Monday, June 13, 2016

दोन स्पेशल


 

दोन स्पेशल पाहून आता जवळजवळ तीन आठवडे झाले. लिहायला आज वेळ मिळाला. 

बरचं ऐकलं होतं या नाटकाबद्दल पण वेळ काही मिळत नव्हता. अखेरीस थोडी ओढाताण करून जमवलं. पडदा वर गेला आणि सेट पाहून मन सुखावलं. अतिशय साधा सेट. अर्थात नाटकाच्या विषयाला शोभेल असा. 

ही कथा आहे मिलिंद भागवत आणि स्वप्ना जोग या दोघांची. उमेदीच्या काळात दैनिक हिंदुस्थानसाठी काम करताना त्यांच्यात झालेली जवळीक आणि नंतर काही कारणास्तव झालेली ताटातूट. त्याच वृत्तपत्रामध्ये अनेक खस्ता खात आता उपसंपादक पदावर पोहोचलेला मिलिंद. आणि एका खाजगी बांधकाम कंपनीमध्ये काम करणारी स्वप्ना. 

शहरामध्ये झालेला एक अपघात या दोघांना पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आणतो. मिलिंदने लिहिलेल्या एका बातमीमध्ये असलेली तीन वाक्ये काढण्यासाठी स्वप्नाने केलेले प्रयत्न आणि आपल्या तत्वांशी तडजोड न करणारा मिलिंद. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक या दोघांनी आपापल्या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. 

नाटकाचे संवाद सुद्धा कौतुक करावे असेच. मिलिंदचा सहाय्यक उमेश भोसले हा लहान मुलांना रात्रशाळेमध्ये शिकवत असतो. एका प्रसंगामध्ये मी मुलांना पेपर सुद्धा वाचायला लावतो असं तो मिलिंदला सांगतो. त्यावर मिलिंद विचारतो, "सकाळचा पेपर इतक्या रात्री वाचतात ती मुलं?" त्यावर उमेश म्हणतो, "शिळ्या अन्नावर जगणाऱ्या त्या पोरांना ताज्या पेपरचं असं काय ते कौतुक?" या वाक्यानंतर प्रेक्षगृहामध्ये माझ्या मागे आणि पुढे बसलेल्या समस्त स्रीवर्गाकडून आई गं, काय ना अशा नानाविध प्रतिक्रिया कानावर आल्या. असे अनेक संवाद या नाटकाची मजबूत बाजू ठरलेले आहेत. 

१९८९ सालात घडलेली कथा असल्याने त्याला साजेसं असं सगळं असणं फार गरजेचं होतं. दिग्दर्शक नेमका तिथे जिंकला आहे. याच वर्षी नेमका कयामत से कयामत तक प्रदर्शित झाला होता. एका प्रसंगात रेडिओवर "गझब का है दिन" हे गाणं वाजलं. त्याक्षणी मी टाळ्या वाजवल्या. बायकोला कळेना काय झालं. तिला मग सांगितलं की १९८९ सालात घडतंय नाटक आणि बरोबर त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं गाणं वाजतंय. हे ध्यानात ठेवलंय याचं कौतुक आहे मला. 

अजून दोन आवडलेल्या गोष्टी म्हणजे नाटकाची प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत. ज्या काळामध्ये ट्युबलाईट फारशा वापरात नसत त्या काळात नाटक घडत असल्याने सबंध नाटकभर बल्बचा प्रकाश जाणवत राहतो. वर्तमानपत्राचे कार्यालय रस्त्याला लागून असावं असं प्रेक्षकांना सतत वाटत राहावं म्हणून अधून मधून येणारे वाहनांचे आवाज. स्वप्ना जात येत असताना येणारा रिक्षाचा आवाज आणि तीच रिक्षा दूर जात असताना कमी होत जाणारा आवाज हे फार शिताफीनं हाताळलेल आहे. 

एका प्रसंगामध्ये मिलिंद भर पावसामध्ये बसची वाट पहात उभा असतो. त्याचवेळेस त्याचा एक जुना मित्र कारमधून जात असताना त्याला पाहतो आणि आपल्या कारमध्ये बसायला बोलावतो. मिलिंद कारमध्ये बसल्या बसल्या बंद झालेला पावसाचा आवाज आणि त्याचबरोबरीने कारच्या टपावर पडून पावसाच्या थेंबांचा येणारा आवाज. हे सगळे बदल प्रेक्षकांना लक्षात सुद्धा येणार नाहीत इतक्या सहजतेने केलेले आहेत. 

