Thursday, December 29, 2016

ढमाले सर

"अरे जा ना कोणीतरी एंट्रीला. घाबरता का तुमच्या आयला तुमचे." असं म्हणून मी एंट्रीला गेलो. अगोदरच पिछाडीवर असल्याने सेफ एंट्री मारून परत आलो. 

आणि मग लक्षात आलं की शाळेचे मुख्याध्यापक धरून सगळे शिक्षक सामना पाहायला आले होते. मी हा असा वेडेपणा करून बसलो होतो. सामन्याचे मध्यांतर झाल्यावर पंच असलेल्या ढमाले सरांनी मला हाक मारली, 

"गुंड्या इकडं ये जरा." 

थोडासा कावराबावरा होऊन मी गेलो. 

"अरे आजूबाजूला कोण बसलंय याचा विचार करून बोलावं की नाही?" 

"सर अहो ते लक्षात नाही आलं माझ्या. सॉरी." मी आपला डिफेन्सिव्ह मोडमध्ये. 

"जा पळ." 

सामना हारलो आम्ही पण सरांची ही आठवण कायम राहिली. 

ढमाले सरांबद्दल लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. कच्चं स्क्रीप्ट मनात जुळवून ठेवलं होतं. आज लिहायला बसलो. 

ताई शाळेत माझ्यापुढे ४ वर्षे. ती आठवीला गेली तेव्हा घरात पहिल्यांदा सरांचं नाव ऐकायला मिळालं. फार कडक आहेत, त्यांच्या एका शिट्टीमध्ये आख्खी शाळा शांत होते अशा दरारा वाटणाऱ्या गोष्टी कानावर पडल्या. त्यांना पाहिलं होतं ते फक्त शाळेच्या बक्षिस समारंभामध्ये विद्यार्थ्यांची नावे पुकारताना. काळा रंग, पण चेहऱ्यावर मात्र प्रचंड तेज, दाबून व्यवस्थित बसवलेले केस, मैदानी खेळ खेळून घडवलेलं शरीर अशी त्यांची आणि माझी पहिली आठवण. 

माझी बहीण पूजाला सरांनी आमच्या शाळेच्या स्पर्धांमध्ये पळताना पाहिलं आणि तिच्यातलं कौशल्य लगेच हेरलं. काही दिवसांनी सर घरी येऊन दादांबरोबर बोलले. पूजाच्या सरावासाठी दादांनीसुद्धा परवानगी दिली आणि तिथून पुढे सुरु झाला तो एक अचंबित करणारा प्रवास. पूजावर सरांनी प्रचंड मेहनत घेतली. मला आठवतंय सर सकाळी ६ वाजता ग्राउंडवर येत असत. येताना आपल्याबरोबर आपले मित्र विनायक खोत सर यांना सुद्धा घेऊन येत. चिमटे सर, आवटे शाळेचे पोकळे सर वेळ मिळेल तसे येत असत. पूजाचा पळण्याचा वेग भन्नाट असे. तिच्याबरोबर पळायला कोणी मुलं तयार नसत.हिच्याबरोबर  हारलो तर आपलं हसं होईल अशी भिती पोरांना वाटे. स्पर्धा असल्याशिवाय सराव होणार कसा? मग हेच ३-४ जण वेगवेगळ्या टप्प्यावर जाउन थांबत. पूजाला स्टार्ट मिळाला की एका ठराविक टप्प्यापर्यंत एकजण पळे आणि तिथून पुढे मग दुसरा. असा तो सराव दिवस दिवस चाले. अर्थात त्याचं फळ पूजाला मिळालं. ती राज्य पातळीवर खेळून आली. या सगळ्या प्रवासामध्ये सरांशी एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला तो आजतागायत कायम आहे. सरांबरोबर असा कौटुंबिक जिव्हाळा असणारी अनेक कुटुंबे जुन्नरमध्ये आहेत. 

सरांची एक गोष्ट सगळ्यांना आवडे. आपली टीम जिंकण्यासाठी वाटेल तितकी मेहनत घायची त्यांची तयारी असे. त्यासाठी अर्थात पोरांना तेवढच कुथवत असत ते. मग सामना खो खो चा असो किंवा कबड्डीचा. माझा आणि त्यांचा संबंध कबड्डीच्या निमित्ताने आला. १४ वर्षाखालील गटात तेव्हा आम्ही खेळत असू. सागर देवडिगा, अरविंद एखंडेसारखे रायडर होते आमच्याकडे. आदित्य कुलकर्णी, गणेश चिमटेसारखे क्षेत्ररक्षक होते. मी त्या वेळेस डाव्या बाजूचा सातवा लावत असे. या सगळ्याच्या जोरावर आम्ही तालुका पातळीवर अंतिम फेरीपर्यंत सहज मजल मारली. अंतिम फेरीचा सामना खोडदच्या शाळेविरुद्ध होता. त्यांच्याकडे एक ६ फुटाहून जास्त उंची असलेला रायडर होता. त्याने पहिल्या चढाईपासून आमची दाणादाण उडवायला सुरुवात केली. मी सातवा लावत असे. त्याच्या एका एंट्रीला चवडा काढायला वाकलो तर त्याने एक जोरदार दणका दिला डोक्यात. डोकं झिणझिणलं माझं. कोणाला काही कळेना काय करावं. सगळ्यांनी उसनं अवसान आणून सरांकडे पाहिलं. इतक्या वेळ शांत बसलेले सर अचानक उठून पंचाकडे गेले. सबंधित मुलगा या वयोगटामधील नसून जास्त वयाचा आहे, त्यामुळे तो हा सामना खेळण्यास अपात्र ठरतो असा युक्तिवाद सरांनी पंचाकडे केला. सामना थांबवला गेला. तब्बल एक तासाच्या विलंबानंतर पुन्हा एकदा ज्येष्ठ पंचाच्या देखरेखीखाली सामना पुन्हा पहिल्यापासून सुरु करण्यात आला. आता मात्र आम्ही पेटून उठलो होतो. पहिल्याच चढाईला त्यांच्या त्या रायडरचा मी चवडा काढला आणि सबंध मैदानात जल्लोष झाला. सामना आम्ही जिंकलाच. पण समोरचा खेळाडू आपल्यापेक्षा वरचढ असेल तर त्याचं मानसिक खच्चीकरण करून सामना आपल्या बाजूने फिरवता येतो हि शिकवण सरांनी घालून दिली. 

मल्लखांबावर सरांचं विशेष प्रेम. त्यांनी शाळेसाठी खास मल्लखांब बनवून घेतला होता. मल्लखांबाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या मुलांकडून चित्तथरारक कसरती ते करून घेत. मलाही मल्लखांब खेळायची इच्छा होती. पण नेमकं सरांनी मला खो खो मध्ये टाकलं. एक दिवस खेळलो खो खो. दुसऱ्या दिवशी मनाचा हिय्या करून सरांकडे गेलो आणि म्हटलं, 

"मला मल्लखांब खेळायचाय." त्यांच्यासमोर जाऊन आपलं मत एव्हढ्या ठामपणे कसं मांडलं माझं मलाच माहित. 

सरांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचारले, 

"तुझं नाव काय बाळ?" 

"आदित्य गुंड" मी उत्तरलो. 

दोन सेकंद विचार करून सर म्हणाले,

 "उद्यापासून लंगोट घेऊन ये आणि मल्लखांब खेळत जा."

ते ५-६ महीने माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या फार महत्वाचे ठरले. त्या वर्षानंतर सरांनी मल्लखांब ठेवला तो अजूनपर्यंत बाहेर काढलेला नाही. सुजान मोठा झाल्यावर एकदा मल्लखांब बाहेर काढेन असं ते म्हणाल्याचे मला पुसट आठवतं. पण ते बहुतेक झालंच नाही. 

सरांच्या शिस्तीचा सबंध शाळेमध्ये चांगलाच गवगवा होता. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी कोण गोंधळ करतोय हे त्यांच्या नजरेनं अचूक हेरलेलं असायचं. मग दुसऱ्या दिवशी त्या त्या मुलांना व्हरांड्यामध्ये बोलावून ते त्यांचा निकाल लावत असत. शाळेत इतक्या सगळ्या मुलांच्या गर्दीमधून कोण मुलगा/मुलगी एखाद्याला चिठ्ठी देतोय/देतेय हे ते बरोबर हेरत. आणि मग त्या दोघांना वेगवेगळ्या वेळेस बोलावून त्यांची खरडपट्टी काढत. यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, ती वाम मार्गाला लागू नयेत असा त्यांचा शुद्ध हेतू असे. कधीकधी काही पालक मग सरांची तक्रार घेऊन शाळेत येत. त्यांना मग वेगळ्या पद्धतीने शाळा आणि सर हाताळत असत. अधिक तपशील देणे इथे उचित ठरणार नाही. 

शिस्तीच्या बाबतीत काटेकोर असणारे सर पोरांची काळजीसुद्धा तितकीच घ्यायचे. त्यांच्यावर प्रेमसुद्धा तितकंच करायचे. मग एखाद्याच्या घरी जाउन त्याची चौकशी करणे असो, एखाद्याला प्रेमाने एका विशिष्ट नावाने हाक मारणे असो. सरांच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येकाच्या त्यांच्या बाबतीत अशा आठवणी असतील. बरेच विद्यार्थी जाउन आता त्यांची पोरं सरांच्या हाताखाली आली आहेत. पण या माणसाचा उत्साह अजून कमी झालेला नाहीये. आजही तितक्याच जोमाने ते रोज संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायला जातात. ओतूरला शेतावर जाऊन मेहनत करतात. या सगळ्यांत बाईसुद्धा त्यांना खंबीरपणे साथ देत असतात हे विसरून चालणार नाही. अगदी अलीकडे सुजानच्या आजारपणाने त्यांची कसोटी पाहिली. पण त्यातूनही ते समर्थपणे बाहेर पडले. 

