Sunday, September 2, 2018

दळण

काल दळण पाहिलं. हो पाहिलंच.द मा मिरासदारांच्या एका कथेवर आधारित हे नाटक/एकांकिका आहे.

आधीही एकदा मी दळण पाहिलं होतं. साधारण चारेक वर्षांपूर्वी.काल एका मित्राला घेऊन गेलो. त्याची एकूण विचारसरणी आता परिचयाची झाली आहे.त्यामुळे त्याला आवडेल की नाही ही शंका होती. नाटक सुरू असताना मी बऱ्याचदा त्याच्याकडे बघत होतो. वेगवेगळ्या संवादांना, विनोदी पंचेसला त्याची काय प्रतिक्रिया येतेय यांच्याकडेही माझं लक्ष होतं.तो दिलखुलास हसत होता.दाद देत होता.ह्याला नाटकाला आणण्याचा आपला निर्णय योग्य ठरला याचा मला आनंद झाला.

चार वर्षानंतर दळण पाहताना मला त्याच्या सादरीकरणात कुठेही बदल जाणवला नाही. अमेय वाघ, आलोक राजवाडे,सिद्धेश पुरकर आणि अजून एक दोन जण हे दळणच्या पहिल्या फळीतले कलाकार सोडले तर बहुसंख्य कलाकार बदलले आहेत असे वाटते (कदाचित तसे नसेलही). असे असूनही इतक्या वर्षांनंतरही हे नाटक तेवढ्याच ताकदीने तुमच्या समोर येतं.

छोट्या गावातल्या शाळेत एक स्त्रीलपंट मास्तर येतो.त्याच्या त्या स्त्रीलंपटपणामुळे काय धमाल उडते हे नाटकात दाखवले आहे.

अमेय वाघ अभिनेता म्हणून आता बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. चित्रपटही केलेत. अमर फोटो स्टुडिओसारखं उत्तम नाटकही करतोय. या सगळ्या व्यापातून वेळ काढून तो दळण करतो याबद्दल त्याचं कौतुक वाटतं. दळणच्या प्रसिद्धीसाठी इंस्टाग्राम, फेसबुकवर वेगवेगळ्या कल्पक पोस्ट्स टाकून तो तरुणाईला हे नाटक पहायला येण्याचं आव्हान करत असतो.यातून त्याचं या नाटकावरचं प्रेम जाणवतं. बाकी मास्तरांच्या भूमिकेत तो जो काही बाजार उठवतो त्याला तोड नाही. "आईला म्हणावं मास्तरांनी बोलीवलंय." हा डायलॉग तो गेली दहा वर्षे त्याच टोनमध्ये म्हणतोय आणि प्रत्येक प्रयोगाला त्या डायलॉगसाठी टाळ्या आणि शिट्ट्या घेतोय.

आलोक राजवाडे शिवाच्या भूमिकेत रंग भरतो.सवांदफेकीची त्याची शैली टाळ्या घेत राहते. मास्तरांना हाक मारताना 'मास्तर' मधला 'मा' तो असा काही लांबवतो की प्रेक्षकांमध्ये फक्त त्या एका शब्दामुळे खसखस पिकते.

इतर कलाकार अमेय, आलोक यांना यथायोग्य साथ देतात.गंधारचं साधं पेटी आणि तबल्याचं संगीतही परिणामकारक गाण्यांमध्ये ठरतं. एकुणात हे नाटक ८० मिनिटे तुम्हाला धरून ठेवतं.

पुण्यात अधूनमधून या नाटकाचे प्रयोग होत असतात. वेळ मिळेल तेव्हा नक्की बघा.

Wednesday, August 29, 2018

श्रद्धा..

"ये किसका बॅग है?" एअरपोर्ट सिक्युरिटीला ड्युटीवर असलेल्या सीआयएसएफच्या माणसाने बेल्टवर स्कॅन होऊन आलेली एक बॅग हातात घेत विचारले.

"हमरा है जी." माझ्यासमोर उभ्या असलेल्या पन्नाशीतल्या एका बाईने आपली बॅग ओळखत उत्तर दिले.

"खोलो इसे. चेक करना पड़ेगा."

"क्या हुआ?" तिला बिचारीला कळेना नक्की काय झाले.

