Saturday, August 11, 2018

बॉर्डर आणि गुंड कुटूंब

काल सुनील शेट्टीचा वाढदिवस झाला. सुनील शेट्टी आवडणारी माणसं तशी विरळाच. मीही सुनीलचा चाहता वगैरे नाही. मात्र त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका मित्राबरोबर बोलताना त्याच्या बॉर्डर या चित्रपटाची आठवण झाली आणि मन भूतकाळात गेलं.

बॉर्डरशी माझं नातं खूप वेगळं आहे. माझ्या वडिलांबरोबर पाहिलेला  माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे. आईदादा साधारण ७७ साली जुन्नरला आले. तेव्हापासून ते २०१३ पर्यंतच्या जुन्नरच्या वास्तव्यात दादांनी थेटरात पाहिलेला हा एकमेव चित्रपट. आम्ही भावंड कधीतरी जात असू चित्रपट पहायला.बऱ्याचदा शाळेतूनही आम्हाला चित्रपट दाखवला जात असे.दादांबरोबर चित्रपट पहायची वेळ मात्र कधी आली नव्हती.

बॉर्डर आल्यावर माझ्या काही मित्रांनी तो पाहिला. शाळेत कधीतरी बोलताना त्यांनी तो भारी असल्याचं सांगितलं. मग मीही दादांकडे हा चित्रपट पहायचा म्हणून हट्ट धरला.एरवी कधीही न बधणारे दादा त्यावेळी मात्र कसे प्रसन्न झाले माहीत नाही. कदाचित भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असल्याने त्यांनी होकार दिला असेल.

चित्रपट सगळ्यांनी जाऊन बघू असे बहुधा ताईने सुचवले.दादांनीही ते मान्य केले.त्यावेळी ऑनलाइन तिकीटविक्री वगैरे काही नव्हतं.त्यावेळीच काय,आजही जुन्नरला अनेकजण थेटरला जाऊनच तिकीट घेतात.

आम्ही रात्री नऊच्या शोला जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जुन्नरच्या शेवंता थेटरला पोहोचलो. मी आणि दादा तिकीट खिडकीकडे गेलो.तिथे आधीच लाईनला उभे असलेले कल्याण पेठेतले दोन-तीन जण दादांना पाहून तोंड लपवून पळून गेल्याचे आठवते. दादांना पाहताच आत असलेले मॅनेजर ईनामदार बाहेर आले.

"साहेब बाहेर थांबू नका.आतमध्ये या तिकीट घ्यायला." म्हणत आम्हाला आतमध्ये घेऊन गेले.

दादांना कधी थेटरची वाट माहीतच नव्हती. त्यामुळे त्यांना तिथे पाहून मॅनेजर ईनामदारांनासुद्धा आश्चर्य वाटले.चित्रपट कसा आहे हे दादांना माहीत असणे शक्यच नव्हते. ईनामदारांनी चित्रपट चांगला असल्याचे दादांना सांगितल्याचे मला आजही ठळकपणे आठवते.

बॉर्डर एक चित्रपट म्हणून उत्तमच होता.त्या दिवशी तो पाहताना मजा आलीच.मात्र आज इतक्या वर्षानंतर आजही बॉर्डर कधीही टीव्हीवर लागला तरी चॅनेल बदलावेसे वाटत नाही.त्यातले 'संदेसे आते है' गाणं तर आजही कित्येकांच्या मनात घर करून आहे. इतकं लांबलचक गाणं असूनही ते ऐकताना कंटाळा येत नाही.

पुढे काही वर्षांनी दादांनी टू इन वन टेपरेकॉर्डर घेतला. त्यावेळी माझा हट्ट म्हणून त्यांनी ए साईडला येस बॉस आणि बी साईडला बॉर्डरची गाणी असलेली कॅसेट घेतली.ती अगदी अलिकडेपर्यंत माझ्या संग्रहात होती.

पुढे पुण्यात आल्यावर आई दादांबरोबर बरेच चित्रपट पाहिले. दादांबरोबर पाहिलेला पहिला चित्रपट म्हणून बॉर्डरची आठवण मात्र कायम राहील.

No comments:

Post a Comment