आजही सर भेटले की गप्पांच्या ओघात जुन्या आठवणीना उजाळा दिला जातो आणि वेळ कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही.सरांच्या निवृत्तीला अजून वेळ आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या उरलेल्या शिक्षकी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. 

Thursday, December 22, 2016

"अण्णा उद्या सकाळी कितीचा गजर लावलाय?" झोपताना मी अण्णाला विचारलं.
"साडे तीनचा लावलाय." अण्णा कुस बदलत म्हणाला.
"बरंय मग मी काही गजर लावत नाही" म्हणत मी सुद्धा निद्रादेवीची आराधना करू लागलो.
पहाटे ३ वाजता जाग आली. शेजारी पडलेला मोबाईल उचलून डोळे किलकिले करत मी वेळ पाहिली तर तीन वाजले होते. अण्णाच्या मोबाईलचा गाजर वाजेलच असा विचार करून मी परत झोपी गेलो.
थोड्या वेळाने अण्णाचा फोन वाजला म्हणून जागा झालो. पाहतो तर सव्वा चार वाजले होते. अण्णा फोन उचलून बोलत होता. दादांचा फोन होता हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही.
लगेच उठून दोघंजण रात्रीच बनवून ठेवलेल्या चुलाणाकडे धावलो. अण्णाने रात्री आजूबाजूला पडलेल्या पत्रावळी गोळा करून जाळ केला. मी टीपाडातून बादलीने पाणी उपसून कढईत टाकायला सुरुवात केली. एव्हाना दादा आणि काकू आजी जागे होऊन आमची धावपळ बघत उभे राहिले. जाळायला लाकडं कोणती वापरावीत हे आम्हाला कळेना झाल्यावर काकू आजीने भराभरा २-३ मोझीर झालेली लाकडं काढून दिली आणि एकदाची चूल पेटली.
लगीनघर असल्यानं हळूहळू का होईना पण जरा लवकरच घरात जाग येऊ लागली होती. थंडीचे दिवस असल्याने जो तो उठून कढईशेजारी येऊन उबेला बसत होता. एक एक जण आंघोळीला नंबर लागेल तसा उठून जात होता. माझे दोन धाकटे चुलत भाऊ आर्यन आणि अद्वैत सुद्धा शेकोटीला येऊन बसले होते. आर्यनची झोप अजून उडाली नव्हती. त्याने जांभया द्यायला सुरुवात केली तेव्हा मग फोटो काढायचा मोह मला आवरला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव टिपताना माझी थोडी तारांबळ उडाली पण त्याची खंत नाही.




Friday, November 18, 2016

छांदिष्ट अमेरिकन्स

ऑगस्ट २००९ ते डिसेंबर २०१३ हा काळ मी अमेरिकेतल्या कॅन्सास आणि आयोवा राज्यांमध्ये व्यतित केला. कॅन्सासमधली २ वर्षे विद्यार्थी म्हणून काढली. त्यानंतर नोकरीनिमित्ताने उरलेला काळ आयोवामध्ये गेला. अमेरिकेतले हे दोन्ही प्रदेश मिडवेस्ट प्रांतात येतात. माझ्या इथल्या वास्तव्यामध्ये आणि थोड्याबहुत केलेल्या भ्रमंतीमुळे अमेरिकन लोकांची जीवनशैली जवळून पाहण्याचा योग आला. 

विद्यार्थीदशेत असताना मिळणाऱ्या मोजक्या पगारामुळे सहसा फार फिरणं होत नाही. एकदा कमवायला सुरुवात झाली कि मग मात्र सुट्ट्यांचा वापर बहुधा फिरण्यासाठी केला जातो. अमेरिका हा भौगोलिकदृष्ट्या एक महाकाय देश आहे. ५० राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये पाहण्यासाठी काही ना काही नक्की आहे. शिवाय ही सगळी स्थळे तुमच्या आवडीनुसार आहेत. आरामाची सवय असलेल्यांसाठी जशा गोष्टी आहेत तशाच साहसी लोकांसाठी सुद्धा आहेत. 

अमेरिकेत स्टेट आणि नॅशनल अशा दोन प्रकारांची पार्क्स असतात. नावं सुचवतात त्याप्रमाणे नॅशनल पार्क्स ही केंद्र शासनाची जबाबदारी असते तर स्टेट पार्क्स राज्य शासनाची. अर्थात त्याचा फिरणाऱ्यांशी फारसा संबंध नाही. आकड्यात बोलायचं झालं तर अमेरिकेत एकूण ५९ नॅशनल पार्क्स किंवा प्रतिबंधीत क्षेत्रे आहेत. नॅशनल पार्क सर्विस या एजन्सीद्वारे ती चालवली जातात. सगळ्यात पहिलं यलोस्टोन नॅशनल पार्क हे १८७२ मध्ये सुरु केलं गेलं. हा लेख लिहीत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे २५ ऑगस्ट २०१६ रोजी नॅशनल पार्क सर्व्हिसने आपली शंभरी पूर्ण केली. त्या निमित्ताने संबंध अमेरिकेतल्या नॅशनल पार्क्समध्ये गेल्या वर्षभर विविध उपक्रम राबवले गेले. 


नॅशनल पार्क जरी १८७२ साली सुरु झाले तरी ही संकल्पना वाढीस लावण्याचे श्रेय जॉन म्युअर या अवलियाला दिले जाते. नॅशनल पार्क्स असणं कसं गरजेचं आहे हे सांगणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये म्युअर अग्रस्थानी होता.


मी ज्या भागात राहिलो तिथले लोक हे आपल्या तब्येतीची काळजी घेताना मला दिसले. कोणताही व्यायाम नसताना किंवा सवय नसताना हे लोक सहज १-२ मैल पळू शकतात. यात पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होतो. हे असताना दुसरीकडे अमेरिकेत स्थूलपणा (ओबेसिटी) सगळ्यात जास्त प्रमाणावर दिसुन येतो हे विसरून चालणार नाही. 

अमेरिकेतला सुट्ट्यांचा सिझन आपल्यासारखाच उन्हाळ्यात असतो. मुलांच्या शाळांना असलेल्या सुट्ट्यांमुळे पालकसुद्धा मोठ्या सुट्ट्या काढून एखादी फॅमिली ट्रिप नक्की करतात. या सुट्ट्यांचं प्लॅनिंग खूप आधी केलेलं असतं. यात सहसा कुटुंबातली आई पुढाकार घेते असं माझं निरीक्षण आहे. मग कुठे जायचं हे फायनल झालं की पुढचे काही दिवस तिथे किती दिवस राहायचं, कुठे राहायचं, हॉटेलच्या दरांमध्ये कितपत फरक आहे, कुठे काही डिस्काउंटचे कुपन मिळतायेत का अशी सगळी उठाठेव केली जाते. आणि साधारणपणे जाण्याच्या तारखेच्या १ महिनाभर किंवा कधीकधी त्याहूनदेखील आधी प्लॅन निश्चित झालेला असतो. अगदी एकेक दिवसाचं प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे एका दिवसात किती मैल जायचं आहे, ते अंतर कापताना मध्ये दुपारच्या जेवणाला,पोरांच्या शी शु ला कुठे थांबायचं आहे, रात्रीचं जेवण कुठे, मुक्कामाच्या ठिकाणी किती वाजता, झोप किती वेळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे इथपर्यंत प्लॅन असतात. अगदी परवाकडे माझा एक मित्र मुलांना घेऊन फ्लोरिडाच्या युनिव्हर्सल स्टुडिओला जाऊन आला. त्याने असंच प्लॅनिंग केलं होतं. 

एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. या सगळ्या पार्क्सला किंवा ट्रेकिंगला जाणाऱ्या ठिकाणी उत्तम रस्त्यांची व्यवस्था आहे. तुम्हाला हव्या त्या ठिकाणापर्यंत, मग तो समुद्र किनारा असो किंवा डोंगर असो, गाडीने सहज जाता येईल असे हे रस्ते असतात. आणि ते कायम चांगल्या अवस्थेत असतात. डोंगर असेल तर पायथ्याला मुक्कामाची उत्तम सोय होईल अशी हॉटेल्स असतात. सुट्ट्यांच्या दिवसात गर्दीमुळे अगोदर बुकिंग केलेलं कधीही चांगलंच. आपल्याकडे जसं गडावर जाऊन स्वयंपाक केला जातो तसंच तिथे देखील करतात. फरक एवढाच कि तिथे तशी सोय करून दिलेली असते. तुम्हाला फक्त खाण्याचे पदार्थ आणि इतर घटक बरोबर घेऊन जावे लागते. हाच प्रकार अगदी गावातल्या बागांमध्ये सुद्धा असतो. कुठे एखाद्या ठिकाणी छोटीसी पार्टी म्हणा वाढदिवस म्हणा सहज साजरा करता येतो. प्रत्येक गावामध्ये सरकारी सभागृहे असतात. ठराविक रक्कम भरून ती आरक्षित करता येतात. हे सगळं आपल्याकडे सुद्धा असतं. पण सरकारी सभागृहांची अवस्था दयनीय असते. कोणीतरी खाजगी पार्टीने पुढाकार घेतल्या शिवाय आपल्याकडे जमत नाही. आणि मग ते झालं की शुल्क वाढतं. असं हे लटांबर पुढे चालूच राहतं. 