"खोलो तो पहले." त्याने पुन्हा फर्मावले.

तिने बॅगची चेन उघडली. त्याने वरुन  ढुंकून पहात काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. ते बहुधा त्याला दिसले नसावे.

"इसमें लोहेका तुकडा है एक. ऐसे शेपका." हाताने इंग्रजी यु आकार हवेत काढत त्याने तिला सांगितले.

"हां हैं." तिने उत्तर दिले.

"उसे बाहर निकालो." बॅग तिच्याकडे सरकवत त्याने आदेश दिला.

तिने बॅगेत हात टाकून तो तुकडा बाहेर काढला. तो तुकडा म्हणजे घोड्याची नाल होती.

"यह अलाउड नही है ले जाना."

"काहे?" तिने भाबडेपणाने विचारले.

"अरे अलाउड नही बोले ना हम."

"बताओ अब क्या करे? इतने दूरसे लेकर आये थे हम.इससे भला हम क्या करेंगे? जाने दीजिये. बिनती करते है हम."

"अरे लेकिन यह लेकर नही जा सकते." त्याने पुन्हा सांगितले.

"हम कहाँ किसको मारनेवाले है.मंदिर गए थे नेपाल. वहासे लाये है बड़ी श्रद्धा से.महंगा भी है. ३०० में खरीदा था.और आप कह रहे यही रखो. भला ऐसे कैसे रखे?"

"साबसे बात करनी पड़ेगी." त्याने साहेबांकडे डोळे दाखवत सांगितले.

"अरे काहे साहब के पास भेज रहे हो.जाने दो.बिनती करते है.इससे भला हम क्या भी कर सकते है.भगवान की चीज है.श्रद्धा है हमारी बस और कुछ नही."

ही बाई घोड्याची नाल घेऊन तर आलीये.चेहऱ्यावरून साधी वाटतेय फारच. नाल तशीही देव्हाऱ्यात ठेवणार आहे. काय हरकत आहे असा विचार करत त्याने ती तिच्या उघड्या बॅगेत भिरकावली आणि म्हणाला,

"जाइये.श्रद्धा हमारी भी है बस यह नौकरी कभी कभी बीचमें आती है."

"बहुत धन्यवाद आपका." म्हणत तिने खुशीने बॅगची चेन लावली आणि आपल्या गेटकडे निघून गेली.

मी बाजूला उभा राहून गालात हसत आहे पाहून तो मला म्हणाला,

"क्या भी करे सर.सबको खुश रखना पड़ता है.बात आखिर श्रद्धा की है."

"जी बिलकुल." म्हणत मीही माझ्या गेटकडे चालू लागलो.

Tuesday, August 21, 2018

आंब्या

गेल्या वर्षी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने एका प्रकल्पांतर्गत शॉर्ट फिल्म महोत्सव भरवला होता. या महोत्सवासाठी मित्र संजय ढेरंगे याच्या 'आंब्या' ह्या शॉर्ट फिल्मची निवड झाली. निवडीचा आनंद साजरा करतोय तोच या महोत्सवात 'आंब्या' ला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची बातमी आली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, २५ हजार आणि भरभरून कौतुक एवढं सगळं आंब्याच्या वाटेला आलं. 

फिल्म पाहिल्यावर एका मित्राचे नाही तर एका दिग्दर्शकाचे कौतुक करावेसे वाटले. बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात लहान मुले पडण्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. कित्येकदा बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या मुलाची अमुक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका अशा बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. आपणही त्या वाचतो आणि सोडून देतो. पण अशाच एखाद्या खड्ड्यात पडलेल्या मुलाच्या आईवडीलांची काय अवस्था होत असेल हा विचार क्वचितच आपल्या मनाला शिवतो. सरकारी पातळीवरदेखील याकरता फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मग एखाद्या फिल्मच्या माध्यमातूनच हा विषय का मांडू नये अशा विचाराने संजयने ही फिल्म बनवली आहे. 

