Wednesday, April 14, 2010

टक्कलपूराण....

आज मी थोड्याशा विचित्र विषयावर लिहिणार आहे. टक्कल...का करतात लोक टक्कल? याला तशी बरीच कारणे आहेत.कोणी काही धार्मिक कारणासाठी, कोणी दुखवटा असतो म्हणून, काही लोक अगदी डोक्यात कोंडा झाला म्हणूनसुद्धा करतात.तर काही लोक उगाच काहीही कारण नसताना स्टाइल म्हणूनसुद्धा करतात.मी माझा समावेश शेवटच्या प्रकारात करतो.
गेली ४-५ वर्षे मी न चुकता वर्षातून किमान एकदा तरी टक्कल करतो.अगदी नाही जमलं तर किमान केस अतिशय बारिक करून टाकतो.का कोण जाणे पण मला हे असं आवडतं.सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ केली कि डोकं पुसायला वेळ कमी जातो.केस लहान असल्याने ते लवकर वाळून जातात.आणि याहून महत्वाचं म्हणजे केस विंचरावे लागत नाहीत.
अनेकदा मला लोक वेडा ठरवून मोकळे होतात.त्यांच्यामते हे असं टक्कल करणं फारसं सभ्यतेचं लक्षण नाही.पण मग ज्या लोकांना केसच नाहीयेत अशा लोकांचं काय? ते सगळे सभ्य नाहीत का?
बर टक्कल मी केलयं, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर माझ्याकडे बघू नका ना.केवळ तुम्ही लोक असं म्हणता म्हणून मी टक्कल करायचं नाही याला काही अर्थ नाही ना.
जसे काही लोक माझ्या या टक्कल करण्यावर आक्षेप घेतात त्याचप्रमाणे माझ्या या टक्कल करणे किंवा केस अगदी छोटे करणे याचं समर्थन करणारेसुद्धा बरेच लोक आहेत.आणि ते सगळेदेखील याच वर्गामध्ये मोडतात.यामध्ये माझे काही मित्र, काही मैत्रीणी, माझ्या बहीणी अगदी माझे वडील यांचादेखील समावेश होतो.
या टक्कल करण्याशी अनेक आठवणी जूळलेल्या आहेत.त्यातली एक इथे सांगतो.माझ्या एका मित्राने मला म्हटलं," जर तू टक्कल केलसं तर मीदेखील करेल." आता मला सवय आहे हो.मीसुद्धा त्याला हो म्हटलं.घरी गेलो आणि न्हाव्याकडे जाऊन टक्कल करून आलो. त्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की आता तूलादेखील टक्कल करावा लागेल.मला वाटलं हा कसलं करतोय टक्कल.पण नाही. ह्या मूलाचा मला एक तासाने पून्हा फोन आला आणि त्याने मला सांगितलं,"गुंड, मीसुद्धा टक्कल केलं बर का" मला खरतर पटलं नाही.पण त्याच दिवशी आम्ही एक नाटक पहायला गेलो होतो.माझा हा मित्र मला लांबून दिसला आणि त्याने खरोखर टक्कल केलं होतं.मी त्याला म्हटलं," शाब्बास रे पठ्ठ्या.जिंकलास तू." आणि पुढच्या १० मिनीटांत ह्याची आईदेखील तिथे आली. तिने त्याला आणि मला असं दोघाना इतकं झापलं की मला पण मी पून्हा टक्कल करेल की नाही यावर मला विचार करावा लागेल असं वाटून गेलं.
असे अनेक किस्से आहेत.पण हा मला जास्त आठवणीतला आहे म्हणून इथे सांगितला.तर असं हे टक्कलपूराण.आणि त्याबद्दलची माझी असलेली मते.

Monday, March 22, 2010

हर्षल देसाई....



