Friday, June 10, 2016

मी अधून मधून काहीतरी लिहित असतो. चांगलं वाईट देव जाणे. आज अचानक दादांनी त्यांच्या जन्मतारखेबद्दल लिहिलेला एक कागद हाताशी आला. त्यातला मजकूर इथे मांडावासा वाटला. 

माझा वाढदिवस 

१ मार्च १९४८ रोजी अस्मादिकांचा जन्म झाला. म्हणजे आपलं म्हणायचं. म्हणायचं एवढ्यासाठी की ती काही खरी जन्मतारीख नव्हे. शाळेत घालताना जन्मतारीख लागते हे कळण्याएव्हढं घरचं कोणी 'सज्ञान' नव्हतं. गुरुजींनी अनेकांप्रमाणे आमचीही जन्मतारीख मनानेच लिहिली. 

मोठा झाल्यावर जन्मतारीख शोधायचे खूळ डोक्यात शिरलं. एका मित्राबरोबर (साहेबाबरोबर) तालुक्याच्या गावी घोडेगावला गेलो. तो येईना म्हटल्यावर "अरे तुझीसुद्धा जन्मतारीख पाहिजेच" असेही त्याला पटवले. गेलो दोघे. कचेरीच्या  गदारोळात जन्मतारखेचा साहेब शोधला. त्याला दक्षिणा कबुल केली. पण कसलं काय. मी आणि माझा परममित्र जन्माला आल्याचा दाखला काही मिळाला नाही. नवलच ना? माणूस तर जिता जागता पण जन्माचा दाखलाच नाही. वैतागवाडी झाली आणि काय महाराजा!! 

आणि थोडा मोठा झाल्यावर म्हणजे नोकरी करताना वहिकरसाहेब एक दिवस म्हणाले, "अण्णा, तुमची जन्मतारीख काय?" (दादांना बरेच लोक अण्णा अशी हाक मारतात)

"१/३/१९४८" इति आम्ही वदलो. साहेबांचा पुढचा प्रश्न तयार होता. 

"ते झाले हो. नक्की तारीख?"

"माहीत नाही." 

"मग असं करा, मुंबईला गेल्यावर अमूक ठिकाणी अमूक माणसाला भेटा. तो सांगेल."

नवलच म्हणायचं! जन्मदाता बाप सांगू शकत नाही तिथे तो महाभाग काय सांगणार? तरीपण एकदा गेलो त्याच्याकडे. पण त्यालाही जमले नाही. पाहताक्षणी तुम्ही कशाला आला आहात हे समजणारा माणूस मला मात्र काही प्रसन्न झाला नाही. 

पुढे मुलांचे वाढदिवस सुरु झाले. मला फारसं पटत नव्हते पण बायकोचे म्हणणे, " तुम्हाला काही कळतच नाही." हे त्रिकालाबाधित सत्य समोर आले.

पुढे कोणीतरी पोट्ट्याने जन्मतारीख ध्यानात ठेवली आणि अभिष्टचिंतन केले. माझ्या मात्र काळजात काही हलले नाही. "कसलं काय!" असं त्याला म्हणालो. 

अलीकडे तर रिवाजच झालाय. १-३ आली की मुलांचा अगदी अमेरिकेतून, जर्मनीहूनसुद्धा  फोन येतो. यंदा तर कहरच झाला. १-३ आली. घरी आम्ही दोघे आणि सुनबाई. पण नाही. सुनबाई संध्याकाळी धडपडत गाडीवर गेली, केक आणला. आता बोला. 

मधून मधून आता मात्र मीसुद्धा कोणाची जन्मतारीख माहीत पडली तर आवर्जून फोन करतो. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याइतका दुसरा आनंद नाही. परमानंद!! अशी ही वाढदिवसाची कहाणी. सुफळ संपूर्ण!!