ऊसाच्या शेतात काम करताना चार सहा ऊसच एकत्र करून त्याची आपल्या बाळासाठी झोळी बनवणे, मुलाला यात्रेत खर्च करण्यासाठी १० रुपये दिले म्हणजे आपण खूप पैसे दिल्यासारखे वाटणे, मुलाच्या दोन्ही पायांत वेगवेगळ्या चपला असणे, यात्रेत गेल्यावर त्याने भेळीच्या गाडीवर ठेवलेल्या शेव, कुरमुऱ्यांच्या पिशवीवर फक्त हात फिरवणे असो, गोडीशेव खरेदी न करता फक्त ती केवढ्याला आहे असे विचारणे असो, या सगळ्या फ्रेम्समधून ऊसकामगारांची सध्या अवस्था किती बिकट आहे हेही संजयने दाखवले आहे. 

एक दिग्दर्शक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा किती बारकाईने विचार केला असेल हे जाणवत राहते. फिल्मच्या शेवटच्या फ्रेममध्ये वापरलेले पार्श्वसंगीत अंगावर काटा आणते. कमी वेळात जास्तीत जास्त परीणामकारक संदेश देणे हा मुळात कुठल्याही शॉर्ट फिल्मचा गाभा असतो. संजयच्या ह्या फिल्मने ते योग्यप्रकारे साधले आहे. नुकतीच ही शॉर्ट फिल्म युट्युबवर उपलब्ध झाली आहे. तुमच्या बिझी शेड्युलमधून ८ मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा. नक्की आवडेल. 

https://www.youtube.com/watch?v=JNjBRGm4lg0&t=2s

Thursday, August 16, 2018

अटलजी

जेव्हा कळू लागलं तेव्हा देशाच्या राजकारणात अटलजींचा दबदबा होता.त्याचवेळी महाराष्ट्र आणि दिल्लीत भाजप पकड घेऊ लागला होता.एखाद्या नेत्याने पंतप्रधान व्हावं असं मला पहिल्यांदा वाटलं ते अटलजींच्या बाबतीत.

त्यांची भाषणं लोकसभेत आणि प्रचार सभांमधूनच ऐकायला मिळाली. काय ते वक्तृत्व, काय ते हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, टीका पण अशी की समोरच्याला वर्मावर लागणार पण तो दुखावणार मात्र नाही. विरोधकही त्यांना मनापासून दाद देत असत. आजवर अनेक नेते झाले. बोलताना कधी ना कधी या ना त्या नेत्याचा आपण एकेरीत उल्लेख करतो. अटलजींच्या बाबतीत मात्र हे कधीच झाले नाही. त्यांचा उल्लेख कायम आदराने 'अटलजी' असाच करण्यात येतो. 

त्यांचं १३ दिवसांचं सरकार पडल्यावर अनेकांना वाईट वाटलं. काय झालं होत नेमकं हे माझ्या बालबुद्धीला समजले नाही पण वाईट मात्र खूप वाटले. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अणूचाचण्या केल्या. त्यावेळी अमेरिका आणि जपानसारख्या देशांनासुद्धा त्यांनी भीक घातली नव्हती. या अणूचाचण्यांचा मला काय फायदा झाला असेल तर त्यावर भाषण करायची संधी मिळाली. त्यावेळी शाळांमधून विविध पातळीवर घेतल्या गेलेल्या भाषण स्पर्धांमध्ये अणूचाचण्यांचा विषय हमखास असे. परीक्षांमध्ये निबंधालाही विषय असे. भाषण केले असल्याने निबंध लिहायला फारशी अडचण येत नसे.

अलीकडे भाजपच्या पोस्टर्स वरून त्यांची छबी सोयीनुसार वापरली किंवा काढून टाकली जाते..त्याबद्दल एखादी बातमी वगैरे येत असते. आता मात्र भाजपच्या प्रत्येक पोस्टर वर त्यांची छबी झळकेल अशी आशा आहे.

भारतीय राजकारणातील एक पर्व संपले.श्रद्धांजली..💐💐

Saturday, August 11, 2018

बॉर्डर आणि गुंड कुटूंब

काल सुनील शेट्टीचा वाढदिवस झाला. सुनील शेट्टी आवडणारी माणसं तशी विरळाच. मीही सुनीलचा चाहता वगैरे नाही. मात्र त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका मित्राबरोबर बोलताना त्याच्या बॉर्डर या चित्रपटाची आठवण झाली आणि मन भूतकाळात गेलं.

