ऑगस्ट २००९ ते डिसेंबर २०१३ हा काळ मी अमेरिकेतल्या कॅन्सास आणि आयोवा राज्यांमध्ये व्यतित केला. कॅन्सासमधली २ वर्षे विद्यार्थी म्हणून काढली. त्यानंतर नोकरीनिमित्ताने उरलेला काळ आयोवामध्ये गेला. अमेरिकेतले हे दोन्ही प्रदेश मिडवेस्ट प्रांतात येतात. माझ्या इथल्या वास्तव्यामध्ये आणि थोड्याबहुत केलेल्या भ्रमंतीमुळे अमेरिकन लोकांची जीवनशैली जवळून पाहण्याचा योग आला.
विद्यार्थीदशेत असताना मिळणाऱ्या मोजक्या पगारामुळे सहसा फार फिरणं होत नाही. एकदा कमवायला सुरुवात झाली कि मग मात्र सुट्ट्यांचा वापर बहुधा फिरण्यासाठी केला जातो. अमेरिका हा भौगोलिकदृष्ट्या एक महाकाय देश आहे. ५० राज्ये आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये पाहण्यासाठी काही ना काही नक्की आहे. शिवाय ही सगळी स्थळे तुमच्या आवडीनुसार आहेत. आरामाची सवय असलेल्यांसाठी जशा गोष्टी आहेत तशाच साहसी लोकांसाठी सुद्धा आहेत.
अमेरिकेत स्टेट आणि नॅशनल अशा दोन प्रकारांची पार्क्स असतात. नावं सुचवतात त्याप्रमाणे नॅशनल पार्क्स ही केंद्र शासनाची जबाबदारी असते तर स्टेट पार्क्स राज्य शासनाची. अर्थात त्याचा फिरणाऱ्यांशी फारसा संबंध नाही. आकड्यात बोलायचं झालं तर अमेरिकेत एकूण ५९ नॅशनल पार्क्स किंवा प्रतिबंधीत क्षेत्रे आहेत. नॅशनल पार्क सर्विस या एजन्सीद्वारे ती चालवली जातात. सगळ्यात पहिलं यलोस्टोन नॅशनल पार्क हे १८७२ मध्ये सुरु केलं गेलं. हा लेख लिहीत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे २५ ऑगस्ट २०१६ रोजी नॅशनल पार्क सर्व्हिसने आपली शंभरी पूर्ण केली. त्या निमित्ताने संबंध अमेरिकेतल्या नॅशनल पार्क्समध्ये गेल्या वर्षभर विविध उपक्रम राबवले गेले.
नॅशनल पार्क जरी १८७२ साली सुरु झाले तरी ही संकल्पना वाढीस लावण्याचे श्रेय जॉन म्युअर या अवलियाला दिले जाते. नॅशनल पार्क्स असणं कसं गरजेचं आहे हे सांगणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये म्युअर अग्रस्थानी होता.
मी ज्या भागात राहिलो तिथले लोक हे आपल्या तब्येतीची काळजी घेताना मला दिसले. कोणताही व्यायाम नसताना किंवा सवय नसताना हे लोक सहज १-२ मैल पळू शकतात. यात पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होतो. हे असताना दुसरीकडे अमेरिकेत स्थूलपणा (ओबेसिटी) सगळ्यात जास्त प्रमाणावर दिसुन येतो हे विसरून चालणार नाही.
अमेरिकेतला सुट्ट्यांचा सिझन आपल्यासारखाच उन्हाळ्यात असतो. मुलांच्या शाळांना असलेल्या सुट्ट्यांमुळे पालकसुद्धा मोठ्या सुट्ट्या काढून एखादी फॅमिली ट्रिप नक्की करतात. या सुट्ट्यांचं प्लॅनिंग खूप आधी केलेलं असतं. यात सहसा कुटुंबातली आई पुढाकार घेते असं माझं निरीक्षण आहे. मग कुठे जायचं हे फायनल झालं की पुढचे काही दिवस तिथे किती दिवस राहायचं, कुठे राहायचं, हॉटेलच्या दरांमध्ये कितपत फरक आहे, कुठे काही डिस्काउंटचे कुपन मिळतायेत का अशी सगळी उठाठेव केली जाते. आणि साधारणपणे जाण्याच्या तारखेच्या १ महिनाभर किंवा कधीकधी त्याहूनदेखील आधी प्लॅन निश्चित झालेला असतो. अगदी एकेक दिवसाचं प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे एका दिवसात किती मैल जायचं आहे, ते अंतर कापताना मध्ये दुपारच्या जेवणाला,पोरांच्या शी शु ला कुठे थांबायचं आहे, रात्रीचं जेवण कुठे, मुक्कामाच्या ठिकाणी किती वाजता, झोप किती वेळ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता पुढच्या प्रवासाला निघायचं आहे इथपर्यंत प्लॅन असतात. अगदी परवाकडे माझा एक मित्र मुलांना घेऊन फ्लोरिडाच्या युनिव्हर्सल स्टुडिओला जाऊन आला. त्याने असंच प्लॅनिंग केलं होतं.
एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. या सगळ्या पार्क्सला किंवा ट्रेकिंगला जाणाऱ्या ठिकाणी उत्तम रस्त्यांची व्यवस्था आहे. तुम्हाला हव्या त्या ठिकाणापर्यंत, मग तो समुद्र किनारा असो किंवा डोंगर असो, गाडीने सहज जाता येईल असे हे रस्ते असतात. आणि ते कायम चांगल्या अवस्थेत असतात. डोंगर असेल तर पायथ्याला मुक्कामाची उत्तम सोय होईल अशी हॉटेल्स असतात. सुट्ट्यांच्या दिवसात गर्दीमुळे अगोदर बुकिंग केलेलं कधीही चांगलंच. आपल्याकडे जसं गडावर जाऊन स्वयंपाक केला जातो तसंच तिथे देखील करतात. फरक एवढाच कि तिथे तशी सोय करून दिलेली असते. तुम्हाला फक्त खाण्याचे पदार्थ आणि इतर घटक बरोबर घेऊन जावे लागते. हाच प्रकार अगदी गावातल्या बागांमध्ये सुद्धा असतो. कुठे एखाद्या ठिकाणी छोटीसी पार्टी म्हणा वाढदिवस म्हणा सहज साजरा करता येतो. प्रत्येक गावामध्ये सरकारी सभागृहे असतात. ठराविक रक्कम भरून ती आरक्षित करता येतात. हे सगळं आपल्याकडे सुद्धा असतं. पण सरकारी सभागृहांची अवस्था दयनीय असते. कोणीतरी खाजगी पार्टीने पुढाकार घेतल्या शिवाय आपल्याकडे जमत नाही. आणि मग ते झालं की शुल्क वाढतं. असं हे लटांबर पुढे चालूच राहतं.
अमेरिकन लोकांना कॅम्पिंग करायला एक फार आवडते. मग अशा लोकांसाठी कॅम्पिंग साईट्स डेव्हलप केलेल्या असतात. एखाद्या तळ्याच्या काठावर किंवा डोंगराच्या पायथ्याला अशा त्या साईट्स असतात. बार्बेक्यू करण्यासाठी लोखंडी ग्रिलची व्यवस्था केलेली असते.मग आपापले कॅम्पर ट्रक (आशुतोष गोवारीकरच्या स्वदेस चित्रपटामध्ये नायक हा असा कॅम्पर घेऊन फिरताना आपल्याला दिसतो.) घेऊन लोक तिथे येतात. या कॅम्पर मध्ये सगळी सोय असते. १-२ माणसं झोपू शकतील अशी सोय असते, एक छोटंसं टॉयलेट असते. एक छोटं वन रूम किचन म्हणूयात हवं तर. हव्या त्या ठिकाणी जाऊन आपला कॅम्पर पार्क करायचा आणि पुढचे २-३ दिवस कुटुंबाबरोबर तिथे घालवायचे. मग गप्पा गाणी गोष्टी आल्याच. मग अशा सुट्ट्यांच्या ठिकाणी कॅम्पर पार्किंगचेसुद्धा ऍडव्हान्स बुकिंग करावं लागतं. तिथे नजारा सुद्धा बघण्यासारखा असतो. वेगवेगळ्या कंपन्यांचे कॅम्पर घेऊन आलेल्या पप्पा लोकांच्या गप्पा रंगतात. तुमचा कोणत्या कंपनीचा, नवा घेतला के जुना, कितीला पडला वगैरे वगैरे. मग आतून बघा काय काय आहे त्यात. वूडन फिनिशवाले अमुक तमुक. बरीच कुटुंबे कर्ज काढून ऐपत नसतानासुद्धा हे कॅम्पर विकत घेतात. वर्षातून फार फार तर ३-४ वेळा ते पार्किंग मधून बाहेर निघतात. पण हौसेला मोल नाही!!!
