Wednesday, October 31, 2018

सूर्यवंशी सरांशी पहिली ओळख अकरावीत झाली. ते आम्हाला इंग्रजी शिकवत. आठवीत असताना इंग्रजीच्या व्याकरणाचा पाया डुंबरे सरांनी तयार करून घेतला. शाळेत नववी,दहावीला माकुणे सरांनी इंग्रजी विषय इंग्रजीतून शिकवला. पुढे अकरावी, बारावीला सूर्यवंशी सरांनी तेच केले. आपल्याकडे इंग्रजी विषय अनेकदा मराठीतून शिकवला जातो.सूर्यवंशी सरांनी ते करणे कटाक्षाने टाळले. कविता असो किंवा गद्य, त्याचा अर्थ त्यांनी कायम इंग्रजीमधूनच समजावून सांगितला.  त्यामुळे नकळतपणे आम्हाला इंग्रजी कानावर पडत असे. कधी कधी सर वर्गात येऊन एक दोन जणांना उभे करत.त्यांना एखादा विषय देऊन त्यावर इंग्रजीतून चर्चा करायला लावत.सुरुवातीला इंग्रजी बोलताना हसू येई.नंतर मात्र सवय होऊन गेली. बोलताना आम्हाला काही अडचण आली, योग्य शब्द सापडला नाही तर सर मदतीला असतच.मला या चर्चांचा पुढे बराच उपयोग झाला. मी माझं म्हणणं इंग्रजीतून मांडताना अनेकदा दोन वाक्यांच्या मध्ये 'म्हणजे' हा शब्द वापरे.तो आपसूक माझ्या तोंडी येई.सरांनी ते बरोबर पकडले आणि मला त्या ऐवजी 'आय मीन किंवा आय मीन टू से' हे वापरण्याचे सुचवले.मी आजतागायत ते करतो आहे.

आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन इंग्रजी बोलताना अडचण येऊ नये या भावनेतून सर आम्हाला इंग्रजी बोलायचा सराव करायाला लावत. या चर्चांचे विषयही आम्हाला आवडतील असे असत.कधी सचिनची बॅटिंग, कधी सध्याची राजकीय परिस्थिती तर कधी अगदी लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज असेही विषय असत.एक आठवण सांगतो. लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज या चर्चेत दोन्ही बाजूकडची मुलं आपली बाजू तावातावाने मांडत होती.सर आपल्या परीने तटस्थ राहून चर्चा पुढे नेत होते. सरांनी लव्ह मॅरेज केलेय हे माहीत असलेल्या मी एका मुद्द्यावर उभे राहून म्हटले,

"Even you chose to go ahead with Love Marriage. In that case, you should support us." 

माझं हे वाक्य ऐकताच सगळा वर्ग हास्यात बुडाला.सरांनाही हसू आवरले नाही आणि अखेरीस त्यांनी आमची बाजू घेतली.

बारावीनंतर जुन्नरमधून बाहेर पडलो.जुन्नरला गेल्यावर अधून मधून सरांना भेटणे होत असे.त्यावेळीही त्यांच्याशी इंग्रजीतूनच संवाद होई. बारावी संपून आता पंधरा वर्षे होतील.सर आजही संपर्कात असतात.माझे ब्लॉग नियमित वाचत असतात.काही चूक वाटली तर आवर्जून तसे सांगतातही. आज सर सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा दाटून आल्या. सरांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.

Tuesday, October 30, 2018

पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था अजून झाली नव्हती. मरीन लाईन्सला असलेल्या मुलींच्या सरकारी हॉस्टेलला जेजेच्या विद्यार्थीनींसाठी काही जागा राखीव असतात. या जागाही लवकर भरतात. पूजाच्या अॅडमिशनला तसा  उशीर झाला होता.त्यामुळे हॉस्टेलला प्रवेश मिळेल की नाही याबाबत शंका होती. दादांना कुणीतरी सांगितलं,

"वळसे पाटलांना भेटा. ते करतील काम."

साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे उच्चशिक्षणमंत्री होते. एक दिवस सकाळीच दादा साहेबांच्या मुंबईतल्या शिवगिरी बंगल्यावर गेले. भेट ३-४ मिनिटांचीच झाली. साहेबांनी काम होईल याची खात्री देऊन त्यांचे स्वीय सहाय्यक भोर यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले.

त्यानंतर काय सूत्रे फिरली की काय झाले कल्पना नाही.दोन एक दिवसांनी भोर साहेबांचा दादांना फोन आला,

"उद्या मुलीला घेऊन हॉस्टेलला जा.तिथं सगळं होईल व्यवस्थित."

त्यांनी सांगितल्याप्रमाणे दादा आणि पूजा हॉस्टेलला पोहोचले.ते पोहोचतात तोच हॉस्टेलचा फोन वाजला. फोनवर बोलून रेक्टर मॅडम बाहेर आल्या आणि दादांना म्हणाल्या,

"तुम्ही गुंड का?"

दादांनी हो म्हणताच त्यांनी पूजा आणि दादांना ऑफिसमध्ये नेऊन पुजाचा हॉस्टेलच्या प्रवेशाची प्रक्रिया वेगात पार पाडली. 