बॉर्डरशी माझं नातं खूप वेगळं आहे. माझ्या वडिलांबरोबर पाहिलेला  माझ्या आयुष्यातला हा पहिला चित्रपट आहे. आईदादा साधारण ७७ साली जुन्नरला आले. तेव्हापासून ते २०१३ पर्यंतच्या जुन्नरच्या वास्तव्यात दादांनी थेटरात पाहिलेला हा एकमेव चित्रपट. आम्ही भावंड कधीतरी जात असू चित्रपट पहायला.बऱ्याचदा शाळेतूनही आम्हाला चित्रपट दाखवला जात असे.दादांबरोबर चित्रपट पहायची वेळ मात्र कधी आली नव्हती.

बॉर्डर आल्यावर माझ्या काही मित्रांनी तो पाहिला. शाळेत कधीतरी बोलताना त्यांनी तो भारी असल्याचं सांगितलं. मग मीही दादांकडे हा चित्रपट पहायचा म्हणून हट्ट धरला.एरवी कधीही न बधणारे दादा त्यावेळी मात्र कसे प्रसन्न झाले माहीत नाही. कदाचित भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असल्याने त्यांनी होकार दिला असेल.

चित्रपट सगळ्यांनी जाऊन बघू असे बहुधा ताईने सुचवले.दादांनीही ते मान्य केले.त्यावेळी ऑनलाइन तिकीटविक्री वगैरे काही नव्हतं.त्यावेळीच काय,आजही जुन्नरला अनेकजण थेटरला जाऊनच तिकीट घेतात.

आम्ही रात्री नऊच्या शोला जायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जुन्नरच्या शेवंता थेटरला पोहोचलो. मी आणि दादा तिकीट खिडकीकडे गेलो.तिथे आधीच लाईनला उभे असलेले कल्याण पेठेतले दोन-तीन जण दादांना पाहून तोंड लपवून पळून गेल्याचे आठवते. दादांना पाहताच आत असलेले मॅनेजर ईनामदार बाहेर आले.

"साहेब बाहेर थांबू नका.आतमध्ये या तिकीट घ्यायला." म्हणत आम्हाला आतमध्ये घेऊन गेले.

दादांना कधी थेटरची वाट माहीतच नव्हती. त्यामुळे त्यांना तिथे पाहून मॅनेजर ईनामदारांनासुद्धा आश्चर्य वाटले.चित्रपट कसा आहे हे दादांना माहीत असणे शक्यच नव्हते. ईनामदारांनी चित्रपट चांगला असल्याचे दादांना सांगितल्याचे मला आजही ठळकपणे आठवते.

बॉर्डर एक चित्रपट म्हणून उत्तमच होता.त्या दिवशी तो पाहताना मजा आलीच.मात्र आज इतक्या वर्षानंतर आजही बॉर्डर कधीही टीव्हीवर लागला तरी चॅनेल बदलावेसे वाटत नाही.त्यातले 'संदेसे आते है' गाणं तर आजही कित्येकांच्या मनात घर करून आहे. इतकं लांबलचक गाणं असूनही ते ऐकताना कंटाळा येत नाही.

पुढे काही वर्षांनी दादांनी टू इन वन टेपरेकॉर्डर घेतला. त्यावेळी माझा हट्ट म्हणून त्यांनी ए साईडला येस बॉस आणि बी साईडला बॉर्डरची गाणी असलेली कॅसेट घेतली.ती अगदी अलिकडेपर्यंत माझ्या संग्रहात होती.

पुढे पुण्यात आल्यावर आई दादांबरोबर बरेच चित्रपट पाहिले. दादांबरोबर पाहिलेला पहिला चित्रपट म्हणून बॉर्डरची आठवण मात्र कायम राहील.