या हौसेवरून अजून काही उदाहरणे सांगावीशी वाटतात. आपला एखादा छंद मनापासून जोपासणे हे या लोकांना खूप चांगले जमते. आणि त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. छंद महागडा असला तरी हरकत नाही. माझ्या एका मित्राला विमानांची भारी हौस. पठ्ठयाने पायलट प्रशिक्षण पूर्ण केले. त्यासाठी गरज पडेल तेवढी फी देखील भरली. हव्या त्या परीक्षा देऊन सर्टिफिकेशन पूर्ण केले. मग प्रत्येक वेळेस विमान तासावारी भाड्याने घेऊन उडवायचा. थोड्या दिवसांनी ते काही याला पटेना. मग याने एक विमान विकतच घेतलंय आता. त्यासाठी गावातल्या एअरपोर्टला महिन्याची पार्किंगची फी सुद्धा भरतोय. हौसेला मोल नाही!!
अजून एका मित्राला सुतारकामाचा छंद. या छंदातून त्याने घरी मुलांसाठी २-३ छोटे स्टूल बनवले. ते चांगले जमले म्हणून एक टेबल बनवायची ऑर्डर त्याला मिळाली. ती पूर्ण केल्यावर मग अजून एक मोठं डायनिंग टेबल त्याने बनवलं. आता गडी वीकएंडला एक्स्ट्रा उत्पन्न कमवतो. ते देखील फावल्या वेळात. या लेखाच्या निमित्ताने त्याच्याशी बोलायचा योग आला तेव्हा त्याने याबद्दल मला अजून जास्त माहिती दिली. त्याला सुतारकामामध्ये आधीपासून रुची होतीच. पण नेमका त्याचवेळेस तो नवीन घरात शिफ्ट झाला. नवीन घरासाठी बरचसं फर्निचर विकत घेण्यापेक्षा आपणच का बनवू नये असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि सुरुवात झाली. जशी गरज पडेल तसा आपल्या कामाच्या श्येड्युलमधून तो वेळ काढून हे काम करू लागला. मुलांनाही आपले वडील आपल्यासाठी काहीतरी बनवत आहेत याचा आनंद होताच. मग वडील काम करत असताना त्यांना मदतीला मुलं शक्य असेल तेव्हा हजर असायची. आपल्या मुलांना आपण या छंदांमध्ये सहभागी करून घेतोय आणि कदाचित त्यांच्यापैकी एकाला याची गोडीदेखील लागू शकते ही भावना खूप सुखावह असते असं त्याने मला बोलता बोलता सांगितले. त्याला हे सगळं करायला आवडतं कारण सगळ्या कामानंतर तयार झालेलं फिनिश्ड प्रॉडक्ट बघण्यात एक अतीव समाधान असते.
अमेरिकेत प्राण्यांची शिकार करायला कायद्याने परवानगी आहे. मग त्यातसुद्धा बंदुकीने शिकार करण्याचा सिझन आणि धनुष्यबाणाने शिकारीचा सिझन असे प्रकार आहेत. काही राज्यांमध्ये हरणं जास्त आहेत त्यामुळे त्यांच्या शिकारीला परवानगी तर इतर कुठे अस्वलांच्या शिकारीला परवानगी. मग त्यासाठी परवाना मिळवणे वगैरे गोष्टी हे लोक तक्रार न करता पार पाडतात. शिकारीनंतर मारलेले प्राणी घरी आणून त्याची कातडी काढून मांस फ्रिजमध्ये गोठवले जाते. आणि मग नंतर वेळ मिळेल तसा त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून चाखले जातात. यात बार्बेक्यू हा सगळ्यात जास्त लोकप्रिय प्रकार. हरीण मी स्वतः खाल्ले आहे आणि फार चविष्ट लागते.
हा सगळा प्रकार सुरु होतो तो बंदूक विकत घेताना. केवळ हौस म्हणून २०-२० बंदुका घरात ठेवणाऱ्या माणसांना मी भेटलो आहे. त्यात अगदी छोट्या हँडगनपासून ते अगदी ए.के. ४७ पर्यंतच्या बंदुका आल्या. २० बंदुकांनी भरलेलं कपाट मी स्वतः बघितले आहे. तिथे होणारे बेछूट गोळीबार याचमुळे होतात का वगैरे चर्चा नकोच. बंदुकींवर अव्वाच्या सव्वा पैसे खर्च करून फक्त शोभेसाठी घरात ठेवणे यात या लोकांना काहीही वाटत नाही.