अभियांत्रिकीसाठी मी पुण्यात आलो आणि पहिल्या वर्षी हर्षल देसाई नामक एका अजब रसायनाशी माझी ओळख झाली.मी होस्टेलला राहणारा मुलगा असल्याने आधी या माणसाबरोबर जेवढ्यात तेवढा माझा संबंध होता.याला कारण म्हणजे होस्टेलच्या सिनियर मित्रांनी लोकल मुलांपासून लांब रहायचा दिलेला सल्ला.पण दुसऱ्या वर्षी मी पुरूषोत्तम करंडकासाठी माझ्या कॉलेजच्या संघात होतो आणि हा मुलगा कधी कधी आमची प्रॅक्टीस पहायला येत असे.तेव्हा मग या मुलाबरोबर माझा संवाद व्हायला सुरुवात झाली.आणि मग नंतर नंतर असं लक्षात आलं की अरे हा तर खूप वेगळा आहे.लोकल मुलांबद्दल जे काही ऐकलं आहे त्यातलं काहीसूद्धा या माणसामध्ये दिसलं नाही मला.आणि मग हळूहळू मैत्री वाढ्त गेली.
पहिल्यांदा कोणाला भेटला तर हा इतका कमी बोलतो की समोरच्याला आपण फार जास्त बोलत आहोत असं वाटून जातं.पण ज्या लोकांशी त्याची खरोखर ओळख त्या लोकांना त्याचा हे वागणं बरोबर माहित आहे.
अभ्यासात,खेळात सगळीकडे हा असायचा. कॉलेजच्या रोबोकॉनच्या टीममध्येपण होता.पण लोकांसाठी त्याची एवढीच ओळख असावी असं मला वाटतं.पण देसाई हा एक नाटकवेडा असेल किंवा याला शास्त्रीय संगीताची आवड असेल असं कोणाला वाटलं असेल असं मला तरी नाही वाटत.नाटकामध्ये प्रचंड आवड असलेला आणि ती आवड जाणीवपूर्वक जपणारा असा हा मुलगा. सुदर्शन ला आम्ही लोकांनी कित्येक नाटकं एकत्र पाहिली आहेत.अजूनही ते दिवस आठवले की मी नॉस्टॅल्जीक होतो.कोणतही नाटक पाहीलं की त्यानंतर रात्री रूपालीमध्ये बसून कॉफी पित त्या नाटकावर सविस्तर चर्चा करायला देसाई हजर असायचा.(यासाठी कधी कधी आम्ही आक्या आणि बाजारला कलटीसुद्धा मारली आहे.) याची एक गोष्ट मला आवडली म्हणजे काहीही होऊ देत,लोक काहीही म्हणू देत देसाई स्वतःच्या मतावर ठाम असायचा.हेच चित्रपटांनाही लागू पडतं.हावरटासारखा हा चित्रपट पाहतो.याबाबतीत आम्हा लोकांना इतर लोक शिव्या देतात कारण लोकांना आवडणारे चित्रपट आम्हाला फार कमी वेळेस आवडतात.आणि मग काही विषय निघाला की आम्ही म्हणणार की नाही बुवा बेकार आहे आणि लोक म्हणणार तुम्ही वेडे झाला आहात.यावर देसाई मग अशा लोकांशी बोलायचाचं नाही.
अजून एक म्हणजे हा माणूस कधी काय करेल,कोणाला काय बोलेल याचा तुम्हाला कधीच अंदाज करता येत नाही.झेस्ट मधला beatles चा टी-शर्ट घातलेल्या माणसाचा प्रसंग, तिथेच आपल्या वर्गातल्या एका मुलीला तुमचा झालं असेल तर हा टेबल आम्हाला हवा आहे असं बेधडकपणे सांगणारा देसाई, हे काही प्रसंग नमुन्यासाठी.
असे अनेक प्रसंग आहेत, चर्चा आहेत, लिहायचा म्हटलं तर मी अजून बरचं काही लिहू शकतो.पण सगळ्याच गोष्टी इथे नमूद करणं शक्य नाहीये.कदाचित भविष्यामध्ये मला अजून काहीतरी लिहावसा वाटेल तुझ्याबद्दल तेव्हा नक्की लिहील.तोपर्यंत रजा घेतो.