Monday, July 30, 2018

हाऊस ऑफ हायलाईट्सचा स्वप्नवत प्रवास

जुलै २०१४ मध्ये मायामी हिट संघाचा स्टार खेळाडू लेब्रॉन जेम्स क्लिव्हलँड कॅव्हेलियर्सबरोबर करारबद्ध झाला. मायामी हिटकडून खेळताना त्याने या संघाला एनबीएची दोन विजेतेपदं मिळवून दिली. याचदरम्यान एक मुलगा या संघाचा कट्टर समर्थक बनला. ओमर राजा त्याचं नाव. लेब्रॉन हिट सोडून गेल्यानंतर तो निराश झाला. यातूनच त्याने मायामी हिटच्या सामान्यांचे हायलाईट्स पहायला सुरुवात केली. हे हायलाईट्स पाहताना एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ओमर आणि त्याचे मित्र मायामी हिटच्या सामन्यांतील काही क्षणांची वारंवार चर्चा करत. मात्र त्या क्षणांचे व्हिडीओ युट्युब, ईसपीएन यापैकी कुठल्याच वेबसाईटवर उपलब्ध नव्हते. आपल्या मित्रांबरोबर चर्चा करत असलेल्या या क्षणांचे व्हिडीओ कुठे ना कुठे तरी सापडतील या आशेतून ओमर कित्येक तास इंटरनेटवर घालवत असे. एक महिनाभर असे केल्यानंतर 'आपणच हे का करू नये?' असा विचार त्याच्या डोक्यातून आला. या विचारातूनच ऑगस्ट २०१४ मध्ये जन्म झाला हायलाईट फॅक्टरी या इंस्टाग्राम अकाउंटचा. आठवड्याभरातच ओमरला हे नाव नको असे वाटले म्हणून त्याने ते बदलून नाव ठेवले, 'हाऊस ऑफ हायलाईट्स'. तिथून सुरु झाला एक स्वप्नवत प्रवास. 

हाऊस ऑफ हायलाईट्स सुरु केले तेव्हा ओमर फ्लोरिडामध्ये विद्यार्थीदशेत होता. सुरुवातीला स्वतः तयार केलेल्या क्लिप्स आपल्या अकाऊंटवरून शेअर केल्यानंतर ओमरने लोकांकडून व्हिडीओ स्वीकारणे सुरु केले. ही कल्पना तात्काळ यशस्वी झाली. ओमरला इंस्टाग्रामवर रोज २००-३०० मेसेज येऊ लागले. प्रत्येक मेसेजमध्ये येणारा व्हिडीओ ओमर स्वतः पाहून मगच हाऊस ऑफ हायलाईट्स वर अपलोड करू लागला. हळूहळू हाऊस ऑफ हायलाईट्स लोकप्रिय होऊ लागले. सुरुवातीला शेकडोमध्ये फॉलोअर्स असणाऱ्या या अकाउंटला आता हजारोंनी फॉलोअर्स मिळू लागले. अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीने ओमर खुश होता. साधारण सात आठ लाख फॉलोअर्स असताना २०१६ मध्ये ब्लिचर रिपोर्ट या प्रसिद्ध वेबसाईटचे लक्ष हाऊस ऑफ हायलाईट्सकडे गेले. ओमर अजूनही शिकतच होता. तो ग्रॅज्युएट होण्याआधीच ब्लिचर रिपोर्टने त्याला हाऊस ऑफ हायलाईट्स विकत घेण्याची ऑफर दिली. शिवाय हे अकाउंट ब्लिचर रिपोर्टसाठी त्यानेच चालू ठेवावे असे सांगून त्याला नोकरीही दिली. 

इंस्टाग्रामवर हे अकाउंट सुरु केल्यापासून ओमरने एकही दिवस सुट्टी घेतली नाहीये. ओमर रोज सकाळी साधारण ८ वाजता उठतो. उठल्या उठल्या सगळ्यात आधी तो आपले दोन फोन चेक करतो. ओमरच्या सहा सात तासांच्या झोपेच्या अवधीमध्ये त्याला हजारो नोटिफिकेशन्स आलेले असतात. उठल्यापासून ते मॅनहॅटनमधील आपल्या ऑफिसला जाईपर्यंत त्याला आलेले प्रत्येक नोटिफिकेशन वाचतो, त्यातले नको ते डिलीट करतो. रात्रीतून ओमरला इंस्टाग्रामवर साधारण ७००-७५० मेसेज आलेले असतात. ऑफिसला पोहोचून तो त्याला आलेला प्रत्येक मेसेज पाहतो आणि गरज पडेल तिथे रिप्लाय देखील करतो. जिथे जाईल तिथे ओमर हाऊस ऑफ हायलाईट्सचे काम करत असतो. अगदी चित्रपटगृहात देखील व्हिडीओ क्लिप एडिट करून त्याने अपलोड केल्या आहेत. ओमरच्या ऑफिसमध्ये २ टीव्ही आहेत. प्रत्येक टीव्हीवर किमान ३ सामने सुरु असतात. म्हणजे एका वेळी ६ सामने पाहत ओमर आपले काम करत असतो. ओमरच्या मदतीला चार जणांची टीम आहे. मात्र आजही हाऊस ऑफ हायलाईट्सवर अपलोड होणारा प्रत्येक व्हिडीओ ओमरने ओके केल्याशिवाय अपलोड होत नाही. 

ब्लिचर रिपोर्टने टेक ओव्हर केल्यापासुन हाऊस ऑफ हायलाईट्सचे फॉलोवर्स साधारण दिवसाला १२,००० या वेगाने सतत वाढतच आहेत. नुकतेच या पेजचे १ कोटी फॉलोअर्स झाले. यामध्ये अगदी लेब्रॉन जेम्स, द रॉक, स्टेफ करी, रोनाल्डो यांसारखे दिग्गज देखील आहेत.

३० जुलै २०१८ रोजी फॉलोअर्सची संख्या 
हाऊस ऑफ हायलाईट्स - १ कोटी 
ईसपीएन - १ कोटी ४ लाख 
स्पोर्ट्ससेंटर - १ कोटी २० लाख 

हाऊस ऑफ हायलाईट्सच्या व्हिडीओजला ईएसपीएन आणि स्पोर्ट्ससेंटर सारख्या नावाजलेल्या अकाउंट्सपेक्षा जास्त हिट्स मिळत आहेत. 

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेल्या लोकांना काही कारणास्तव एखादा सामना बघता आला नाही तर त्यातील नेमक्या क्षणांचे व्हिडीओज हाऊस ऑफ हायलाईट्सवर नक्की उपलब्ध असतात. सुरुवातीला अमेरिकन फुटबॉल आणि एनबीए या खेळांवर लक्ष असलेल्या या पेजने आता इतरही खेळांचे व्हिडीओ पुरवायला सुरुवात केली आहे. या पेजची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे सामने प्रत्यक्ष पाहणारे प्रेक्षकच ओमरला त्यांनी रेकॉर्ड केलेले व्हिडीओ पाठवतात. त्यातील योग्य ते व्हिडीओ थोडेफार एडिटिंग करून हाऊस ऑफ हायलाईट्सवर अपलोड केले जातात. 

ब्लिचर रिपोर्टबरोबर काम करायला सुरुवात केल्यापासून ओमरला त्यांचे कंटेंटदेखील वापरता येऊ लागले आहे. नुकतेच हाऊस ऑफ हायलाईट्सचे ट्विटर हँडल आणि युट्युब चॅनेलही सुरु झाले आहे. कुठलीही जाहिरात न करता त्यांचे ट्विटरवर ३८,००० आणि युट्युबवर २,६०,००० सबस्क्रायबर्स आहेत. अजूनही ओमर व्हिडिओजवर काम करत असला तरी इथून पुढे ब्लिचर रिपोर्टसाठी वेगवेगळे कंटेंट बनवण्याची त्याची मनिषा आहे. मी स्वतः हे पेज सुरु झाल्यापासून फॉलो करत आलोय. हाऊस ऑफ हायलाईट्सची एकही पोस्ट मिस करण्याजोगी नसते. तुम्हीही दर्दी क्रिडारसिक असाल तर इंस्टाग्रामवर हे पेज नक्की फॉलो करा. 

Thursday, July 26, 2018

काटेकर

जरा उशीरच झाला पण काल सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन पाहून संपवला. नवाझुद्दीन, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, राधिका आपटे असे बाप लोक असताना ही मालिका विशेष असणार यात शंका नव्हती. ट्रेलर पाहून ज्या अपेक्षा वाढल्या होत्या त्या संपूर्ण सिझन पाहिल्यानंतर पूर्णदेखील झाल्या. 