अमेरिकन लोकांना कॅम्पिंग करायला एक फार आवडते. मग अशा लोकांसाठी कॅम्पिंग साईट्स डेव्हलप केलेल्या असतात. एखाद्या तळ्याच्या काठावर किंवा डोंगराच्या पायथ्याला अशा त्या साईट्स असतात. बार्बेक्यू करण्यासाठी लोखंडी ग्रिलची व्यवस्था केलेली असते.मग आपापले कॅम्पर ट्रक (आशुतोष गोवारीकरच्या स्वदेस चित्रपटामध्ये नायक हा असा कॅम्पर घेऊन फिरताना आपल्याला दिसतो.) घेऊन लोक तिथे येतात. या कॅम्पर मध्ये सगळी सोय असते. १-२ माणसं झोपू शकतील अशी सोय असते, एक छोटंसं टॉयलेट असते. एक छोटं वन रूम किचन म्हणूयात हवं तर. हव्या त्या ठिकाणी जाऊन आपला कॅम्पर पार्क करायचा आणि पुढचे २-३ दिवस कुटुंबाबरोबर तिथे घालवायचे. मग गप्पा गाणी गोष्टी आल्याच. मग अशा सुट्ट्यांच्या ठिकाणी कॅम्पर पार्किंगचेसुद्धा ऍडव्हान्स बुकिंग करावं लागतं. तिथे नजारा सुद्धा बघण्यासारखा असतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे कॅम्पर घेऊन आलेल्या पप्पा लोकांच्या गप्पा रंगतात. तुमचा कोणत्या कंपनीचा, नवा घेतला के जुना, कितीला पडला वगैरे वगैरे. मग आतून बघा काय काय आहे त्यात. वूडन फिनिशवाले अमुक तमुक. बरीच कुटुंबे कर्ज काढून ऐपत नसतानासुद्धा हे कॅम्पर विकत घेतात. वर्षातून फार फार तर ३-४ वेळा ते पार्किंग मधून बाहेर निघतात. पण हौसेला मोल नाही!!!

या हौसेवरून अजून काही उदाहरणे सांगावीशी वाटतात. आपला एखादा छंद मनापासून जोपासणे हे या लोकांना खूप चांगले जमते. आणि त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. छंद महागडा असला तरी हरकत नाही. माझ्या एका मित्राला विमानांची भारी हौस. पठ्ठयाने पायलट प्रशिक्षण पूर्ण केले. त्यासाठी गरज पडेल तेवढी फी देखील भरली. हव्या त्या परीक्षा देऊन सर्टिफिकेशन पूर्ण केले. मग प्रत्येक वेळेस विमान तासावारी भाड्याने घेऊन उडवायचा. थोड्या दिवसांनी ते काही याला पटेना. मग याने एक विमान विकतच घेतलंय आता. त्यासाठी गावातल्या एअरपोर्टला महिन्याची पार्किंगची फी सुद्धा भरतोय. हौसेला मोल नाही!!

अजून एका मित्राला सुतारकामाचा छंद. या छंदातून त्याने घरी मुलांसाठी २-३ छोटे स्टूल बनवले. ते चांगले जमले म्हणून एक टेबल बनवायची ऑर्डर त्याला मिळाली. ती पूर्ण केल्यावर मग अजून एक मोठं डायनिंग टेबल त्याने बनवलं. आता गडी वीकएंडला एक्स्ट्रा उत्पन्न कमवतो. ते देखील फावल्या वेळात. या लेखाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलायचा योग आला तेव्हा त्याने याबद्दल मला अजून जास्त माहिती दिली. त्याला सुतारकामामध्ये आधीपासून रुची होतीच. पण नेमका त्याचवेळेस तो नवीन घरात शिफ्ट झाला. नवीन घरासाठी बरचसं फर्निचर विकत घेण्यापेक्षा आपणच का बनवू नये असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि सुरुवात झाली. जशी गरज पडेल तसा आपल्या कामाच्या श्येड्युलमधून तो वेळ काढून हे काम करू लागला. मुलांनाही आपले वडील आपल्यासाठी काहीतरी बनवत आहेत याचा आनंद होताच. मग वडील काम करत असताना त्यांना मदतीला मुलं शक्य असेल तेव्हा हजर असायची. आपल्या मुलांना आपण या छंदांमध्ये सहभागी करून घेतोय आणि कदाचित त्यांच्यापैकी एकाला याची गोडीदेखील लागू शकते ही भावना खूप सुखावह असते असं त्याने मला बोलता बोलता सांगितले. त्याला हे सगळं करायला आवडतं कारण सगळ्या कामानंतर तयार झालेलं फिनिश्ड प्रॉडक्ट बघण्यात एक अतीव समाधान असते. 

अमेरिकेत प्राण्यांची शिकार करायला कायद्याने परवानगी आहे. मग त्यातसुद्धा बंदुकीने शिकार करण्याचा सिझन आणि धनुष्यबाणाने शिकारीचा सिझन असे प्रकार आहेत. काही राज्यांमध्ये हरणं जास्त आहेत त्यामुळे त्यांच्या शिकारीला परवानगी तर इतर कुठे अस्वलांच्या शिकारीला परवानगी. मग त्यासाठी परवाना मिळवणे वगैरे गोष्टी हे लोक तक्रार न करता पार पाडतात. शिकारीनंतर मारलेले प्राणी घरी आणून त्याची कातडी काढून मांस फ्रिजमध्ये गोठवले जाते. आणि मग नंतर वेळ मिळेल तसा त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून चाखले जातात. यात बार्बेक्यू हा सगळ्यात जास्त लोकप्रिय प्रकार. हरीण मी स्वतः खाल्ले आहे आणि फार चविष्ट लागते. 

हा सगळा प्रकार सुरु होतो तो बंदूक विकत घेताना. केवळ हौस म्हणून २०-२० बंदुका घरात ठेवणाऱ्या माणसांना मी भेटलो आहे. त्यात अगदी छोट्या हँडगनपासून ते अगदी ए.के. ४७ पर्यंतच्या बंदुका आल्या. २० बंदुकांनी भरलेलं कपाट मी स्वतः बघितले आहे. तिथे होणारे बेछूट गोळीबार याचमुळे होतात का वगैरे चर्चा नकोच. बंदुकींवर अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करून फक्त शोभेसाठी घरात ठेवणे यात या लोकांना काहीही वाटत नाही. 

असाच शिकारवेडा असलेला एक मित्र म्हणाला, त्याला त्याच्या वडिलांनी ही गोडी लावली. कळत्या वयाचा झाल्यावर त्याला वडील आपल्याबरोबर शिकारीला घेऊन गेले. त्याने ते सगळं प्रकरण पाहिलं आणि आपणसुद्धा शिकार करायची अशी खूणगाठ मनाशी बांधली. प्रौढवयात आल्यावर त्याच्या वाढदिवसाला वडिलांनी त्याला उत्तम प्रतीची हँडगन् भेट म्हणून दिली आणि तिथून सुरु झाला तो बंदुकी जमविण्याचा आणि शिकारीचा सिलसिला. आजमितीला त्याच्याकडे ५-६ बंदुका आहेत. 

अमेरिकन लोकांचा अजून एक महागडा छंद म्हणजे मासेमारी. त्यासाठी स्वतःची बोट विकत घेतात हे लोक. घराला लागून एक पार्किंग तयार केलं जातं. फक्त उन्हाळ्यात ही बोट बाहेर निघते मासेमारीसाठी. इतर सगळे महिने हप्ते भरत असतात लोक. कर्ज काढून घेतलेली असते ना बोट!! पण वर म्हटलं तसं हौसेला मोल नाही. कारच्या टपावर कयाकिंगची बोट बांधून जाणारे किंवा आपल्या पिकअप ट्रकच्या मागे बोट ट्रॉली करणारे असंख्य लोक दिसतात.  या बोटीवर वेगवेगळी चित्रे काढणे हाही एक छंद पाहायला मिळतो. ९० टक्के बोटींवर अमेरिकेचा झेंडा रंगवलेला दिसतो. काहीजण तर खास बर्फात मासेमारी करायची म्हणून प्रवास करून उत्तरेला कॅनडामध्ये जातात. तिथली तळी थंडीने बर्फाळलेली असतात. मग गोठलेल्या पाण्यात एक मोठं भोक पाडून वर खुर्ची टाकून आतमध्ये गळ टाकायचा आणि सुरु मासेमारी. काहीजण कमी बर्फाळलेल्या पाण्यात बोटी हाकुनसुध्दा मासेमारीचा शौक पुरा करतात. काही जण शेतात तळी तयार करून त्यात मासे सोडून तेच मासे पकडतात. काय म्हणायचं आता याला!!

हे छंद पुरे करण्यासाठी कामाच्या ठिकाणीसुद्धा नियोजन केलेले असते. एखादा माणूस वर्षाच्या बरोबर त्याच दिवसांमध्ये सुट्टी घेतो हे बॉसलासुद्धा माहित असते. त्यानुसार कामाचं प्लॅनिंग केलं जातं. अर्थात हे खासकरून छोट्या गावांमध्ये पहायला मिळतं. न्यूयॉर्क किंवा तत्सम मोठ्या शहरांमध्ये हा प्रकार फारसा आढळून येत नाही

आपल्याकडे खेड्यात जशी बरीचशी कामे स्वतः केली जातात तोच प्रकार अमेरिकेतदेखील आढळतोअर्थात या सगळ्यामागे इथे मनुष्यबळ कमी आणि महाग असणे ही कारणेसुद्धा आहेतच. आपली घरे स्वतः बांधणारी लोकंसुद्धा आहेत. गाड्या स्वतःहून रिपेयर करणं, घराच्या बाजूला पार्किंगसाठी गॅरेज बांधणं ही आणि अशी इतर बरीच कामं हे लोक वीकएंडला करतात. त्यासाठी वीकएंड प्रोजेक्ट असा छान शब्ददेखील आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर स्वावलंबनाला अमेरिकन संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. 