जीबी

Thursday, May 26, 2016

सफर मुन्नारची

या आठवड्यामध्ये कामानिमित्त केरळमधील कोचीनला जाण्याचा योग आला. तिथल्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की तुम्हाला हवा असलेला माणुस मुन्नारच्या शाखेत असतो. मी आणि माझा सहकारी दोघेही मग कोचीनहून मुन्नारला गेलो.
मुन्नारबद्दल आधी बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं. मुन्नारला जाणाऱ्या रस्त्यावर एकुणात पुढे आपल्याला काय दिसणार आहे याची साधारण कल्पना येऊ लागली होती. मुन्नारमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी ठरल्याप्रमाणे त्या माणसाला भेटलो. त्याने अजून एका माणसाला भेटायला सांगितल्याने खरं तर निराश आम्ही झालो पण कामाचा भाग म्हणून त्याला सुद्धा फोन केला. हे सगळं उरकेपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले होते. अर्थातच त्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावले.
सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्याने आता हॉटेल मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. अखेरीस एका हॉटेलात रूम मिळाल्या आणि आमची गाडी त्या दिशेने चालू लागली.
त्या संध्याकाळी आभाळ काहीसं भरून आलेलं. मुळात मुन्नार उंचीवर असल्याने ढग खाली उतरू लागले होते. जागोजागी पर्यटक थांबून फोटो काढत होते. इतका वेळ गाडीत बसून निसर्गाच्या सौंदर्याची स्तुती करणारा मी एका विशिष्ट ठिकाणी गेल्या नंतर स्वतःला थांबवू शकलो नाही. माझ्या सहकाऱ्याला गाडी थांबवायला सांगून मी खाली उतरलो आणि ते सौंदर्य डोळ्यांमध्ये भरून घेऊ लागलो. सहसा कशाला पटकन चांगला न म्हणणारा मी निसर्गाची ती किमया पाहून हरखून गेलो होतो. नकळत हात फोनकडे गेला आणि मी फोटोज काढायला लागलो.
नजर जाईल तिथपर्यंत चहाचे मळे आणि ते संपले की पश्चिम घाटाच्या डोंगररांगा. यातले बहुसंख्य चहाचे मळे टाटांच्या मालकीचे आहेत. इथेच चहा बनविण्याचे कारखाने सुद्धा आहेत. इथे तयार होणारा चहा पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये विकला जातो. मुन्नारमध्ये गेलाच आहेस तर येताना आपल्याला चहा पावडर घेऊन ये असा हा आईचा आदेश आलेलाच होता. तो शिरसावंद्य मानून दुसऱ्या दिवशी सकाळची मिटिंग संपवून चहा खरेदी केली आणि पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी कूच केले.

















Tuesday, February 9, 2016

आबा


आबांची आणि माझी भेट २०१३ मधल्या डिसेंबर महिन्यात झाली. माझा एक अमेरिकन मित्र आणि मी दोघांनी पुण्याला येण्यासाठी आबांची गाडी भाड्याने घेतली होती. मुंबई ते पुणे या प्रवासामध्ये मला आबांच्या ड्रायविंगबद्दल एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे आबांचे गाडी चालविण्याचे कौशल्य अतिशय चांगले होते. उगाच खूप जास्त वेगही नाही किंवा अगदी कूर्मगतीसुद्धा नाही. मला हे आवडलं.