Friday, March 19, 2010

नमस्कार.खरं तर मी माझ्या आत्ता सुरू असलेल्या ब्रेकमध्ये काहीतरी लिहीण्याचा विचार करत होतो.पण ब्रेकमध्ये आलेला आळस,नुकतीच सुरू झालेली आयपीएल स्पर्धा आणि सगळ्यात महत्वाचा माझा कंटाळा यामुळे एक नविन लिहायला घेतलेला ब्लॉग सध्या अर्धाच राहीलेला आहे.तो आता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल.तोपर्यंत रजा घेतो.राम राम.

Thursday, February 25, 2010

ब्लॉग लिहायला सुरुवात कर तू.. इति अद्वैत बोराटे..मी विचारात पडलो.च्यायला हा म्हणतोय खरं की तू लिही म्हणून, पण आपल्याला जमेल की नाही. शेवटी म्हटलं चला सुरूवात तर करु. पुढे काय व्हायचं ते होईल.पण काही दिवसांनी मी विचारात पडलो की बूवा लोक ब्लॉग का लिहीतात? बर तुमच्या ब्लॉगमध्ये काय काय लिहू शकता तुम्ही? की काहीही लिहीलं तरी चालतं?तुमच्या ब्लॉगमध्ये तुम्ही अगदी वजनदार, अलंकारिक अशीच भाषा वापरणे बंधनकारक आहे का? साध्या, सरळ, सोप्या भाषेत लिहीलं तर चालत नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या मनाने शोधायचा प्रयत्न केला.बरं ही माझी वैयक्तिक मते आहेत. त्यामुळे काही जणांना ती न पटणं मी गृहीत धरलेलं आहे.
माझ्या मते ब्लॉग हे तुमचे विचार मांडण्यासाठी असलेलं एक व्यासपीठ आहे.मग ते विचार काही का असेनात.तुमचे स्वतःचे राजकीय, क्रिडाविषयक, साहित्यिक,कलाक्षेत्रविषयक असलेले विचार तुम्ही इथे मांडू शकता. राजकीय नेते, त्यांच्या सध्याच्या हालचाली, एखादा नवीन चित्रपट किंवा एखादा तुम्हाला मनापासून आवडलेला जूना चित्रपट इथून ते थेट तुम्ही आजच्या दिवसात काय केलं इथपर्यंत सगळं काही तुम्ही लिहू शकता.(अगदी तुमचं पहिलं प्रेमसुद्धा :) आणि दुसरं असेल तर ते सुद्धा :) ). अर्थात हे तुम्ही लिहीलेलं सगळ्यांना आवडेलचं असंही नाही. काही लोकांना ते बरं वाटेल, काही लोक तुमची खिल्ली उडवतील, काही अगदी "हं ठिक आहे" असंही म्हणतील आणि काही लोकांना मात्र ते खरोखर आवडेल. मग तुम्ही स्वतः काय करणं अपेक्षित आहे? तर माझ्या मते तुम्हाला वाटतयं ना की आपण लिहूयात म्हणून, मग ते जरूर लिहा. इतर लोक काय म्हणतील? त्यांना ते आवडेल की नाही? ते लोक आपल्या लिखाणावर हसले तर काय?? या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नका.हे जरूर लक्षात असूद्यात की हे जे काही तुम्ही लिहीत आहात यातून तुम्हाला स्वतःला आनंद मिळतोय.मनातून कुठेतरी बरं वाटतयं.मग इतर लोकांची पर्वा का करावी? माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की तुमच्या ह्या लिहीण्याला एक ठराविक कालावधीनंतर ठराविक असा एक प्रेक्षकवर्ग लाभतो. आणि हेच लोक तुम्हाला मदत करत असतात.त्यांना तुमचं म्हणणं पटो अथवा न पटो,हे लोक असे असतात की जे तुम्हाला सांगतात की अरे छान आहे बर का..किंवा अरे अजून छान होऊ शकतं हे,पुढच्यावेळेस प्रयत्न कर.आणि मला वाटतं लोकांनी हे एवढं बोललेलं पुरेसं असतं तुम्हाला.अगदी एका माणसाने जरी तुम्हाला म्हटलं ना की "अरे मी वाचतो बरं का तुझा ब्लॉग" तरी तुम्हाला फार बरं वाटतं. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.माझा हे लिहीणं आवडणारे लोक जसे आहेत तसेच माझ्या लिखाणाची अगदी जोरदार खिल्ली उडवणारे लोक पण आहेत.(योगायोग असा की दोघेही नाशिकमध्ये जन्मलेले आणि जोपासले गेलेले आहेत).पण म्हणून मी लिहीतो किंवा लिहीत नाही असं नाहीये.तर मला वाटतं म्हणून मी लिहीतो.आणि इथून पुढेसुद्धा लिहीत राहील.पुन्हा एकदा नवीन काहीतरी घेऊन परत येइल. तोपर्यंत राम राम.