असाच शिकारवेडा असलेला एक मित्र म्हणाला, त्याला त्याच्या वडिलांनी ही गोडी लावली. कळत्या वयाचा झाल्यावर त्याला वडील आपल्याबरोबर शिकारीला घेऊन गेले. त्याने ते सगळं प्रकरण पाहिलं आणि आपणसुद्धा शिकार करायची अशी खूणगाठ मनाशी बांधली. प्रौढवयात आल्यावर त्याच्या वाढदिवसाला वडिलांनी त्याला उत्तम प्रतीची हँडगन् भेट म्हणून दिली आणि तिथून सुरु झाला तो बंदुकी जमविण्याचा आणि शिकारीचा सिलसिला. आजमितीला त्याच्याकडे ५-६ बंदुका आहेत.
अमेरिकन लोकांचा अजून एक महागडा छंद म्हणजे मासेमारी. त्यासाठी स्वतःची बोट विकत घेतात हे लोक. घराला लागून एक पार्किंग तयार केलं जातं. फक्त उन्हाळ्यात ही बोट बाहेर निघते मासेमारीसाठी. इतर सगळे महिने हप्ते भरत असतात लोक. कर्ज काढून घेतलेली असते ना बोट!! पण वर म्हटलं तसं हौसेला मोल नाही. कारच्या टपावर कयाकिंगची बोट बांधून जाणारे किंवा आपल्या पिकअप ट्रकच्या मागे बोट ट्रॉली करणारे असंख्य लोक दिसतात. या बोटीवर वेगवेगळी चित्रे काढणे हाही एक छंद पाहायला मिळतो. ९० टक्के बोटींवर अमेरिकेचा झेंडा रंगवलेला दिसतो. काहीजण तर खास बर्फात मासेमारी करायची म्हणून प्रवास करून उत्तरेला कॅनडामध्ये जातात. तिथली तळी थंडीने बर्फाळलेली असतात. मग गोठलेल्या पाण्यात एक मोठं भोक पाडून वर खुर्ची टाकून आतमध्ये गळ टाकायचा आणि सुरु मासेमारी. काहीजण कमी बर्फाळलेल्या पाण्यात बोटी हाकुनसुध्दा मासेमारीचा शौक पुरा करतात. काही जण शेतात तळी तयार करून त्यात मासे सोडून तेच मासे पकडतात. काय म्हणायचं आता याला!!
हे छंद पुरे करण्यासाठी कामाच्या ठिकाणीसुद्धा नियोजन केलेले असते. एखादा माणूस वर्षाच्या बरोबर त्याच दिवसांमध्ये सुट्टी घेतो हे बॉसलासुद्धा माहित असते. त्यानुसार कामाचं प्लॅनिंग केलं जातं. अर्थात हे खासकरून छोट्या गावांमध्ये पहायला मिळतं. न्यूयॉर्क किंवा तत्सम मोठ्या शहरांमध्ये हा प्रकार फारसा आढळून येत नाही
आपल्याकडे खेड्यात जशी बरीचशी कामे स्वतः केली जातात तोच प्रकार अमेरिकेतदेखील आढळतो. अर्थात या सगळ्यामागे इथे मनुष्यबळ कमी आणि महाग असणे ही कारणेसुद्धा आहेतच. आपली घरे स्वतः बांधणारी लोकंसुद्धा आहेत. गाड्या स्वतःहून रिपेयर करणं, घराच्या बाजूला पार्किंगसाठी गॅरेज बांधणं ही आणि अशी इतर बरीच कामं हे लोक वीकएंडला करतात. त्यासाठी वीकएंड प्रोजेक्ट असा छान शब्ददेखील आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर स्वावलंबनाला अमेरिकन संस्कृतीमध्ये फार महत्व आहे.
अमेरिकेत असलेल्या भारतीयांमध्ये सगळ्यात लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळे सांगायची तर न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया राज्ये, दक्षिणेकडे फ्लोरिडा राज्य, अमेरिकेची राजधानी असलेलं वॉशिंग्टन डीसी,नव्याने लग्न होऊन आलेल्या जोडप्यांच्या मधुचंद्रासाठी हवाई बेटे ही नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. मग हे कव्हर केल्यानंतर जरा ट्रेकिंग वगैरेची आवड असणारे लोक कोलोरॅडो, युटाह, ऍरिझोना या राज्यांमधल्या डोंगरांवर चढाई करतात. यात पुन्हा सोपे, अवघड ट्रेक आहेतच. तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवड करू शकता. मैलोनमैल पसरलेल्या या डोंगररांगांवर किती फिरू आणि किती नको असे होते.. त्यातही आपल्या लोकांची पसंती ग्रँड कॅनियन, योसेमिटी नॅशनल पार्क, कोलोरॅडोमधली रॉकी पर्वतरांग, टेनेसी राज्यातली स्मोकी पर्वतरांग यांना असते. माझ्या पाहण्यात स्मोकी पर्वतरांग आणि ग्रँड कॅनियनला जाणारे लोक जास्त आहेत. आकडे बोलतात असं म्हटलं जातं त्याप्रमाणे २०१४ साली नुसत्या स्मोकी पर्वतरांगेला १०,०००,००० लोकांनी तर ग्रँड कॅनियनला ४७,००,००० लोकांनी भेट दिली होती.
