Tuesday, February 9, 2016

आबा


आबांची आणि माझी भेट २०१३ मधल्या डिसेंबर महिन्यात झाली. माझा एक अमेरिकन मित्र आणि मी दोघांनी पुण्याला येण्यासाठी आबांची गाडी भाड्याने घेतली होती. मुंबई ते पुणे या प्रवासामध्ये मला आबांच्या ड्रायविंगबद्दल एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे आबांचे गाडी चालविण्याचे कौशल्य अतिशय चांगले होते. उगाच खूप जास्त वेगही नाही किंवा अगदी कूर्मगतीसुद्धा नाही. मला हे आवडलं.

माझा मित्र फक्त २ आठवड्यांसाठी पुण्यात होता आणि काही कारणास्तव त्याला मुंबईला सोडायला जाणे मला जमणार नव्हते. पुण्यात पोहोचल्यावर मी आबांना विचारलं की दोन आठवड्यानंतर त्याला परत मुंबईला सोडणार का? आबांनी होकारार्थी मान डोलावली आणि मला जायच्या एक दिवस अगोदर फोन करायला सांगुन घरी गेले.
ठरल्याप्रमाणे मी आबांना एक दिवस आधी फोन करून येण्याची वेळ सांगितली आणि दुसऱ्या दिवशी आबा ठरलेल्या वेळेस हजर झाले. माझ्या मित्राला मुंबई विमानतळावर सोडल्यानंतर आबांनी मला फोन केला आणि माझ्या मित्राला सोडल्याचे मला सांगितले. त्यानी फोन मित्राकडे देऊन माझे आणि त्याचे बोलणेदेखील करून दिले. त्यांची हि सगळी वागणुक मला आवडली आणि मी माझ्या ऑफिसच्या ट्रिप्ससाठी आबांनाच बोलवायचं हे मनामध्ये ठरवून टाकलं.
कामानिमित्त माझे बऱ्याचदा मुंबईला जाणे होते. प्रत्येक वेळी मी आबांना फोन करून निघायची वेळ कळवतो. आजतागायत आबा कधीही उशिरा आलेले नाहीत. अशाच एका मुंबई ट्रीप दरम्यान आबांनी मला नुकताच घेतलेला त्यांचा स्मार्टफोन दाखवला आणि तो वापरण्यासाठी काही टिप्स मागितल्या. मी माझ्या परीने त्यांना शिकवलं.
साधारण एक-दोन आठवडे गेल्यानंतर आबांनी मला विचारलं, "सर फेसबुक काय असतं?"
मी त्यांच्याकडे आश्चर्य आणि कौतुकाने बघून त्यांना फेसबुक म्हणजे नक्की काय असतं, ते कसं वापरायचे हे सांगितले. मग आबा लगेच म्हणाले, "माझं पण अकाउंट तयार करून द्या."
मग मी आबांना त्यांचे फेसबुक अकाउंट तयार करून दिले. त्यांना फोटो कसे अपलोड करायचे, इतरांचे फोटोज लाइक कसे करायचे, फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवायची हे शिकविले. हळूहळू आबा फेसबुक वापरायला शिकले आणि आता ते अगदी एक्स्पर्ट झालेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
काही महिने गेल्यानंतर एक दिवस आबांनी मला विचारले, "सर तुम्ही ओला आणि उबर कॅब मध्ये फिरता. त्यांची काय सिस्टीम असते?"
पुन्हा एकदा आबांच्या कुतुहलाचे कौतुक करत मी त्यांना त्याबद्दल माहिती दिली आणि शक्य झाल्यास तोही जोडधंदा सुरु करावा असे सुचविले. आबा आधीपासून आपली गाडी भाड्याने देत होते. त्यातून कमाई देखील पुरेशी होत होती. पण काही दिवस असे यायचे की कोणतीच ट्रीप नसायची. मग आख्खा दिवस घरीच जायचा. आता तो प्रश्न पडत नव्हता. जेव्हा घरी असतील तेव्हा आबा दिवसभर ओला आणि उबरच्या ट्रिप्स करतात त्यामुळे काम तर आलंच पण थोडाफार पैसा शिल्लक राहु लागला.
मला तामिळ गाणी ऐकायची आवड आहे. अशाच एका मुंबई पुणे ट्रीप मध्ये आबांनी आपला पेन ड्राईव माझ्याकडे दिला आणि म्हणाले, "यात काही तमिळ गाणी टाकून द्या मला."
मी नेहमीप्रमाणे चकीत होऊन, "तुम्हाला सुद्धा तमिळ गाण्यांचा नाद लागला की काय?"
आबा - "नाही नाही तसं नाही. माझ्याकडे कधीकधी दक्षिण भारतीय लोक सुधा येतात. त्यांना ऐकायला गाडीमध्ये ही गाणी लावली तर त्यांना बरं वाटेल."
आबांच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे कौतुक करून मी त्यांना ही तमिळ गाणी दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघात विम्याचे महत्व बऱ्याच शिकलेल्या माणसांनासुद्धा कळत नाही. पण आबांनी बऱ्याच आधी आपला स्वतःचा अपघात विमा काढून घेतलेला आहे आणि आपल्या इतर ड्रायव्हर मित्रांना देखील त्यांचे महत्व जमेल तेव्हा पटवून देत असतात.
सगळं काही व्यवस्थित चालू असताना एक दिवस आबांनी मला पुण्याजवळच्या एका गृहप्रकल्पाचे ब्रोशर दाखवले. उत्सुकता म्हणून मी आबांना विचारले, "कोणासाठी बघताय फ्लॅट?"
आबा म्हणाले मीच घेतोय. अतिशय आनंदाने त्यांचे अभिनंदन करून मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फ्लॅट बुक केल्यानंतरच्या आमच्या भेटीमध्ये आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह केवळ अवर्णनीय होता. त्या दिवशी खरोखर मला आबांच्या जिद्दीचा आणि कष्टाळू वृत्तीचा अभिमान वाटला.
माझ्यासाठी आबा हे निश्चित एक यशस्वी व्यावसायिक किंवा अगदी आपल्या इंग्रजीमध्ये सांगायचे झाले तर Successful Entrepreneur आहेत.

No comments:

Post a Comment