Saturday, March 25, 2017

अविस्मरणीय के२एस

कात्रज ते सिंहगड, कात्रज ते सिंहगड लई ऐकलं होतं कॉलेजला असताना.. पण नक्की काय असतं कधी कळलंच नाही..१०-१२ डोंगर चढून उतरून जावं लागतं इतकंच काय ते माहित होतं..

वर्ष दीड वर्षांपूर्वी किल्लेदारीचा सभासद झालो..ट्रेकिंग वगैरे फार कधी केलंच नव्हतं.. पण आता संतोष भाऊंनीच ग्रुप काढला म्हटल्यावर सभासद तर झालो..ट्रेकला जायचं की नाही पुढची गोष्ट होती..ग्रुप पण लई बेकार आहे हा..नुसतं सभासद असून चालत नाही..ग्रुपबरोबर नाही तर स्वतःने अधून मधून ट्रेक करत रहावं लागतंय..नाहीतर ग्रुपमधून काढून टाकतात.. एक दोन छोटे मोठे ट्रेक केले होते मी..पण कात्रज ते सिंहगड म्हणजे शारीरिक क्षमतेची परीक्षा पाहणारा ट्रेक असणार याची जाणीव होती..ऐन वेळेस स्टॅमिना कमी पडला तर अर्ध्यातून ट्रेक सोडायला लागू नये अशी माझी माफक अपेक्षा स्वतःकडून होती..

गेल्या आठवड्यात ट्रेक डिक्लेअर झाला..आधी संतोषदादाला मेसेज केला..म्हटलं, 

"मला जमलं का रे?" 

त्याचा रिप्लाय आला,

 "१४-१५ डोंगर चढून उतरावे लागतात.टोटल डिस्टन्स १६-१७ किमी होतं. भलेभले थकून जातात. तुला यायचं असलं तर निदान राहिलेल्या २-३ दिवसात सकाळी २-३ किमी चालायची प्रॅक्टिस कर.बरं एवढं करूनही त्रास होणार नाही असं नाही."

मी म्हटलं,"तू एनकरेज करतोय की भीती घालतोय."

"तू चल. बाकीचं बघू तेव्हाचं तेव्हा."

शुक्रवारी संध्याकाळी ट्रेकला येणारे सात जण कात्रजला भेटलो.तिथून एक व्हॅन पकडून कात्रजच्या बोगद्याला उतरलो.तिथून चढायला सुरुवात केली. पहिल्याच डोंगराला वाट चुकली. रानातून वाट काढत काढत चढाई सुरु होती. वर चढताना मोकळी झालेली माती परीक्षा पहात होती.एका ठिकाणी जरा विश्रांतीला थांबलो तर डोंगरावरुन दोन मोठी साळिंदर आमच्या दिशेने पळत येताना दिसली. आम्हाला घाबरून म्हणा किंवा अजून काही म्हणा त्यांनी आपला मार्ग बदलला आणि दुसऱ्या वाटेने निघून गेली. एव्हाना पहिला डोंगर चढून माथ्यावर आलो होतो. वारं लागत होतं त्यामुळे जरा बरं वाटत होतं. मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, "आता माघार नाही." आणि पुढची पायपीट सुरु केली.

सातव्या डोंगरपर्यंत थोडं वेगात, थोडं थांबून गेलो. एव्हाना दहा वाजले होते. सर्वानुमते जेवण करायचं ठरलं. आपापले डबे काढून सहलीला आलोय जणू असे सगळे जेवायला बसलो. प्रदीपच्या डब्यात पुऱ्या आणि बटाट्याची भाजी होती. त्यावरून शाळेतल्या सहलीला कशा सगळ्या आया आपल्या पोरांना हाच मेनू द्यायच्या यावर चर्चा होऊन मनसोक्त हसलो. तोंडी लावायला संजूदा आणि संतुदाचे इकडच्या तिकडच्या ट्रेकचे किस्से होतेच. जेवण करून पुन्हा चढाईला सुरुवात झाली. पोटात भर पडल्याने बरं सुद्धा वाटत होतं पण चढायला आधीसारखा हुरूप नव्हता. आता दोन जोडप्यांबरोबर चालण्यापेक्षा मी प्रदीप आणि कौस्तुभ बरोबर चालू लागलो. याचा फायदा असा होत होता की चढण वेगात होई. माथ्यावर जाऊन मागचे लोक येईपर्यंत पुरेशी विश्रांती होत असे. त्यामुळे एनर्जी कायम राहत असे. वाटेत जाताना प्रदीप वन्यजीवांबद्दल त्यांच्याकडची माहिती पुरवत होता. 

