दोन स्पेशल पाहून आता जवळजवळ तीन आठवडे झाले. लिहायला आज वेळ मिळाला.
बरचं ऐकलं होतं या नाटकाबद्दल पण वेळ काही मिळत नव्हता. अखेरीस थोडी ओढाताण करून जमवलं. पडदा वर गेला आणि सेट पाहून मन सुखावलं. अतिशय साधा सेट. अर्थात नाटकाच्या विषयाला शोभेल असा.
ही कथा आहे मिलिंद भागवत आणि स्वप्ना जोग या दोघांची. उमेदीच्या काळात दैनिक हिंदुस्थानसाठी काम करताना त्यांच्यात झालेली जवळीक आणि नंतर काही कारणास्तव झालेली ताटातूट. त्याच वृत्तपत्रामध्ये अनेक खस्ता खात आता उपसंपादक पदावर पोहोचलेला मिलिंद. आणि एका खाजगी बांधकाम कंपनीमध्ये काम करणारी स्वप्ना.
शहरामध्ये झालेला एक अपघात या दोघांना पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आणतो. मिलिंदने लिहिलेल्या एका बातमीमध्ये असलेली तीन वाक्ये काढण्यासाठी स्वप्नाने केलेले प्रयत्न आणि आपल्या तत्वांशी तडजोड न करणारा मिलिंद. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक या दोघांनी आपापल्या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे.
नाटकाचे संवाद सुद्धा कौतुक करावे असेच. मिलिंदचा सहाय्यक उमेश भोसले हा लहान मुलांना रात्रशाळेमध्ये शिकवत असतो. एका प्रसंगामध्ये मी मुलांना पेपर सुद्धा वाचायला लावतो असं तो मिलिंदला सांगतो. त्यावर मिलिंद विचारतो, "सकाळचा पेपर इतक्या रात्री वाचतात ती मुलं?" त्यावर उमेश म्हणतो, "शिळ्या अन्नावर जगणाऱ्या त्या पोरांना ताज्या पेपरचं असं काय ते कौतुक?" या वाक्यानंतर प्रेक्षगृहामध्ये माझ्या मागे आणि पुढे बसलेल्या समस्त स्रीवर्गाकडून आई गं, काय ना अशा नानाविध प्रतिक्रिया कानावर आल्या. असे अनेक संवाद या नाटकाची मजबूत बाजू ठरलेले आहेत.
१९८९ सालात घडलेली कथा असल्याने त्याला साजेसं असं सगळं असणं फार गरजेचं होतं. दिग्दर्शक नेमका तिथे जिंकला आहे. याच वर्षी नेमका कयामत से कयामत तक प्रदर्शित झाला होता. एका प्रसंगात रेडिओवर "गझब का है दिन" हे गाणं वाजलं. त्याक्षणी मी टाळ्या वाजवल्या. बायकोला कळेना काय झालं. तिला मग सांगितलं की १९८९ सालात घडतंय नाटक आणि बरोबर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं गाणं वाजतंय. हे ध्यानात ठेवलंय याचं कौतुक आहे मला.
अजून दोन आवडलेल्या गोष्टी म्हणजे नाटकाची प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत. ज्या काळामध्ये ट्युबलाईट फारशा वापरात नसत त्या काळात नाटक घडत असल्याने सबंध नाटकभर बल्बचा प्रकाश जाणवत राहतो. वर्तमानपत्राचे कार्यालय रस्त्याला लागून असावं असं प्रेक्षकांना सतत वाटत राहावं म्हणून अधून मधून येणारे वाहनांचे आवाज. स्वप्ना जात येत असताना येणारा रिक्षाचा आवाज आणि तीच रिक्षा दूर जात असताना कमी होत जाणारा आवाज हे फार शिताफीनं हाताळलेल आहे.
एका प्रसंगामध्ये मिलिंद भर पावसामध्ये बसची वाट पहात उभा असतो. त्याचवेळेस त्याचा एक जुना मित्र कारमधून जात असताना त्याला पाहतो आणि आपल्या कारमध्ये बसायला बोलावतो. मिलिंद कारमध्ये बसल्या बसल्या बंद झालेला पावसाचा आवाज आणि त्याचबरोबरीने कारच्या टपावर पडून पावसाच्या थेंबांचा येणारा आवाज. हे सगळे बदल प्रेक्षकांना लक्षात सुद्धा येणार नाहीत इतक्या सहजतेने केलेले आहेत.
वर्तमानपत्राचे कार्यालय म्हणजे प्रिंटींग प्रेस पाहिजेच. सबंध नाटकभर कार्यालाच्या मागे असणाऱ्या प्रेसमधून छपाईचा येणारा आवाज सतत जाणवत राहतो. मिलिंदाने फोन करून प्रेस थांबवा असे सांगितल्यावर बंद झालेला छपाईचा आवाज एक वेगळीच शांतता निर्माण करतो. दर ५-१० मिनिटाला वाजणारा टेलीप्रिंटर, जुन्या काळातला बोटाने फिरवून नंबर लावावा लागणारा फोन हे सगळं अगदी कथेमध्ये चपखल बसणारं.
बऱ्याच दिवसांनी एक चांगल नाटक पाहायला मिळालं अशी दादही आमच्या आई वडिलांनी दिली. ज्या अपेक्षा घेऊन नाटक पाहायला गेलो होतो त्या सगळ्या पूर्ण करण्यात नाटक यशस्वी झाले.
अजून पाहिले नसेल तर नक्की बघा.
No comments:
Post a Comment