"देवः देवौ देवाः --- प्रथमा
देवम् देवौ देवान् --- द्वितीया"
"इकडे लक्ष द्या." शब्द चालवत असताना मध्येच थांबून आपल्या ठराविक शैलीमध्ये सर मुलांना बोलत असत.
सरांचा आणि माझा संबंध आठवीत आला. तोपर्यंत सर शाळेच्या नॊकरीतून निवृत्त झाले होते. पण आठवी ते दहावीच्या वर्गांचे संस्कृत आणि इंग्रजीचे क्लास मात्र सरांनी सुरु ठेवले होते. माझ्या अगोदर माझ्या दोन्ही बहीणी सरांकडे क्लासला जात होत्या. त्यामुळे मीही जाऊ लागलो.
आमची शिकवणी सरांच्या घरी पहिल्या माळ्यावर एका मोठ्या हॉलमध्ये होत असे. दोन शिकवण्यांच्या मध्ये सर खाली जात असत. तेवढ्या वेळात आम्ही वर जाऊन बसत असू. सर नाहीयेत म्हटल्यावर दंगा सुरु असे. दाराजवळ बसलेला मुलगा मध्येच बाहेर डोकावून सर आलेत की काय याची खात्री करत असे. तो आमचा पहारेकरीच म्हणा ना. बऱ्याच वेळेस तो केतन पडवळच असे. सरसुद्धा आमचे सरच होते शेवटी!! कधी कधी सर दारात येऊन शांतपणे आमचा दंगा बघत असत. शेवटी कोणाला तरी कळे आणि आम्ही गप्प बसत असू. दारात उभं राहून मुलांचा दंगा पाहण्यात त्यांना बहूधा मजा वाटत असावी. कारण त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस एक मिश्किल हसू असे.
आठवीत आम्हाला सरांनी पाठ्यपुस्तकापेक्षा व्याकरण जास्त शिकवलं. त्यासाठी आमची भरपूर तयारी त्यांनी करून घेतली. माझं आणि माझ्यासारख्या अनेकांचं इंग्रजी व्याकरण सरांमुळेच पक्कं झालं.मी आठवीत असताना माझी ताई बारावीत होती. तिचा बारावीचा इंग्लिशचा पेपर झाल्यावर सरांनी मला सांगितलं,
"गुंड, उद्या येताना दीप्तीचा इंग्लिशचा पेपर घेऊन ये."
दुसऱ्या दिवशी आमच्याकडून बारावीच्या इंग्लिशच्या पेपरमधलं सगळं व्याकरण त्यांनी सोडवून घेतलं. आठवीत असणाऱ्या आम्हा सगळ्यांना स्वतःचाच फार अभिमान वाटला त्यावेळेस!!
आपल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम सर हे असं करत असत.
व्याकरणात रोज काहीतरी नवीन शिकवायचे सर. त्याची तयारी करून घ्यायचे आणि मग आम्हाला घरी सोडायच्या आधी होमवर्क द्यायचे. दुसऱ्या दिवशी गेलं की त्यांचा प्रश्न ठरलेला असे,
"होमवर्क दिलाय का?"
मग आधी तो होमवर्क आमच्याकडून सोडवून घेत आणि त्यानंतर पुढे शिकवायला सुरुवात करत.
तीन शब्दांचं एक वाक्य १२ काळांत चालवायला सरांनीच आम्हाला शिकवलं. आणि रोज शिकवणीला सुरुवात करण्याअगोदर कोणातरी एका विद्यार्थ्याला एक वाक्य देऊन ते १२ काळांत चालवायला सर सांगत. नकळतपणे सगळ्याच विद्यार्थ्यांची तयारी होत असे. इंग्रजी नुसतं बोलता आलं पाहिजे यावर सरांचा कधीच विश्वास नव्हता. तर व्याकरणदृष्ट्या बरोबर इंग्रजी बोलता आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे आम्ही सगळेच चांगलं इंग्रजी बोलू लागलो. आजही बोलताना एखाद्याने काही चूक केली तर ती मला खटकते.
आमच्या घरी इंग्लिश पेपर सुरु करण्याचं श्रेय सर आणि बाईंना जातं. सरांचा मुलगा आशुतोषचं जेव्हा यूपीएससीमध्ये सिलेक्शन झालं तेव्हा त्यांचं अभिनंदन करायला आमचे दादा त्यांच्या घरी गेले होते. बाईंशी बोलताना दादांनी त्यांना विचारलं,
"हे कसं जमवलं तुम्ही?"
"साहेब माझी नोकरी होती. घरातही काम असेच. अशात मग पेपर वाचायला वेळ सापडत नसे. मग मी आशुतोषला पेपर वाचून दाखवायला सांगत असे. तोही अगदी मोठ्या माणसासारखा पेपर धरून वाचीत असे. जसा जसा तो मोठा होत गेला तसा तो पेपर वाचायला चटावलाच जणू. पेपरवाल्याची वाट बघू लागला. थोडा उशीर झाला तर बैचेन होऊ लागला."