अमेरिकेत असलेल्या भारतीयांमध्ये सगळ्यात लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळे सांगायची तर न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया राज्ये, दक्षिणेकडे फ्लोरिडा राज्य, अमेरिकेची राजधानी असलेलं वॉशिंग्टन डीसी,नव्याने लग्न होऊन आलेल्या जोडप्यांच्या मधुचंद्रासाठी हवाई बेटे ही नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. मग हे कव्हर केल्यानंतर जरा ट्रेकिंग वगैरेची आवड असणारे लोक कोलोरॅडो, युटाह, ऍरिझोना या राज्यांमधल्या डोंगरांवर चढाई करतात. यात पुन्हा सोपे, अवघड ट्रेक आहेतच. तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवड करू शकता. मैलोनमैल पसरलेल्या या डोंगररांगांवर किती फिरू आणि किती नको असे होते.. त्यातही आपल्या लोकांची पसंती ग्रँड कॅनियन, योसेमिटी नॅशनल पार्क, कोलोरॅडोमधली रॉकी पर्वतरांग, टेनेसी राज्यातली स्मोकी पर्वतरांग यांना असते. माझ्या पाहण्यात स्मोकी पर्वतरांग आणि ग्रँड कॅनियनला  जाणारे लोक जास्त आहेत. आकडे बोलतात असं म्हटलं जातं त्याप्रमाणे २०१४ साली नुसत्या स्मोकी पर्वतरांगेला १०,०००,००० लोकांनी तर ग्रँड कॅनियनला ४७,००,००० लोकांनी भेट दिली होती. 

अमेरिकन लोकांची अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. कितीही लांबचा प्रवास असू देत. फार कमी वेळा हे लोक विमानाने प्रवास करतात. बऱ्याचदा प्रवास स्वतःच्या कारमधूनच केला जातो. अर्थात तिथे रस्तेसुद्धा अप्रतिम असतात. अजून एक म्हणजे कुटुंबासाठी हे लोक जमेल तसा आणि जमेल तेव्हा वेळ निश्चित काढतात. कुटुंबामधले लोक वेगवेगळ्या राज्यात राहत असले तरी बरीच कुटुंबे वर्षातून एकदा फॅमिली गेट टुगेदरसाठी न चुकता येतात. त्यात कोणतीही कारणे पुढे केली जात नाहीत. प्रसंगी बिनपगारी रजा घेणारी लोकं मी पाहीली आहेत. बऱ्याचदा ही गेट टुगेदर्स नोव्हेंबर महिन्यातल्या शेवटी थँक्सगिव्हिंग मध्ये होतात असं माझं निरीक्षण आहे. 

अशा या छांदिष्ट अमेरिकन लोकांशी बोलल्यावर त्यांचं असंही म्हणणं आलं की आज आयुष्य आहे तर त्याची मजा घ्यावी. उद्या कोणी पाहिलाय. अमेरिकेतील आयुष्य खरंच सुंदर आहे. फक्त ते सुंदर कसं बनवायचं हे तुमच्या हातात आहे. 

अमेरिकेतील लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन्स 

१. टेनेसी राज्यातील स्मोकी पर्वतरांग 
२. ऍरिझोना राज्यातील ग्रँड कॅनियन 
३. कॅलिफोर्निया राज्यातील योसेमिटी नॅशनल पार्क - यातही हाफ डोम नावाचा ग्रॅनाईटचा एक उभा कातळ बऱ्याच ट्रेकर्सना भुरळ घालतो. ४७४७ फूट उंचीचा हा उभा कातळ नुसता बघितला तरी उरामध्ये धडकी भरते. 
४. युटाह राज्यातील आर्च नॅशनल पार्क 
५. ऍपलेशियन ट्रेल - हा जवळजवळ ३५०० किलोमीटर्सचा मार्ग आहे. १४ वेगवेगळ्या राज्यातील डोंगरांवरून जातो. लोक त्यांच्या सोयीनुसार हव्या त्या जागेवरून चढाई करायला सुरुवात करतात. वर्षातून किमान २,०००,००० लोक कमीतकमी एक दिवसाचा ट्रेक करतात या ट्रेलवर. २०१४ च्या आकडेवारीनुसार २७०० लोकांनी हा ट्रेल एन्ड तो एन्ड पूर्ण केला. त्यांना इंग्लिशमध्ये थ्रू हाईकर्स असे संबोधले जाते. काही जणांनी ट्रेल पूर्ण करून पुन्हा माघारी फिरून सुरुवातीच्या ठिकाणी सुद्धा गेले. त्यांच्या साहसकथा इंटरनेटवर उपलब्ध आहेत. 
(संदर्भ - विकिपीडिया) 

अमेरिकेतील टुरिझम -

१. २०१६ च्या आकडेवारीनुसार फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो हे सगळ्यात जास्त पर्यटकांच्या पसंतीचे शहर 
२. पर्यटकांनी पैसे खर्च करण्याबाबत फ्रान्स खालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो. 
३. २०१४ च्या आकडेवारीनुसार भारतातून अमेरिकेमध्ये गेलेले पर्यटक - ११,११,७३८
४. २०१४ च्या आकडेवारीनुसार संबंध जगभरातून अमेरिकेमध्ये गेलेले पर्यटक - ६,७५,१९,११३
५. २०१४ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतून भारतात आलेले पर्यटक - ११,१८,९८३ 
६. २०१४ च्या आकडेवारीनुसार बाहेरच्या देशातून आलेल्या पर्यटकांच्या पसंतीच्या राज्यांमध्ये तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. 
(संदर्भ - विकिपीडिया)

Monday, November 14, 2016

पुना हरी

"रोजच्या सारखा मी बँकेत काम करत होतो. नुकतेच व्यवहार सुरु झाल्याने जरा वर्दळ होती. तेवढ्यात मावळी हेल काढत एक आवाज माझ्या कानावर पडला. जरा डोकं उंच करून पाहिलं तर एक म्हातारा सेविंग्ज काउंटरला सांगत होता, "ए सायबा, उलीसं पैसं ठूयाचत आन पुस्ताक काढायचंय." 

बँकेतल्या काही निवडक आठवणी सांगताना दादा ही एक आठवण सांगत होते. 
 
"डोईवर मळके पागोटे, काळा रंग अशी ठेंगणी मूर्ती मला दिसली. काउंटरवाला माणूस फार लक्ष देत नाहीये हे एव्हाना त्या म्हाताऱ्याच्या लक्षात आलं होतं. माझी त्याला न्याहाळणारी नजर नेमकी त्याने पकडली आणि माझ्याकडं आला. त्याच्या वयामुळे म्हणा किंवा अजून काही कारणामुळे पण नकळतपणे मी उभा राहिलो. म्हातारा परत तेच पालुपद लावत मला म्हणाला,

"सायबा, उलीसं पैसं ठूयाचत."

मी उशीर न करता फॉर्म काढला आणि विचारलं, "नाव काय बाबा?" 

"पुना हरी पारधी."

"गाव?"

"हातज" 

"हातज म्हणजे हातवीज. माझ्या जुन्नरच्या तोपर्यंतच्या वास्तव्यात मी हातवीजपर्यंत गेलो नव्हतो. याला आता जुन्नरमध्ये कोण ओळखदार मिळणार म्हणून ती सही मीच केली. फॉर्म भरून झाला आणि इंकपॅड काढून त्याच्यासमोर ठेवत मी म्हटलं,

"द्या अंगठा."

त्याला सही करा असं म्हणणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखे होते. पैसे भरायची स्लिप काढली अन त्याला विचारलं,

"किती पैसे भरायचेत बाबा?"

बाबा म्हणाला, "पाच रुपये."

"मी रकमेचा आकडा टाकून स्लिप त्याच्या हातात दिली आणि पैसे कॅशियरला द्यायला सांगून पासबुक तयार करायला लागलो. पैसे भरून होताच तो माझ्याकडे आला. तयार करून ठेवलेलं पासबुक पुढं करत मी त्याला सांगितलं, "दर वेळेस बँकेत येताना हे पुस्तक घेऊन यायचं. हरवलं तर घाबरायचं नाही."

म्हाताऱ्याचा चेहरा उजळला. काहीतरी मोठं पदरात पडल्यासारखं करत त्याने ते पासबुक कोपरीच्या आतल्या खिशात ठेवलं (लपवलं म्हणू हवं तर). काउंटर वरून निघत मला म्हणाला, 

"येऊ का बाळा? लांब जायाचं मला. गाडी मिळाया पाहिजेल आन पुढं एक डोंगर चढायचाय"

त्याला अलविदा करून मी परत कामाच्या  रगाड्यात गुंतून गेलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच पुना हरी बँकेत हजर. त्याला पाहताच माझा एक सहकारी खवचटपणे बोलला, 

"ए गुंड तुझं गिऱ्हाईक आलं बघ."

मी त्या दिवशी कॅशला होतो. त्याची नजर भिरभिर फिरत मला शोधत असल्याचं मला जाणवलं आणि त्याला आवाज देत मी म्हटलं, 

"बाबा मी इकडं आहे."

आवाजाच्या दिशेने तो आला आणि म्हणाला, 

"आरं पैसं भरायचंत. भाईर ये ना."

मी कॅशमधून बाहेर येत त्याच्या दिशेने गेलो. त्याला बसायला खुर्ची दिली. मग हळूच इकडे तिकडे बघत त्याचा हात खिशाकडे गेल्याचं मी पाहिलं. मनात कदाचित भीती असावी त्याच्या. त्याने पैसे माझ्यासमोर काढून ठेवले. मला म्हणाला, 

"हं मोज."

"मी पैसे मोजून संपवले तर बरोबर सहा हजार रुपये होते. १९७८ साली सहा हजार रुपये रोख म्हणजे विचार कर तू."

"मी त्याच्यासमोर बसून चलन भरले. पैसे जमा करून त्याला पावती दिली. पासबुकवर नोंद करून त्याला दाखवत म्हंटल, 

"सहा हजार पाच."

"बरं झालं बाबा देवासारखा भेटला तू." असं बोलून तो निघून गेला. 

"माझे सहकारी गार झाले होते आणि मॅनेजर खुश होते. तेव्हापासून पुना हरीचा प्रत्येक व्यवहार माझ्या हातानेच करायचा असा जणू रिवाज पडून गेला."

"१९८७ ला माझी बदली झाली आणि मी आपटाळे शाखेला गेलो. एक दिवस पुना हरी नेहमीप्रमाणे जुन्नरला बँकेत गेले. त्यांनी मला शोधलं पण मी नव्हतोच तर त्यांना दिसणार कसा. बाकी सहकाऱ्यानी माझी बदली आपटाळ्याला झाल्याचं त्यांना सांगितलं."

"मपलं सगळं पैसं द्या." मी नाही हे पाहून त्यांनी बँकेत असा तगादा लावला. 

"सगळ्या स्टाफने त्यांना समजावलं. मॅनेजर स्वतः बाहेर येऊन त्यांच्याशी बोलले पण व्यर्थ. शेवटी रीतसर त्यांचं खातं बंद करून सगळी रक्कम त्यांच्या हातात देण्यात आली."

"लगेच गाडी पकडून पुना हरी आपटाळ्याला आले. बँकेत येऊन मला गाठलं आणि म्हणाले,

"आरं तू इकडं आला मला कसं कळायचं. तिकडं नाय ठुवायचं पैसं. घिवून आलो सगळे. हे घे आन तुला कसं ठुवायचं ते तू पघ. आयला बरं झालं जवळ आली बँक."

"परत एकदा खाते उघडायचे सोपस्कार पार पाडत मी त्यांच्या हातात पासबुक ठेवलं आणि म्हटलं, 
"आता इथंच येत चला."

"ए बाळा, आता दमलो मी डोंगर चढायचा आन उतरायचा म्हणजे झेपत नाही मला." पुना हरी म्हणाले, "पोराच्या नावानी कर सगळं."

बापाचं मन बोलत असल्याची जाणीव मला झाली आणि त्यांना मी त्यांना म्हंटलं, 

"पुढच्या वेळेस येताना त्याला घिवून या एक डाव. म्हयी मंग तुम्हाला यायची गरज नाही." मी त्यांच्यासारखंच बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या त्या बारीक मिशीखाली हसू तरळल्याचं मला जाणवलं."

नंतर परत माझी बदली झाली. पुना हरींनी काय केले असेल कोणास ठाऊक. पण इतक्या वर्षांनंतरही पुना हरी हे नाव मी विसरू शकत नाही. खेड्यापाड्यातच नव्हे तर अगदी शहरात सुद्धा बहुधा बँकवाल्यांना "साहेब" संबोधतात. पुना हरींच्या लेखी मात्र मी "बाळ" होतो. आणखी काय हवं?"

तसं पाहता दादांनी विशेष काही केलं नव्हतं. फक्त बँकेत आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला ओळख दिली होती. पण त्यामुळे बँकेचं डिपॉझिट वाढलं, त्या माणसाची वणवण वाचली. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे हेच काहीतरी असावं असा विचार करत मी दादांच्या खोलीतून बाहेर पडलो. 





Thursday, October 13, 2016

मधुचा उपास

"कॉलेजला असताना जसे बिकट प्रसंग आले तशाच काही गमती देखील घडल्या. वाघ काकांची एक गम्मत तुला सांगतो", म्हणून दादा बोलू लागले. 

"मी नुकताच घरून जाऊन आलो होतो. मंचरला येताना बाबांनी मला डालड्याच्या रिकाम्या डब्यात एक किलो साखर भरून दिली होती. मुळात एवढी साखर कोण खाणार, एवढ्या साखरेचं करायचं काय हाही प्रश्नच होता. नेमकी त्याचवेळेस गोकुळाष्टमी आली. मधु महानुभाव पंथाचा असल्याने त्याने उपास धरला. आम्ही त्याला समजवायचा प्रयत्न केला, "अरे मधू आपल्याकडं उपासाचं खायला काही नाही. उपास धरू नको." 

पण मधू पडला कट्टर. त्याने आमचं न ऐकता उपास धरला. दिवस जसजसा वर येत राहिला तशी भूक मधुचं आतडं कुरतडत राहिली. त्याला काही सुचानां. खायला तर काही नाही, काय करावं? 

तितक्यात भिवसेन त्याला म्हणाला, "बाळू, गोपाकडं साखर आहे बुआ. साखर खातो का? उपासाला चालती साखर." (भिवसेन कधीकधी मधूला प्रेमाने बाळू म्हणत असे.)

ते ऐकून मधू मला म्हणाला, "ए गोपा, दे रे तो डबा."

मी त्याला डबा दिला आणि मधुनी साखर खायला सुरुवात केली. आता साखर खाऊन काही पोट भरणार नाही हेही आमच्या लक्षात आलं नाही. मधू जे सुटला तो एकदम डबा रिकामा करूनच थांबला. पण भूक काही शमली नाही. 

आज आम्हाला हसू येतं. पण त्या वेळेला आम्हीसुद्धा काळजीने त्याला विचारलं, "मधू आता मस्त झालं ना काम?"

मधू म्हणाला, "नाय रे. कसलं काय. भूक नाहीच गेली."

अशी ही मधुच्या उपासाची गोष्ट आम्हाला कायम सोबतीला राहिली. 

Tuesday, October 11, 2016

वाचाल तर वाचाल


"अजाब तसा चांगल्या घरचा होता. दर रविवारी त्याचा भाऊ त्याच्यासाठी एक तांब्या भरून तूप घेऊन यायचा. गावात नेऊन त्याला रवा घेऊन द्यायचा आणि अजाब रोज शिरा करून खायचा. शिवाय त्याला घरून रोज डबासुद्धा यायचा. तो आमच्याकडं पाठ करून जेवायचा. आम्हाला जेवायला रोज एकच मेनू. पिठलं आणि भाकरी. अर्थात आपल्याला शिरा खायला मिळत नाही याचं आम्हाला कधी वाईट वाटलं नाही. पण त्याची जी वृत्ती होती त्याचा आम्हाला संताप येत असे. बरं तोसुद्धा गप्प बसत नसे. येताजाता काहीतरी टोमणा मारत असे."

गेले काही दिवस कसल्या ना कसल्या कारणाने लिहायला जमले नाही. बऱ्याच जणांनी पुढचा लेख कधी येणार अशी चौकशी केली. उशीर झाल्याबद्दल माफी. 

आज पुन्हा एकदा दादांबरोबर गप्पा मारायला बसलो. नेहमीप्रमाणे दादा बोलू लागले. 

"मंचरला त्या काळी पाणी टंचाई असे. हॉटेलवाले, व्यापारी वगैरे पाणी विकत घ्यायचे. एखादी स्त्री किंवा पुरुष त्यांच्याकडे ठरल्याप्रमाणे हांडे आणून टाकायचे आणि त्याच्या मोबदल्यात व्यापारी त्यांना पैसे देत. आमच्याकडं प्रश्न मोठा होता. घरच्यांनी शिकायला तर पाठवलं पण पैशाची चैन कधीच नव्हती. पाणी ही बाब तर निकडीची. बर घरात नळ वगैरे असले प्रकार तोपर्यंत शोधले जायचे होते. आमच्या खोलीमध्ये पाणी हा विषय नाजूक होता. खाली टँकर आला की मडकं घेऊन खाली जायचं आणि ते भरून घेऊन परत वर यायचं असा आमचा कार्यक्रम असे. एक दिवस मी मडकं भरायला गेलो. वरच्या काठाला धरून टँकर खाली लावलं. पाण्याच्या जोराने वरचा काठ माझ्या हातातच राहिला आणि खालचा भाग खाली गाळून पडला. मडकं पण गेलं आणि ते भरण्यासाठी दिलेले १० पैसे सुद्धा गेले. आता करायचं काय हा प्रश्न आमच्यापुढे आला. मग कोणाकडून तरी पैसे उसने घेऊन नवीन मडकं आणलं आणि आमचा संसार पुन्हा सुरु झाला. 

आज याचं फारसं कौतुक वाटत नाही. पण मुळात १० पैशाला एक हंडा पाणी हेच आम्हाला खूप महाग वाटे. मग हा १० पैशाचा खर्च काहीतरी करून कमी केला पाहिजे असं आम्ही ठरवलं. घरापासून एक दीड किलोमीटरवर एक विहीर होती. तिथे आम्ही सगळे आंघोळीला जात असू. मग आंघोळ झाली की घरी येताना बादली भरून घेऊन यायची. जड झालं की दुसऱ्याच्या हातात द्यायची. त्यामुळे पाणी जवळजवळ फुकट आल्यासारखं झालं. 

पण थोड्याच दिवसात एक नवी डोकेदुखी सुरु झाली. पाणी घेऊन आलं की आमचाच एक रूममेट रोज त्यासाठी टपून बसलेला असायचा. बबन अजाब त्याचं नाव. तो सुद्धा आंघोळीला विहिरीवर जायचा. पण येताना फक्त एक तांब्या भरून घेऊन यायचा. आणि तो संपला की आम्ही भरून आणलेल्या हंड्यातून पाणी घ्यायचा. त्याला हटकलं की, "मला काय आपला एक तांब्या. एका तांब्याने तुम्हाला काय फरक पडतो." असं म्हणून हसायचा. आमचा संताप व्हायचा पण त्याला बोलणार कोण हाही प्रश्न होताच. उगाच वाद नको असा दृष्टीकोन असणारे आम्ही लोक. आम्ही दुर्लक्ष केलं. 

एक दिवस दुपारी मी असाच पडलो होतो. भिवसेन (दादांचे अतिशय जवळचे मित्र. यांना आम्ही लोखंडे मामा म्हणतो.) आणि मधूची (वाघकाका - हे नंतर याच मंचर कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.) नेहमीप्रमाणे अजाब बरोबर काहीतरी वादावादी चालू होती. तो त्यांना डिवचत होता. तुमचं काय कॉमर्सच? डेबिट, क्रेडिट बावळटसारखं. या दोघांना काही नीट बोलता येईना. कॉमर्सची बाजू मांडता येईना. यांची अशी अवस्था पाहून त्याला अजून चेव येई. 