आपल्या गावची एक मुलगी जे जे सारख्या कॉलेजला जातेय म्हटल्यावर तिच्या हॉस्टेलचं हे छोटंसं काम केलंच पाहिजे या भावनेने साहेबांनी पूजाचं हे काम करून दिलं.

आजही कधी पूजाच्या अॅडमिशनची आठवण झाली की साहेबांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रसंग पुन्हा एकदा आठवला. 

साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Monday, October 22, 2018

द ड्रेनेज

परवा बाणेरच्या ड्रामालयला 'द ड्रेनेज' नावाची शॉर्टफिल्म पाहिली. गावावरुन एक माणूस स्मार्टफोन घ्यायला शहरात येतो. त्याचा जुना फोन देऊन नवा स्मार्टफोन विकत घेतो. नवा फोन घेतल्याच्या आनंदात गावाकडच्या आपल्या एका मित्राला फोन करतो. मी नवा फोन घेतलाय, टचस्क्रीन आहे असं कौतुक चाललेलं असतं. तितक्यात एका दुचाकीवाल्याचा धक्का लागून फोन त्याच्या हातातून खाली पडतो तो नेमका एका ड्रेनेजमध्ये. 

दहाच मिनिटांपूर्वी घेतलेला फोन ड्रेनेजमध्ये पडल्यावर त्या माणसाची काय अवस्था होते? तो फोन परत मिळवण्यासाठी तो काय काय करतो? या सगळ्याची गोष्ट म्हणजे 'द ड्रेनेज'. नंदू माधव यांनी भूमिकेला यथायोग्य न्याय दिला आहे. गावाकडचा माणूस, त्याचं शहरातील बावरत वावरणं, मोबाईल ड्रेनेजमध्ये पडल्यावर तो पुन्हा मिळवण्यासाठीची धडपड हे सगळं त्यांनी खूपच मस्त साकारलंय. एका प्रसंगात बरोबर त्यांचा फोन पडलेल्या ड्रेनेजच्या झाकणावर एक गाडी येऊन थांबते. एरवी कुणी असतं तर त्या गाडीवाल्याला सांगून गाडी दुसरीकडे लावायला सांगितली असती आणि फोन काढायचे प्रयत्न सुरु ठेवले असते.  बाजूला बसून गाडी कधी हलेल याची वाट बघत बसतात. यातून त्यांचा साधेपणाही जाणवला. 

तुम्ही म्हणाल एवढंच आहे का शॉर्टफिल्ममध्ये? तर नाही. शॉर्टफिल्म ज्याने लिहिली आणि दिग्दर्शित केली त्या विक्रांत बदरखेशी या निमित्ताने बोलायला मिळालं. शॉर्टफिल्मच्या शेवटच्या काही फ्रेम्समधून दिग्दर्शक त्याला द्यायचा असलेला संदेश देतो. मोबाईलचं व्यसन वगैरे विषय आजवर भरपूर चघळून झालेत. विक्रांत त्याही पलीकडे जाऊन विचार करतोय. गावात मोबाईलला रेंज नाही म्हणून विक्रांतच्या एका नातेवाईकाच्या शेतात मोबाईलचा टॉवर लावण्यात आला. त्याच महिन्याकाठी भाडंही सुरु झालं. मोबाईलला रेंजदेखील आली. मात्र त्यामुळे ही माणसं कुठेतरी शेती करायला आळसू लागली. हे सगळं कुठेतरी विक्रांतला खटकत होतं. आपल्या या नेहमीच्या जगासारखंच मोबाइलचंही एक जग आहे की काय? ते जग आपल्या जगाहूनही भयंकर आहे काय? या सगळ्या विचारांमधून 'द ड्रेनेज' ची  निर्मिती झाली. 

एका हलक्याफुलक्या विषयावर ही फिल्म आहे असे वाटत असताना शेवटची ३-४ मिनिटं मात्र तुम्हाला बराच वेळ विचार करायला भाग पाडतात. पंधरा मिनिटांत ही शॉर्टफिल्म तुम्हाला जिंकते. ड्रेनेजमध्ये केलेलं शूटिंग, आतमध्ये असलेला अंधार, घाण, त्यात शूटिंग करताना फवारलेले रूम फ्रेशनर आणि काय काय. हे सगळं करताना नक्की कसं केलं हे विक्रांतने सांगितलं तेव्हा त्याच कौतुक वाटलं. 

एक मुलगा अकोल्याहून पुण्यात येतो काय, स्पर्धा परीक्षांची तयारी करता करता लिहिता होतो काय, शॉर्टफिल्म लिहितो काय, आणि त्या शॉर्टफिल्मला जगभरातल्या अनेकानेक महोत्सवांमध्ये पारितोषिकं मिळतात काय!! एक लेखक, दिग्दर्शक म्हणून विक्रांतचा हा प्रवास कौतुकास्पद आहे. चित्रपटांचा दर्जा खालावला असे म्हणणाऱ्या लोकांना द ड्रेनेजसारख्या फिल्म्स दाखवल्या की या क्षेत्राचं भवितव्य योग्य हातांत आहे याची त्यांना खात्री पटेल. 