माझा मित्र फक्त २ आठवड्यांसाठी पुण्यात होता आणि काही कारणास्तव त्याला मुंबईला सोडायला जाणे मला जमणार नव्हते. पुण्यात पोहोचल्यावर मी आबांना विचारलं की दोन आठवड्यानंतर त्याला परत मुंबईला सोडणार का? आबांनी होकारार्थी मान डोलावली आणि मला जायच्या एक दिवस अगोदर फोन करायला सांगुन घरी गेले.
ठरल्याप्रमाणे मी आबांना एक दिवस आधी फोन करून येण्याची वेळ सांगितली आणि दुसऱ्या दिवशी आबा ठरलेल्या वेळेस हजर झाले. माझ्या मित्राला मुंबई विमानतळावर सोडल्यानंतर आबांनी मला फोन केला आणि माझ्या मित्राला सोडल्याचे मला सांगितले. त्यानी फोन मित्राकडे देऊन माझे आणि त्याचे बोलणेदेखील करून दिले. त्यांची हि सगळी वागणुक मला आवडली आणि मी माझ्या ऑफिसच्या ट्रिप्ससाठी आबांनाच बोलवायचं हे मनामध्ये ठरवून टाकलं.
कामानिमित्त माझे बऱ्याचदा मुंबईला जाणे होते. प्रत्येक वेळी मी आबांना फोन करून निघायची वेळ कळवतो. आजतागायत आबा कधीही उशिरा आलेले नाहीत. अशाच एका मुंबई ट्रीप दरम्यान आबांनी मला नुकताच घेतलेला त्यांचा स्मार्टफोन दाखवला आणि तो वापरण्यासाठी काही टिप्स मागितल्या. मी माझ्या परीने त्यांना शिकवलं.
साधारण एक-दोन आठवडे गेल्यानंतर आबांनी मला विचारलं, "सर फेसबुक काय असतं?"
मी त्यांच्याकडे आश्चर्य आणि कौतुकाने बघून त्यांना फेसबुक म्हणजे नक्की काय असतं, ते कसं वापरायचे हे सांगितले. मग आबा लगेच म्हणाले, "माझं पण अकाउंट तयार करून द्या."
मग मी आबांना त्यांचे फेसबुक अकाउंट तयार करून दिले. त्यांना फोटो कसे अपलोड करायचे, इतरांचे फोटोज लाइक कसे करायचे, फ्रेंड रिक्वेस्ट कशी पाठवायची हे शिकविले. हळूहळू आबा फेसबुक वापरायला शिकले आणि आता ते अगदी एक्स्पर्ट झालेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
काही महिने गेल्यानंतर एक दिवस आबांनी मला विचारले, "सर तुम्ही ओला आणि उबर कॅब मध्ये फिरता. त्यांची काय सिस्टीम असते?"
पुन्हा एकदा आबांच्या कुतुहलाचे कौतुक करत मी त्यांना त्याबद्दल माहिती दिली आणि शक्य झाल्यास तोही जोडधंदा सुरु करावा असे सुचविले. आबा आधीपासून आपली गाडी भाड्याने देत होते. त्यातून कमाई देखील पुरेशी होत होती. पण काही दिवस असे यायचे की कोणतीच ट्रीप नसायची. मग आख्खा दिवस घरीच जायचा. आता तो प्रश्न पडत नव्हता. जेव्हा घरी असतील तेव्हा आबा दिवसभर ओला आणि उबरच्या ट्रिप्स करतात त्यामुळे काम तर आलंच पण थोडाफार पैसा शिल्लक राहु लागला.
मला तामिळ गाणी ऐकायची आवड आहे. अशाच एका मुंबई पुणे ट्रीप मध्ये आबांनी आपला पेन ड्राईव माझ्याकडे दिला आणि म्हणाले, "यात काही तमिळ गाणी टाकून द्या मला."
मी नेहमीप्रमाणे चकीत होऊन, "तुम्हाला सुद्धा तमिळ गाण्यांचा नाद लागला की काय?"
आबा - "नाही नाही तसं नाही. माझ्याकडे कधीकधी दक्षिण भारतीय लोक सुधा येतात. त्यांना ऐकायला गाडीमध्ये ही गाणी लावली तर त्यांना बरं वाटेल."
आबांच्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे कौतुक करून मी त्यांना ही तमिळ गाणी दिली.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघात विम्याचे महत्व बऱ्याच शिकलेल्या माणसांनासुद्धा कळत नाही. पण आबांनी बऱ्याच आधी आपला स्वतःचा अपघात विमा काढून घेतलेला आहे आणि आपल्या इतर ड्रायव्हर मित्रांना देखील त्यांचे महत्व जमेल तेव्हा पटवून देत असतात.
सगळं काही व्यवस्थित चालू असताना एक दिवस आबांनी मला पुण्याजवळच्या एका गृहप्रकल्पाचे ब्रोशर दाखवले. उत्सुकता म्हणून मी आबांना विचारले, "कोणासाठी बघताय फ्लॅट?"
आबा म्हणाले मीच घेतोय. अतिशय आनंदाने त्यांचे अभिनंदन करून मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फ्लॅट बुक केल्यानंतरच्या आमच्या भेटीमध्ये आबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह केवळ अवर्णनीय होता. त्या दिवशी खरोखर मला आबांच्या जिद्दीचा आणि कष्टाळू वृत्तीचा अभिमान वाटला.
माझ्यासाठी आबा हे निश्चित एक यशस्वी व्यावसायिक किंवा अगदी आपल्या इंग्रजीमध्ये सांगायचे झाले तर Successful Entrepreneur आहेत.