हे एकूण दादा त्यांना म्हणाले,
"बाई तुम्ही दोघंही नोकरीला होतात. त्यामुळे तुम्हाला २ पेपर घेणं परवडलं. पण मी मात्र एकटा. माझं गणित कसं बसणार?"
त्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया दोन रुपयाला असे. ते डोक्यात ठेवून बाई म्हणाल्या,
"माझा हिशोब साधा होता. मुलाने एक नवीन शब्द शिकला की माझे २ रुपये वसूल असे मी समजत असे. तुमच्याकडे तर दोन मुली आणि एक मुलगा असे तिघेजण आहेत. प्रत्येकाने एकेक शब्द शिकला तर तीन शब्दांचे सहा रुपये होतात. तुम्ही उलट चार रुपये फायद्यात जाणार."
हे ऐकून दुसऱ्याच दिवशी दादांनी घरी इंग्लिश पेपर सुरु केला तो आजतागायत सुरु आहे.
इंग्रजीचा क्लास झाला की आमचा संस्कृतचा क्लास असे. इंग्रजी शिकवताना वाक्यरचनेवर भर देणारे सर संस्कृत शिकवताना मात्र कशीही वाक्यरचना करायची मुभा आम्हाला देत. आणि आम्हाला सांगत सुद्धा,
"संस्कृतच हे एक बरं आहे. सिंटॅक्सचा फारसा प्रश्न येत नाही इथे."
वर सांगितल्याप्रमाणे देव, वन, मालापासून सगळे शब्द सर आमच्याकडून म्हणून घेत. संस्कृतमध्ये पाठांतराला पर्याय नाही हा त्यांचाच धडा. त्यामुळे शाळेत कधी संस्कृतमध्ये आम्हाला अडचण आली नाही.
सरांची स्मरणशक्तीसुद्धा अतिशय तल्लख होती. एकदा आम्हाला होमवर्क म्हणून सरांनी चाळीस शब्द दिले होते. त्या दिवशी आमचा एक मित्र नेमका उशिराने आला. त्याच्यासाठी ते शब्द सर पुन्हा सांगू लागले. सांगायला सुरुवात करण्याअगोदर आमच्यातल्या एकाला सर म्हणाले,
"आत्ता दिलेले शब्द मी पुन्हा सांगतो. ते त्याच क्रमाने येतात का हे चेक कर."
आम्ही सगळे सावरून बसलो. सर कुठे चुकतात का हे आम्ही पहात होतो. सर त्याच क्रमाने एकेक शब्द सांगत होते. असं करत करत सरांनी चाळीसच्या चाळीस शब्द आधी सांगितलेल्या क्रमानेच पुन्हा सांगितले. आम्ही सगळे सरांकडे आश्चर्याने बघतच राहिलो होतो.
त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते. पण कॉर्डलेस फोन असत. सरांकडेसुद्धा असाच कॉर्डलेस फोन होता. शिकवताना तो बाजूला ठेवून ते शिकवत असत. एखाद्या वेळेस कधी फोन आलाच तर तो उचलून त्यांच्या विशिष्ट शैलीमध्ये ते "हॅलो" म्हणत असत. आम्हा सगळ्यांना त्याची तेव्हा मजा वाटे आणि आम्ही भरपूर हसत असू.
शिकवणीच्या हॉलला एक बाल्कनी होती. तिथे २-३ बरण्यांमध्ये बाई गुलकंद बनवायला ठेवत असत. एक दिवस शिकवणी सुरु होण्याअगोदर मी आणि विन्या बाल्कनीमध्ये जाऊन चोरून गुलकंद खात होतो. सर कधी आले आणि आमच्याकडे पहात उभे राहिले आम्हाला कळलंसुद्धा नाही. थोडा वेळ झाल्यावर आम्हाला आवाज आला,
"तुमचं झालं असेल तर या आता आतमध्ये."
सरांच्या बागेतल्या कैऱ्या,स्ट्राबेरीज शिकवणीला येणारी मुलं चोरून खात असत. एवढंच काय शिकवणीच्या हॉलच्या मागच्या बाजूला असलेले कांदेसुद्धा मुलं खिशात भरून नेत असत. पण सर कधीही कोणाला काही बोलल्याचं मला आठवत नाही.
शिकवणी संपल्यावर मुलांना घरी सोडायची सरांची स्वतःची एक खास पद्धत होती. सगळ्यात लांब राहणाऱ्या मुलांना ते आधी सोडत. पण हे करत असताना जुन्नरमधल्या वेगवेगळ्या पेठांची नावे ते घेत. म्हणजे पणसुंबा पेठ, सदाबाजार, ब्राम्हण बुधवार, राष्ट्रीय तेली बुधवार असे करत करत सगळ्यात शेवटी कल्याण पेठ येत असे.मग आम्हाला घरी जायला मिळत असे.
सरांनी शिकवलेल्या संस्कृतचा बारावीपर्यंत उपयोग झाला. इंग्लिशचा अजूनही होतोच आहे. हळूहळू सरांनी शिकवण्या बंद केल्या. आताही सर या ना त्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात. इतक्या वर्षानंतरदेखील तब्येत अजूनही राखून आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो.