आत्ताच अंधाधुन बघून आलोय. ट्रेलर न पाहता फक्त एका मित्राने सांगितलं भारी आहे म्हणून गेलो. बऱ्याच वर्षांनी एकट्यानेच चित्रपट पाहिला.हा चित्रपट पाहून कधी एकदा घरी जाऊन लिहीतोय असं आज झालं होतं.
प्रेक्षकाला शेवटपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवणे की काय म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट. ब्लॅक कॉमेडी आहे. चित्रपटाची सुरुवात मिस करू नका. कारण ती मिस झाली तर अख्ख्या चित्रपटाची मजा जाईल.
आयुष्यमान आधीच भारी अॅक्टिंग करतो. त्यात त्याला हा चित्रपट मिळाला ज्यात तो एक मुख्य पात्र आहे. त्याने आंधळ्याच्या (सॉरी आंधळ्याचं नाटक करणाऱ्या - हा स्पॉयलर नाही) भूमिकेत जीव ओतला आहे. तब्बू हे दुसरं मुख्य पात्र. तिच्याबद्दल न बोललेलंच बरं इतकी ती भारी आहे.तिचं वय जसजसं वाढत चाललंय तसतसा तिचा अभिनय जास्तच भारी होत चाललाय. राधिका आपटेने छोट्याश्या भूमिकेत हवा केली आहे. झाकीर हुसेन हा डॉक्टरच्या भूमिकेत मजा आणतो.
तब्बूने केलेला एक खून आयुष्यमान पाहतो, त्याने आपल्याला पाहिलंय हेही तब्बूला माहित असतं. तरी चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो. का? ते चित्रपट पाहूनच माहित करून घेणे जास्त योग्य राहील. दिग्दर्शक श्रीराम राघवन फिल्म इन्स्टिट्यूटचा माजी विद्यार्थी असल्यामुळे पुण्यात चित्रीकरण करावे असे त्याला वाटले असू शकेल. संपूर्ण चित्रपट पुण्यात चित्रित झाल्याने सतत आपल्याला माहित असलेल्या जागा दिसल्या की काही भान नसलेले प्रेक्षक मोठ्याने "अरे गुडलक चौक आहे हा." वगैरे वगैरे ज्ञान पाजळत राहतात. (पुण्यात चित्रित झालेला चित्रपट पुण्यात पाहताना तरी हे ज्ञान पाजळु नये याचं त्यांना भान रहात नाही. असो.)
अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत चित्रपट तुम्हाला धरून ठेवतो. किती? तर माझ्याशेजारी बसलेलं १२-१३ वर्षांचं पोरगं निम्म्याहून जास्त वेळ खुर्चीच्या पुढच्या कडेवर बसलं होतं आणि संपूर्ण चित्रपटात न राहवून त्याने ५-६ वेळा 'फक' म्हटलं.
हा चित्रपट शांतीत क्रांती करतोय. फक्त माऊथ पब्लिसिटीवर चालणार आहे. यावर्षीच्या उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. पाहिला नसाल तर विकेंडची वाट पाहू नका. पस्तावा होणार नाही याची खात्री माझी.
No comments:
Post a Comment