Monday, November 14, 2016

पुना हरी

"रोजच्या सारखा मी बँकेत काम करत होतो. नुकतेच व्यवहार सुरु झाल्याने जरा वर्दळ होती. तेवढ्यात मावळी हेल काढत एक आवाज माझ्या कानावर पडला. जरा डोकं उंच करून पाहिलं तर एक म्हातारा सेविंग्ज काउंटरला सांगत होता, "ए सायबा, उलीसं पैसं ठूयाचत आन पुस्ताक काढायचंय." 

बँकेतल्या काही निवडक आठवणी सांगताना दादा ही एक आठवण सांगत होते. 
 
"डोईवर मळके पागोटे, काळा रंग अशी ठेंगणी मूर्ती मला दिसली. काउंटरवाला माणूस फार लक्ष देत नाहीये हे एव्हाना त्या म्हाताऱ्याच्या लक्षात आलं होतं. माझी त्याला न्याहाळणारी नजर नेमकी त्याने पकडली आणि माझ्याकडं आला. त्याच्या वयामुळे म्हणा किंवा अजून काही कारणामुळे पण नकळतपणे मी उभा राहिलो. म्हातारा परत तेच पालुपद लावत मला म्हणाला,

"सायबा, उलीसं पैसं ठूयाचत."

मी उशीर न करता फॉर्म काढला आणि विचारलं, "नाव काय बाबा?" 

"पुना हरी पारधी."

"गाव?"

"हातज" 

"हातज म्हणजे हातवीज. माझ्या जुन्नरच्या तोपर्यंतच्या वास्तव्यात मी हातवीजपर्यंत गेलो नव्हतो. याला आता जुन्नरमध्ये कोण ओळखदार मिळणार म्हणून ती सही मीच केली. फॉर्म भरून झाला आणि इंकपॅड काढून त्याच्यासमोर ठेवत मी म्हटलं,

"द्या अंगठा."

त्याला सही करा असं म्हणणं म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखे होते. पैसे भरायची स्लिप काढली अन त्याला विचारलं,

"किती पैसे भरायचेत बाबा?"

बाबा म्हणाला, "पाच रुपये."

"मी रकमेचा आकडा टाकून स्लिप त्याच्या हातात दिली आणि पैसे कॅशियरला द्यायला सांगून पासबुक तयार करायला लागलो. पैसे भरून होताच तो माझ्याकडे आला. तयार करून ठेवलेलं पासबुक पुढं करत मी त्याला सांगितलं, "दर वेळेस बँकेत येताना हे पुस्तक घेऊन यायचं. हरवलं तर घाबरायचं नाही."

म्हाताऱ्याचा चेहरा उजळला. काहीतरी मोठं पदरात पडल्यासारखं करत त्याने ते पासबुक कोपरीच्या आतल्या खिशात ठेवलं (लपवलं म्हणू हवं तर). काउंटर वरून निघत मला म्हणाला, 

"येऊ का बाळा? लांब जायाचं मला. गाडी मिळाया पाहिजेल आन पुढं एक डोंगर चढायचाय"

त्याला अलविदा करून मी परत कामाच्या  रगाड्यात गुंतून गेलो. 

दुसऱ्या दिवशी सकाळीच पुना हरी बँकेत हजर. त्याला पाहताच माझा एक सहकारी खवचटपणे बोलला, 

"ए गुंड तुझं गिऱ्हाईक आलं बघ."

मी त्या दिवशी कॅशला होतो. त्याची नजर भिरभिर फिरत मला शोधत असल्याचं मला जाणवलं आणि त्याला आवाज देत मी म्हटलं, 

"बाबा मी इकडं आहे."

आवाजाच्या दिशेने तो आला आणि म्हणाला, 

"आरं पैसं भरायचंत. भाईर ये ना."