वर्तमानपत्राचे कार्यालय म्हणजे प्रिंटींग प्रेस पाहिजेच. सबंध नाटकभर कार्यालाच्या मागे असणाऱ्या प्रेसमधून छपाईचा येणारा आवाज सतत जाणवत राहतो. मिलिंदाने फोन करून प्रेस थांबवा असे सांगितल्यावर बंद झालेला छपाईचा आवाज एक वेगळीच शांतता निर्माण करतो. दर ५-१० मिनिटाला वाजणारा टेलीप्रिंटर, जुन्या काळातला बोटाने फिरवून नंबर लावावा लागणारा फोन हे सगळं अगदी कथेमध्ये चपखल बसणारं. 

बऱ्याच दिवसांनी एक चांगल नाटक पाहायला मिळालं अशी दादही आमच्या आई वडिलांनी दिली. ज्या अपेक्षा घेऊन नाटक पाहायला गेलो होतो त्या सगळ्या पूर्ण करण्यात नाटक यशस्वी झाले. 
अजून पाहिले नसेल तर नक्की बघा. 


Friday, June 10, 2016

मी अधून मधून काहीतरी लिहित असतो. चांगलं वाईट देव जाणे. आज अचानक दादांनी त्यांच्या जन्मतारखेबद्दल लिहिलेला एक कागद हाताशी आला. त्यातला मजकूर इथे मांडावासा वाटला. 

माझा वाढदिवस 

१ मार्च १९४८ रोजी अस्मादिकांचा जन्म झाला. म्हणजे आपलं म्हणायचं. म्हणायचं एवढ्यासाठी की ती काही खरी जन्मतारीख नव्हे. शाळेत घालताना जन्मतारीख लागते हे कळण्याएव्हढं घरचं कोणी 'सज्ञान' नव्हतं. गुरुजींनी अनेकांप्रमाणे आमचीही जन्मतारीख मनानेच लिहिली. 

मोठा झाल्यावर जन्मतारीख शोधायचे खूळ डोक्यात शिरलं. एका मित्राबरोबर (साहेबाबरोबर) तालुक्याच्या गावी घोडेगावला गेलो. तो येईना म्हटल्यावर "अरे तुझीसुद्धा जन्मतारीख पाहिजेच" असेही त्याला पटवले. गेलो दोघे. कचेरीच्या  गदारोळात जन्मतारखेचा साहेब शोधला. त्याला दक्षिणा कबुल केली. पण कसलं काय. मी आणि माझा परममित्र जन्माला आल्याचा दाखला काही मिळाला नाही. नवलच ना? माणूस तर जिता जागता पण जन्माचा दाखलाच नाही. वैतागवाडी झाली आणि काय महाराजा!! 

आणि थोडा मोठा झाल्यावर म्हणजे नोकरी करताना वहिकरसाहेब एक दिवस म्हणाले, "अण्णा, तुमची जन्मतारीख काय?" (दादांना बरेच लोक अण्णा अशी हाक मारतात)

"१/३/१९४८" इति आम्ही वदलो. साहेबांचा पुढचा प्रश्न तयार होता. 

"ते झाले हो. नक्की तारीख?"

"माहीत नाही." 

"मग असं करा, मुंबईला गेल्यावर अमूक ठिकाणी अमूक माणसाला भेटा. तो सांगेल."

नवलच म्हणायचं! जन्मदाता बाप सांगू शकत नाही तिथे तो महाभाग काय सांगणार? तरीपण एकदा गेलो त्याच्याकडे. पण त्यालाही जमले नाही. पाहताक्षणी तुम्ही कशाला आला आहात हे समजणारा माणूस मला मात्र काही प्रसन्न झाला नाही. 

पुढे मुलांचे वाढदिवस सुरु झाले. मला फारसं पटत नव्हते पण बायकोचे म्हणणे, " तुम्हाला काही कळतच नाही." हे त्रिकालाबाधित सत्य समोर आले.

पुढे कोणीतरी पोट्ट्याने जन्मतारीख ध्यानात ठेवली आणि अभिष्टचिंतन केले. माझ्या मात्र काळजात काही हलले नाही. "कसलं काय!" असं त्याला म्हणालो. 

