Saturday, October 3, 2009

पुन्हा एकदा मराठीतुन ब्लॉग....महाराष्ट्र आणि पुण्याची भेट..

नमस्कार.आज पुन्हा एकदा लिहायला बसलो आहे.निमीत्त आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या तापत असलेलं वातावरण.कशामुळे ते तुम्हाला माहित असेलच.आणि सकाळ ने नुकताच सुरु केलेला एक नविन आणि स्तुतिपात्र असलेला असा उपक्रम.सकाळची याअगोदर वेबसाइट होती. www.esakal.com या नावाने.अजुनही आहे.पण आता त्यांनी यामध्ये अजुन एक नविन प्रकार सुरू केला आहे.www.epaper.esakal.com या नावाने.इथे सकाळ ने त्यांच्या सगळ्या विभागाच्या आवृत्त्या एकत्रपणे उपलब्ध करुन दिल्या आहेत.अगदी आपण घरात बसुन पेपर वाचत आहोत असं वाटतं.याअगोदर फक्त वेबसाइट वर मी बातम्या वाचायचो.पण कधी कधी काहीतरी तांत्रिक बिघाड व्हायचा किंवा मलाच वेळ मिळायचा नाही आणि मग पेपरवाचन राहून जायचा.पण आता या नविन प्रकारामुळे मात्र मी रोज चुकता पेपर वाचेल हे तर नक्की.सकाळचे याबद्दल मनापासुन आभार.
तर सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची धामधूम सुरु आहे.मी सध्या फक्त पुण्याबद्दल बोलतो.कालचं दादा आणि भाई यांचा मनोमिलन झालं.भाईंनी अगदी मासे आणि कोंबडी असा बेत केला होता.अगदी जोरात जाहीर करण्यात आलं की आम्ही आता मित्र आहोत.पुन्हा तिकडे कोथरुडमध्ये उज्वल केसकरांची बंडखोरी हा पण एक छान असा विषय मिळाला आहे लोकांना चर्चा करायला.शिवाजीनगर मधुन आधी शिवसैनिक असलेले आणि आता पंजा चे झालेले निम्हण रिंगणात आहेत.बाळासाहेब शिवरकर तिकडे कॅम्पातून आहेत.एकुणात वातावरण गरम झालेलं आहे.
मला खरं तर हा सगळा पोरखेळ वाटायला लागला आहे.काल शत्रु होते,आज काय मित्र झाले आणि उदया काय तर परत शत्रु झाले.अरे काय चाललं आहे हे.तिकीट नाही मिळालं,कर बंडखोरी.पुन्हा अर्ज मागे घ्यायला पैसे घे.आत्तापुरती करु हो मैत्री नंतर बघु काय ते.हे असा या लोकांचं बोलणं.या सगळ्यामध्ये जनता गेली तेल लावतं.आधी माझा खिसा भरु देत,मग जनतेचा विचार करेल मी.विकास काय हो,होत रहातो.आधी पैसे खा.ही असली यांची विचारसरणी.कसा विकास होणार आणि कसं जनतेचं भलं होणार काय माहित.
दुसरं असं की यापैकी किती उमेदवार खरोखर या पदाकरता लायक आहेत याचा तरी विचार पक्षनेतृत्वाने करावा ना.आता कोथरुडचचं उदाहरण घ्या ना.खर तर माझ्या मते उज्वल केसकर हा एक चांगला पर्याय होता भाजप साठी पण त्यांचा पत्ता कापण्यात आला.आता ते बंडखोर म्हणून उभे आहेत.मला असं वाटतं की तिथे सुधा पैसा बोलतो हो.इतके द्या आणि तिकीट घ्या.बाजारीकरण झालयं सगळीकडे.
या सगळ्याचा विचार केला की प्रश्न पडतो की मतदान करावं की नाही.कारण कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही.पण मग एक जागरुक नागरिक म्हणुन मतदान केलं पाहिजे असं पण येतं. दुर्दैवाने मी सध्या भारतात नसल्याने मला मतदान करता येणार नाहिये.पण एकदा मला असं पण वाटलं की हे बरं झालं म्हणून.लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मी अगदी विचार करून योग्य त्या उमेदवाराला मत दिलं होतं.पक्ष कोणता आहे याचा विचार नव्हता केला.पण आत्ता माझ्या मुळगावी म्हणजे जुन्नर ला सगळेच उमेदवार बंडल आहेत हो.त्यामुळे मत दिलेलं परवडलं असा विचार मनात येतो.
बाकी महाराष्ट्राचं म्हणाल तर मला यावेळेस पुन्हा एकदा पंजा आणि घड्याळ या आघाडीला जास्त जागा मिळतील असं वाटतं आहे.सेनेला पुन्हा एकदा मनसे चा फटका बसेल असं दिसत आहे.पण एक मात्र नक्की सांगेल की मनसे या निवडणुकीमध्ये एक पक्ष म्हणून आपली एक जागा नक्की निर्माण करेल.आणि कदाचित सत्तेच्या खेळीमध्ये महत्वाची भुमिका पण बजावेल. अंतिमतः सत्ता कोणाकडे जाते हे आपल्याला योग्य वेळी कळेलच.तेव्हा आणि त्याच्या अगोदर एकदा म्हणजे निकाल लागल्यावर,माझी आणि तुमची भेट होइलचं.तोपर्यंत राम राम.