Friday, January 1, 2016

नटसम्राट

नाना नाना आणि फक्त नाना. असंच वर्णन करावं लागेल "नटसम्राट" या चित्रपटाचं. तुमची मातृभाषा कोणतीही असूद्यात. हा चित्रपट तुमच्यासाठी नक्की एक  मेजवानी आहे. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकावर बेतलेला हा चित्रपट. महेश मांजरेकरांनी प्रचंड मेहनत घेऊन ही कलाकृती बनवली आणि नाना पाटेकरांनी आपल्याला मिळालेल्या भूमिकेचं खरोखर सोनं केलय.

गणपतराव बेलवलकर आपल्या अतिशय यशस्वी कारकीर्दीनंतर निवृत्ती घेतात. आपल्या कुटुंबीयांसोबत आता वेळ घालवायचा हे त्यांनी ठरवलेले असते. आपलं घर आणि इतर सगळी संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करून गणपतराव मोकळे होतात. आपल्या नवऱ्याचा हा निर्णय त्यांच्या बायकोला (गणपतराव चित्रपटामध्ये त्यांना प्रेमाने "सरकार" असं संबोधतात) फारसा पटत नाही पण त्या त्यांची साथ देतात. सगळं काही गणपतरावांना वाटतं असतं तसं घडतं नाही आणि अखेरीस ते दोघे घर सोडून बाहेर पडतात. आणि तिथून पुढे घडलेला  सगळा भाग हा फक्त चित्रपटगृहामध्येच पहावा असं मी म्हणेन. 

काही संवाद तुम्हाला हसायला लावतात पण पुढच्या क्षणाला तितकेच विचारातदेखील पाडतात कारण ते वास्तव असल्याची तुम्हाला लागलीच जाणीव होते. नानांची प्रमुख भुमिका असली तरी मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे, सुनिल बर्वे यांच्या भूमिकांचे महत्व कमी होत नाही. नेहा पेंडसेने आपल्या कारकीर्दीमध्ये आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याहून पूर्णपणे वेगळी अशी भूमिका तिने या चित्रपटामध्ये साकारलेली आहे. तिची भुमिका हा माझ्यासाठी एक धक्का होता हे मात्र निश्चित. माझा मित्र चैतन्य म्हणाला त्याप्रमाणे मेधा मांजरेकरांचे डोळेच इतके बोलके आहेत की त्यांनी फक्त कॅमेराकडे पाहिलं की प्रेक्षकांना त्यांना काय म्हणायचे आहे हे लक्षात येतं. हा त्यांच्या अभिनयाचा विजय आहे असे मी म्हणेन. काही जणांना चित्रपटामधले काही प्रसंग नाटकासारखे वाटतील पण माझ्या मते त्याची गरज होती म्हणून दिग्दर्शकाने ते प्रसंग तसे केले असतील. विक्रम गोखलेंची भूमिका थोडी अजून लांबीची असती तर कदाचित अजून मजा आली असती. डॉक्टर श्रीराम लागूंनी केलेली भूमिका प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. पण ही भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य नानांनी यशस्वीरीत्या पेलेलेलं आहे असं मी म्हणेन.  

नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोन प्रचंड ताकदीच्या अभिनेत्यांची जुगलबंदी पहायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा. नाना पाटेकरांचे वजनदार मोनोलॉग ऐकायचे असतील तर हा चित्रपट नक्की बघा. भूमिकेचं बेअरिंग म्हणजे काय असतं हे पाहायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. संवादफेक म्हणजे काय असतं, प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने खिळवून ठेवणे म्हणजे काय असते हे पहायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. मराठी चित्रपटसृष्टी मधली अलीकडच्या काळातली एक उत्कृष्ट कलाकृती पहायची असेल तर हा चित्रपट नक्की बघा. हा चित्रपट न पाहणे ही आपली चूक झाली असं नंतर वाटेल इतका जमून आलाय हा चित्रपट. लवकर जा. 

Friday, December 11, 2015

शरद पवार

उद्या माननीय शरद पवार यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या मनातले काही विचार मांडायचा हा प्रयत्न

मी दहावी मध्ये होतो तेव्हाची गोष्ट. माझ्या सराव परीक्षेदरम्यान साहेबांचा साठावा वाढदिवस आला. आता साठावा वाढदिवस म्हटल्यावर त्याचा भरपूर गाजावाजा झाला. संपूर्ण पेपर भरून साहेबांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती होत्या. सकाळने त्या वेळेस एक १५-२० पानी पुरवणी काढली होती. त्यामध्ये साहेबांवर बरेच लेख होते. दादांनी मला ती पुरवणी पूर्ण वाचायला सांगितलीमाझी सराव परीक्षा असल्याने मी रोज रात्री झोपताना एक दोन लेख वाचून झोपत असे. साधारण - दिवसात ती पुरवणी वाचून मी पूर्ण केली. त्यानंतर माझ्या मनामध्ये का कोण जाणे साहेबांबद्दल एक विशेष असा आदर निर्माण झाला. आणि तो आजतागायत कायम आहे.

महाराष्ट्राला साहेब नवे नाहीत. साहेबांची राजकीय दूरदृष्टी मी वेगळी काय सांगणार. लहानपणी दादांनी सांगितलेला एक किस्सा इथे नमूद करावासा वाटतो. आत्ताच्या शिरूर मतदारसंघामध्ये तेव्हा माननीय कै. किसनराव बाणखेले आणि माननीय कै. रामकृष्ण मोरे या दोघांमध्ये लोकसभेसाठी लढत होती. मोरेसरांच्या प्रचारासाठीची  शेवटची सभा मंचरला ठेवली होती. साहेब स्वतः सभेला हजर होते. सभेच्या दरम्यान साहेबांनी अंदाज घेतला. सभा संपल्यानंतर गाडीमध्ये बसताना साहेबांनी सरांना सांगितले की आज रात्रीमध्ये काही करता आले तर ठीक नाहीतर आपले सीट गेले म्हणून समजा. आणि खरोखर त्या निवडणूकीमध्ये मोरे सर पराभूत झाले. फक्त सभेमध्ये बसलेल्या लोकांच्या कलावरुन साहेबांनी अंदाज बांधला होता आणि तो खरा ठरला. आजकाल लोकांच्या मनाचा इतका अभ्यास असलेले नेते दुर्मिळ आहेत.

साहेबांची मला भावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं गाडीमध्ये ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसणे. दिल्ली किंवा इतर कुठेही असले आणि गाडीमध्ये प्रवास करायचा झाला तर साहेब कायम ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसतात. महाराष्ट्रामध्ये निवडणूकांच्या वेळी गावोगावी फिरताना बऱ्याचदा ते ड्रायव्हरला रस्तादेखील सांगत असतात. आजमितीला साहेबांच्या इतका महाराष्ट्र माहीत असलेला दुसरा राजकीय नेता सापडणार नाही