अलीकडे तर रिवाजच झालाय. १-३ आली की मुलांचा अगदी अमेरिकेतून, जर्मनीहूनसुद्धा  फोन येतो. यंदा तर कहरच झाला. १-३ आली. घरी आम्ही दोघे आणि सुनबाई. पण नाही. सुनबाई संध्याकाळी धडपडत गाडीवर गेली, केक आणला. आता बोला. 

मधून मधून आता मात्र मीसुद्धा कोणाची जन्मतारीख माहीत पडली तर आवर्जून फोन करतो. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याइतका दुसरा आनंद नाही. परमानंद!! अशी ही वाढदिवसाची कहाणी. सुफळ संपूर्ण!!

जीबी

Thursday, May 26, 2016

सफर मुन्नारची

या आठवड्यामध्ये कामानिमित्त केरळमधील कोचीनला जाण्याचा योग आला. तिथल्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्हाला हवा असलेला माणुस मुन्नारच्या शाखेत असतो. मी आणि माझा सहकारी दोघेही मग कोचीनहून मुन्नारला गेलो.
मुन्नारबद्दल आधी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं. मुन्नारला जाणाऱ्या रस्त्यावर एकुणात पुढे आपल्याला काय दिसणार आहे याची साधारण कल्पना येऊ लागली होती. मुन्नारमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी ठरल्याप्रमाणे त्या माणसाला भेटलो. त्याने अजून एका माणसाला भेटायला सांगितल्याने खरं तर निराश आम्ही झालो पण कामाचा भाग म्हणून त्याला सुद्धा फोन केला. हे सगळं उरकेपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले होते. अर्थातच त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावले.
सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्याने आता हॉटेल मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. अखेरीस एका हॉटेलात रूम मिळाल्या आणि आमची गाडी त्या दिशेने चालू लागली.
त्या संध्याकाळी आभाळ काहीसं भरून आलेलं. मुळात मुन्नार उंचीवर असल्याने ढग खाली उतरू लागले होते. जागोजागी पर्यटक थांबून फोटो काढत होते. इतका वेळ गाडीत बसून निसर्गाच्या सौंदर्याची स्तुती करणारा मी एका विशिष्ट ठिकाणी गेल्या नंतर स्वतःला थांबवू शकलो नाही. माझ्या सहकाऱ्याला गाडी थांबवायला सांगून मी खाली उतरलो आणि ते सौंदर्य डोळ्यांमध्ये भरून घेऊ लागलो. सहसा कशाला पटकन चांगला न म्हणणारा मी निसर्गाची ती किमया पाहून हरखून गेलो होतो. नकळत हात फोनकडे गेला आणि मी फोटोज काढायला लागलो.
नजर जाईल तिथपर्यंत चहाचे मळे आणि ते संपले की पश्चिम घाटाच्या डोंगररांगा. यातले बहुसंख्य चहाचे मळे टाटांच्या मालकीचे आहेत. इथेच चहा बनविण्याचे कारखाने सुद्धा आहेत. इथे तयार होणारा चहा पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये विकला जातो. मुन्नारमध्ये गेलाच आहेस तर येताना आपल्याला चहा पावडर घेऊन ये असा हा आईचा आदेश आलेलाच होता. तो शिरसावंद्य मानून दुसऱ्या दिवशी सकाळची मिटिंग संपवून चहा खरेदी केली आणि पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी कूच केले.

















Tuesday, February 9, 2016

आबा


आबांची आणि माझी भेट २०१३ मधल्या डिसेंबर महिन्यात झाली. माझा एक अमेरिकन मित्र आणि मी दोघांनी पुण्याला येण्यासाठी आबांची गाडी भाड्याने घेतली होती. मुंबई ते पुणे या प्रवासामध्ये मला आबांच्या ड्रायविंगबद्दल एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे आबांचे गाडी चालविण्याचे कौशल्य अतिशय चांगले होते. उगाच खूप जास्त वेगही नाही किंवा अगदी कूर्मगतीसुद्धा नाही. मला हे आवडलं.