Thursday, February 4, 2010

उत्तरायण

२००५ साली मराठीमध्ये एक चित्रपट आला होता. उत्तरायण नावाचा. त्या सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. साठीमध्ये असलेला रघु आणि दुर्गी हे बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर त्यांना एकमेकांबद्दल वाटू लागलेलं प्रेम आणि या वयात हे असं काही करायचं म्हणून दोघांच्याही मनात झालेला कलह याचं सुरेख चित्रण या चित्रपटामध्ये केलेलं आहे. अलिकडेच मी हा चित्रपट पाहिला. त्यातलं एक गाणं मनाला भिडलं. गाण्याचे बोल खाली देत आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा.

धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना
सये रमुनी या जगात रिक्त भाव असे परि
कैसे गुंफु गीत हे?
धुंद होते शब्द सारे!

मेघ दाटून गंध लहरुनि बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले, भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा, विश्रांत हा, शांत हा!

गीत- कौस्तुभ सावरकर
चित्रपट- उत्तरायण
(साभार-http://www.aathavanitli-gani.com/Song%20Html/1924.htm)

Sunday, January 31, 2010

नमस्कार् लोकहो, आज पुन्हा एकदा दीर्घ कालावधीनंतर लिहायला बसलो आहे. मागच्या वेळेस लिहीलेला ब्लॉग आणि आजचा ब्लॉग यामध्ये तसं बरच अंतर आहे, आणि त्याचं कारण माझा लिहीण्यासाठी असलेला कंटाळा. पण या वर्षामध्ये अधिकाधिक नियमितपणे ब्लॉग लिहायचा माझा प्रयत्न राहील.
बरचं काही घडून गेलं आहे या कालावधीमध्ये. सगळ्या गोष्टींचा परामर्श घेणे आज शक्य नाहीये. म्हणून सावकाशीने एकेका गोष्टीबद्दल सांगेल. तोपर्यंत राम राम.

Saturday, October 3, 2009

पुन्हा एकदा मराठीतुन ब्लॉग....महाराष्ट्र आणि पुण्याची भेट..