आत्तापर्यंत एक गोष्ट लक्षात आली होती. डोंगर चढताना जोर लावून वेगात चढायला त्रास होत नव्हता. पण उतरताना मात्र अतिशय काळजीपूर्वक उतरावं लागत होतं. जरा कुठे चूक झाली तर पार्श्वभागाची काही धडगत नव्हती. १० डोंगर झाले आणि सगळ्यांना जरा बरं वाटलं. संतुदा अजून काही बोलत नव्हता. त्यावरून लक्षात आलं पुढे अजून अवघड चढण असणार. अपेक्षेप्रमाणे ११ व्या डोंगराने सगळ्यांचा घामटा काढला. संजूदा प्रचंड थकले होते.इथंच तंबू ठोकू म्हटलं तर म्हणतात,

"आख्खी रात्र चाललं मी, पण इथे इच्चू काट्यांत झोपणार नाही."

पुन्हा पायपीट सुरु झाली. मी थोडा वेळ संजूदा बरोबर चाललो. त्यांचा मूड थोडा चिअर अप करायला त्यांना म्हटलं,

"आपल्या अध्यक्ष महोदयला हा ट्रेक करायला लावला पाहिजे नाही का?"

संजूदा हसत म्हणतात,"अरे तो कसला येतो.आला तर चॉपर घेऊन येईल इथं."

इतका वेळ फारसं बोलत नसलेले पाय आता बोलू लागले होते. थकवा जाणवू लागला होता. पण हा ट्रेक असा आहे की अर्ध्यातून सोडून देता येत नाही. कारण पुढे मागे जायला काहीच ऑप्शन नसतो. मागे फिरलं तरी तेवढीच पायपीट परत करावी लागते. त्यापेक्षा हळूहळू का होईना पुढे जात राहिलेलं परवडतं. संतुदाने आधीच सांगितलं होतं प्रत्येकाने किमान चार लिटर पाणी बरोबर ठेवा. त्याने तसं का सांगितलं याचा प्रत्यय चालताना येत होता. या सबंध पायपिटीमध्ये कुठेही पाण्याचा मागमूसही दिसला नाही. घोट घोट करून प्यायलेलं पाणी एव्हाना संपत आलं होतं. अजून बरंच अंतर कापायचं बाकी होतं. ट्रेक पूर्ण झाल्यावर प्यायला थोडं तरी पाणी हवं म्हणून मी आपला जपून वापर सुरु ठेवला. 

मजल दरमजल करत अखेरीस सगळे डोंगर संपले. ट्रेक संपता संपता अजून एका साळींदराने आम्हाला दर्शन दिलं. अखेरीस संतुदानी सांगितलं बास आता उतरलं की लगेच झोपडी. परत एकदा सगळ्यांना कडकडून भुका लागल्या होत्या.झोपडीवर जाऊन परत एकदा सगळ्यांनी पोटात चार घास ढकलले आणि निद्रादेवीची आराधना करायला सुरुवात केली.

सकाळी सहाला सगळ्यांचे गजर वाजले. कसेबसे सगळे जण जागे झाले. खरं दिव्य इथून पुढे होतं. वरून खाली डोणज्यापर्यंत जायला आम्हाला गाडी मिळेना. जो थांबे तो अवाजवी पैसे मागे. मग पुन्हा मी, संतुदा आणि प्रदीप वन-टू वन-टू करत डोणज्याच्या दिशेने चालायला लागलो. रात्रभर डोंगर चढायला आणि उतरायला जेवढा त्रास झाला नव्हता त्याहून कित्येक पट अधिक त्रास डांबरी रस्त्याच्या उतारावरून होत होता. कसेबसे आम्ही डोणज्यात पोहोचलो. किल्लेदारीचे अतुल पानसरे त्यांच्या हिमाचल सायकल टूरची प्रॅक्टिस म्हणून आणि आम्हाला भेटायला म्हणून सुद्धा सायकलवर सिंहगडावर आले होते. आमच्या रात्रभराच्या कष्टाची पावती म्हणून अतुलजींनी आमचा नाष्टा स्पॉन्सर केला. डोणज्यातून बस घेऊन अखेरीस साडेनऊच्या सुमारास सिंहगड रोडला आम्ही परतलो आणि ट्रेकची ऑफिशियली सांगता झाली. 

मी स्वतःच स्वतःला मनातल्या "शाब्बास रे मेरे शेर" अशी दाद दिली. ट्रेक पूर्ण करू शकेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं.पण बरोबर असलेली माणसं, मनात असलेली इच्छा यांच्या जोरावर ते करू शकलो. इतकी वर्षे जे लोकांकडून फक्त ऐकलं होतं तो कात्रज ते सिंहगड ट्रेक मी पूर्ण केला होता. सध्या तरी आयुष्यातल्या काही निवडक यशामध्ये या ट्रेकचा समावेश करायला हरकत नाही. 

1 comment:

  1. राजे... मस्त लिहीलंय. फोटो पण अपलोड करा यात ट्रेकचे. लाईव्ह परफॉर्मन्स होईल म्हणजे. इतर कुठे फोटो सेव्ह करुन ठेवायची गरजही राहणार नाही.

    ReplyDelete