माझा मित्र फक्त २ आठवड्यांसाठी पुण्यात होता आणि काही कारणास्तव त्याला मुंबईला सोडायला जाणे मला जमणार नव्हते. पुण्यात पोहोचल्यावर मी आबांना विचारलं की दोन आठवड्यानंतर त्याला परत मुंबईला सोडणार का? आबांनी होकारार्थी मान डोलावली आणि मला जायच्या एक दिवस अगोदर फोन करायला सांगुन घरी गेले.
ठरल्याप्रमाणे मी आबांना एक दिवस आधी फोन करून येण्याची वेळ सांगितली आणि दुसऱ्या दिवशी आबा ठरलेल्या वेळेस हजर झाले. माझ्या मित्राला मुंबई विमानतळावर सोडल्यानंतर आबांनी मला फोन केला आणि माझ्या मित्राला सोडल्याचे मला सांगितले. त्यानी फोन मित्राकडे देऊन माझे आणि त्याचे बोलणेदेखील करून दिले. त्यांची हि सगळी वागणुक मला आवडली आणि मी माझ्या ऑफिसच्या ट्रिप्ससाठी आबांनाच बोलवायचं हे मनामध्ये ठरवून टाकलं.
कामानिमित्त माझे बऱ्याचदा मुंबईला जाणे होते. प्रत्येक वेळी मी आबांना फोन करून निघायची वेळ कळवतो. आजतागायत आबा कधीही उशिरा आलेले नाहीत. अशाच एका मुंबई ट्रीप दरम्यान आबांनी मला नुकताच घेतलेला त्यांचा स्मार्टफोन दाखवला आणि तो वापरण्यासाठी काही टिप्स मागितल्या. मी माझ्या परीने त्यांना शिकवलं.
साधारण एक-दोन आठवडे गेल्यानंतर आबांनी मला विचारलं, "सर फेसबुक काय असतं?"
मी त्यांच्याकडे आश्चर्य आणि कौतुकाने बघून त्यांना फेसबुक म्हणजे नक्की काय असतं, ते कसं वापरायचे हे सांगितले. मग आबा लगेच म्हणाले, "माझं पण अकाउंट तयार करून द्या."
मग मी आबांना त्यांचे फेसबुक अकाउंट तयार करून दिले. त्यांना फोटो कसे अपलोड करायचे, इतरांचे फोटोज लाइक कसे करायचे, फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवायची हे शिकविले. हळूहळू आबा फेसबुक वापरायला शिकले आणि आता ते अगदी एक्स्पर्ट झालेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
काही महिने गेल्यानंतर एक दिवस आबांनी मला विचारले, "सर तुम्ही ओला आणि उबर कॅब मध्ये फिरता. त्यांची काय सिस्टीम असते?"
पुन्हा एकदा आबांच्या कुतुहलाचे कौतुक करत मी त्यांना त्याबद्दल माहिती दिली आणि शक्य झाल्यास तोही जोडधंदा सुरु करावा असे सुचविले. आबा आधीपासून आपली गाडी भाड्याने देत होते. त्यातून कमाई देखील पुरेशी होत होती. पण काही दिवस असे यायचे की कोणतीच ट्रीप नसायची. मग आख्खा दिवस घरीच जायचा. आता तो प्रश्न पडत नव्हता. जेव्हा घरी असतील तेव्हा आबा दिवसभर ओला आणि उबरच्या ट्रिप्स करतात त्यामुळे काम तर आलंच पण थोडाफार पैसा शिल्लक राहु लागला.
मला तामिळ गाणी ऐकायची आवड आहे. अशाच एका मुंबई पुणे ट्रीप मध्ये आबांनी आपला पेन ड्राईव माझ्याकडे दिला आणि म्हणाले, "यात काही तमिळ गाणी टाकून द्या मला."
मी नेहमीप्रमाणे चकीत होऊन, "तुम्हाला सुद्धा तमिळ गाण्यांचा नाद लागला की काय?"
आबा - "नाही नाही तसं नाही. माझ्याकडे कधीकधी दक्षिण भारतीय लोक सुधा येतात. त्यांना ऐकायला गाडीमध्ये ही गाणी लावली तर त्यांना बरं वाटेल."
आबांच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे कौतुक करून मी त्यांना ही तमिळ गाणी दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघात विम्याचे महत्व बऱ्याच शिकलेल्या माणसांनासुद्धा कळत नाही. पण आबांनी बऱ्याच आधी आपला स्वतःचा अपघात विमा काढून घेतलेला आहे आणि आपल्या इतर ड्रायव्हर मित्रांना देखील त्यांचे महत्व जमेल तेव्हा पटवून देत असतात.
सगळं काही व्यवस्थित चालू असताना एक दिवस आबांनी मला पुण्याजवळच्या एका गृहप्रकल्पाचे ब्रोशर दाखवले. उत्सुकता म्हणून मी आबांना विचारले, "कोणासाठी बघताय फ्लॅट?"
आबा म्हणाले मीच घेतोय. अतिशय आनंदाने त्यांचे अभिनंदन करून मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फ्लॅट बुक केल्यानंतरच्या आमच्या भेटीमध्ये आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह केवळ अवर्णनीय होता. त्या दिवशी खरोखर मला आबांच्या जिद्दीचा आणि कष्टाळू वृत्तीचा अभिमान वाटला.
माझ्यासाठी आबा हे निश्चित एक यशस्वी व्यावसायिक किंवा अगदी आपल्या इंग्रजीमध्ये सांगायचे झाले तर Successful Entrepreneur आहेत.