टिप - ही शॉर्टफिल्म युट्युबवर उपलब्ध नाही. लवकर युट्युबवर येईल अशी शक्यताही नाही. वेळोवेळी या फिल्मचं स्क्रीनिंग पुणे, मुंबई आणि इतरही शहरांत होत राहील. तुमच्या शहरात आली की न चुकता पहा. 

Monday, October 8, 2018

अंधाधुन

आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट पाहून कधी एकदा घरी जाऊन लिहीतोय असं आज झालं होतं. 

प्रेक्षकाला शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणे की काय म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट. ब्लॅक कॉमेडी आहे. चित्रपटाची सुरुवात मिस करू नका. कारण ती मिस झाली तर अख्ख्या चित्रपटाची मजा जाईल. 

आयुष्यमान आधीच भारी अॅक्टिंग करतो. त्यात त्याला हा चित्रपट मिळाला ज्यात तो एक मुख्य पात्र आहे. त्याने आंधळ्याच्या (सॉरी आंधळ्याचं नाटक करणाऱ्या - हा स्पॉयलर नाही) भूमिकेत जीव ओतला आहे. तब्बू हे दुसरं मुख्य पात्र. तिच्याबद्दल न बोललेलंच बरं इतकी ती भारी आहे.तिचं वय जसजसं वाढत चाललंय तसतसा तिचा अभिनय जास्तच भारी होत चाललाय. राधिका आपटेने छोट्याश्या भूमिकेत हवा केली आहे. झाकीर हुसेन हा डॉक्टरच्या भूमिकेत मजा आणतो. 

तब्बूने केलेला एक खून आयुष्यमान पाहतो, त्याने आपल्याला पाहिलंय हेही तब्बूला माहित असतं. तरी चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो. का? ते चित्रपट पाहूनच माहित करून घेणे जास्त योग्य राहील. दिग्दर्शक श्रीराम राघवन फिल्म इन्स्टिट्यूटचा माजी विद्यार्थी असल्यामुळे पुण्यात चित्रीकरण करावे असे त्याला वाटले असू शकेल. संपूर्ण चित्रपट पुण्यात चित्रित झाल्याने सतत आपल्याला माहित असलेल्या जागा दिसल्या की काही भान नसलेले प्रेक्षक मोठ्याने "अरे गुडलक चौक आहे हा." वगैरे वगैरे ज्ञान पाजळत राहतात. (पुण्यात चित्रित झालेला चित्रपट पुण्यात पाहताना तरी हे ज्ञान पाजळु नये याचं त्यांना भान रहात नाही. असो.)

अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो. किती? तर माझ्याशेजारी बसलेलं १२-१३ वर्षांचं पोरगं निम्म्याहून जास्त वेळ खुर्चीच्या पुढच्या कडेवर बसलं होतं आणि संपूर्ण चित्रपटात न राहवून त्याने ५-६ वेळा 'फक' म्हटलं.   

हा चित्रपट शांतीत क्रांती करतोय. फक्त माऊथ पब्लिसिटीवर चालणार आहे. यावर्षीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. पाहिला नसाल तर विकेंडची वाट पाहू नका. पस्तावा होणार नाही याची खात्री माझी. 

Friday, October 5, 2018

समालोचनाचे दोन दिग्गज

रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग हे दोघेही माझ्या पिढीला खेळाडू म्हणून तितकेसे आठवत नाहीत. दिग्गज समालोचक म्हणून मात्र निश्चित आठवतात. मला स्वतःला रिची बेनॉ यांची कॉमेंट्री फारशी आठवत नाही. टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री न ऐकलेला माझ्या पिढीचा माणूस सापडणं मात्र अवघड आहे.

टोनी ग्रेग यांची कॉमेंट्री म्हणजे दर्शकांसाठी पर्वणी असे.एखाद्या फटक्याचे भरभरून कौतुक कसे करावे हे शिकावे तर त्यांच्याकडूनच.एखाद्या खेळाडूने सोपा कॅच सोडला तर सयंतपणे फक्त बोलण्यातून त्याची लायकी काढावी ती त्यांनीच.

भारतीय क्रिकेट रसिकांना टोनी ग्रेग जास्त लक्षात राहतील ते त्यांच्या शारजामधल्या कॉमेंट्रीमुळे. सचिन ऑस्ट्रेलियाच्या चिंध्या उडवत होता तेव्हा माईक टोनी ग्रेग यांच्याकडे होता हे बरंच झालं असं आता वाटतं. सचिनची तो स्फोटक खेळी  जगप्रसिद्ध करण्यात ग्रेग यांच्या कॉमेंट्रीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आज रिची बेनॉ आणि टोनी ग्रेग या दोन दिग्गजांचा जन्मदिवस.आजच्या काही क्रिकेट समालोचकांची कॉमेंट्री ऐकून अक्षरशः कीव येते आणि या दोन दिग्गजांची आठवण आल्यावाचून रहात नाही.

क्रिकेटरसिक हे दोन आवाज येणारी अनेक वर्षे मिस करतील यात शंका नाही.