Wednesday, August 14, 2013

स्वातंत्र्यदिन

                                


स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न.

तसं पाहायला गेलं तर जुन्नर हे छोटं शहर. या छोट्या शहरात चार मोठ्या शाळा. त्यातल्याच एका शाळेत मी अगदी बालवाडीपासून ते दहावीपर्यंत शिकलो. या सबंध दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षाच्या काही आठवणी आहेत. या सगळ्या आठवणींमध्ये एक आठवण मात्र सारखी आहे. ती म्हणजे दरवर्षीचा  स्वातंत्र्यदिन

दर १५ ऑगस्टला आम्ही  तिन्ही भावंडे सकाळी लवकर उठत असू. आंघोळ करून दादांनी कडक इस्त्री केलेला शाळेचा गणवेश घालून, पायात पांढरे शुभ्र, नवे कोरे बूट आणि नवे सॉक्स घालून मी तयार होत असे आणि मित्रांबरोबर शाळेत जात असे. खालच्या शाळेत तेव्हा कुलकर्णी बाई शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका होत्या. त्या सगळ्यांना रांगेत उभे करत असत. अजूनही त्यांची ती खास स्वातंत्र्यदिनासाठी घातलेली पांढरी साडी आणि गळ्यात शिट्टी अशी मूर्ती डोळ्यांसमोर येते. झेंडावंदन होताच आकाशात सोडायला म्हणून काही मुले कबूतरे घेऊन येत असत. त्यांना इतर मुलांपेक्षा वेगळ्या रांगेत सगळ्यांच्या पुढे उभं केलं जात असे. दर वर्षी माझा आपल्याकडे कबूतर नाही आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांच्या पुढे उभं राहता येत नाही म्हणून संताप होत असे. दरवर्षी मी दादांकडे मला कबूतर पाळू द्या असा हट्ट करत असे.

शाळेतल झेंडावंदन संपवून मग तहसीलदार कचेरीकडे आम्ही सगळे धाव घेत असू. कारण तिथे पोलीस दल, गृहरक्षक दल, एन.सी.सी. असे सगळेच लोक असत. का कोण जाणे पण कचेरीतील तो कार्यक्रम चुकू नये म्हणून मी खूप काळजी घेत असे. अजूनही त्या कार्यक्रमाबद्दल लहानपणापासून असलेली उत्सुकता तशीच कायम आहे. तिथेच दादा मला भेटत असत आणि आम्ही तो कार्यक्रम आटोपून घरी परतत असू. घराच्या वाटेवर असताना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहण्याचे वेध लागलेले असत. घरी येताच टीव्हीसमोर बसून तो कार्यक्रम मी बघत असे. महाराष्ट्राचा रथ दिसला की का कोण जाणे पण अभिमान वाटत असे. तो संपूर्ण कार्यक्रम पाहून मग उरलेला दिवस सुट्टीचा आनंद घेण्यात घालवत असे.

वरच्या शाळेत गेल्यावर मात्र थोडी वेगळी परिस्थिती होती. मला का कोण जाणे पण एम.सी.सी. मध्ये सहभागी होण्यात फारसा रस नव्हता. कदाचित त्यासाठी घालावी लागणारी अर्धी चड्डी हेही एक कारण होतं. मग मी शाळेच्या बँड पथकात सहभागी व्हायचं ठरवलं. बँडपथकात असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाई. त्यामुळे तेही एक समाधान मनाला होतचं. आख्खा ट्रूप आमच्या समोरून बँडच्या तालावर परेड करत आमच्या समोरून जात असे. बँड पथकातल्या माझ्या एका सहकार्याला एक मुलगी तेव्हा आवडायची. परेड आमच्या समोरून जाताना त्याला ती दिसावी म्हणून त्याला मी पुढे माझ्या जागी उभं राहू दिल्याचं मला आठवतंय. शाळेनंतर मग परेड करत आम्ही सगळे कचेरीत जावून ध्वजारोहण करीत असू. कचेरीतून परत येताना शाळेच्या वाटेवर एक निर्मनुष्य रस्ता होता. त्या रस्त्यावर आम्ही सगळे जणू काही बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत वाजवतो आहोत अशा थाटात जोरजोरात ढोल बडवत असू.

जुन्नर सोडून पुण्याला शिकायला आलो. पण दरवर्षी १५ ऑगस्टला ध्वजारोहण कधी मी चुकवलं नाही. एक वर्षी मी पुण्याहून जुन्नरला जात होतो. जुन्नरला जाईपर्यन्त समारंभ संपून गेलेला असेल असं माझ्या लक्षात आलं. मध्येच कुरुळी फाट्यावर एक शाळा दिसली. पटकन गाडी वळवून मी त्या शाळेत गेलो. तिथे ध्वजारोहण केलं आणि मग जुन्नरला गेलो.