Friday, January 1, 2016

नटसम्राट

नाना नाना आणि फक्त नाना. असंच वर्णन करावं लागेल "नटसम्राट" या चित्रपटाचं. तुमची मातृभाषा कोणतीही असूद्यात. हा चित्रपट तुमच्यासाठी नक्की एक  मेजवानी आहे. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकावर बेतलेला हा चित्रपट. महेश मांजरेकरांनी प्रचंड मेहनत घेऊन ही कलाकृती बनवली आणि नाना पाटेकरांनी आपल्याला मिळालेल्या भूमिकेचं खरोखर सोनं केलय.

गणपतराव बेलवलकर आपल्या अतिशय यशस्वी कारकीर्दीनंतर निवृत्ती घेतात. आपल्या कुटुंबीयांसोबत आता वेळ घालवायचा हे त्यांनी ठरवलेले असते. आपलं घर आणि इतर सगळी संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करून गणपतराव मोकळे होतात. आपल्या नवऱ्याचा हा निर्णय त्यांच्या बायकोला (गणपतराव चित्रपटामध्ये त्यांना प्रेमाने "सरकार" असं संबोधतात) फारसा पटत नाही पण त्या त्यांची साथ देतात. सगळं काही गणपतरावांना वाटतं असतं तसं घडतं नाही आणि अखेरीस ते दोघे घर सोडून बाहेर पडतात. आणि तिथून पुढे घडलेला  सगळा भाग हा फक्त चित्रपटगृहामध्येच पहावा असं मी म्हणेन. 

काही संवाद तुम्हाला हसायला लावतात पण पुढच्या क्षणाला तितकेच विचारातदेखील पाडतात कारण ते वास्तव असल्याची तुम्हाला लागलीच जाणीव होते. नानांची प्रमुख भुमिका असली तरी मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनिल बर्वे यांच्या भूमिकांचे महत्व कमी होत नाही. नेहा पेंडसेने आपल्या कारकीर्दीमध्ये आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याहून पूर्णपणे वेगळी अशी भूमिका तिने या चित्रपटामध्ये साकारलेली आहे. तिची भुमिका हा माझ्यासाठी एक धक्का होता हे मात्र निश्चित. माझा मित्र चैतन्य म्हणाला त्याप्रमाणे मेधा मांजरेकरांचे डोळेच इतके बोलके आहेत की त्यांनी फक्त कॅमेराकडे पाहिलं की प्रेक्षकांना त्यांना काय म्हणायचे आहे हे लक्षात येतं. हा त्यांच्या अभिनयाचा विजय आहे असे मी म्हणेन. काही जणांना चित्रपटामधले काही प्रसंग नाटकासारखे वाटतील पण माझ्या मते त्याची गरज होती म्हणून दिग्दर्शकाने ते प्रसंग तसे केले असतील. विक्रम गोखलेंची भूमिका थोडी अजून लांबीची असती तर कदाचित अजून मजा आली असती. डॉक्टर श्रीराम लागूंनी केलेली भूमिका प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण ही भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य नानांनी यशस्वीरीत्या पेलेलेलं आहे असं मी म्हणेन.  

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोन प्रचंड ताकदीच्या अभिनेत्यांची जुगलबंदी पहायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा. नाना पाटेकरांचे वजनदार मोनोलॉग ऐकायचे असतील तर हा चित्रपट नक्की बघा. भूमिकेचं बेअरिंग म्हणजे काय असतं हे पाहायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. संवादफेक म्हणजे काय असतं, प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणे म्हणजे काय असते हे पहायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. मराठी चित्रपटसृष्टी मधली अलीकडच्या काळातली एक उत्कृष्ट कलाकृती पहायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा. हा चित्रपट न पाहणे ही आपली चूक झाली असं नंतर वाटेल इतका जमून आलाय हा चित्रपट. लवकर जा.