तो विचारी, " सांगा बरं शिवाजीचा जन्म कुठं झाला?"
हे म्हणत, "शिवनेरी."
मग तो म्हणे, "ह्या ते तर काय कोणीही सांगतंय. मला सांगा नेपोलियनला कोणत्या बेटावर कैदेत ठेवलं होतं?"
ह्या दोघांची डोकी फिरली. ते पाहून तो हसायचा, हातवारे करायचा. 
"वाघ, बोल की. हाये का तुमच्याकडं काही?"
मी पडलेला पाहून भिवसेनने मला उठवलं, "ए उठ. हा बब्या काय म्हणतो बघ." कारण त्याला बबन अशी हाक मारावी असं आम्हाला कधी वाटलंच नाही. 
मी उठून विचारलं, "हं काय?"
भिवसेन म्हणाला, "अरे त्या नेपोलियनला कुठल्या बेटावर कैदेत ठेवला होता?"

योगायोगाने मी नुकतंच नेपोलियनचं पुस्तक वाचलं होतं. मी लगेच म्हटलं, "सेंट हेलेना." अजाबकडे पाहिलं तर त्याच्या पापण्या पडलेल्या. माझं उत्तर ऐकून भिवसेनला चेव चढला. माझ्या पाठीवर थाप मारून भिवसेन म्हणाला, "अरे माझ्या वाघा. बब्या बोल तुझं काय म्हणणंय."

माझ्या पाठीवर आनंदाने अजून एक थाप मारून भिवसेन म्हणाला, " हे रे वाघ. च्यायला याला गप्प केला तू."

या प्रसंगानंतर मात्र आमचा आत्मविश्वास वाढला. अजाबच्या अरेला आम्ही कारे म्हणू लागलो. ती एक सवय होऊन गेली.

प्रसंग तसा छोटा पण केवळ वाचनाने मला हात दिला. आणि त्यामुळे एक प्रश्न कायमचा मिटला. वाचत रहा हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो ते याच कारणासाठी. "

Sunday, August 14, 2016

चौदा आण्याची गोष्ट


दादांशी कॉलेजच्या गप्पा मारताना मग त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी सांगा असा आग्रह मी केला. दादासुद्धा तयार झाले. जमेल तसा एकेक किस्सा त्यांनी सांगितला. त्यातलाच एक आज इथे मांडतोय. नेहमीप्रमाणे दादा सांगू लागले. 

" आता १०० पैशाचा रुपया होतो. आमच्या वेळेस ६४ पैशाचा किंवा १६ आण्याचा रुपया होई . २ आण्यांची चवली , ४ आण्यांची पावली तर ८ आण्यांची अधेली होत असे. अर्थात मला सांगायची गोष्ट वेगळीच आहे. एकदा भोरमामा (दादांचे मामा) थोरांदळ्याला आले होते. मामा भेटले की आम्हाला फार बरे वाटत असे. त्यांचे ते उजळ कपडे, तलम धोतर, अंगात कबजा (एक प्रकारचे जॅकेट) असा त्यांचा थाट असे. आले की प्रत्येक वेळी आम्हाला ते पैसे देत असत. कबजाच्या खिशात हात घालून ते पसाभर नाणी काढत तेव्हा आमचे डोळे विस्फारत असत. त्या भेटीमध्ये मामांनी आम्हा भावंडांना एक आख्खा रुपया दिला. अर्थात देताना त्यांनी तो बाईच्या (दादांची मोठी बहीण - तिला सगळे बाईच म्हणतात) हातात दिला. त्या रुपयातून बाईने दोन आण्याचा खाऊ घेतला. काय ते आता मला आठवत नाही पण तेव्हा एक पैशाला पाच गोळ्या मिळत - रेषारेषांच्या. उरलेल्या चौदा आण्यांची (आताचे ८७ पैसे) बाईने पुरचुंडी बांधली आणि आम्ही दोघं कुमजाईत (गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या मळ्याचे नाव) रताळी खणायला गेलो. रताळी खणत असताना बाईने पैशाची पुरचुंडी माझ्याकडे दिली. बाई रताळी खणायची आणि मी गोळा करायचो. एक वाफा खणून झाला आणि बाई दमली. थोडी बसली आणि नंतर रताळ्यांचे ते घमेलं उचलून आम्ही परत घरी निघालो. घमेलं अर्थात तिच्या डोक्यावर. ती मोठी होती ना!! प्रत्येक वेळी बिचारीला ते मोठेपण असे वहावे लागे. 

बरेच अंतर गेल्यावर तिने मला पैशाबद्दल विचारले आणि मी हादरलो. माझ्याकडून पुरचुंडी कुठेतरी हरवली होती. पण बाई आता मारते की काय अशी भीती मला मुळीच वाटली नाही. आम्हा सगळ्या भावंडांना बाईची भीती कधीच वाटली नाही. उलट तिचा फार मोठा आधार वाटे. अजूनही वाटतो. पण आता ती किंचितही खटटू झाली तर मात्र भीती वाटते. 

आम्ही दोघंही शेताच्या दिशेने पळत निघालो. आधीच खणलेला वाफा बाईने परत एकदा सगळा खणला. अखेरीस चौदा आणे सापडले आणि आमचा जीव भांड्यात पडला. चौदा आणे नव्हे तर आमच्यासाठी त्यावेळेस ते ब्रह्मांडच होते जणू. दोघंही खुश झालो आणि घरी परतलो. आजही चौदा आण्याची गोष्ट आठवली की बाई आणि माझे डोळे पाणावतात. चौदा आण्याला आज काहीच किंमत नाही पण त्यावेळेस त्याला किती किंमत होती हे आमचे आम्हीच जाणोत. अशा छोट्या छोट्या प्रसंगांनी आम्हा भावंडांना खूप काही शिकवले. खासकरून माझे आणि बाईचे भावाबहिणीचे नाते अजूनच घट्ट केले."

आदित्य 

Saturday, August 6, 2016

अमेरिकेतील काही आठवणी

२००९ च्या ऑगस्ट महिन्याच्या २ तारखेला मुबईहून अटलांटाला जाणाऱ्या विमानात मी बसलो. आयुष्यातला पहिलाच विमानप्रवास होता. तोही एकदम अमेरिकेत. घरच्यांना थोडी काळजी होतीच. साधारणपणे १७ तासांच्या सलग प्रवासानंतर मी अटलांटा विमानतळावर पोहोचलो. तिथून मग पुढची अजून एक फ्लाईट पकडून फायनली कॅन्सस सिटीच्या विमानतळावर पोहोचलो. 

मॅनहॅटन नावाच्या छोट्या गावामध्ये माझी युनिव्हर्सिटी होती. कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी. जुन्नरहून मी पुण्याला आलो होतो.पुण्यात ५ वर्षे काढली. आणि आता एकदम मॅनहॅटन सारख्या छोट्या गावात येऊन पडलो. पुढची २ वर्षे आपल्याला इथेच काढायची आहेत हि खूणगाठ मनाशी बांधली. माझ्या अनेक मित्रांना मी न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन मध्ये राहतो असे वाटत असे. मीही त्यांना फारसं स्पष्टीकरण देण्याच्या फंदात पडत नसे. 

मॅनहॅटन तसं फारच छोटं गाव. कॅन्सस या राज्यामध्ये कॅन्सस आणि बिग ब्लु या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं. लोकसंख्या साधारण लाखभर पण त्यातले बहुसंख्य विद्यार्थी. अशा ठिकाणी दोन वर्षे काढायची म्हणजे तसं अवघड होतं. इथे विद्यार्थी म्हणून आलेले किंवा अमेरिकेत विद्यार्थी म्हणून जवळपास सगळ्यांना येणारे काही अनुभव इथे सांगावेसे वाटतात. 

१. सुरुवातीच्या १-२ महिन्यात आपण विकत घेणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या किमतीला आपण ६५ (सध्याचा डॉलर रेट) ने गुणतो. आणि मग अरे नको फार महाग आहे म्हणून परत ठेवून देतो. मला आठवतंय पॅराशूट तेलाची छोटी बाटली ३.५ डॉलरला होती. केवळ महाग आहे म्हणून मी टी घेतली नव्हती. अर्थात एखाद महिन्यानंतर सवय होते आणि डॉलरमध्ये विचार करायला लागतो आपण. 

२. विद्यार्थी म्हणून किंवा एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीकडून ऑनसाईट आलेला असाल तरी प्रत्येकाला स्वयंपाक हा करावाच लागतो. नसेल येत तर मग भांडी घासायची तयारी असली पाहिजे. सुरुवातीला जरी अशी तयारी असली तरी काही दिवसांनी भांडी घासायचा खरोखर कंटाळा येतो. मी स्वतः स्वयंपाक करायला शिकण्याआधी ४-५ महिने फक्त भांडी घासत होतो. आता वाटतं स्वयंपाक करायला शिकून चूक काही केली नाही. 

३. कॅन्सस हे राज्य अमेरिकेमध्ये मिडवेस्ट पट्ट्यात येते. आपल्याकडे जसे कोकणपट्टा, विदर्भ, मराठवाडा असे विभाग आहेत तसेच अमेरिकेतसुद्धा आहेत. या देशात तर वेगवेगळे टाईम  झोन आहेत. मग त्यात ईस्टर्न टाईम, सेंट्रल टाईम, माऊंटन टाईम असे प्रकार आहेत. सांगायचा मुद्दा हा या मिडवेस्ट प्रातांतले लोक मला फार मनमिळाऊ वाटले. रस्त्यावरून जाताना कोणी दिसलं तर ओळख असो नसो ते तुमच्याकडे पाहून हसणार. "Hey, How are you doing?" असं विचारून तुमच्या उत्तराची वाट ना पाहता पुढे चालू लागणार. या सगळ्याचं सुरुवातीला आश्चर्य वाटलं मला. मग सिनियरला विचारलं तेव्हा त्याने काय नक्की फंडा आहे ते समजावून सांगितलं. 