पुढे शिक्षणासाठी अमेरिकेत आलो. इथे आल्यावर देखील इंडियन स्टुडंट असोसिएशनच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मी जात असे. भारतात असतानासुद्धा आपलं राष्ट्रगीत कानावर पडलं की उर भरून येत असे, अंगावर काटा येत असे. आता परदेशात असताना आपलं राष्ट्रगीत ऐकलं तर आपण भारतीय असल्याचा अजूनच अभिमान वाटतो. कधी कधी फार भावूक झालो तर डोळ्यांच्या कडा ओल्यादेखील होतात. अमेरिकेला येताना आपला राष्ट्रध्वज मी बरोबर आणला होता. माझ्या घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये भिंतीवर तो लावला आहे. आता नोकरीसाठी मी छोट्या गावात राहतो. इथे ध्वजवंदनाचा औपचारीक कार्यक्रम होत नाही. दरवर्षी ध्वजारोहण चुकता कामा नये असं लहान असताना कधीतरी दादांनी सांगितल्याच आठवतंय. त्यांच्या त्या शिकवणीप्रमाणे मी घरातल्या तिरंग्यासमोर उभा राहून आपलं राष्ट्रगीत म्हणेन आणि माझ्यासाठी भारतीय स्वातंत्रदिन साजरा झालेला असेल. 

Saturday, August 10, 2013

एक आठवण..

आत्ताच चेन्नई एक्स्प्रेस पाहून घरी परतलो आहे. चित्रपट का पहिला वगैरे चर्चा करण्यात मला फारसं स्वारस्य नाहीये. चित्रपट तसा सुमारच होता. पण चित्रपटाच्या शेवटी लुंगी डान्स नावाचं एक गाणं दिग्दर्शकाने टाकलं आहे. मला चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्टं म्हणजे हे गाणं. त्याचं कारण म्हणजे ते गाणं हे “रजनीकांत” यांना केलेलं अभिवादन आहे (बॉलीवूडचा बादशाह असला तरी दक्षिणेकडे खरा सुपरस्टार रजनीकांतच आहे हे कदाचित शाहरुखला कळलं असावं.).

तुम्ही म्हणाल अचानक रजनीकांतबद्दल तुला का बाबा प्रेम वाटायला लागलं. खरं तरं बरेच दिवस या प्रसंगाबद्दल लिहावं असं मनात होतं. पण काही ना काही कारणांमुळे ते राहून जायचं. या चित्रपटाच्या निमित्ताने ते आठवलं आणि तुम्हाला ते सांगावं या हेतूने लिहितो आहे. ऑगस्ट २००९ मध्ये मी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी आलो. ज्या विद्यापीठात मला प्रवेश मिळाला तिथे बहुसंख्य तेलगु आणि तमिळ विद्यार्थी होते. याचसुमारास रजनीकांतवर इंटरनेटवर अनेक विनोद यायला लागले. आणि हे विनोद मला आवडले म्हणून मी माझ्या फेसबुकवर शेअर करू लागलो. काही विनोद मी स्वतः तयार केलेले असायचे. हे विनोद वाचून काही लोकांना प्रचंड हसू येई. आणि तसं ते मला सांगतदेखील असत. एकदा मात्र बाका प्रसंग उभा राहिला. एक लेक्चर संपवून मी घरी येत असताना एक तेलगु सिनियर मला रस्त्यात भेटला. त्याचं पाहिलं वाक्य, “तू स्वतःला कोण समजतोस?” मी बुचकळ्यात पडलो की हा असं का विचारतो आहे. तोच त्याचं दुसरं वाक्य, “तू फेसबुकवर रजनीकांतची टिंगल का करतोस? त्याच्यावरचे फालतू विनोद का शेअर करतोस?” मला लक्षात आलं की याला नक्की कसला त्रास होतोय. वेळ मारून न्यायची म्हणून मी त्याला असं काही नाहीये सांगून पळ काढला. मुळात माझा असा काही हेतू नव्हता. इतक्या मोठ्या माणसाची टिंगल करावी असा विचारदेखील माझ्या मनात नव्हता. पण शांत बसेल तो मी कसला म्हणून मी घरी जाउन रजनीकांतबद्दल शक्य असेल तेव्हढी माहिती शोधून काढली. सुदैवाने माझा एक रूममेट तमिळ होता. त्याने मला अजून काही माहिती पुरवली. हे सगळं करून झाल्यावर मी अजून जोमाने माझा जुना उद्योग सुरु केला. रजनीकांतबद्दल जोक लिहिणे. हे मात्र काही त्या सिनियरला पटलं नाही. त्याने पुन्हा एकदा मला गाठलं आणि तोच प्रश्न पुन्हा विचारला. यावेळेस मी तयार होतो. मी त्याला रजनीकांतबद्दल उलट काही प्रश्न विचारले. त्याची तत पप झाली. मी त्याला सांगितलं, “राजा नुसतं मी रजनीकांतचा फॅन आहे असं म्हणून चालत नाही. त्याने काय केलंय, कशामुळे त्याला इतका सन्मान मिळतोय हेदेखील माहीत असू देत. तुला रजनीकांतबद्दल जितका आदर आणि प्रेम आहे तितकाच आदर आणि प्रेम मलादेखील आहे. केवळ जोक फेसबुकवर टाकले म्हणून मी त्याची टिंगल करतो असं नाहीये.” हे समजून सांगितल्यावर मात्र स्वारी नरम आली आणि तिथून पुढे कधी त्याने मला पुन्हा असा प्रश्न विचारला नाही.

रजनीकांतबद्दल अजून काही लिहावं असं बरेच दिवस मनात आहे. पण ते पुन्हा कधीतरी.