अमेरिकन लोकांची अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. कितीही लांबचा प्रवास असू देत. फार कमी वेळा हे लोक विमानाने प्रवास करतात. बऱ्याचदा प्रवास स्वतःच्या कारमधूनच केला जातो. अर्थात तिथे रस्तेसुद्धा अप्रतिम असतात. अजून एक म्हणजे कुटुंबासाठी हे लोक जमेल तसा आणि जमेल तेव्हा वेळ निश्चित काढतात. कुटुंबामधले लोक वेगवेगळ्या राज्यात राहत असले तरी बरीच कुटुंबे वर्षातून एकदा फॅमिली गेट टुगेदरसाठी न चुकता येतात. त्यात कोणतीही कारणे पुढे केली जात नाहीत. प्रसंगी बिनपगारी रजा घेणारी लोकं मी पाहीली आहेत. बऱ्याचदा ही गेट टुगेदर्स नोव्हेंबर महिन्यातल्या शेवटी थँक्सगिव्हिंग मध्ये होतात असं माझं निरीक्षण आहे.
अशा या छांदिष्ट अमेरिकन लोकांशी बोलल्यावर त्यांचं असंही म्हणणं आलं की आज आयुष्य आहे तर त्याची मजा घ्यावी. उद्या कोणी पाहिलाय. अमेरिकेतील आयुष्य खरंच सुंदर आहे. फक्त ते सुंदर कसं बनवायचं हे तुमच्या हातात आहे.
अमेरिकेतील लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन्स
१. टेनेसी राज्यातील स्मोकी पर्वतरांग
२. ऍरिझोना राज्यातील ग्रँड कॅनियन
३. कॅलिफोर्निया राज्यातील योसेमिटी नॅशनल पार्क - यातही हाफ डोम नावाचा ग्रॅनाईटचा एक उभा कातळ बऱ्याच ट्रेकर्सना भुरळ घालतो. ४७४७ फूट उंचीचा हा उभा कातळ नुसता बघितला तरी उरामध्ये धडकी भरते.
४. युटाह राज्यातील आर्च नॅशनल पार्क
५. ऍपलेशियन ट्रेल - हा जवळजवळ ३५०० किलोमीटर्सचा मार्ग आहे. १४ वेगवेगळ्या राज्यातील डोंगरांवरून जातो. लोक त्यांच्या सोयीनुसार हव्या त्या जागेवरून चढाई करायला सुरुवात करतात. वर्षातून किमान २,०००,००० लोक कमीतकमी एक दिवसाचा ट्रेक करतात या ट्रेलवर. २०१४ च्या आकडेवारीनुसार २७०० लोकांनी हा ट्रेल एन्ड तो एन्ड पूर्ण केला. त्यांना इंग्लिशमध्ये थ्रू हाईकर्स असे संबोधले जाते. काही जणांनी ट्रेल पूर्ण करून पुन्हा माघारी फिरून सुरुवातीच्या ठिकाणी सुद्धा गेले. त्यांच्या साहसकथा इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
(संदर्भ - विकिपीडिया)
अमेरिकेतील टुरिझम -
१. २०१६ च्या आकडेवारीनुसार फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो हे सगळ्यात जास्त पर्यटकांच्या पसंतीचे शहर
२. पर्यटकांनी पैसे खर्च करण्याबाबत फ्रान्स खालोखाल अमेरिकेचा नंबर लागतो.
३. २०१४ च्या आकडेवारीनुसार भारतातून अमेरिकेमध्ये गेलेले पर्यटक - ११,११,७३८
४. २०१४ च्या आकडेवारीनुसार संबंध जगभरातून अमेरिकेमध्ये गेलेले पर्यटक - ६,७५,१९,११३
५. २०१४ च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतून भारतात आलेले पर्यटक - ११,१८,९८३
६. २०१४ च्या आकडेवारीनुसार बाहेरच्या देशातून आलेल्या पर्यटकांच्या पसंतीच्या राज्यांमध्ये तामिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो.
(संदर्भ - विकिपीडिया)