Thursday, October 1, 2009

नमस्कार.माझं नाव आदित्य गुंड.मी तसा मूळचा राहणार जुन्नरचा.छ्त्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या गावात झाला त्या गावात माझा सगळं बालपण गेलं.खरं तर या बाबत मी स्वतःला फार नशिबवान समजतो.एकूणात सगळं छान झालं असा मला वाटतं.
तर मी १२ वी पर्यंत माझ्या या छोट्याशा गावात शिकलो.आणि पुढे अभियांत्रिकी करता पुण्यात आलो.पुण्यात मी व्यतीत केलेला काळ मी माझ्या आयुष्यामध्ये फार फार महत्वाचा मानतो.या कालावधीमधे मला खूप काही मिळालं.खूप मित्र,खूप मैत्रिणी,खूप माणसं आणि खूप चांगले अनुभव आणि अर्थात काही वाइट अनुभवसुद्धा.आणि या सगळ्यातुन मी शिकत गेलो.स्वतःला संपन्न करत गेलो.हे सगळं करत असताना बरचं शिकायला मिळालं.
कॉलेज मधे असताना मी खूप दंगा केला.लोकांची बोलणी खाल्ली.पण आता त्याचा फार काही वाटत नाही.कुठेतरी हे सारं काही आपल्या आयुष्यात घडलं याचा आनंद होतो.ब्लॉग लिहावा असा खुप दिवसांपासून खरं तर मनात होतं.पण मला वेळ मिळत नव्हता म्हणा किंवा मी कंटाळा करत होतो म्हणा.पण अद्वैत बोराटे नावाची एक असामी सुदैवाने मला भेटली.हा माणूस लिहायचा बरचं काही.आणि ते सगळं त्याच्या ब्लॉग वर टाकायचा.मला एकदा तो म्हणाला अरे गुंड्या तू पण लिहीत चल. तुझा ब्लॉग सुरू कर.आणि मग एके दिवशी अखेरीस मुहूर्त सापडला बुवा.गॆलो एक दिवस सायबर कॅफेमधे आणि केलं लिहायला चालु.म्हटलं बघु तरी किती दिवस आपण हे चालु ठेवतोय ते.पहिला ब्लॉग तर आला बुवा.मला लय्य्य भारी वाटलं.पण हे इथेच संपल हो. पुढे मी काही लिहीलचं नाही.बरेच दिवस असेच गेले.मग मला अद्वैतने शिव्या दिल्या. कसाबसा मी दुसरा ब्लॉग लिहिला.आणि हे प्रकरण इथेच संपणार असा अंदाज माझा मीच केला.नंतर मी सुद्धा कामात अडकत गेलो.आणि ब्लॉग प्रकरण थांबुन गेलं.
नंतर मग या नविन देशात आलो.अमेरिका असा नाव त्याचं.आणि मग पुन्हा असा वाटलं की आपण परत लिहावं.आणि तशी सुरुवात पण केली मी.मग वाटलं का नाही मराठी मधे लिहावं.आणि मग त्यासाठी बराच खटाटोप करुन शेवटी हा ब्लॉग लिहायला घेतला.पण दुर्दैव असा की तोपर्यंत माझं वेळापत्रक बरचं बिझी झालं होता.खरं तर हा ब्लॉग पण मी गेले काही दिवस लिहित आहे.जसा वेळ मिळेल तसा.हा माझा मराठी फॉंट वापरुन लिहीलेला पहिला ब्लॉग आहे.त्यामुळे फारसं काय लिहावं हे कळत नाहीये खरं तर.पण हळुहळू मी जसा मला वेळ मिळेल तसा लिहीत जाइल. सध्या इथे थांबतो.आणि हा मराठी मधुन लिहायचा उत्साह पण किती दिवस टिकतो ते बघुयात आपण.सध्यासाठी एवढं पुरे.