४. लोकांना भारताबद्दल प्रचंड उत्सुकता असते. दिल्लीमध्ये झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे नाही तर एक चांगला देश म्हणून भारताकडे बघणारे लोक जास्त आहेत. अशा वेळेस किंवा भारताचा स्वातंत्र्यदिन अमेरिकेत साजरा करताना आपण भारतीय असल्याचा फार अभिमान वाटतो. 

५. आपले सण साजरे करायला मजा येते. बऱ्याच ठिकाणी दिवाळी, नवरात्री हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. पण नेमकं त्याच दरम्यान घरच्यांशी स्काईपवॉर कॉल होतो आणि घरची आठवण मन अस्वस्थ करते. 


६. तुमचा लॅपटॉप हा तुमची लाईफलाईन असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. लोक अक्षरशः त्यांच्या लॅपटॉप बरोबर झोपतात. सकाळी उठल्याबरोबर लॅपटॉप उघडून इमेल, फेसबुक, बातम्या चेक करतात आणि मग दिवस सुरु होतो. अलीकडे लॅपटॉपची जागा आयपॅडने घेतलेली दिसते. 

७. आपण स्वतः दुसऱ्या देशातून अमेरिकेत शिकायला आलेलो असल्याने, बाकी कोणकोणत्या देशातून इथे विद्यार्थी येतात याची आपोआपच माहिती होते. प्रत्येक देशाच्या विद्यार्थ्यांची एक ऑरगनायझेशन असते. बऱ्याचदा तुम्ही इतर देशांच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांना जाऊन बसता. 


८. जगात कुठेही गेला तरी भारतीय माणूस क्रिकेट खेळल्यावाचून राहू शकत नाही. मग अगदी घरातल्या छोट्याश्या जागेत का होईना क्रिकेट खेळायला मार्ग शोधला जातो. मोठ्या शहरांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान असे सामने देखील होतात. बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळायला बेसबॉलच्या मैदानाचा वापर केला जातो. २०११ चा वर्ल्ड कप भारताने जिंकला तेव्हा केलेला जल्लोष अजूनही आठवतो मला. 

९. अमेरिकेत आलात म्हटल्यावर अमेरिकन लोकांच्या आवडीनिवडी कळणारच. अमेरिकन फुटबॉल हि त्यातलीच एक गोष्ट. अमेरिकन फुटबॉल न आवडणारा अमेरिकन माणूस शोधावा लागेल इतका हा खेळ इथे लोकप्रिय आहे. एखाद्या अमेरिकन माणसाबरोबर संवाद साधण्यासाठी अमेरिकन फुटबॉलचा ice breaker म्हणून छान वापर करता येतो. 

माझा मॅनेजर हा एक फुटबॉल खेळाडू होता. मग त्याचे लक्ष कामावरून जरा दुसरीकडे करण्यासाठी मी आणि माझा सहकारी फुटबॉलबद्दल बोलत असू. आपसूकच तो आमच्या चर्चेमध्ये सामील होत असे. 

१०. विद्यार्थी असताना उन्हाळे अतिशय आळसावलेले असतात. कॉलेजला सुट्टी असते. रिसर्चचं काम असलं तरी समर असल्याने तुमचा प्रोफेसरसुद्धा थोडी सूट देतो तुम्हाला. याच दिवसांमध्ये मग बरंच फिरणं होतं. बरेच चित्रपट, मालिकांचे एपिसोडच्या एपिसोड एकामागोमाग एक पहिले जातात. त्याबद्दल मग मित्रांमध्ये शेखी मिरवली जाते की मी अमुक एक सिरीजचे अमुक सीझन्स एका रात्रीत संपवले आणि अजून काय काय. 

११. ट्रॅफिकचे नियम पाळण्यावाचून पर्याय नसतो. इथल्यासारखी चिरीमिरी देऊन प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होऊन तुरुंगाची हवा खाण्याची वेळीसुद्धा येऊ शकते. बर नियम मोडल्यानंतर भराव्या लागणाऱ्या दंडाची रक्कम प्रचंड असते त्यामुळे तसं न केलेलं जास्त शहाणपणाचं ठरतं. 

१२. अमेरिकेत गाडी चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची पद्धत आहे. पादचारी रस्ता क्रॉस करत असतील तर वाहने थांबून राहतात. भारतात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस असं केल्याबद्दल मी शिव्या खाल्ल्या आहेत. 

१३. तुम्ही थँक यु म्हणायला शिकता. अमेरिकेत शिकलेली  ही एक फार चांगली गोष्ट. येता जाता तुम्ही तुमच्यासाठी एखाद्याने केलेल्या छोट्या गोष्टीसाठीसुद्धा मनापासून थँक यु म्हणता. समोरच्याला सुद्धा बरं वाटतं. 

१४. अमेरिकेतील सेल हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. इथे लेबर डे, ब्लॅक फ्रायडे, ख्रिसमस अशा प्रसंगी मोठे सेल लागतात, या सगळ्यांत ब्लॅक फ्रायडेचा सेल सगळ्यात जास्त प्रसिद्ध. तो यासाठी की या सेलसाठी लोक १-२ दिवस आधीच रांगा लावायला सुरुवात करतात. यात फक्त आपलेच नाही तर अमेरिकन लोकसुद्धा असतात. बरं एकदा रांग लागली के ती शिस्त मात्र कोणी मोडत नाही. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी अगदी कचऱ्याच्या भावात मिळतात असं म्हटलं तरी चालेल. मग घरी येऊन भारतामध्ये असे सेल होणं कसं शक्य नाही वगैरे गप्पा मित्रांबरोबर मारल्या जातात. 

१५. वडा पाव, पाणीपुरी, भेळ असे रस्त्यावर मिळणारे पदार्थ अचानक दुर्मिळ होतात. आणि मग भारतीय जेवण कसं जगातलं भारी जेवण आहे यावर चर्चा झोडल्या जातात. 


१६. परीक्षांमध्ये कॉपी करण्याचा विचारसुद्धा तुमच्या मनाला शिवत नाही. कारण होणारे परीणाम खूप गंभीर असतात. चंबूगबाळ उचलून देशात परत येण्याची वेळ येऊ शकते. बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेस वर्गात पर्यवेक्षकदेखील नसतात. तरीही कोणी कॉपी करत नाही. आपल्याकडे हे कदापि शक्य नाही. 

१७. तुम्ही सहसा सगळे लेक्चर्स अटेंड करता. आपल्यासारखे प्रायव्हेट क्लासेस नाहीत तिकडे. त्यामुळे एकदा शिकवलेलं कळलं नाही तर होणारा त्रास जास्त असतो. 

१८. नकळतपणे तुमच्या इंग्लिश बोलण्याला अमेरिकन अक्सेंट येतो. आणि मग तुमचे भारतातले मित्र तुम्हाला तसे सांगतात आणि तुम्ही सतत ते नाकारत राहता. 

१९. तुम्ही भलेही मॅनुफॅक्चरिंग इंजिनियर असाल पण अमेरिकन लोकांसाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियरच असता. 


२०. भारतीय विद्यार्थी राहत असलेल्या प्रत्येक घराच्या टॉयलेटमध्ये एक मग असतो. आपल्याकडे टॉयलेट पेपर सहसा वापरला जात नाही म्हणून. 

मला खात्री आहे मी वर लिहिलेल्या मुद्द्यांशी अमेरिकेत शिकायला गेलेला प्रत्येक विद्यार्थी सहमत असेल . या यादीमध्ये अजूनही काही गोष्टी मी ऍड करत राहीन. सध्या थांबतो

Friday, July 29, 2016

सडकेवर

दादांच्या कॉलेजचा प्रसंग वाचल्यानंतर बऱ्याच जणांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्या. पुढे लिही असं प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी. त्यातून मग पुढचा प्रसंग लिहावा असा विचार मनात आला. दादांकडून तो विचारून घेतला. एक दिवस संध्याकाळी बसलो दोघं जण आणि त्यांना म्हटलं बोला. दादा सांगू लागले. 

" पैशाची अडचण आल्याने सिडनहॅम कॉलेजला ऍडमिशन न घेता थोरांदळ्याला यायची वेळ आली. माझ्या नशिबाने त्याच वर्षी मंचरला कॉलेज सुरु झाले होते. मंचर कॉलेजला पुढच्या वर्षी जाऊ असा विचार होता डोक्यात. त्यासाठी पैसे जमवायला सडकंवर कामाला जाऊ लागलो. तिथं कामाची काय पद्धत आहे हे गेल्याशिवाय कळणार नव्हतं. एक दिवस भाकरी बांधुन गेलो. त्या कामावर त्या वेळेस वसंत पाटिल (ह्यांची आणि दादांची नंतर फार चांगली मैत्री झाली) मुकादम होते. ते म्हणाले, " आपल्याकडं काम कर तू." फार नंतर मग वसंत पाटिल मला आदरार्थी संबोधू लागले. 

मग काय मी कामाला सुरुवात केली. दुपारी सुट्टी झाली तेव्हा जेवलो आणि संध्याकाळी घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत आलो कामावर. कामावरच्या आया बायांनी मला पाहिलं आणि म्हणाल्या, " ए बाळा तू आजयं आला रं?"
मला प्रश्न पडला की त्यांना कसं सांगायचं. वेळ मारून न्यायला मी म्हटलं, " आलोय असाच. सुट्टीये मंग करावं काम म्हटलं."
"बरं कर कर कर!!" असं त्या म्हणाल्या. नाही म्हटलं तरी माझ्याविषयी सहानुभूती होती. माझी आई गेली होती आणि शाळेतही  थोडा चांगला होतो मी. त्यामुळे लोक थोड्या प्रेमाने वागवायचे मला. कामावर असताना मग घमेलं भरताना त्यात दोन खोरी कमी टाकणार, धावपळीच्या ठिकाणी मला ठेवणार नाहीत हे असं सहकार्य मला मिळत राहिलं. 