सैफ अली खानने रंगवलेल्या सरताज सिंग ह्या पोलिस अधिकाऱ्याला येणाऱ्या एका निनावी फोनवरून मालिकेचे सारे कथानक उलगडत जाते. मालिकेचे कथानक मुंबईत घडल्याचे दाखवल्याने अनेक पात्रे मराठी आहेत. या सगळ्यांत सरताज सिंगबरोबर असणारा हवालदार काटेकर मला भावला. काटेकरची भूमिका मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने केली आहे. भूमिकेचे सोने करणे म्हणजे काय हे जितूने या भूमिकेतुन दाखवून दिले आहे. 

वेब सिरीजमध्ये सेन्सॉरचा प्रश्न येत नसल्याने आणि अंडरवर्ल्डशी निगडीत कथानक असल्याने ह्या मालिकेत शिव्यांचा भरणा आहे. काहीतरी धक्कादायक घडणे, आपल्या नको असलेली गोष्ट करावी लागणे, न आवडणारा माणूस अचानक समोर येणे, आश्चर्याचा धक्का बसणे या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी काटेकर एकच वाक्य वापरत असतो. ते वाक्य म्हणजे, 'आई झवली'. हे वाक्य बोलण्याची त्याची स्टाईल इतकी बाप आहे ना की पाहणाऱ्याला काटेकर म्हणजे आपणच आहोत की काय असे वाटून जाते. आपल्यातले अनेकजण रोजच्या व्यवहारात बोलताना शिव्यांचा सर्रास वापर करतात. मी देखील मित्रांबरोबर बोलताना शिव्या वापरतो. बोलत असताना वर लिहिलेल्या गोष्टींना प्रतिक्रिया म्हणून अशाच काही शिव्या वापरल्या जातात. त्यातलीच ही 'आई झवली' असल्यामुळे कदाचित काटेकर माझ्यासारख्या अनेकांना आपला वाटला. 

सरताजसाठी काम करणारा काटेकर आपल्या बायकोपेक्षा आपल्या कामाशी आणि साहेबांशी जास्त बांधील आहे. एका प्रसंगात बायकोबरोबर श्रुंगार करणारा काटेकर सरताज साहेबांचा फोन आला म्हणून तसाच उठून ठाण्यात जातो तेव्हा त्याची कामावरची निष्ठा दिसून येते. आपल्या पोलिसाच्या नोकरीमुळे आपल्या बायकामुलांना वेळ देता येत नाही म्हणून त्याचे मन त्याला खाते. मात्र तक्रार न करता काटेकर कर्तव्य बजावण्याला प्राधान्य देतो. आपल्या साहेबाच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या तणावामुळे वाईट वाटून साहेबाने बायकोशी पुन्हा एकदा जुळवून घ्यावे म्हणून तो साहेबाची विनवणी देखील करतो. एका केसमध्ये साहेबाची बाजू बरोबर असूनही त्याचा बकरा केला जातोय हे लक्षात येऊन त्याला वाईटही वाटते. मात्र भ्रष्ट व्यवस्थेमध्ये हे असेच चालू राहणार असे सांगत तो साहेबाची समजूतही काढतो. साहेबाचे नशीब फळफळावे म्हणून त्याला एक मोठी केस मिळणे कसे गरजेचे आहे हे त्याला सांगत राहतो. तणावाच्या वेळी एखादं हलकंफुलकं वाक्य बोलून साहेबाचा आणि स्वतःचा मूडही ठीक करतो. बाकी स्टारकास्ट इतकी तगडी असताना, भूमिका फारशी महत्वाची नसतानादेखील काटेकर प्रेक्षकांना आपला वाटतो. म्हणूच संपूर्ण मालिकेत साईड रोल करणारा काटेकर मालिका संपल्यानंतरही लक्षात राहतो.

मागे जितेंद्रचे दोन स्पेशल पाहिले तेव्हा त्याच्याबद्दल लिहिले होते. आज काटेकर पाहून पुन्हा एकदा त्याच्याबद्दल लिहावेसे वाटले. ही संपूर्ण मालिकाच कशी भारी आहे हे अनेकांनी लिहिले आहे, म्हणून त्याबद्दल लिहिण्यात अर्थ नाही. अजून पाहिली नसेल तर नक्की पहा. काटेकर नक्की आवडेल.