मी कॅशमधून बाहेर येत त्याच्या दिशेने गेलो. त्याला बसायला खुर्ची दिली. मग हळूच इकडे तिकडे बघत त्याचा हात खिशाकडे गेल्याचं मी पाहिलं. मनात कदाचित भीती असावी त्याच्या. त्याने पैसे माझ्यासमोर काढून ठेवले. मला म्हणाला, 

"हं मोज."

"मी पैसे मोजून संपवले तर बरोबर सहा हजार रुपये होते. १९७८ साली सहा हजार रुपये रोख म्हणजे विचार कर तू."

"मी त्याच्यासमोर बसून चलन भरले. पैसे जमा करून त्याला पावती दिली. पासबुकवर नोंद करून त्याला दाखवत म्हंटल, 

"सहा हजार पाच."

"बरं झालं बाबा देवासारखा भेटला तू." असं बोलून तो निघून गेला. 

"माझे सहकारी गार झाले होते आणि मॅनेजर खुश होते. तेव्हापासून पुना हरीचा प्रत्येक व्यवहार माझ्या हातानेच करायचा असा जणू रिवाज पडून गेला."

"१९८७ ला माझी बदली झाली आणि मी आपटाळे शाखेला गेलो. एक दिवस पुना हरी नेहमीप्रमाणे जुन्नरला बँकेत गेले. त्यांनी मला शोधलं पण मी नव्हतोच तर त्यांना दिसणार कसा. बाकी सहकाऱ्यानी माझी बदली आपटाळ्याला झाल्याचं त्यांना सांगितलं."

"मपलं सगळं पैसं द्या." मी नाही हे पाहून त्यांनी बँकेत असा तगादा लावला. 

"सगळ्या स्टाफने त्यांना समजावलं. मॅनेजर स्वतः बाहेर येऊन त्यांच्याशी बोलले पण व्यर्थ. शेवटी रीतसर त्यांचं खातं बंद करून सगळी रक्कम त्यांच्या हातात देण्यात आली."

"लगेच गाडी पकडून पुना हरी आपटाळ्याला आले. बँकेत येऊन मला गाठलं आणि म्हणाले,

"आरं तू इकडं आला मला कसं कळायचं. तिकडं नाय ठुवायचं पैसं. घिवून आलो सगळे. हे घे आन तुला कसं ठुवायचं ते तू पघ. आयला बरं झालं जवळ आली बँक."

"परत एकदा खाते उघडायचे सोपस्कार पार पाडत मी त्यांच्या हातात पासबुक ठेवलं आणि म्हटलं, 
"आता इथंच येत चला."

"ए बाळा, आता दमलो मी डोंगर चढायचा आन उतरायचा म्हणजे झेपत नाही मला." पुना हरी म्हणाले, "पोराच्या नावानी कर सगळं."

बापाचं मन बोलत असल्याची जाणीव मला झाली आणि त्यांना मी त्यांना म्हंटलं, 

"पुढच्या वेळेस येताना त्याला घिवून या एक डाव. म्हयी मंग तुम्हाला यायची गरज नाही." मी त्यांच्यासारखंच बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या त्या बारीक मिशीखाली हसू तरळल्याचं मला जाणवलं."

नंतर परत माझी बदली झाली. पुना हरींनी काय केले असेल कोणास ठाऊक. पण इतक्या वर्षांनंतरही पुना हरी हे नाव मी विसरू शकत नाही. खेड्यापाड्यातच नव्हे तर अगदी शहरात सुद्धा बहुधा बँकवाल्यांना "साहेब" संबोधतात. पुना हरींच्या लेखी मात्र मी "बाळ" होतो. आणखी काय हवं?"

तसं पाहता दादांनी विशेष काही केलं नव्हतं. फक्त बँकेत आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला ओळख दिली होती. पण त्यामुळे बँकेचं डिपॉझिट वाढलं, त्या माणसाची वणवण वाचली. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे हेच काहीतरी असावं असा विचार करत मी दादांच्या खोलीतून बाहेर पडलो. 





No comments:

Post a Comment