दुपारच्या जेवायच्या सुट्टीपर्यंत पोटात भुकेची आग पेटलेली असायची. जवळ कुठे सावली नसायची.आम्ही सगळे एका पानं गळून पडलेल्या बाभळीच्या झाडाला आमची डब्याची गाठोडी बांधत असू. त्या वेळेस कसले स्टीलचे डबे आले. एका फडक्यात भाकरी आणि चटणी बांधून मी नेत असे. उन्हात कोळून भाकरी पार कडक होऊन जाई. मग ताकद लावायची आणि चुरायची पितळीमध्ये. कालवण घेतलं की वाळलेली भाकरी ते पटकन शोषून घ्यायची. मग दुसऱ्या कोणाचं तरी घ्यायचं आणि पुन्हा जेवायला सुरुवात. एक पितळी सहज जायची. 


जेवायच्या वेळेपर्यंत धुळीतच काम केलेलं असायचं. ती धूळ सगळी पायावर साचत असे. त्या वेळेस पाण्याचा सुद्धा प्रचंड तुटवडा असे. मग कसलं पाय धुणं आणि कसलं काय. तसंच आम्ही जेवायला बसत असू. मांडी घालून बसलं की पोटरी आणि मांडीच्या मध्ये घाम यायचा. आणि घाम आलाय हे कळायचं पण त्याचं काही वाटत नसे. उठून उभं राहिलं की पोटरी आणि मांडीला एक त्रिकोणी पट्टा येई. तो सुकला की आधीच पायावर असलेल्या धुळीने बुरशी आल्यासारखं दिसत असे. पण त्याचं काही वाटत नसे. संध्याकाळी घरी गेल्यावर हात पाय धुवेपर्यंत एखादा दागिना मिरवावा असा तो त्रिकोणी पट्टा लोक मिरवत असत. 


या कामावर असताना साहेब कधी येतो याची सगळे वाट पाहायचे. का?? तर तो आला की आपण त्याला काम  करताना दिसलं पाहिजे. नाहीतर काम जाईल याची भीती असायची. हजेरीवाला माणूस लक्ष ठेवायचा आणि काम नाही केलं की खाडा मांडीन अशी धमकी द्यायचा. तो आपल्याकडून जास्त काम करून घेतोय हे लवकरच लक्षात आलं माझ्या आणि त्याचा उलगडा पगाराच्या दिवशी झाला. पगाराच्या दिवशी भलतीच ४-५ माणसं येऊन रांगेला ऊभी राहिली. आमच्या अगोदर त्यांची नावं पुकारली गेली. इतर कोणी काही बोलत नसे. पण मी थोडा शिकलेला असल्याने मला उत्सुकता होती. त्यांनी आपापले पैसे घेतले आणि बाजूला जाऊन साहेबाला त्याचा वाटा काढून दिला. आणि गायब झाले. कामाला २० माणसं असायची पण हजेरीपटावर ३० लोकांची नावं यायची. नंतर कधीतरी त्या साहेबाला नोकरीवरून काढून टाकल्याचं मला कळलं.

या कामादरम्यान एक दिवस मी रांजणीला रेशनची साखर आणायला गेलो. आणि आधीच्या प्रसंगामध्ये सांगितलेले मारुती भिमाजी भोर मला तिथे भेटले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझं मंचर कॉलेजला ऍडमिशन झालं आणि मी काम सोडून दिलं. हे काम कष्टाचं होतं. घरी गरीबी होतीच पण कष्टाशिवाय पर्याय नाही हा धडा मात्र मला या कामावर मिळाला."

पुढचे कॉलेजचे प्रसंग आठवतील तसे तुला सांगत जाईन असं म्हणून दादा थांबले. 

Saturday, July 16, 2016

दादांचं कॉलेज

आज संध्याकाळी दादांबरोबर गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता पोर्शे इंडियाचा डायरेक्टर पवन शेट्टीचा विषय निघाला. मी - दिवसापूर्वी त्याच्याबद्दल वाचले होते. दादांना मी त्याच्या वाटचालीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजला एमबीए केल्याचं मी दादांना सांगितलं. ते ऐकून दादांनी मला थांबवलं आणि म्हणाले, "मी मध्येच तुला थांबवतोय पण हे ऐक."

मी त्यांना म्हटलं बोला. दादा बोलू लागले

"माझी अकरावी संपल्यानंतर मी मुंबईला गेलो. त्यावेळी दहावी नसायची. माझ्या डोक्यात मुंबईला जाऊन कॉलेजला ऍडमिशन घ्यायची हा विचार होता. मुंबईमध्ये मी आपल्या गावच्या एका माणसाकडे राहायला होतो. मारुती खेबडे नाव त्याचं. फार भला माणूस होता. वेळ मिळेल तेव्हा मी त्याच्याशी बोलत असे. त्याने मला सांगितलं की तू सिडनहॅम कॉलेजला जा. मी माझी सगळी कागदपत्र घेऊन गेलो. त्यावेळेस पॅन्ट माहीतच नव्हती आम्हाला. पायजमा आणि शर्ट हाच आमचा वेष असे. त्याबद्दल लाजही वाटत नसे.  मी आपला जाऊन रांगेत उभा राहिलो. मला पायजमा आणि शर्टमध्ये पाहून आजूबाजूचे लोक आपसांत बोलू लागले. बर ते इंग्लिशमध्ये बोलत. मला कळायचं की हे आपल्याबद्दल बोलत आहेत. पण मला स्वतःला इंग्लिश बोलता येत नव्हते. मग आपला गप्प राहिलो. नंबर आल्यावर आतमध्ये गेलो. माझी कागदपत्रे टेबलावर बसलेल्या बाईच्या हातात दिली. मला ६८ टक्के होते. त्यावेळेस ते मार्क खूप असत. माझे मार्क पाहून तिने आश्चर्याने मान वर केली आणि म्हणाली, "अरे!! ६८ है तुझे. मिलेगा तुझे." मी तिला फी विचारली. फी ३०० रुपये होती. माझ्याकडे तेव्हा कसले बोंबलायला आले ३०० रुपये. मी तिला म्हटलं मी उद्या येतो आणि बाहेर पडलो. बाहेर आल्यावर सगळ्यांनी मला गराडा घातला आणि म्हणाले, "बहोत अच्छा मार्क मिला है." १५ मिनिटांपूर्वी जे लोक मला हसत होते तेच आता माझ्याभोवती गराडा घालून माझं कौतुक करत होते. तेव्हा मला स्वतःचाच फार अभिमान वाटला. घरी येऊन मी खेबड्याला सांगितलं की ३०० रुपये फी आहे. खेबडे तेव्हा एका ऑफिसात शिपाई होते. त्याने त्याच्यापरीने प्रयत्न करून मला ६० रुपये गोळा करून दिले. पण ते पुरेसे नव्हते. मग काय.. मी आपला थोरांदळ्याला परत आलो आणि सडकंवर कामाला जायला लागलो. त्या कामाचे जे पैसे मिळतील त्या पैशातून पुढच्या वर्षी मंचर कॉलेजला जायचं असा विचार होता डोक्यातसडकेवरच्या कामाचा अनुभव तुला परत कधीतरी सांगेल.  

एक दिवस रेशनची साखर आणायला रांजणीला गेलो. रांगेत माझा नंबर आला. मी पुढं होऊन रेशनवाल्याच्या हातात कार्ड दिलं. त्याचं नाव मारुती भिमाजी भोरत्याने कार्ड घेतलं आणि लांब फेकून दिलं. मला कळाना काय झालं. लोकं म्हणाली अहो त्या पोराचा नंबर आहे. द्या की त्याला साखर. तो काय ऐकेना. वर लोकांना सांगत होता की तुम्ही आपली साखर घ्या आणि चालू पडा. सगळे लोक गेल्यावर त्याने मला विचारलं. "तुझं नाव काय रे?" 

मी नाव सांगितलं.

"तू आत्ता कुठं असायला पाहिजे?"

मी म्हटलं, "सडकंवर". 

"गप्प. कॉलेजला का जात नाही?"

मी -"पैसे नाय फी भरायला." 

"घरी कारभारी कोण आहे?"

मी - "चुलता"

"मी उद्या येणार आहे तुमच्या गावात. तिथं भेट मला."

बरं म्हणून मी आपला घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गावातल्या पारावर खेळत होतो. थोड्या वेळात मारुती भोर येताना दिसला मला. तो शाळेत गेला. पुढच्या  मिनिटांत मला गुरुजींनी बोलावलं आणि सांगितलं तुझ्या चुलत्याला बोलावून घे. मी पळत घरी आलो. दादांना सांगितलं गावात मारुती भिमाजी आलाय. त्याने तुम्हाला बोलावलंय. दादा लगेच निघाले. शाळेत आल्यावर मारुती भिमाजी त्यांना म्हणाला, "तुम्ही घरचे कारभारी का?" 

दादांनी होकारार्थी मान हलवली

"हा पोरगा कॉलेजला गेला पाहिजे."

हं म्हणून मी आणि दादा घरी निघालो. येताना दादांनी एक पोस्टकार्ड घेतलं. घरी येऊन ते कार्ड माझ्यासमोर टाकून म्हणाले, "लिही". 

ते सांगत गेले ते मी लिहीत गेलो. - दिवसांनी एक माणूस घरी आला आणि मला हाक मारली. मी जवळ गेल्यावर त्याने खिशातून शंभर रुपयांची नोट काढून मला दिली आणि म्हणाला, " हे घे आणि काय कुठं झक मारायची ती मार." मुंबईहून नानांनी (मुंबईचे चुलते) त्याच्याकडे ते शंभर रुपये पाठवले होते

ते पैसे घेऊन मी मंचर कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि माझं कॉलेज सुरू झालं. मध्ये मारुती भिमाजी गेले. मला मात्र ते कळलं नाही. नंतर कुणीतरी सांगितलं तेव्हा मात्र मला फार वाईट वाटलं. अजूनही माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा माणूस म्हणून मी त्याचा उल्लेख करतो."