Wednesday, March 15, 2017

एका कवितेची गोष्ट

फार वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यातल्या एका छोट्याश्या खेड्यामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा आणि तीन मुली. आई लहानपणीच निवर्तलेली. मुलींनी शाळेत जाण्याचे दिवस नव्हते ते. मुलगा मात्र शाळेत जात असे. शाळा गावापासून अडीच तीन किलोमीटर असे. गाडीचा पत्ता नव्हताच. मग दोन पायांच्या गाडीनेच गडी शाळेला जात असे. रस्ता म्हणजे खटारगाडीचा रस्ता असे. जाताना येताना सोबत कोणी नसे. रोज एकटाच. इतकं अंतर एकट्याने जायचं म्हणजे कंटाळा येणारच ना. तेव्हा आत्तासारखे मोबाईल नव्हते की लावले हेडफोन्स आणि गाणी ऐकत गेलाय. खेड्यात राहात असल्याने आहेत ती गाणी माहीत असण्याचा काही संबंधच नव्हता. 

एकट्याने चालताना येणाऱ्या कंटाळ्यावर औषध म्हणून तो मुलगा कविता म्हणू लागला. घर सोडलं की दप्तरातून (दप्तर कसलं साधी पिशवीच असायची) पुस्तक काढायचं आणि मोठ्या आवाजात कविता म्हणायला सुरुवात करायची. रस्त्याने जाणारं येणारं माणूस दिसणं त्यावेळी मुश्कीलच होतं. हा एकटाच मोठमोठ्याने कविता म्हणत जायचा. सूर बेसूर याचा विचार त्याच्या मनाला कधी शिवलाच नाही. पण त्याच्या नकळतपणे ह्या कविता म्हणण्याचा त्याला फायदा झाला. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सगळ्या विषयांच्या कविता तोंडपाठ झाल्या. गुरुजींनी शिकवल्याने आणि  रोजच म्हटल्यामुळे प्रत्येक कवितेचा भावार्थ त्याला चांगला कळू लागला. 

अशात परीक्षा आली. गद्यावरचे प्रश्न तर त्याने सोडवलेच पण पद्यावरचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडवता आले. मुळात तो हुशार होताच पण आता एकदम पहिला नंबर आला. त्याला काय आनंद झाला सांगू. पण हा आनंद सुद्धा त्याने एकट्यानेच साजरा केला. 

बऱ्याच वर्षानंतर त्याने मग आपल्या या अनुभवावर कविता केली. ती सहज माझ्या हाती लागली म्हणून तुमच्यासमोर ठेवतो आहे.


सावली उंबरी निघाली,
तशी शाळेची वेळ झाली 
काखे मारुनि बुकांची थैली,
स्वारी निघाली शाळेला 

मार्गी बहुतची काटे कुटे,
जोडीला गोटे अन सराटे 
पायताण असणे तेही खोटे,
सोबतीला नसे कुणी 

थैलीतून काढे एक बुक,
आननी  पसरे अमाप सुख
कविता म्हणाया 'हाच' एक,
आवाज तो उंचावूनी 

खड्या स्वरी कविता गाता,
हाच 'गाता' हाच 'श्रोता'
शरम कासया दुजा श्रोता,
दूर अंतरी नसे पै 

आली आली, शाळा आली, 
कविताही कधीच संपली
अहो ती 'पाठच' की झाली!!
अभ्यास न करिताची 

एकदाची परीक्षा होतसे,
सर्वच सवाल सोपे कैसे
फक्त उतरवणे उरले साचे,
बाकी काही नसेची

'हा घ्या' आला पहिला नंबर,
वर्गात झाला बहू गजर 
गळा दाटला अनिवार,
जागीच जिरविला तयाने

कौतुक कुणा नसे साचे,
हेचि वळण पडिले त्याचे 
समजावी आपुल्या मनाते,
उसासूनी पुन्हा पुन्हा 

- जी. बी. 

या गोष्टीतला मुलगा म्हणजे माझे दादा आणि त्यांची ही कविता. 









1 comment: