री कोण रे? त्याला सांगता आलं नाही. ह्यातून काय ते मी समजलो. ज्यांच्या वयापेक्षा जास्त वर्षे साहेब राजकारणात आहेत अशा मुलांनी साहेबांचा एकेरी उल्लेख केलेला दिसला की मला त्यांची कीव येते. बाकी जाऊद्यात हो, पण कमीतकमी त्या माणसाच्या वयाची तरी जाण ठेवा. आजमितीला सत्तेत नसूनही दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा चेहरा म्हणून साहेबांची ओळख आहे. केवळ नऊ खासदारांच्या जोरावर सरकारला धारेवर धरू शकणारे हेच ते साहेब. किल्लारी भूकंप झाल्यानंतर मदतकार्याला दुर्घटनेच्या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचणारे हेच ते साहेब. महाराष्ट्रामध्ये आज दिसणारा बहुतांशी विकास घडवणारे हेच ते साहेब.
आयुष्यात कधी संधी मिळालीच तर ज्या निवडक लोकांना भेटायला मला आवडेल त्यात साहेबांचं नाव अग्रक्रमाने येते. बघू कधी मिळतेय संधी.
टीप - सदर लेखावरून मी साहेबांच्या पक्षाचा समर्थक आहे असा समज करून घेऊ नये.
No comments:
Post a Comment