नमस्कार.आज पुन्हा एकदा लिहायला बसलो आहे.निमीत्त आहे ते महाराष्ट्रामध्ये सध्या तापत असलेलं वातावरण.कशामुळे ते तुम्हाला माहित असेलच.आणि सकाळ ने नुकताच सुरु केलेला एक नविन आणि स्तुतिपात्र असलेला असा उपक्रम.सकाळची याअगोदर वेबसाइट होती. www.esakal.com या नावाने.अजुनही आहे.पण आता त्यांनी यामध्ये अजुन एक नविन प्रकार सुरू केला आहे.www.epaper.esakal.com या नावाने.इथे सकाळ ने त्यांच्या सगळ्या विभागाच्या आवृत्त्या एकत्रपणे उपलब्ध करुन दिल्या आहेत.अगदी आपण घरात बसुन पेपर वाचत आहोत असं वाटतं.याअगोदर फक्त वेबसाइट वर मी बातम्या वाचायचो.पण कधी कधी काहीतरी तांत्रिक बिघाड व्हायचा किंवा मलाच वेळ मिळायचा नाही आणि मग पेपरवाचन राहून जायचा.पण आता या नविन प्रकारामुळे मात्र मी रोज न चुकता पेपर वाचेल हे तर नक्की.सकाळचे याबद्दल मनापासुन आभार.
तर सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची धामधूम सुरु आहे.मी सध्या फक्त पुण्याबद्दल बोलतो.कालचं दादा आणि भाई यांचा मनोमिलन झालं.भाईंनी अगदी मासे आणि कोंबडी असा बेत केला होता.अगदी जोरात जाहीर करण्यात आलं की आम्ही आता मित्र आहोत.पुन्हा तिकडे कोथरुडमध्ये उज्वल केसकरांची बंडखोरी हा पण एक छान असा विषय मिळाला आहे लोकांना चर्चा करायला.शिवाजीनगर मधुन आधी शिवसैनिक असलेले आणि आता पंजा चे झालेले निम्हण रिंगणात आहेत.बाळासाहेब शिवरकर तिकडे कॅम्पातून आहेत.एकुणात वातावरण गरम झालेलं आहे.
मला खरं तर हा सगळा पोरखेळ वाटायला लागला आहे.काल शत्रु होते,आज काय मित्र झाले आणि उदया काय तर परत शत्रु झाले.अरे काय चाललं आहे हे.तिकीट नाही मिळालं,कर बंडखोरी.पुन्हा अर्ज मागे घ्यायला पैसे घे.आत्तापुरती करु हो मैत्री नंतर बघु काय ते.हे असा या लोकांचं बोलणं.या सगळ्यामध्ये जनता गेली तेल लावतं.आधी माझा खिसा भरु देत,मग जनतेचा विचार करेल मी.विकास काय हो,होत रहातो.आधी पैसे खा.ही असली यांची विचारसरणी.कसा विकास होणार आणि कसं जनतेचं भलं होणार काय माहित.
दुसरं असं की यापैकी किती उमेदवार खरोखर या पदाकरता लायक आहेत याचा तरी विचार पक्षनेतृत्वाने करावा ना.आता कोथरुडचचं उदाहरण घ्या ना.खर तर माझ्या मते उज्वल केसकर हा एक चांगला पर्याय होता भाजप साठी पण त्यांचा पत्ता कापण्यात आला.आता ते बंडखोर म्हणून उभे आहेत.मला असं वाटतं की तिथे सुधा पैसा बोलतो हो.इतके द्या आणि तिकीट घ्या.बाजारीकरण झालयं सगळीकडे.
या सगळ्याचा विचार केला की प्रश्न पडतो की मतदान करावं की नाही.कारण कोणताच उमेदवार योग्य वाटत नाही.पण मग एक जागरुक नागरिक म्हणुन मतदान केलं पाहिजे असं पण येतं. दुर्दैवाने मी सध्या भारतात नसल्याने मला मतदान करता येणार नाहिये.पण एकदा मला असं पण वाटलं की हे बरं झालं म्हणून.लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मी अगदी विचार करून योग्य त्या उमेदवाराला मत दिलं होतं.पक्ष कोणता आहे याचा विचार नव्हता केला.पण आत्ता माझ्या मुळगावी म्हणजे जुन्नर ला सगळेच उमेदवार बंडल आहेत हो.त्यामुळे मत न दिलेलं परवडलं असा विचार मनात येतो.
बाकी महाराष्ट्राचं म्हणाल तर मला यावेळेस पुन्हा एकदा पंजा आणि घड्याळ या आघाडीला जास्त जागा मिळतील असं वाटतं आहे.सेनेला पुन्हा एकदा मनसे चा फटका बसेल असं दिसत आहे.पण एक मात्र नक्की सांगेल की मनसे या निवडणुकीमध्ये एक पक्ष म्हणून आपली एक जागा नक्की निर्माण करेल.आणि कदाचित सत्तेच्या खेळीमध्ये महत्वाची भुमिका पण बजावेल. अंतिमतः सत्ता कोणाकडे जाते हे आपल्याला योग्य वेळी कळेलच.तेव्हा आणि त्याच्या अगोदर एकदा म्हणजे निकाल लागल्यावर,माझी आणि तुमची भेट होइलचं.तोपर्यंत राम राम.