साहेबांची भाषणाची शैली देखील इतरांपेक्षा वेगळी. प्रत्यक्ष त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मला - वेळाच मिळाली आहेक्वचित टीका केलीच तर तीसुद्धा मोजक्या पण शेलक्या शब्दात. कधीकधी अचानक भाषण चालू असताना गर्दीमध्ये बसलेल्या एखाद्या कार्यकर्त्याचे नाव घेऊन जणू काही त्याच्याशीच बोलतो आहोत अशी जनमानसाला आपलीशी करून घेणारी भाषणशैली. आमचे जुन्नरचे स्नेही सुनील ढोबळे यांनी सांगितलेली एक आठवण इथे सांगाविशी वाटते. आळेफाट्याला साहेबांची सभा होती. त्या सभेमध्ये भाषण करताना साहेबांची नजर गर्दीमध्ये बसलेल्या एका जुन्या कार्यकर्त्यावर गेली. आणि पुढच्या क्षणी साहेबांनी काय चिमा बरोबर ना? असा प्रश्न त्याला केला. इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपले नाव साहेबांच्या लक्षात आहे असे वाटून तळेरानच्या चिमा पाटील या कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आले. हे केवळ उदाहरण आहे. काहींना हा पब्लिसिटी स्टंट वाटेल पण हे असं अनेकदा आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडल्याचे सांगणारी माणसं देखील भेटतात

राजकारणाबरोबरच साहित्य आणि कला ह्या क्षेत्रांमध्येदेखील तितकीच रुची असणाऱ्या निवडक नेत्यांमध्ये साहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. १९८० साली घाशीराम कोतवाल नाटकाचा परदेशदौरा आखला गेला होता. ह्या दौऱ्याला काही लोकांचा विरोध होता. त्यात शिवसेनेचे नेते प्रमोद नवलकर ह्यांनी घाशीराम विरोधात कोर्टात याचिका दाखल करून हा प्रदेश दौरा धोक्यात आणून ठेवला. साहेबांनी नाटकवाल्या मंडळीना घेऊन मातोश्री गाठलं. तिथेसुद्धा चर्चेतून काही मार्ग निघाला नाही. कारण त्या साहेबांनी घाशीरामच्या बाजूने निकाल लागला तरी शिवसैनिक विरोध करतील अशी तंबी दिलेली. अखेरीस पवार साहेबांनी हा दौरा होणारच असं सांगून जब्बार पटेल आणि इतरांना पुण्याला पाठविले. ठरल्याप्रमाणे कुठेही कुणालाही कळता हे सगळे कलाकार एके दिवशी पुण्याहून विमानाने मुंबईला दाखल झाले आणि दुसऱ्या  विमानाने परदेशी गेले. अलीकडेच सतीश आळेकरांचा याबाबत सविस्तर माहिती देणारा लेख लोकसत्तेत प्रसिद्ध झाला होता. त्याची लिंक सोबत देत आहे



२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला बरेच लोक साहेबांवर टीका करताना दिसले. साहेब केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना इतक्या हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे वगैरे. त्यानंतर भाजप सरकार आले आणि मी सहजच एका मित्र टीकाकाराला विचारले की भारताचे सध्याचे कृषीमंत्री कोण रे? त्याला सांगता आलं नाही. ह्यातून काय ते मी समजलो. ज्यांच्या वयापेक्षा जास्त वर्षे साहेब राजकारणात आहेत अशा मुलांनी साहेबांचा एकेरी उल्लेख केलेला दिसला की मला त्यांची कीव येते. बाकी जाऊद्यात हो, पण कमीतकमी त्या माणसाच्या वयाची तरी जाण ठेवा. आजमितीला सत्तेत नसूनही दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा चेहरा म्हणून साहेबांची ओळख आहे. केवळ नऊ खासदारांच्या जोरावर सरकारला धारेवर धरू शकणारे हेच ते साहेब. किल्लारी भूकंप झाल्यानंतर मदतकार्याला दुर्घटनेच्या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचणारे हेच ते साहेब. महाराष्ट्रामध्ये आज दिसणारा बहुतांशी विकास घडवणारे हेच ते साहेब

आयुष्यात कधी संधी मिळालीच तर ज्या निवडक लोकांना भेटायला मला आवडेल त्यात साहेबांचं नाव अग्रक्रमाने येते. बघू कधी मिळतेय संधी

टीप - सदर लेखावरून मी साहेबांच्या पक्षाचा समर्थक आहे असा समज करून घेऊ नये