पंधरा काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.माझी बहीण पूजाला मुंबईच्या जे जे स्कुल ऑफ आर्टला अॅडमिशन मिळाले.कॉलेजचं तर झालं पण राहण्याची व्यवस्था अजून झाली नव्हती. मरीन लाईन्सला असलेल्या मुलींच्या सरकारी हॉस्टेलला जेजेच्या विद्यार्थीनींसाठी काही जागा राखीव असतात. या जागाही लवकर भरतात. पूजाच्या अॅडमिशनला तसा उशीर झाला होता.त्यामुळे हॉस्टेलला प्रवेश मिळेल की नाही याबाबत शंका होती. दादांना कुणीतरी सांगितलं,
"वळसे पाटलांना भेटा. ते करतील काम."
साहेब त्यावेळी महाराष्ट्राचे उच्चशिक्षणमंत्री होते. एक दिवस सकाळीच दादा साहेबांच्या मुंबईतल्या शिवगिरी बंगल्यावर गेले. भेट ३-४ मिनिटांचीच झाली. साहेबांनी काम होईल याची खात्री देऊन त्यांचे स्वीय सहाय्यक भोर यांच्या संपर्कात राहण्यास सांगितले.
त्यानंतर काय सूत्रे फिरली की काय झाले कल्पना नाही.दोन एक दिवसांनी भोर साहेबांचा दादांना फोन आला,
"उद्या मुलीला घेऊन हॉस्टेलला जा.तिथं सगळं होईल व्यवस्थित."
त्यांनी सांगितल्याप्रमाणे दादा आणि पूजा हॉस्टेलला पोहोचले.ते पोहोचतात तोच हॉस्टेलचा फोन वाजला. फोनवर बोलून रेक्टर मॅडम बाहेर आल्या आणि दादांना म्हणाल्या,
"तुम्ही गुंड का?"
दादांनी हो म्हणताच त्यांनी पूजा आणि दादांना ऑफिसमध्ये नेऊन पुजाचा हॉस्टेलच्या प्रवेशाची प्रक्रिया वेगात पार पाडली.
आपल्या गावची एक मुलगी जे जे सारख्या कॉलेजला जातेय म्हटल्यावर तिच्या हॉस्टेलचं हे छोटंसं काम केलंच पाहिजे या भावनेने साहेबांनी पूजाचं हे काम करून दिलं.
आजही कधी पूजाच्या अॅडमिशनची आठवण झाली की साहेबांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रसंग पुन्हा एकदा आठवला.
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
No comments:
Post a Comment